सकारात्मकतेतून आत्मशक्ती वाढवा!

0
12

(योगसाधना- 595, अंतरंगयोग- 180)

  • डॉ. सीताकांत घाणेकर

प्रत्येक व्यक्तीने थोडीफार तडजोड करणे अपेक्षित असते. प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावामध्ये चांगले-वाईट गुण असतीलच; पण स्वतःला काही विशिष्ट गोष्टी पटत नाहीत म्हणून दुरावा निर्माण करू नये. त्यामुळे कौटुंबिक व सामाजिक वातावरण प्रदूषित होते.

मानवी जीवन हजारो वर्षांपासून या ग्रहावर अस्तित्वात आहे. विविध राष्ट्रे, वर्ण, रंग, भाषा, संस्कृती… कशातही ताळमेळ नाही. या विविधतेमध्येच जीवनाची सुंदरता आहे, नाहीतर जीवन निरस वाटले असते. पण जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन योग्य असायला हवा. त्याप्रमाणे ज्ञान व संस्कार असणे आवश्यक आहे.
चौफेर नजर फिरवली तर लगेच लक्षात येते की, असे ज्ञान सहसा दृष्टिपथात येत नाही. त्यामुळे अनेक छोट्या-मोठ्या समस्या मानवासमोर ‘आ’ वासून उभ्या आहेत. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी आहे. त्यात वावगे काहीही नाही. तशी अपेक्षादेखील ठेवू नये. पण एकवाक्यता नसल्यामुळे छोटासा मुद्दा- विषय मोठा दिसायला लागतो. त्यामुळे मतभेद वाढतात. कौटुंबिक, सामाजिक स्वास्थ्य बिघडते.
मानव एकटा जगू शकत नाही. पण दुसऱ्याबरोबर त्याचे पटेलच असे नाही. काहीजण कटकट नको म्हणून तडजोड करतात. यासंदर्भात शास्त्रकार म्हणतात-
न एकाकी रमते, द्वितीयात वै भयं भवती।

  • माणूस एकटा रमत नाही. दुसऱ्याचे त्याला भय वाटते. बरोबर आहे. कारण मानवी स्वभाव समजणे अत्यंत कठीण काम आहे. बहुतेकजण विवाह करतात. मुले वगैरे झाली की त्यांना संसार सुखाचा वाटतो. पण त्याबरोबर जबाबदाऱ्याही वाढतात. ताणतणाव वाढतो. बाहेरून सगळे व्यवस्थित दिसले तरी आतून तसे असेलच याची खात्री नाही. काहीजण हे असे घडेल म्हणून विवाहबंधनात अडकतच नाहीत. इतर काहीजण संसार सोडून संन्यास घेतात. एक विचार येतो की, हा पळपुटेपणा आहे का? की त्यांचा निर्णय योग्य आहे?
    अध्यात्मशास्त्रात या विषयावर सुंदर मार्गदर्शन आहे-
    ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हे त्रिकालाबाधित सत्य आहे. हा सिद्धांत सर्वमान्य आहे. तर मग दरएक व्यक्तीचे सर्वांकडे कसे जुळणार? पण याचा अर्थ असा नाही की सांसारिक प्रवृत्ती सोडून द्यावी. प्रत्येक व्यक्तीने थोडीफार तडजोड करणे अपेक्षित असते. प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावामध्ये चांगले-वाईट गुण असतीलच; पण स्वतःला काही विशिष्ट गोष्टी पटत नाहीत म्हणून दुरावा निर्माण करू नये. त्यामुळे कौटुंबिक व सामाजिक वातावरण प्रदूषित होते. आज बहुतेककडे असेच वातावरण आहे.

याला उपाय म्हणजे दुर्गुणच न बघता सद्गुणदेखील बघावे. त्या दुर्गुणांकडे थोडावेळ दुर्लक्ष करावे. ती व्यक्ती आहे तसा स्वीकार करावा. व्यक्तीपासून दूर जाऊ नये. आत्मीय संबंध तोडू नयेत.
स्वतःचे मूळ संस्कार आठवावे. आत्म्याचे गुण आठवावे- ज्ञान, सत्य, प्रेम, शांती, सुख, आनंद… त्यांचे भान क्षणोक्षणी ठेवावे. काही घटनांमुळे, समस्यांमुळे त्यात व्यत्यय अवश्य येतो. जसे नदीच्या पाण्यावर दगड मारला तर त्यावर लहरी उठतात- लहान-मोठ्या. पण नंतर पाणी अगदी शांत होईल. तसेच काही कारणांमुळे पाणी गढूळ झाले तर आतला तळ थोडावेळ दिसणार नाही. पण थोड्या वेळाने कचरा खाली गेला की खालचा तळ अगदी साफ दिसतो. आपल्या मनाचेदेखील तसेच आहे. घटना घडली की आपले षड्रिपू- काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर व अहंकार- विविध प्रमाणात उफाळून येतात. केव्हा केव्हा विशिष्ट नकारात्मक भावनांमुळे विपरित बोल मुखात येतात. कृतीदेखील घडू शकते. कारण आपले नियंत्रण पंचज्ञानेंद्रिये व पंचकर्मेंद्रियांवर असेलच असे नाही. त्यामुळे बाहेरचे वातावरण बिघडते व अंतर्मनदेखील प्रदूषित होते. मनाची शांतता नष्ट होते.

केव्हा घटना संपते पण आपल्या आंतरिक मनात विचार चालूच असतात. याचा आत्मशक्तीवर दबाव पडतो. ती कमी होते. हे विचार किती वेळ चालू असतील याची खात्री नसते- काही मिनिटे, तास, दिवस, महिने, वर्षे… किंवा अनेक जन्म!
केव्हा केव्हा समोरची व्यक्ती कदाचित घटना विसरून जाते; पण आपल्या मनात तिची आठवण झाली अथवा ती व्यक्ती प्रत्यक्ष भेटली तरी नकारात्मक विचारांची शृंखला चालू राहते. त्यामुळे व्यक्तीचे जास्त नुकसान होते- शारीरिक, मानसिक, भावनिक व आत्मिकदेखील.
यासाठी सुरुवातीला थोडी माघार घ्यावी. आपले मूळ गुण आठवावे. व्यक्तीबद्दल सहानुभूती ठेवावी. स्वतःची नम्रता कायम ठेवावी. असे केले तर वातावरण शांत राहील. व्यक्तीचे स्वास्थ्य सांभाळले जाईल व आत्मशक्ती वाढल्यामुळे पुढील समस्यांचा सामना करायला सोपे जाईल.
केव्हा केव्हा शांतपणे चर्चा केली तर विषय संपून जाण्याची शक्यता वाढते. वादविवाद टळू शकतात. समाधानकारक उपाय सुचतो. त्यानंतरदेखील त्या व्यक्तीला आपण चांगली सकारात्मक कंपने पाठवू शकतो. त्यासाठी व्यक्तीला अंतर्मनासमोर आणून तिच्या गुणांचे कौतुक करावे. तिला सुख-समाधान-सुयश मागावे.

ज्यांनी ज्यांनी हा मार्ग अनुसरला व अनुभवला त्यांचे अनुभव ऐकण्यासारखे असतात. पण आजच्या शिक्षणपद्धतीत असे शिक्षण दिले जाईल याची खात्री नाही. याचे एक मूळ कारण म्हणजे अध्यात्मशास्त्र हा विषयच शिकवला जात नाही. उलट आध्यात्मिक म्हणजे धार्मिक असा गोड गैरसमज असतो.
अध्यात्म म्हणजे आत्म्याचे शास्त्र- जो आत्मा अमर, अजर, अविनासी, निर्विकारी, निरहंकारी असतो. त्याला एक गोष्ट पक्की माहीत असते- दया, क्षमा, शांती तेथे देवाची वसती. आणि प्रत्येकाला शांतीचीच अपेक्षा असते- आत व बाहेर. आपणातील बहुतेकजण ती शांती बाहेरूनच कुठूनतरी मिळेल अशी आशा ठेवतात. एका पवित्र शांत ठिकाणी- मंदिर, निसर्गरम्य ठिकाण अथवा कुणा संताकडून. ते विसरतात की ‘शांती’ हा आत्म्याचा सप्तगुणांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. त्यांची स्थिती त्या कस्तुरीमृगासारखी होते. कस्तुरी त्याच्या बिचाऱ्याच्या बेंबीत असते. त्याला जो सुगंध येतो, तो त्याच्याच शोधात वणवण सगळीकडे फिरतो. अगदी शेवटी मृत्युसमयी तो जेव्हा जमिनीवर कोसळतो तेव्हा त्याला साक्षात्कार होतो की जी कस्तुरी आपण शोधत होतो ती तर त्याच्याकडेच, त्याच्याच शरीराच्या एका छोट्याशा भागात आहे. यामुळेच भारतीय संत-महापुरुषांनी अध्यात शिक्षणाचा प्रेमळ आग्रह ठेवला होता. उपनयन व्रत झाल्यानंतर स्त्री-पुरुष सगळेच ऋषींच्या आश्रमात जाऊन मानव विकासाची सर्व शास्त्रे अभ्यासीत असत.

आजच्या काळात बहुतेकांना ते वेद-उपनिषदांचे शिक्षण अनावश्यक वाटते. अर्थात, अपवाद आहेतच. पण एक आशेचा किरण म्हणजे अनेकांना हे ज्ञान जरूरीचे आहे असे वाटायला लागले आहे. त्यामुळे भारतात व इतर देशांत अनेक संस्था या विषयावर कार्यरत आहेत. त्यांची हजारो केंद्रे आहेत. लाखो अनुयायी विविध पद्धतीने सुंदर कार्य करताहेत.
आपण आशावादी बनूया. एक दिवस- जवळच्या भविष्यात- विश्वाची नकारात्मक स्थिती बदलून सकारात्मकतेकडे प्रत्येक व्यक्ती वळलेली दिसेल. सगळीकडे शांतीचे साम्राज्य येईल. अशा या सत्ययुगाची फक्त वाट पाहण्यापेक्षा आपण प्रत्येकजण आपला खारीचा वाटा उचलूया. संस्कृती मातेचे थोडेतरी ऋण फेडूया.

आपले योगसाधक या मार्गावर अनुक्रमण करताहेत… आपणही त्यांच्या कळपात मिसळूया…
(संदर्भ ः प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय यांचे साहित्य)