संस्कार जीवनप्रवेशापूर्वीचे…

0
3

जीवन संस्कार
लेखांक- 2

  • प्रा. रमेश सप्रे

बाळ प्रत्यक्षात जन्माला येण्याआधीपासून त्याची जडणघडण आईच्या गर्भाशयात, अंतरंगात होत असते. या जडणघडणीचेही विशिष्ट टप्पे असतात. जच्चा नि बच्चा यांची प्रकृती आणि तिचा विकास योग्य पद्धतीने घडावा या उद्देशाने धर्मशास्त्राच्या दृष्टीने काही जन्मपूर्व संस्कार केले जातात. त्यात आरोग्याबरोबरच इतर संस्कारांचाही समावेश असतो.

काही वर्षांपूर्वी दूरसंचार क्षेत्रात दूरध्वनीचे (लँडलाइन फोनचे) युग होते. त्यावेळी एका फोन कंपनीची एक मार्मिक जाहिरात होती. व्यक्तीचे जीवन नि जग कसे वायरने जोडलेले आहे हे फार प्रभावीपणे त्या जाहिरातीत दाखवले होते. इथे वायर म्हणजे नळी, ज्यातून तार गेलेली असते, जिच्यातून विद्युतशक्ती गेलेली असते… पहिली नळी ही गर्भावस्थेपासूनच कार्यरत होते, जिला ‘नाळ’ असे म्हणतात. मातेकडून गर्भाचे पोषण याच नाळेतून होते. जन्मानंतर ही नाळ कापून आई नि बाळ यांना स्वतंत्र केले जाते. पण आई घरात- शाळेत- व्यवसायाच्या-शिक्षणाच्या ठिकाणी- वसतिगृहात, इतकेच काय पण देशाच्याच नव्हे तर जगाच्या कोणत्याही भागात आपल्या मुलाशी जोडलेलीच राहते, अशी ती जाहिरात.

या जाहिरातीत नकळत सुचवलंय मुलावर घडणारे सर्व संस्कार, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा होणारा विकास या साऱ्याशी जीवनाच्या सर्व स्तरांवर सतत जोडलेली व्यक्ती म्हणजे आई. विशेष, बाळ प्रत्यक्षात जन्माला येण्याआधीपासून त्याची जडणघडण आईच्या गर्भाशयात, अंतरंगात होत असते. या जडणघडणीचेही विशिष्ट टप्पे असतात. त्यांच्याकडे विशेष लक्ष जावे आणि जच्चा (गर्भायश, गर्भधारणा) नि बच्चा (मूल) यांची प्रकृती आणि तिचा विकास योग्य पद्धतीने घडावा या उद्देशाने धर्मशास्त्राच्या दृष्टीने काही जन्मपूर्व संस्कार केले जातात. त्यात आरोग्याबरोबरच इतर संस्कारांचाही समावेश असतो.
तसे पाहिले तर या प्रत्येक संस्काराचे तीन पैलू असतात-

  1. विधी, 2. संस्कार, 3. समारंभ किंवा सोहळा.
    आजकाल विधी बऱ्यापैकी निष्प्राण नि यांत्रिक बनल्याने कर्मकांड होऊन बसलेयत. काही सन्माननीय अपवाद सोडले तर मंत्रांचे अर्थ न समजल्याने यजमानाच्या मनात सुयोग्य भाव निर्माण होत नाहीत. सारी कृत्ये फक्त ‘केली’ जातात; ‘अनुभवली’ जात नाहीत. इथे खरा संस्कारांचा संबंध येतो. संस्कार हे मना-बुद्धीवर घडायला हवेत. ‘सवय’ही देहाच्या अंगाने लागते.

तिसरा पैलू जो समारंभ किंवा सोहळा, त्याने काळाच्या ओघात ‘इव्हेंट’चे रूप धारण केलेय. त्यामुळे कर्कश्श, गदारोळी स्वरूप त्याला आलेय. खूप मोठ्या आवाजाचे संगीत, जोडीला किंचाळणारे आर.जे. – डी.जे. म्हणजे रेडिओ जॉकी नि डिस्को जॉकी! पहिला दिसत नाही पण रेडिओच्या माध्यमातून कानामनावर तीव्र आघात करत राहतो. दुसरा दिसतो कारण तो डिस्को जॉकी असतो. त्याचे एकच काम, बदलणाऱ्या ऱ्हिदम (तालां)चा हृदय विदीर्ण करणारा आवाज आणि जोडीला पाय थिरकवणारे, शरीर ढवळून टाकणारे नृत्य. अर्थात युवापिढीला हेच आवडते हेही मान्य केले पाहिजे. पण आपला विषय आहे जीवनसंस्कारांचा! असो.
जन्मपूर्व जे तीन संस्कार केले जातात, त्याचे विधी, मंत्र खपूच अर्थपूर्ण असतात. सर्व संबंधितांना सकारात्मक स्पंदने नि ऊर्जा देणारे असतात.

पहिला संस्कार- गर्भाधान ः पूर्वी लग्नं खूप लहान वयात होत असत. कधीकधी झोपलेल्या वधूला (कधीकधी नवरदेवालासुद्धा) मामा खांद्यावर घेऊन सप्तपदीचा विधी करत असत. म्हणजे हल्लीच्या भाषेतले ‘सात फेरे.’ ज्यावेळी नवरा वयात येई आणि बायको ऋतुस्नात होई (वयात येई) तेव्हा समारंभपूर्वक हा विधी करत. (आता करण्याचा प्रश्नच नाही!)
दक्षिण भारतातील चित्रपटात अशा प्रसंगी जेव्हा वयात आलेले पती-पत्नी बंद खोलीत, एकांतात असतात तेव्हा मामी-मावशी-आत्या-काकू अशा प्रौढ अनुभवी स्त्रिया त्या खोलीभोवती फेर धरून नृत्य करत, गीत म्हणत धमाल करतात. अतिशय सुसंस्कृत, सभ्य शब्दांत एकप्रकारे प्रथमच जवळ येणाऱ्या त्या जोडप्याला मार्गदर्शन करत असतात. (अशा प्रसंगीचे ‘रुक्मिणी रुक्मिणी’ हे गाजलेले चित्रपटगीत ऐकण्या-पाहण्यासारखे आहे.)
एकूण गर्भाधान संस्कार हा सर्जनशीलतेचा, नवनिर्मितीचा संदेश नि अनुभव देणारा असाच आहे. यावेळचा संक्षिप्त मंत्र अर्थपूर्ण आहे. गर्भाधान म्हणजे गर्भधारणा (कन्सेप्शन). ‘ॐ गर्भे सिंचामि ते रेतः।’ पती पत्नीला विश्वासात घेऊन आश्वासक स्वरात सांगतो, ‘तुझ्या गर्भाशयात मी माझ्या वीर्याचे (रेताचे) सिंचन करतो.’ हे नुसते शाब्दिक बुडबुड्यांचे वाक्य नाही. त्यात एक अभिवचन आहे, एक संकल्प आहे. हे परस्पर विश्वासाने, समर्पण भावनेने दिलेले वचन आहे. यात उज्ज्वल भवितव्याचे आधी पाहिलेले चित्र आहे. पूर्णपणे विधायक नि सकारात्मक असा हा संस्कार आहे.

या मंत्राचा महत्त्वाचा भाव किंवा गाभा आहे तो म्हणजे, केवळ शारीरिक आकर्षणाच्या नि प्रकृतीच्या पातळीवरच्या पलीकडे एकमेकाशी असलेली बांधिलकीची, त्याहीपेक्षा सामिलकीची (सहभागाची) भावना! डोळे मिटून जर या मंत्राचा भावार्थ अंतःकरणात साठवला तर सार्थकतेचा अनुभव येतो. एका अर्थी वैवाहिक जीवनातील बीजारोपणाचा हा संस्कार आहे. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ याची सुरुवात या संस्कारात असू शकते.

दुसरा संस्कार- पुंसवन ः या संस्काराद्वारे मातेच्या गर्भाशयातील गर्भाचे संरक्षण करण्यासाठी प्रार्थना करायची असते. यावेळेपर्यंत गर्भ तीन महिन्यांचा असतो. त्याच्या विकासाची प्रक्रिया सुखरूप व्हावी म्हणून या संस्काराद्वारे भावी मातेच्या मनात आत्मविश्वास, आत्मबल निर्माण करायचे असते. याचा मंत्र आहे-
‘ॐ हिरण्यगर्भः समवर्तताग्रे।’

म्हणजे सुवर्णाचे तेज असलेल्या सूर्याप्रमाणे गर्भ विकसित होत राहो. यातही महत्त्वाचा मनावर होणारा संस्कार आहे ‘सकारात्मकते’चा. गर्भधारणा- गर्भाची वाढ, आतून मातेला तो प्रतिसाद देत असल्याचा अनुभव, आपल्या आत एक चैतन्याचा अंकुर फुलतोय ही धन्य जाणीव आणि मुख्य म्हणजे जीवनात हे सारे प्रथमच अनुभवत असल्याने थोडीशी भीती, थोडीशी उत्सुकता यांचा संमिश्र अनुभव मातेला येतो.
सध्या इंटरनेट, समाजमाध्यमे यांवरील उपयुक्त माहितीतून मिळणारे मार्गदर्शन हा भावी मातेसाठी मोठा आधार बनून राहिलाय.
तिसरा संस्कार- सिमन्तोन्नयन ः याला संस्कृत शब्द आहे ‘दोहद’ आणि त्याचा मराठी प्रतिशब्द आहे ‘डोहाळे.’ गर्भाची वाढ होऊ लागली की समाजाचा सहभाग वाढू लागतो. या संस्कारापूर्वी आई, मामा, भाऊ, वडील अशी आतल्या वर्तुळातली मंडळी जास्त निकट असायची. आता डोहाळजेवण, डोहाळे साजरा करण्याचे नावेतील, आवळीच्या झाडाखालील, पुनवेच्या चंद्रप्रकाशातील असे निरनिराळे स्नेहभोजनाचे नि स्नेहमीलनाचे कार्यक्रम होतात. पोटी ‘राम’ जन्मावा म्हणून भावी मातेच्या हातात धनुष्यबाण देऊन सजवून विविध शैलीतली छायाचित्रे काढली जातात. हल्ली तर या प्रकारात मोबाइल, सेल्फी, फेसबुक इ. माध्यमांमुळे क्रांतीच झालीय. आपल्याकडे ‘फुलं माळणे’ अशा नावानेही हा संस्कार ओळखला जातो.
या संस्काराचा उद्देश म्हणजे नातेवाईक, मित्रमैत्रिणी अशा विशाल परिवाराशी भावी मातेचा नि मुख्य म्हणजे आतील गर्भाचा संबंध प्रत्यक्षात येत असतो. भावी आजे, काके, तसे मामे, सोयरे, सखे इ.इ., तशाच अनेक आजी- काकी- मामी- मावशी- आत्या गर्भाशी नाते जोडतात.
फारच हृद्य संस्कार, त्यापेक्षा संकल्पना आहे ही! डोहाळे-प्रसंगांना उत्सवी समारंभाचा भाव सहजच येऊन ‘आज आनंदी आनंद झाला’ ही अनुभूती सर्व संबंधितांच्या हृदयाला व्यापून राहते.

या जन्मपूर्व संस्कारांचा उद्देश भावी माता-पित्यांना उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहतानाच भविष्यातील जबाबदारीची जाणीव करून देणे हाच असतो. हे झाले गर्भात उमलणाऱ्या जिवावर केंद्रित असलेले जीव-संस्कार. खरे जीवनसंस्कार तर याहून खूप विशाल आणि उदात्त आहेत. ते केवळ मानवी जीवनाला व्यापणारेच नाहीत तर जीवन व्यापून दशांगुळे (दहा बोटे) उरणारे आहेत. लहान मुलं राधाकृष्णाचं नृत्य करताना कृष्ण दोन्ही हातांची दहा बोटं जोडून बासरी वाजवल्याचा अभिनय करतो तशा दिव्य नि हृद्य बासरीसारखे!