Home आयुष संस्कार सणांचे ः गुढीपाडवा

संस्कार सणांचे ः गुढीपाडवा

0
  • प्रा. रमेश सप्रे

गुढी हा काही इतर ध्वजांप्रमाणे साधा ध्वज नसतो. अनेक वस्तू एकत्र बांधून गुढी उभारली जाते. या साऱ्या वस्तू प्रतीकात्मक संदेश देणाऱ्या असतात नि यातच जीवनसंस्कार दडलेले असतात. गुढीपाडवा हा केवळ एक सण नाही तर विविध संदेश देणारा तसेच संकल्प नि संस्कार घडवण्यासाठी प्रेरणा देणारा भाग्यदिवस आहे, पर्वणी आहे.

आपला भारत ही जशी संतांची भूमी आहे, तशी सणांचीही भूमी आहे. असा एकही महिना नाही ज्यात एकही सण नाही. त्याचप्रमाणे प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत प्रत्येक तिथीला सण आहेच. यामुळे आपली संस्कृती अनेकरंगी, अनेकढंगी बनलेली आहे. प्रत्येक राज्याचा वर्षारंभ निराळा, त्याचा सण वेगळा, तो साजरा करण्याची पद्धतही प्रत्येकाची वेगळी. इतकी विविधता असलेला दुसरा देश या पृथ्वीतलावर नाही. सणाचा म्हणून एक खास संस्कार असतो, पण तो आपण स्वतःवर घडवून घ्यावा लागतो.

गुढीपाडवा
या सणाशी संबंधित अशा अनेक कथा रामायण, महाभारत तसेच इतर पुराणग्रंथांत येतात. एखादी चांगली, युगप्रवर्तक घटना घडली की त्याचा उत्सव साजरा केला जातो. मग श्रीरानं केलेला रावणवध असो किंवा चौदा वर्षांचा वनवास संपवून राम-सीता-लक्ष्मण अयोध्येत परतलेले असोत; गुढ्या उभारून त्यांचं स्वागत केलं जाणारच. जोडीला इतरही काही गोष्टी येणारच.

नवीन वर्षाचा आरंभ ही आनंददायी घटना असते. अनेक इच्छा, आशा, आकांक्षा, अनेकांची अनेक ध्येयं, स्वप्नं या दिनाशी जोडलेली असतात, वर्ष सुरू होतं त्या दिवशीच्या सूर्योदयापासून. म्हणून गुढीपाडव्याला गुढी सूर्योदयाला उभारतात. जणू सूर्याच्या पहिल्या किरणाचं स्वागत त्याच्या दिशेनं गुढी म्हणजेच ध्वज उभारून केलं जातं. गुढीला ‘धर्मध्वज’ असंही म्हणतात. ती जणू सांगत असते- ‘आता नव्या वर्षात नवीन धर्मसत्ता उदयाला येणार.’
गुढी हा काही इतर ध्वजांप्रमाणे साधा ध्वज नसतो. अनेक वस्तू एकत्र बांधून गुढी उभारली जाते. या साऱ्या वस्तू प्रतीकात्मक संदेश देणाऱ्या असतात नि यातच जीवनसंस्कार दडलेले असतात.

प्रथम एक साधा कळक (बांबू) घेतला जातो. तो उभारल्यावर उंच दिसण्यासाठी पुरेसा लांब असावा लागतो. याचाही एक संस्कार असतो की जीवनात उच्च ध्येय बाळगा किंवा ‘नॉट फेल्युअर बट लो एम इज अ क्राईम’ म्हणजे ‘अपयश नव्हे तर छोटं ध्येय (उद्दिष्ट) हा गुन्हा आहे.’ जीवनाला उच्चतेचा ध्यास असावा हा गुढीचा संदेश नि संस्कारही आहे.
गुडीपाडवा हा खास कुटुंबाचा, संसाराचा सण आहे म्हणून याला ‘संसारपाडवा’ असेही म्हटले जाते. संसाराला आवश्यक अशा महत्त्वाच्या मूलभूत गोष्टी बांधूनच गुढी सजवली जाते. प्रत्येकाला अन्न-वस्त्र-निवारा यांची गरज असते. त्यापैकी वस्त्र हे गुढीला बांधलं जातं. नवं, रेशमी, चांगलं वस्त्र निवडण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. यानंतर गुढीच्या टोकावर एक धातूचं भांडं उपडं बांधलं जातं. भांड्याशिवाय संसार अशक्य आहे. चांगलं वस्त्र आणि नवं भांडं बाधलं की गुढी तयार झाली असं होत नाही. नवीन वर्षात सर्वांना काही हवेसे तर काही नकोसे प्रसंग समोर येणारच. या गोड आणि कडू प्रसंगांचं प्रतीक म्हणून कडुनिंबाचा टाळा (लहान फांदी) बांधून वर साखरेच्या पदकांची माळ घातली जाते. शिवाय निसर्गाची देणगी म्हणून आंब्याची शुभसूचक पानं, फुलांचा हारही बांधला जातो. अंतर्मुख होऊन या साऱ्या वस्तूंवर चिंतन केले तरच त्यांचे संस्कार आपल्याला जीवनात साकारता येतात.

गुढीपाडव्याला गोड पक्वान्नं करतातच. पण त्यापूर्वी सकाळी कडुनिंबाची तीनचार पानं नि कडू चटणी- आवडली नाही तरी- घ्यावी लागतेच. जीवनातील साऱ्या कटू प्रसंगांना, संकटांना टाळता येत नाही. काहींचा स्वीकार करावाच लागतो. हे अनुभवायचं असतं कडुनिंबाची पानं नि कडू चटणी खाऊनच. कडुनिंबाची पानं खूप औषधी असतात. त्यांच्या सेवनाने साऱ्या कुटुंबाचे आरोग्य सांभाळले जाते. यासाठी कृतज्ञतेचा संस्कारही घडावा लागतो.
आपण कधी विचार केलाय का, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण सर्व पदार्थांना खाली खेचतं. तसेच ते इमारती, वाहनं, सामाजिक संस्था, माणसं, प्राणी अशा सर्वांना धरून ठेवतं. सर्व पदार्थांची प्रवृत्ती खालच्या दिशेनेच असते.

आपण जे अन्न खातो ते वरून (तोंडातून) खाली पोटात (उदरात) येतं. सर्व प्राणी जेवतात तेव्हा खाल्लेलं अन्न खालच्या (किंवा समांतर) दिशेनं जातं. पृथ्वीच्या पाठीवर फक्त झाडं ही खालून वर असं उलट्या दिशेनं अन्न-पाणी नेतात. मुळाशी घातलेलं खतपाणी कितीही उंच असलेल्या शेंड्यापर्यंत पोचवलं जातं. हा विशेष गुढी ताठ उभं राहून आपल्याला देते. गुरुत्वाकर्षण हे जसं पृथ्वीचं आहे नि ते खालच्या दिशेनं नेणारं आहे, यामुळेच पृथ्वीवर गतिमान आणि संपन्न संस्कृती विकसित झाली आहे.

खालून वर म्हणजेच सूर्यप्रकाशाच्या दिशेनं गुढी उभारली जाते. आपला जीवनप्रवासही असाच असावा. नाहीतर सगळेच खाली खाली करत जीवनाचं डबकं होईल.
पृथ्वीच्या खाली ओढणाऱ्या भौतिक गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेनं जाणारं एक आश्चर्यकारक गुरुत्वाकर्षण आहे अध्यात्म क्षेत्रातलं. ‘गुरुत्वाचं आकर्षण’ ही एक न संपणारी गोष्ट आहे, कारण गुरुत्व म्हणजे अनंतेला गवसणी घालण्यासारखं आहे. गुरू हा सदैव मोठा, महान होत असल्यानं तो साक्षात परब्रह्म असतो. त्याच्यासारखं बनण्यासाठी उलट्या गुरुत्वाकर्षणाचा संदेश गुढी देते. तसा संस्कार मात्र तिच्यापासून प्रेरणा घेऊन घडवला पाहिजे. यासाठी आवश्यक असते आध्यात्मिक उपासना. सूर्याच्या दिशेनं जाण्यात अशा उपासनेचा संस्कार आहे.

नूतन संवत्सर
वत्स म्हणजे वासरू किंवा वासरं. भारतासारख्या कृषिप्रधान देशाला गोवंशाची म्हणजे गायी-बैलांची अत्यंत आवश्यकता असते. नवीन वर्षात सर्वत्र आबादीआबाद होतो. सुखसमृद्धी येवो ही शुभकामना नि शुभप्रार्थना गुढीपाडव्याच्या दिवशी केली जाते. नुसत्या कामना, इच्छा उपयोगाच्या नाहीत, त्या साकार होण्यासाठी साधना-प्रार्थना या दोन्हींची गरज आहे. नववर्षदिनी गुढी हाही संदेश देत असते. त्याचं संस्कारात रूपांतर करण्यासाठी उदंड इच्छाशक्ती मात्र आपल्याकडे हवी.
गुढी सूर्याच्या स्वागतासाठी उभारणं नि सूर्याला निरोप देण्यासाठी उतरवणं या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. तसं पाहिलं तर ‘भारत’ या शब्दातील ‘भा’ हा प्रकाश, ऊर्जा दर्शवणारा शब्द आहे. ‘भास्कर’ म्हणजे सूर्य. अशा प्रकाशाच्या पूजेत रत (गुंतलेला) असलेल्यांचा देश तो भारत असा ‘भारत’ शब्दाचा एक अर्थ आहे. हा संस्कार घडवण्यासाठी सूर्योपासना नि त्याचं स्मरण करून देण्यासाठी गुढीपाडवा ही जीवनात चांगला बदल घडवून आणण्यासाठी उत्तम संधी असते.
गुढीपाडवा हा एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. आपल्या संस्कृतीत देवकार्य, धर्मकार्य सुरू करण्यासाठी शुभवेळ म्हणजेच मुहूर्ताला खूप महत्त्व आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नवी कार्यं, नवे उपक्रम, व्यवसाय सुरू केले जातात. सगळीकडे आनंदाचं, उत्साहाचं वातावरण असतं.
गुढीपाडवा हा केवळ एक सण नाही तर विविध संदेश देणारा तसेच संकल्प नि संस्कार घडवण्यासाठी प्रेरणा देणारा भाग्यदिवस आहे, पर्वणी आहे.
सण साजरा करण्याचा उत्साह सर्वांना असतो. त्यासाठी खूप कल्पकता नि नवनिर्माण क्षमता (क्रिएटिव्हिटी) अनेकजण वापरतात. पण फारच थोडे लोक चिंतन करून सणाचा नि त्याला जोडून येणाऱ्या गोष्टींचा स्वीकार करतात.
आजकाल असं चिंतन अनेक क्षेत्रांत होऊ लागलंय. वृत्तपत्रांच्या विशेष पुरवण्यांतही यावरचे लेख असतात. हे सारं घोड्याला पाण्यावर (नदीच्या काठी) नेण्यासारखं आहे. पाणी मात्र घोड्यालाच प्यावं लागतं. तसंच इतकी माहिती व विचार सर्वत्र तरंगत असताना आपण त्यांच्यापासून दूर राहाणं हा करंटेपणा आहे. जसं ‘दैव देतं पण कर्म नेतं’ असं म्हणतात ते सणांच्या संस्कारांबाबतीतही खरं आहे.
आपण संकल्प करूया, येथून पुढे येणाऱ्या प्रत्येक सणाची माहिती यू-ट्यूब, गुगल अशा समाजमाध्यमांतूनही मिळवू, पण स्वतःवर योग्य ते संस्कार घडवून ज्यांनी ही संस्कृती नि जीवनशैली घडवली त्यांच्या मनासारखे सण साजरे करूया, हा संकल्प तर करूयाच!