– ऍड. जतीन नाईक, वेरे – रेईश मागूश
भारताच्या इतिहासात राजकारणाच्या आणि कलेच्या क्षेत्रात मुलाने पित्याचा वारसा पुढे चालवण्याची उदाहरणे आपल्यापुढे विपुल आहेत. ज्ञानाच्या क्षेत्रात ती अगदीच विरळा. धर्मानंद कोसंबी आणि दामोदर कोसंबी हे पिता – पुत्र हे असे एक उदाहरण. कदाचित एकमेव!
दामोदर कोसंबी हे एक चतुरस्त्र संशोधक होते. विशुद्ध गणित, सांख्यिकी, नाणकशास्त्र, अनुवंशशास्त्र, प्राचीन भारतशास्त्र अशा विविध विषयांत त्यांनी केवळ रस घेतला एवढेच नव्हे, तर त्यामध्ये स्वतंत्र व मौलिक असे संशोधन केले. या सार्यामागे एक पुरोगामी विचारवंत, एक क्रियाशील कर्मयोगी आणि एक मनस्वी आणि अत्यंत निर्भीड व्यक्तिमत्त्वही होते. दामोदर कोसंबी यांचे व्यक्तिमत्त्व घडण्यात महत्त्वाचा वाटा त्यांचे वडील धर्मानंद कोसंबी यांचा होता यात शंका नाही. आचार्य धर्मानंद कोसंबी हेदेखील एक मनस्वी आणि ज्ञानयोगी गृहस्थ होते. ज्ञानसाधनेसाठी आचार्य धर्मानंदांनी त्या काळात अपार कष्ट सहन केले. ते संस्कृत शिकले, पाली शिकले, इंग्रजी शिकले. बौद्ध धर्मग्रंथांचा अभ्यास केला आणि याच काळात स्वातंत्र्य चळवळीशी आणि क्रांतिकारकांच्या गटाशीही त्यांचा संबंध आला.
३१ जुलै १९०७ रोजी कोसंबे या गावी दामोदर कोसंबी यांचा जन्म झाला. दामोदर कोसंबींची जीवनकहाणी केवळ एका हुशार, ज्ञानपिपासू विद्यार्थ्याची कहाणी नाही. एका विक्षिप्त विद्वानाचीही कहाणी नाही. ती एका महान संशोधकाची कहाणी आहे. कोसंबीचे कार्य न थांबता, न मंदावता सतत चालू होते. त्यांचे संशोधन हा त्यांचा ‘अंतरीचा ज्ञानदिवा’ होता. तो शेवटपर्यंत कधीही मालवला नाही वा निस्तेज झाला नाही. दामोदर कोसंबींनी विविध क्षेत्रांत संशोधन केले. त्याविषयाची नुसती यादी बघितली तरी छाती दडपून जाते. आदराने नतमस्तक व्हायला होते. गणित हा तर त्यांचा मूळ विषय. विशुद्ध गणितात त्यांचे मोलाचे संशोधन आहे. तिथून ते वळले सांख्यिकीकडे (स्टॅटिस्टिक्स). मग त्यातून आले अनुवंशशास्त्रातले (जेनेटिक्स) संशोधन. मग कोसंबींनी नाणकशास्त्रावर म्हणजे जुन्या नाण्यांच्या सांख्यिकी दृष्टिकोनातून केलेल्या अभ्यासातून वाट फुटली ती प्राचीन भारतीय शास्त्राकडे म्हणजे इंडोलॉजीकडे. पुढे जाऊन त्यांनी जुन्या संस्कृत ग्रंथांचे संशोधन केले आणि त्यातून भारताच्या प्राचीन इतिहासाकडे पाहण्याची समग्र दृष्टी त्यांनी मिळवली व इतिहासाचे संशोधनही त्यांनी केले.
आज जग दामोदर कोसंबींना भारताचे एक थोर इतिहासकार आणि भारताच्या इतिहासाची परिभाषा बदलून टाकणारे संशोधक म्हणून ओळखते, पण कोसंबींनी गुणसूत्राचा अभ्यास करून जगप्रसिद्ध ‘कोसंबी फॉर्म्युला’ही जन्माला घातला आहे. आजही या विषयाचा अभ्यास करताना विद्यार्थी हा ‘कोसंबी फॉर्म्युला’ वापरतात. कोसंबींनी आयुष्यात अन्य कोणतेही काम केले नसेल, तरी केवळ या संशोधनाने संशोधक म्हणून त्यांचे नाव अजरामर झाले असते. सांख्यिकीचा अभ्यास करण्याच्या निमित्ताने कोसंबींनी एका वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकले होते, ते म्हणजे जुन्या नाण्यांच्या अभ्यासाचे क्षेत्र. या अभ्यासाला एक शिस्तबद्ध आणि शास्त्रशुद्ध पाया घालून देण्याचे श्रेय कोसंबींकडे जाते. कोसंबींचे एक वैशिष्ट्य म्हणजे संशोधनाच्या ज्या क्षेत्रात त्यांनी एकदा पाऊल टाकले, त्यात ते आयुष्यभर काम करीत राहिले. त्यांनी संस्कृत भाषेतील प्राचीन कवी भर्तृहरी शतकत्रयीच्या तीन संपादित आवृत्त्या कोसंबी यांच्या नावावर प्रसिद्ध झाल्या होत्या. पण संस्कृत भाषेतील ग्रंथांवरचे कोसंबींचे संशोधन हा खरे म्हणजे आनुषंगिक भाग होता.
आज सगळे जग कोसंबींच्या विविध क्षेत्रांतील संशोधनाच्या कामांपैकी ज्या कामासाठी त्यांचे नाव खास करून घेते, ते प्राचीन भारताच्या संदर्भात त्यांनी केलेल्या कामामुळे. किंबहुना याच कामामुळे कोसंबींची आठवण अजूनही जिवंत राहिली आहे. संस्कृत ग्रंथ आणि त्यातील तत्त्वज्ञान यातून भारतीय समाजही कळत नाही आणि भारताचा खरा इतिहासही कळत नाही, अशी त्यांची ठाम खात्री होती, कारण खरा भारतीय समाज हा राजेरजवाडे, धनिक आणि ब्राह्मणी पंडित याच्यापलीकडे पसरलेला होता. तो होता हजारो लाखो खेड्यांमध्ये. श्रमिकांमध्ये, कष्टकर्यांमध्ये. तो होता शेतामध्ये राबणार्या शेतकर्यांमध्ये, रानावनांत विखुरलेल्या आदिवासींमध्ये. खरा भारताचा इतिहास तिथे आहे, असे कोसंबी मानीत. खरा इतिहास शोधण्यासाठी लोकांमध्येच मिसळायचे, त्यांच्या लोककथा, लोकगीते, परंपरा, रूढी, दैवते, मिथके यांची माहिती गोळा करायची ही कोसंबींची इतिहाससंशोधनाची पद्धत होती. इतिहास व्याख्याही नव्याने करण्याची गरज होती आणि कोसंबींनी हे सर्व केले. रूढ अर्थाने कोसंबींची पद्धत ही मार्क्सवादी पद्धत होती. पण ते पोथीबद्ध मार्क्सवादी नव्हते. ते मार्क्सवादाकडे डोळसपणे पाहात, कारण भारताला इतिहास नाही असे खुद्द मार्क्सचे मत होते. कोसंबींनी या मतातील फोलपणाही जोरदारपणे मांडला. मात्र, मार्क्सच्या अभ्यासातूनच कोसंबींना अर्थपूर्ण व्याख्या मिळाली. ‘‘इतिहास म्हणजे कालानुक्रमानुसार उत्पादनाची साधने आणि पद्धती यात होत जाणार्या बदलातून घडणारा घटनाक्रम.’’
आपल्या इतिहास संशोधनाबद्दल आणि त्यानिमित्ताने केलेल्या भटकंतीबद्दल कोसंबींनी विस्तृत लेखन केले. किंबहुना कोसंबींचे सर्वांत जास्त ग्रंथलेखन याच विषयावर आहे आणि त्याच्या प्रत्येक ग्रंथाची दखल घेतली गेली. त्यांच्या वेगळ्या दृष्टिकोनामुळे आणि प्रस्थापितांना धक्का देण्याच्या शैलीमुळे त्यांच्या सर्व ग्रंथांचे स्वागत झाले असे म्हणता येणार नाही. पण प्रत्येक ग्रंथाची दखल घेणे या क्षेत्रातील जाणकारांना भाग पडले.
भारतीय इतिहासाच्या अभ्यासाची ओळख हा कोसंबींचा या विषयावरचा पहिला ग्रंथ १९५६ साली प्रसिद्ध झाला. कोसंबींच्या या पुस्तकामुळे प्रथमच भारतीय इतिहासाची संगती लागण्यास सुरूवात झाली असे सुप्रसिद्ध लेखक जे. डी. बर्नाल यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे. दामोदर कोसंबींचे दुसरे महत्त्वाचे पुस्तक म्हणजे ‘मिथ अँड रिअलिटी’ हा लेखसंग्रह. भारताची संस्कृती म्हणजे जनसामान्यांची संस्कृती. लब्ध प्रतिष्ठितांच्या ब्राह्मणी संस्कृतीपेक्षा ती कशी वेगळी आहे याचे विवेचन या लेखांमध्ये केले आहे. १९६५ साली कल्चर अँड सिव्हिलायझेशन ऑफ एन्शंट इंडिया इन हिस्टॉरिकल आऊटलाइन हा कोसंबींचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. भाषा वाकवण्याचे कौशल्य हे कोसंबींचे मोठे सामर्थ्य होते, यात शंका नाही. पण कोसंबींनी जे अन्य लेखन केले आहे, त्याचा पाया त्यांचे भाषेवरचे प्रभुत्व हा नव्हता. त्याचा पाया होता त्यांची तीव्र सामाजिक बांधिलकीची जाणीव.
शुद्ध गणिताच्या संशोधनापासून सुरू झालेली ही संशोधनयात्रा सांख्यिकी, अनुवंशशास्त्र, नाणकशास्त्र, प्राचीन संस्कृत ग्रंथ, इंडोलॉजी, इतिहास अशा अनेक प्रांतांमधून सहजपणे संचार करीत पुढे गेली. यातले कोणतेही एक काम एखाद्या संशोधकाचे आयुष्यभराचे काम म्हणून ओळखले गेले असते. पण येथे तर एकाच माणसाने एकाच आयुष्यात ही सारी कामगिरी केली आहे. त्यातही आश्चर्य म्हणजे एका विषयातले काम संपवून दुसर्या विषयातले काम सुरू केले असे घडलेले नाही. एकाच वेळी सार्या विषयांतील संशोधन तितक्याच जोमाने आणि सकसपणे त्यांनी चालू ठेवले होते हे विशेष होय.
गांधीजींच्या संदर्भात आईनस्टाईनचे उद्गार प्रसिद्ध आहेत. तो म्हणाला होता – ‘‘असा हाडामांसाचा खरोखरीचा एक माणूस या धरतीवर वावरून गेला यावर पुढच्या पिढ्यांचा विश्वास बसणार नाही’’ कोसंबींच्या बाबतीतही हे खरे आहे. खरोखरच एका आयुष्यात इतक्या विविध विषयांवर संशोधन करणारा एक संशोधक होऊन गेला यावर आज विश्वास बसत नाही. गोमंतकातील किंवा भारतातील संशोधकांची गोष्ट सोडाच, जगात असा एकही वैज्ञानिक नसेल की ज्याने इतके विविध विषय हाताळले, गुणसूत्रांच्या अभ्यासासाठी एक मूलभूत असा फॉर्म्युला दिला. नाणकशास्त्रासारख्या एका नव्या शास्त्राची पायाभूत उभारणी केली, विस्मृतीत गेलेल्या अनेक प्राचीन संस्कृत कवींना उजेडात आणले. प्राचीन इतिहासाच्या संशोधनाची नवी पद्धत निर्माण केली आणि इतिहासाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोनही दिला.
गोमंतक ही नररत्नांची खाण आहे असे म्हणून आपण आपलीच पाठ थोपटून घेत असतो. त्यासाठी अनेक उदाहरणे देतो. काही नावांचा तर वारंवार जप करतो. ते सगळे मोठे आहेत यात शंका नाही, पण कोसंबींसारख्या एका महान संशोधकाची उपेक्षा का होते आहे? सार्या जगाला तोड नाही अशा पातळीवरचा हा संशोधक विस्मृतीच्या गर्तेत जाणार नाही याची काळजी घेण्याची वेळ आली आहे.
इतक्या विविध विषयांतले संशोधन सातत्याने करणारा हा संशोधक. त्याने आयुष्यभर स्वतःला संशोधनाच्या कामात बुडवून घेतले. कोसंबींची सामाजिक जाणीवही प्रखर होती. विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाज यांच्या परस्पर संबंधांबद्दल त्यांनी विपुल लेखन केले आहे. दामोदर धर्मानंद कोसंबी हे शेवटपर्यंत एक संशोधक आणि फक्त संशोधकच होते. त्यांच्या संशोधन कार्यातील विविधता आणि संशोधनाचा दर्जा पाहता त्यांना संशोधकांचे मेरूमणीच म्हटले पाहिजे.

