नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांकडून झालेल्या भारतीय जवानांच्या अमानुष हत्यांची संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे चौकशी करवून घेण्यास तयार असल्याचे पाकिस्तानने काल म्हटले होते. भारताने मात्र हा प्रस्ताव स्पष्ट शब्दात नाकारला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये पूंछ सेक्टरला झालेल्या भारतीय जवानांच्या भीषण हत्यांच्या पार्श्वभूमीवर काल संरक्षणमंत्री ए. के. अँथनी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक झाली. यावेळी वरील मत व्यक्त झाले. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना पी.चिदंबरम यांनी स्पष्ट केले की, नियंत्रण रेषेवर जे झाले त्या विषयात आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप होऊ दिला जाणार नाही. संयुक्त राष्ट्रसंघामार्फत चौकशीचा प्रस्तावही आम्ही नाकारत आहोत. परवा दोन भारतीय सैनिकांची गस्त देतेवेळी पाकिस्तानी सैनिकांकडून हत्या करून शिरच्छेद करण्यात आला होता. पाकिस्तानने आपला यात काहीच सहभाग नसल्याचे सांगत याप्रकाराची संयुक्त राष्ट्र संघाच्या निरीक्षकांमार्फत चौकशी करून घेण्याची तयारी दर्शविली होती.

