सरकार भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी गंभीर नसल्याचा पुनरुच्चार अण्णा यांनी केला. टीम अण्णा आज नवी दिल्लीत जंतर मंतर येथे धरणे धरून निदर्शने करणार आहे.
दरम्यान, संसदेत संसदीय समितीने लोकपालसंबंधी केलेल्या शिफारसींत क आणि ड श्रेणीतील नोकरशहांना लोकपालमधून वगळावे असे सूचविले आहे. या श्रेणीतील कर्मचार्यांना केंद्रीय दक्षता आयोग आणि लोकायुक्तांकडे सोपवावे असे सूचविले आहे. पंतप्रधानांच्या समावेशाबाबतही अंतिम निर्णय संसदेवर सोपविला आहे.
लोकपाल : बुधवारी सर्वपक्षीय बैठक
लोकपाल विधेयकाच्या मुद्द्यावर अण्णा टीमने दबाव निर्माण करण्यास सुरूवात केल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आता लोकपाल विधेयक संसदेत सादर करण्याआधी चर्चेसाठी येत्या बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
त्याआधी दि. १३ रोजी लोकपालच्या मुद्द्यावर यूपीएतील घटक पक्षांची बैठक होत आहे. याच दिवशी मंत्रिमंडळाची बैठकही घेण्यात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दि. १४ रोजी होणार असलेली सर्वपक्षीय बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलविण्यात आली आहे. चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात लोकपाल विधेयक संसदेत सादर करण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी राजकीय सहमती होण्याच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
संसदीय समितीच्या शिफारसी विचारात घेऊन मंत्रिमंडळ विधेयकास मंगळवारपर्यंत अंतिम स्वरूप देण्याची शक्यता आहे. लोकपाल विधेयक दि. १९ रोजी संसदेत सादर होणार असल्याचे समजते.
‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’चे आज पणजीत उपोषण
इंडिया अगेन्स्ट करप्शनतर्फे आज पणजीतील आझाद मैदानावर एका दिवसाचे उपोषण करण्यात येणार असून नंतर संध्याकाळी जाहीर सभा होणार असल्याचे ऍड. सतीश सोनक यांनी काल सांगितले. सर्व कार्यक्रम शांततापूर्णरित्या पार पडणार असल्याचे ते म्हणाले.
लोकपाल विधेयकाच्या प्रश्नावरून समाजसेवक अण्णा हजारे यांनी देश पातळीवर सुरू केलेल्या आंदोलनाचाच हा एक भाग असल्याचे सोनक यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मांद्रे व पर्वरी येथेही उपोषणाचे कार्यक्रम होणार असल्याचे सांगण्यात आले.