सकारात्मकतेसाठी प्राणोपासना

0
197

योगसाधना ः ५११
अंतरंग योग ः ९६

 • डॉ. सीताकांत घाणेकर

आज ह्या कठीण प्रसंगी नकारात्मक विचार बंद करून अत्यंत तेजस्वी असे सकारात्मक विचार आत्मसात करण्याची आमच्यातील प्रत्येकाला अत्यंत गरज आहे. त्याचबरोबर साध्या पैलूंनी आणि मार्गांनी शास्त्रशुद्ध योगसाधना करणे गरजेचे आहे. त्यांत प्राणोपासनादेखील येते.

अंतरंगयोगामध्ये आपण भारतीय संस्कृतीतील विविध प्रतीकांवर विचार करताना – ‘मडके’ ह्या विषयावर चिंतन करतो आहोत.
विश्‍वात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक व्यक्ती मृत्युमुखी पडताहेत. मृत्यूनंतर प्रेताची अंत्यक्रिया होते. भारतात प्रेताला अग्नी देतात.
मडक्यातील अग्नी स्वतःच्या घरातून जाण्याची एक भावपूर्ण प्रथा भारतात प्रत्येक ठिकाणी आहे. त्यामागे एक सुंदर भाव आहे, तत्त्वज्ञानदेखील आहे. ज्या अग्नीने मला आजीवन सांभाळले, पाळले, पोसले- एवढेच नाही तर स्वतः जळून मला जीवन दिले- लहानाचे मोठे केले त्या अग्नीच्या ज्वाळांमध्येच जळण्यात जीवनाची कृतार्थता आहे.
पू. पांडुरंगशास्त्री आठवले ह्या संदर्भात लक्ष वेधतात…

‘अग्नेनमय सुपधा इत्ये अस्मा न्विश्वानि देव वधुनानि विद्वान|
सुयोध्यस्मज्जुहुराणमेनो भूविष्ठां ते नम उक्तिं विधेय॥

 • ‘अग्नीला प्रार्थना आहे की- हे अग्ने! विश्‍वाच्या सर्व तत्त्वांचा तू ज्ञाता आहेस. आम्हाला तू चांगल्या मार्गाने घेऊन जा. आम्हाला तो आनंददायक होवो. वाकड्या मार्गाकडे जाणारी आमची पापे तू पिटाळून लाव.’
  खरेच, हा वेदमंत्र अगदी यथार्थ आहे.
  प्रत्येकाला आनंद हवा. पण तो आनंद मिळविण्यासाठी माणूस अज्ञानाने अथवा विपरीत ज्ञानामुळे वाईट मार्गाकडे जातो. कदाचित त्याला थोडा वेळ आनंद मिळतही असेल. पण शेवटी तो पापात्माच ठरतो. म्हणून पापे पिटाळून लावणे अत्यंत गरजेचे आहे व चांगल्या मार्गाने जाणे अभिप्रेत आहे.

आपल्या जीवनात हे ज्ञान मिळाले तर अनेकजणांची अधोगती टळेल. पण बहुधा अग्नीची उपासना बंद झाली आहे आणि तसे ज्ञान घेणेही अगदी अल्प आहे. आम्हाला भोजन बनवताना, काळोख झाला तर, अग्नीची आठवण होते. पण ह्या प्रथेमागील सूक्ष्म तत्त्वज्ञान माहीतच नाही. एक फक्त कर्मकांड म्हणूनच ते केले जाते. त्यात भाव बिलकूल नाही.

त्याशिवाय आमच्या घरात, फ्लॅटमध्ये तसा पूर्वीसारखा पेटत असलेला अग्नी नसतोच. पूर्वी स्वयंपाकघरात, न्हाणीघरात तसा सतत पेटणारा अग्नी होता. नव्या पिढीला तर हे माहीतच नाही.
ह्या संदर्भात शास्त्रीजी काय म्हणतात बघूया-
‘‘परंपरेच्या रीतीमध्ये व्यवहाराचे मिश्रण करून शहाण्या लोकांनी शेणाच्या गोवरीच्या दोन तुकड्यांवर घासलेट ओतून त्यांना पेटवून मडक्यात ठेवून घेऊन जाण्याचे नक्की केले. ह्या क्रियेत व्यवहार व आदर्श ह्यांचा सुंदर समन्वय झालेला आहे. दोन्ही एकमेकांचे पूरक बनले आहेत.’’

जाणकार व्यक्तींनी ह्या मडक्याच्या प्रतीकामधून बोध घेऊन आपल्या जीवनाची वाट बदलणे अत्यावश्यक आहे. तरच जीवन कृतार्थ बनेल.
आज कोरोना महामारीत अशा विचारांची अत्यंत जरुरी आहे. कारण विश्‍वभर प्रत्येक ठिकाणी मृत्यू होत आहेत. मुख्य म्हणजे इथे कसलाही भेदभाव नाही- राष्ट्र, वंश, वर्ण, लिंग, स्थिती, शिक्षण… अनेक कुटुंबात एक-दोन… किंवा अधिक व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. कुठे कर्ती-सवरती स्त्री, कुठे कमवणारा पुरुष अथवा तरुण तर काही ठिकाणी वयस्क आईवडील. वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे अशा बातम्या वेळोवेळी ऐकायला येतात. जे जिवंत आहेत ते अत्यंत घाबरलेले आहेत. पुढील आयुष्य कसे घालवावे हेच त्यांना समजत नाही. ते एक मोठे कोडेच आहे. अनेकजण भांबावून गेलेले आहेत. त्यातच भर म्हणून आर्थिक समस्या- नोकर्‍या नाहीत, धंदा चालत नाही, मुलांच्या शिक्षणार्थ कष्ट… सारांश, सगळेच दुःखदायक.
म्हणूनच जीवनाचे तत्त्वज्ञान बालपणापासून शिकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पूर्वी भारतात ऋषींच्या आश्रमांत जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन मिळत होता. अशावेळी उपासना, भक्ती फारच महत्त्वाची. भगवंताची भक्ती आहेच. पण आणखी उपासना म्हणजे प्राणोपासना!
मृत्यू व प्राण ह्यांचा अगदी जवळचा, निकटचा संबंध आहे. कुणीही मृत्युमुखी पडला की आपण म्हणतो की त्याचा ‘प्राण’ गेला. पण हे अर्धसत्य आहे. कारण खरा जातो तो त्या व्यक्तीचा जीवात्मा. आता त्याच्याबरोबर प्राणही जातो हेदेखील सत्य आहे.
आपण तसे म्हणतो याचे कारण म्हणजे शरीरातून आत्मा निघून जातो तो आम्हाला दिसत नाही. कारण तो अदृश्य व अतिसूक्ष्म आहे. प्राण देखील तेवढाच सूक्ष्म अदृश्य शक्ती आहे. पण प्राण व श्‍वास ह्यांचे नाते आहे-

 • जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत श्‍वास चालू असतो. प्राण निघून गेला की श्‍वास बंद होतो.
  खरे म्हणजे – आत्मा जन्माच्यावेळी (गर्भावस्थेत) प्राणशक्ती बरोबर घेऊन येतो व मृत्यूच्यावेळी प्राण घेऊन जातो. पण दोन्हीही सूक्ष्म, अदृश्य शक्ती आहेत. पण श्‍वास स्थूल असल्यामुळे त्याची जाणीव आम्हाला होत असते.
  तसे बघितले तर प्राण आहे म्हणून ही सर्व सृष्टी आहे. तो सर्व विश्‍वात, चराचरांत सामावून आहे.
 • जिवंत प्राणी-पशू-पक्षी-जीवजंतू
 • वृक्ष वनस्पती
 • पंचमहाभूतें- पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश…
 • सागराच्या तळावर लाटा येतात त्यात प्राण आहे.
 • अग्नीच्या उष्मेत प्राण आहे.
 • आकाश देखील प्राणाव्यतिरिक्त नाही.
 • दगड-धोंड्यातदेखील प्राण आहे.
  एका रशियन वैज्ञानिकाने एक विशिष्ट कॅमेरा तयार केला. तो वापरून सर्वांचे फोटो काढले. त्याला ‘किर्लीयन फोटोग्राफी’ म्हणतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा फोटो येतो त्यातील प्राणशक्तीमुळे.
  मानवाच्या हाताच्या बोटांचे फोटो काढले गेले- जसे बोटांचे ठसे असतात तसे. आता रंगीत किर्लीयन फोटो काढले जातात. व्यक्तीच्या भावनेप्रमाणे ते रंग बदलत जातात.
 • मन शांत असले, त्यात प्रेम असले तर हलका निळा रंग
 • मनात क्रोध, मत्सर असला तर तांबडा असतो…
  ह्या विषयावर सखोल संशोधन चालू आहे.
  विविध दगडांचे फोटो काढले
 • जुन्या मोडलेल्या मंदिराच्या फोटोत चांगली कंपने सापडली. कारण इतिहासकाळात त्या मंदिरांत सतत भक्ती, भजन, पूजा… केली जात होती.
  ‘प्राणिक हिलींग’ – ह्या क्षेत्रात ह्या विषयावर पुष्कळ संशोधन चालू आहे. साधकाची शक्ती वापरून रोगोपचार करण्यासाठीदेखील उपयोग केला जातो.

प्राण हा आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.
पू.पांडुरंगशास्त्री आठवले म्हणतात –
‘‘प्राणाच्या उपासनेशिवाय मानवाचे जीवन फुलत नाही. प्राणाची उपासना त्याच्या व्यक्तीजीवनाला, कुटुंबजीवनाला, समाजजीवनाला किंवा राष्ट्रीय जीवनाला प्राणवान बनवते. थोडक्यात सांगायचे झाले तर ही समग्र सृष्टी प्राणवान लोकांची आहे.’’
म्हणून आपले ऋषी म्हणतात-
‘‘वीरभोग्या वसुंधरा-’’

 • निष्प्राण लोक कोणाचेच कार्य पार पाडू शकत नाहीत, एवढेच नाहीतर त्यांचे अस्तित्व ह्या पृथ्वीवर भार बनून राहते.
  इतिहासाकडे नजर टाकली की अनेकवेळा भारतीय लोक मुडद्यासारखे झाले होते. त्यांच्या आचरणात प्राण नव्हता. हा अनुभव अनेकांच्या राज्यांत आपल्याला आला. भारतात ब्रिटिश, मुसलमान… गोव्यात पोर्तुगीज… अशावेळी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी लोकांना प्रतिकारासाठी तयार केले. तेव्हा आपण म्हणतो-‘‘अमुक अमुक व्यक्तींनी सामान्यांच्या जीवनात प्राण फुंकला.’’
  भारतात अनेक उदाहरणे आहेत- छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस… असे अनेक.
  स्वामी विवेकानंदांसारख्या व्यक्तींनीदेखील आध्यात्मिक ज्ञान देऊन सामान्यांत प्राण फुंकला.
  आपल्या ऋषींनी जीवन, कार्य, समाज यांना प्राणवान बनवण्यासाठी पंचप्राणाची उपासना शिकवली आहे.
  स्वामी विवेकानंदांनी भगवंताकडे मागितले होते-‘‘मला शंभर नचिकेता दे. मी विश्‍वाचे स्वरूप बदलून टाकीन.’’ -नचिकेता म्हणजे वाजश्रवस ऋषींचा तरुण मुलगा. ज्याने यमराजाकडून आत्मविद्येचे ज्ञान आत्मसात केले आणि तेही मोठ्या हुशारीने, आत्मविश्‍वासाने, जिद्दीने. कठोपनिषदांत त्याची सर्व रोचक कथा व सर्व तत्त्वज्ञान शिकायला मिळते. नचिकेता हे प्राणवान लोकांचे प्रतीक आहे.
  शास्त्रीजी सांगतात-
  ‘‘नचिकेता म्हणजे प्रलोभनाला बळी न पडणारा, भीतीमुळे न पळणारा तसाच भोगाने भ्रष्ट न होणारा. असे निष्ठावान मनुष्यच जगाला बदलवू शकतात.

आज ह्या कठीण प्रसंगी नकारात्मक विचार बंद करून अत्यंत तेजस्वी असे सकारात्मक विचार आत्मसात करण्याची आमच्यातील प्रत्येकाला अत्यंत गरज आहे. त्याचबरोबर साध्या पैलूंनी आणि मार्गांनी शास्त्रशुद्ध योगसाधना करणे गरजेचे आहे. त्यांत प्राणोपासनादेखील येते.
आपल्या योगसाधकांना ह्या संदर्भात ज्ञान आहेच.
(संदर्भ- संस्कृती-पूजन- पू. पांडुरंगशास्त्री यांच्या प्रवचनावर आधारित.)