संस्कार व्यवसायाचे सैनिक

0
7

जीवन संस्कार- 27

  • प्रा. रमेश सप्रे

सैनिक आहे कोण? एक व्रत? एक वाण? हो, सैनिक आहे एक शपथ! देशासाठी नि देशवासीयांच्या रक्षणासाठी कोणताही विचार न करता रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत, जीवनातल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याग… सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी सदैव सिद्ध असण्याची शपथ!

‘बेटी, आज तुने मुझे रुलाया!’ हे उद्गार आहेत आपल्या देशाच्या पहिल्या पंतप्रधानांचे- पं. जवाहरलाल नेहरूंचे. आठवतो तो प्रसंग? हजारोंच्या उपस्थितीत प्रथमच ते गीत म्हटलं होतं गानसम्राज्ञी लता मंगेशकरने. आठवतं ते अमरगीत?
ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी।
जो शहीद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी॥
हे संपूर्ण गीत सर्वसामान्य लोकांचे आणि सैनिकांचे जीवनकार्य वर्णन (खरं तर विरोध व्यक्त) करणारं आहे. या ओळीच पहा ना! –
जब देश में थी दीवाली, वो खेल रहे थे होली।
जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली॥

एवढंच नव्हे तर-
अब अन्त-समय आया तो, कह गए के अब मरते हैं।
खुश रहना देश के प्यारों, अब हम तो सफर करते हैं॥
जीवनातील करुणरसाचं याच्यापेक्षा अधिक प्रत्ययकारी वर्णन नव्हे, चित्रण असेल काय? कवी- प्रदीप, संगीत- सी. रामचंद्र नि गायिका- लता मंगेशकर या त्रिवेणीने हा करुणरस मूर्तिमंत जिवंत केला. एकाच वेळी लक्षावधी डोळे पाणावले. ही केवळ युद्धात कामी आलेल्या सैनिकांसाठी श्रद्धांजली नव्हती, तर अखंड कार्यरत असणाऱ्या असंख्य सैनिकांना केलेली भावभीनी मानवंदना होती.

तसं पाहिलं तर सेनेतील नोकरी हा व्यवसाय नव्हे नि सैनिक हा व्यावसायिक नव्हे. मग सैनिक आहे कोण? एक व्रत? एक वाण? हो, सैनिक आहे एक शपथ! देशासाठी नि देशवासीयांच्या रक्षणासाठी कोणताही विचार न करता रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत, जीवनातल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याग… सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी सदैव सिद्ध असण्याची शपथ!
परवा एका जाहीर वादात एकानं विधान केलं नि प्रश्न विचारला- ‘रस्त्यावरील अपघातांत जेवढी माणसं मरतात तेवढे सैनिक युद्धात मरत नाहीत; मग सैनिकांचं एवढं कौतुक कशाला? त्यांचे एवढे गोडवे कशाला गायचे?’

  • उत्तर उघड आहे. अपघात नकळत घडतात. मरण्यासाठी म्हणून कोणी घराबाहेर पडत नाही. पण सैनिक ज्यावेळी सेनेत प्रवेश करतो, त्याक्षणीच त्यानं आपल्या मृत्यूवर स्वाक्षरी केलेली असते. अन्‌‍ रोज हजेरीपटावर स्वाक्षरी करताना कोणत्याही क्षणी येऊ शकणाऱ्या मृत्यूचं स्मरण तो स्वतःला करून देत असतो. खरोखर, तळहातावर स्वतःचं शिर घेऊनच सैनिक जगत असतो नि जेव्हा शेवटचा क्षण येतो तेव्हा मृत्यूला मारून अमर होतो… अशा जीवनातच सैनिकी जीवनाचे संस्कार दडलेले असतात.
  • सर्वात महत्त्वाचा संस्कार म्हणजे हसत-हसत समोर दिसणाऱ्या मृत्यूला सामोरं जाणं. सैनिक जणू म्हणत असतो- ‘ये मृत्यो, ये, तुला तीन पर्याय देतो. तुझ्याकडे यायला मी सदैव तयार आहे- तुझ्याशी हस्तांदोलन करू की तुझं चुंबन घेऊ की तुला आलिंगन देऊ? – हस्तांदोलन-चुंबन-आलिंगन हे तीन पर्याय आहेत. यातला कोणताही पर्याय तू निवड- मी तुला भेटायला सदैव तयार आहे.’
  • सैनिक म्हणजे जीवनातली शिस्त नि शिस्तीचं जीवन. पहाटे उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सीमेवर नसतो त्यावेळी सारं कसं घड्याळाच्या काट्यानुसार चालू असतं. अन्‌‍ सीमेवर सज्ज असताना कान-डोळे कायम उघडे ठेवून साऱ्या कृती करायच्या. शिस्तीचा संस्कार नसेल तर सैनिक हा सैनिकच नसेल.
  • सर्वस्वाच्या त्यागाची तयारी- केव्हाही कोणत्याही स्थळी-वेळी-प्रसंगी देशाची सेवा करण्याचं वचन, जीवनातील सर्वात उच्च नि अंतिम त्याग म्हणजे- आत्मबलिदान! जीवनदानापेक्षा वरचं, श्रेष्ठ दान असूच शकत नाही. हे दान देण्यासाठी सिद्ध असतो तो सैनिक.
  • संघभावना- हा अतिशय महत्त्वाचा संस्कार. एकट्या सैनिकाचं सैन्य बनत नाही; जसं एका घराचं गाव बनत नाही, एका फुलाचा हार बनत नाही किंवा एका वर्गाची शाळा बनत नाही. सैनिकाचं सारं जीवन इतरांसाठी, दुसऱ्यांसाठी, सर्वांसाठी बांधलेलं असतं. ही बांधिलकी (कमिटमेंट) म्हणजे सैनिक.
  • आज्ञापालन- वरिष्ठांची आज्ञा शब्दशः नि त्वरित पाळतो तो खरा सैनिक. इंग्रजीत एका कवितेच्या छान ओळी आहेत-
    देअर्स नॉट टु रिझन व्हाय, देअर्स इज बट टु डू ऑर डाय!
    म्हणजे त्यांनी ‘का’ हा प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारायचा नाही. त्यांच्यापुढे फक्त एकच पर्याय- ‘जगायचं किंवा मरायचं!’ लेफ्ट-राइट, लेफ्ट राइट, बाया-दाया, बाया-दाया… बस्स! विचार करायचा नाही- ‘बाया (डावा) आधी का? विचारायचं नाही ‘दाया’ (उजवा) नंतर का?’ आज्ञा मिळेल त्याप्रमाणे पालन नि चालन करायचं.

यासंदर्भात एक मार्मिक प्रसंग आहे-
अल्बर्ट आइन्स्टाइन, महान वैज्ञानिक (सायंटिस्ट) प्रयोगशाळेत आपल्या कामात मग्न झाला होता. त्यावेळी रस्त्यातून हिटलरच्या ‘एसएस’ सैनिकांची एक पलटण शिस्तीत संचलन (मार्चिंग) करत आली. त्यांचे ते एकाच वेळी एकाच उंचीपर्यंत उचलले जाणारे पाय, सोबतीला ‘लेफ्ट-राइट, लेफ्ट-राइट’ ही आज्ञा… एखादी चालणारी भिंत जशी दिसावी तशी ती पलटण जात होती. सर्वांच्या आग्रहावरून आइन्स्टाइन ते संचलन पाहायला बाल्कनीत आला… ती पलटण दृष्टीआड झाल्यानंतर सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात आकाशाकडे तोंड करून, हात पसरून म्हणाला- ‘ओ गॉड, बाय्‌‍ मिस्टेक यू हॅव गिव्हन देम ब्रेन्स, स्पायनल कॉर्ड वुड् हॅव बीन ॲम्प्ली सफिशंट फॉर देम?’ म्हणजे, ‘देवा, या सैनिकांना तू चुकून मेंदू दिलास, मज्जारज्जू (जी शरीराच्या पातळीवर यांत्रिक निर्णय घेते, जसे लेफ्ट-राइट!) पुरशी झाली असती!’
इथं आइन्स्टाइन सैनिकांना दोष देत नव्हता तर त्यांना बुद्धीचा बिल्कुल वापर करू न देता केवळ यांत्रिक आज्ञापालनाची अपेक्षा करणाऱ्या यंत्रणेचा तो निषेध करत होता. असो.

  • सैनिक हा सदैव सैनिक असतो (वन्स अ सोल्जर फॉर एव्हर अ सोल्जर) आणि सैनिकाला सुट्टी नसते. म्हणजे रजेवर असला तरी त्याच्यातला सैनिक रजेवर नसतो, तो सतत दक्ष नि कार्यक्षम असतो.
    एका चित्रपटात असाच रजेवर आलेला एक सैनिक आपल्या गल्लीतील दुकानदारांकडून (ज्यात त्याच्या वडिलांचं दुकान असतं) खंडणी गोळा करणाऱ्या, तेथील तरुण मुलींची छेडछाड करणाऱ्या (ज्या तरुणींत त्याची बहीणही असते) गुंडांना बेदम मारतो. त्यात त्यांच्या म्होरक्याचा अंत (खून) होतो. या सैनिकावर खुनाचा खटला भरला जातो तेव्हा कोर्टात स्वतःचा बचाव करताना तो न्यायाधीशांना विचारतो- ‘सीमेवर उभा असताना सीमेपलीकडील अनेक शत्रूंना मारलं तर ‘वीरचक्र’ मिळतं अन्‌‍ समाजातील गुंडांना (नीतिन्यायाच्या शत्रूंना) मारलं तर त्याबद्दल शिक्षा होते, हा कसला न्याय? सैनिक हा सदैव सैनिकच असतो. मी सैनिकाचं कर्तव्यच केलं आहे.’ न्यायाधीश शिक्षा सांगतानाही त्या सैनिकाच्या कृतीचं कौतुक करतात. पण शेवटी ‘कायदा गाढव असतो’ हेच खरं नाही का?
  • ‘भारतमाता’ हे सैनिकाचं सर्वोच्च दैवत असतं. ‘तिची सेवा सर्वोपरी’ हे त्याचं ध्येय असतं. आणि हे तो फक्त घोषवाक्य (स्लोगन) न ठेवता ब्रीदवाक्य (मोटो) बनवतो. यासाठी त्याला सदैव सलाम करायला हवा.
  • सियाचिनसारख्या बर्फाच्छादित प्रदेशात सीमांचं रक्षण करणारा सैनिक अतिमानव (सुपरह्यूमन) वाटतो. 4 डि.सें. तापमानाला पाणी गोठायला प्रारंभ होतो. शून्य अंश तापमानाला पाण्याचं गोठून बर्फ होतं. मग उणे 40 डि.सें. तापमानात रात्रंदिवस उभं असताना त्या रक्त गोठवणाऱ्या नि मांस थिजवणाऱ्या थंडीत ‘हिमदिव्य’ करणाऱ्या सैनिकाचं कार्य सीतामाईच्या अग्निदिव्यासारखं महत्त्वाचं नाही काय?
  • कोणत्याही क्षणी मृत्यूच्या जबड्यात प्रवेश करून जीवनाचा शेवट होईल अशा सैनिकांच्या बाबतीत म्हटलं जातं- ‘दे रिमेन अवेक सो दॅट वुई माइट स्लीप. दे डाय्‌‍ सो दॅट वुई माइट लिव्ह.’ म्हणजे आपण शांत झोपावं यासाठी ते डोळ्यात तेल घालून जागे असतात, तर आपण (आनंदात) जगावं म्हणून ते जीवाची आहुती देतात.
  • आजची युद्धं हायटेक, डिजिटल बनली आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वाढत्या प्रभावामुळे ती बरीचशी यंत्रमानव (रोबो), ड्रोन (मानवरहित यान), क्षेपणास्त्रं अशा पद्धतीनं लढली जाऊ लागलीयत. त्यामुळे सैनिकाचं (वैमानिकाचं, नौदल सैनिकाचं) महत्त्व कमी झालंय असं वाटलं तरी प्रत्येक देशाच्या त्रिदलात ‘जल-थल-गगन’ म्हणजे नौदल-भूदल-वायुदल यांच्यात अजूनही लाखो सैनिक आहेत. नवीन भरती होतच आहे. कारण यंत्रांकडे ‘तंत्र’ असतं, पण माणसाकडे ‘मंत्र’ असतो. देशभक्तीच्या मंत्रामुळेच भारतीय सैनिक हा केवळ यंत्र-तंत्रसज्ज सैनिकांना भारी पडतो. ‘हर हर महादेव’, ‘जो बोले सो निहाल, सत्‌‍ श्री अकाल’ या मंत्रातलं जादुई चैतन्य आजपर्यंत इतिहासात अपूर्व पराक्रम करून राहिलंय.
  • एक सदाहरित स्फूर्तिगीत आहे- ‘मानवतेच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू’- या मानवतेच्या रक्षणासाठी, माणुसकीच्या मशागतीसाठी खरंतर युद्ध लढायचं असतं. त्यात राष्ट्राच्या पवित्र सरहद्दीचं रक्षण करणं हा भाग महत्त्वाचा असतो. आठवा ते कारगिलचं 1999 सालचं युद्ध- त्यातले ते शौर्याचं प्रतीक असलेले जवान कॅ. विक्रम बात्रा, ले. मनोजकुमार पांडे अन्‌‍ त्यांचे सहकारी यांचं बलिदान व्यर्थ ठरलं नाही. उत्तर सीमेवरचा मानबिंदू, विजयशिखर असलेलं कारगिल आज या सैनिकांचं खरं स्मारक बनलं आहे, खरं ना?
  • युद्धविषयक चित्रपटात अनेक हृदयस्पर्शी प्रसंग असतात- राखी बांधणाऱ्या बहिणीची राखी बांधून झाल्यावर ऑर्डर आली म्हणून तसाच उठून देशातील कोट्यवधी भगिनींच्या रक्षणासाठी सैनिक धावतो, नुकताच विवाह झालेला नि पहिल्या (सुहाग) रात्रीसाठी उत्सुक असलेला नौजवान युवक रजा रद्द झाल्याची तार येताच लगेच आपल्या छावणीच्या दिशेनं जायला तयार होतो… अशा अनेकांना आपण आपल्या प्रिय व्यक्तींना पुन्हा पाहू याची खात्री नसते.
  • अशा असंख्य अज्ञात- अनामिक सैनिकांच्या मनाभावनांशी एकरूपता व्यक्त करणारं एक अतिमधुर मराठी चित्रपटगीत होतं-
    भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठी
    सैनिक हो तुमच्यासाठी… सैनिक हो तुमच्यासाठी!
  • मायभूमीचा ध्यास असलेल्या प्रत्येक सैनिकाला कल्पना असते, भारतवासीयांचा प्रत्येक श्वास आपल्यासाठी प्रार्थना करतोय. या जाणिवेनं कोणत्या तरी सीमेवर शेवटचा श्वास घेताना सैनिकांच्या हृदयाचा अखेरचा ठोका पडताना त्यांच्या तोंडात हेच शब्द असतात-
    कर चले हम फिदा जानो तन साथियों
    अब तुम्हारे हवाले वतन साथियों…
    याहून अधिक धन्य जीवन नि उदात्त मरण आणखी कुणाचं असू शकेल?