संवादातून लोकशाही सशक्त : ओम बिर्ला

0
11

गोवा विधानसभा संकुलाचा रौप्यमहोत्सवी सोहळा संपन्न; विधिमंडळ हे चर्चा,

वादविवाद आणि विविध मतांच्या देवाणघेवाणीचे व्यासपीठ

सशक्त लोकशाही ही संवाद, विविध मते आणि अर्थपूर्ण लोकसहभाग यावर आधारलेली असते. विधिमंडळे ही चर्चा, संवाद, वादविवाद आणि विविध मतांच्या देवाणघेवाणीची व्यासपीठे आहेत. जेव्हा सहमती आणि असहमती या दोन्ही गोष्टींना वाव असतो आणि विविध दृष्टिकोन विधिमंडळ प्रक्रियेत समाविष्ट केले जातात, तेव्हा लोकशाही अधिक बळकट होते. विविध मते आणि दृष्टिकोन सामावून घेण्याच्या आपल्या संस्थांच्या क्षमतेवरच भारताची लोकशाहीची ताकद उभी राहिली आहे, असे प्रतिपादन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गोवा विधानसभा संकुलाच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात बोलताना काल पर्वरी येथे केले.

याप्रसंगी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती डॉ. गणेश गावकर, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष जी. एस. पाटील, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधिमंडळ कामकाजमंत्री माविन गुदिन्हो, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, उपसभापती ज्योशुआ डिसोझा आदी मान्यवर उपस्थित होते.
तंत्रज्ञान आणि तरुणांचा सहभाग लोकशाहीला नवी दिशा देऊ शकते. नाविन्यपूर्ण उपक्रम स्वीकारण्याबाबत विविध राज्यांच्या विधिमंडळांमध्ये निकोप स्पर्धा असावी. गोव्याने आर्थिक विकास आणि आपला वारसा व नैसर्गिक पर्यावरणाचे जतन यांच्यात यशस्वीपणे समतोल साधला आहे.
युवक, महिला आणि नागरिकांच्या व्यापक सहभागातून गोवा विधानसभेने 25 वर्षांचा कृती आराखडा (रोडमॅप) तयार करावा, असेही ओम बिर्ला यांनी सांगितले.

गोवा आपल्या विकासाच्या प्रवासात सर्वांना सोबत घेऊन चालत आहे. छोटे राज्य असूनही गोवा लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहे. विकसित भारत घडवण्यात गोव्याची भूमिका महत्त्वाची आहे, असेही ओम बिर्ला म्हणाले.
गेल्या 25 वर्षांत गोव्याने लक्षणीय विकास साधला आहे. गोव्याने आपली भाषा, पर्यावरण, अर्थव्यवस्था अधिक बळकट करावी. पर्यटन, शिक्षण, उद्योग क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. तसेच आर्थिक वृद्धी कायम राखण्यासाठी आवश्यक ते बदल घडवून आणावेत, असा सल्ला ओम बिर्ला यांनी दिला.
राज्यपाल काय म्हणाले?
गोवा विधानसभा संकुलाला 25 वर्षे पूर्ण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आपण केवळ इमारतीचा उत्सव साजरा करत नाही, तर आपण विचारांचा म्हणजेच सार्वभौमत्वाच्या विचारांचा उत्सव साजरा करत आहोत, असे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.

असा मुख्यमंत्री
मी पहिलाच : प्रमोद सावंत

गोवा मुक्तीनंतर जन्म झालेला आपण गोव्याचा पहिला मुख्यमंत्री आहे. तसेच, मुख्यमंत्री होण्यापूर्वी गोवा विधानसभेचे सभापती म्हणून काम पाहणारा आपण पहिलाच मुख्यमंत्री असल्याचेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नमूद केले.

विरोधक म्हणजे पहारेकरी : आलेमाव
प्रत्येक गोष्टीला विरोध करणे ही विरोधी पक्षाची भूमिका नाही, तर सरकारला प्रश्न विचारणे, त्यांच्या कामाचे परीक्षण करणे, त्रुटी निदर्शनास आणून देणे आणि पर्यायी उपाय सुचवणे ही विरोधी पक्षाची जबाबदारी आहे. विरोधी पक्षाने जनहिताचे रक्षण केले पाहिजे आणि सत्तेचा गैरवापर व दुरुपयोग रोखण्यासाठी पहारेकऱ्याची भूमिका बजावली पाहिजे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

आलेमाव यांची सरकारवर टीका
2026 चे अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करणे हे चांगले लक्षण नाही. हा निर्णय इतिहासात लक्षात राहील आणि लोकशाहीसाठी हे काही चांगले लक्षण नाही. इतर राज्यांनी आपली अर्थसंकल्पीय अधिवेशने घेतली; पण गोवा सरकारने मात्र आपले अधिवेशन रद्द केले, असेही युरी आलेमाव यांनी सांगितले.

1961 आणि 1971 मधील गोवा आणि आजचा गोवा यात खूप मोठा फरक आहे. राज्याची लोकसंख्या आणि अर्थव्यवस्था वाढली आहे, तसेच जीवनशैलीतही बदल झाले आहेत. काहीही झाले तरी आपण आपल्या वचनबद्धतेशी ठाम राहिले पाहिजे. आपण आपला गोवा नष्ट करू नये, असे युरी आलेमाव म्हणाले.

गोवा विधानसभेचे सभापती डॉ. गणेश गावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी विधिमंडळ कामकाजमंत्री माविन गुदिन्हो यांनी विचार मांडले. गोवा विधानसभा इमारतीच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याचा एक भाग म्हणून गोवा विधानसभेचे चित्र असलेले खास टपाल तिकीट आणि आजी-माजी आमदारांच्या कार्याची माहिती देणाऱ्या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोवा विधानसभेचे माजी सभापती, माजी मंत्री, माजी आमदार यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

तर गोवा महाराष्ट्राचा एक जिल्हा बनला असता
गोव्यातील जनतेने 1967 मधील जनमत कौलाच्या वेळी आपले स्वतंत्र अस्तित्व कायम राखण्यासाठी वेगळ्या राज्याच्या बाजूने कौल दिल्याने युवा वर्गाला राजकारणात संधी मिळत आहे. गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण झाले असते, तर आम्हाला राजकारणात जास्त संधी मिळाली नसती. गोवा हे महाराष्ट्र राज्याचा एक जिल्हा बनून राहिला असता आणि आपण सुध्दा विधानसभेत पोहोचू शकलो नसतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.