शिक्षण खात्याची सूचना, काँग्रेसची टीका
संविधान हत्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिक्षण खात्याने एका परिपत्रकाद्वारे विविध उपक्रमांचे आयोजन करण्याची सूचना राज्यातील सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांना केली आहे. विद्यालयांत लोकशाही मूल्ये, नागरी स्वातंत्र्य आणि संवैधानिक नैतिकतेचे रक्षण करण्यासाठी हे उपक्रम राबवावेत असे म्हटले आहे. दरम्यान, भाजप सरकारकडून शिक्षण खात्याचा संविधान हत्येचा दिवस साजरा करण्यासाठी गैरवापर केला जात असल्याचा आरोप काल काँग्रेसने केला.
शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंडगे यांनी संविधान हत्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर 24 जून 2025 रोजी एक परिपत्रक जारी करून 25 जून 2025 ते 25 जून 2026 या काळात लोकशाही मूल्ये, नागरी स्वातंत्र्य आणि संवैधानिक नैतिकतेच्या जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्याची सूचना केली. विद्यालयाच्या प्रार्थनासभेच्या वेळी संविधान हत्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीच्या रक्षणाबाबत जागृती करण्याची सूचना केली. मुलांसाठी घेतल्या जाणाऱ्या निबंध लेखन स्पर्धेत मुलांनी सहभागी व्हावे. केंद्रीय माहिती व प्रसिद्धी मंत्रालयाने उपलब्ध केलेली फिल्म मुलांना दाखविणे, केंद्रीय कला मंत्रालयाचे प्रदर्शन दाखविणे यासारखे उपक्रम हाती घेण्याची सूचना केली.
काँग्रेसची टीका
भाजपकडून संविधान हत्येचा दिवस साजरा करण्यासाठी शिक्षण खात्याचा गैरवापर केला जात आहे, अशी टीका पाटकर यांनी केली.इतिहासात कधीही सत्ताधारी पक्षाने शैक्षणिक संस्थांचा राजकीय वापर केलेला नाही. तथापि, भाजपने घाणेरडे राजकारण सुरू केले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.

