संदेश तेजस्वी तार्‍याचा

0
134

– फादर फ्रान्सिस दिब्रिटो

‘देवा, हे काय करताहेत त्यांना कळत नाहीये, तू त्यांना माङ्ग कर.’ आपल्या मारेकर्‍यांप्रतिही असा दयाभाव दाखवणार्‍या येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजे नाताळ. कुठल्याही नव्या जीवाचा जन्म, त्याचे आगमन मंगलमय आहे. ही घटनाच उत्साहवर्धक आहे. तेव्हा संपूर्ण जगाला दया, सेवा आणि शांतीचा उपदेश करणार्‍या देवाच्या लाडक्या पुत्राचा जन्मदिवस आनंदात आणि उत्स्ङ्गूर्ततेने साजरा होणे स्वाभाविक आहे. यानिमित्त जगभर सात दिवसांचा नाताळ धुमधडाक्यात साजरा होतो. सुरुवातीला अगदी घरगुती स्वरुपात साजरा होणारा हा आनंदोत्सव सध्या अतिशय मोठ्या स्वरुपात साजरा होतो. कालानुरूप त्यात अनेक गोष्टींचा अर्ंतभाव झाला आहे. व्यापारीकरणाने जोर धरल्याने दुर्दैवाने या मंगलपर्वातदेखील अनेक चुकीचे पायंडे पडताना दिसतात. माझ्या मते हे सर्वात दु:खदायी आहे. नाताळच कशाला, साजर्‍या होणार्‍या प्रत्येक चांगल्या दिवसामध्ये हे व्यापारीकरण डोकावताना दिसते. साधे ‘मदर्स डे’चे उदाहरण घेतले तरी या दिवशी मातेचे स्मरण करावे आणि तिच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करावी हा साधा विषय असताना व्यापारीकरणामुळे शुभेच्छापत्रे काय, किमती भेटी काय, पार्ट्या काय… अनेक वेगवेगळी आयोजने होतात आणि मूळ उद्दिष्ट मागे पडते. सध्या ख्रिसमसबाबत हेच पाहायला मिळते. 

आपला समाज रुढीप्रिय, परंपराप्रिय आहे. तेराव्या शतकात सुरू झालेली नाताळची परंपरा आजही पाळली जाते. तेराव्या शतकात ङ्ग्रान्सिस ऑस असिसी हे साधुपुरुष होऊन गेले. ते येशूचे भक्त होते. त्यांनी ख्रिस्तजन्मामुळे झालेला आनंद दृश्य स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी एक कृत्रिम गव्हाण तयार केली. तिथे येशूचा छोटा पुतळा ठेवला. शेजारी त्याच्या आईचाही पुतळा ठेवला. आजूबाजूला मेंढरांचे शिल्प ठेवले आणि अशा प्रकारे येशूजन्मवेळेचा देखावा तयार झाला. हे दृश्यरूप सर्वांनाच सुखावून गेले. पाहता-पाहता गावोगावी असे दृश्य दाखवण्याची पद्धत रुजू लागली. या देखाव्याला ‘ख्रिसमस क्रिब’ म्हणतात. आजही जगभर ही संकल्पना राबवली जाते. वेगवेगळ्या देशांतील संस्कृतीनुसार आणि संदर्भानुसार दृश्यरूप बदलत असले तरी मूळ संकल्पना हीच आहे. 
बायबलमधील उल्लेखानुसार येशूच्या जन्माच्या वेळी आकाशात एक तेजस्वी नक्षत्र दिसले होते. याचा मागोवा घेत पूर्व दिशेने तीन ज्ञानी पुरुष निघाले. यातला एक भारतातील होता असाही कयास आहे. तेव्हा रोमन राजा हेरॉब याने चौकशी केली आणि आपल्या आजूबाजूला एका महात्म्याने जन्म घेतला आहे हे कळताच प्रतिस्पर्धी जन्माला आला म्हणून बिथरून जात त्याने दोन वर्षांखालील मुलांच्या हत्येचा ङ्गतवा काढला. त्या काळी एक मोठं हत्याकांड घडलं होतं. मात्र येशूच्या आईला साक्षात्कार झाला आणि ती इजिप्तमध्ये गेली. या घटनेची आठवण म्हणून नाताळच्या दिवशी घराघरावर चांदणी लावली जाते. ही सर्व प्रतीकेआहेत, पण या सणाचे मूळ सार दु:खितांचे दु:ख घालवणे, दारिद्य्राचे दारिद्य्र घालवणे, सकळजनांना सुख वाटणे, शक्य ती सेवा देऊ करणे हे आहेत. म्हणूनच ख्रिसमसमध्ये शिरलेल्या व्यापारीकरणाचा खेद वाटतो. आजही अनेक चर्च कुष्ठरोगी, अनाथालये, वृद्धाश्रम, बालसुधारगृह आदी ठिकाणी आपली सेवा देऊ करतात. दुर्लक्षित घटकांकडे लक्ष द्या, हा येशूचा संदेश. दिल्याने आनंद द्विगुणित होतो. यानिमित्ताने माणसे चर्चमध्ये हजेरी लावतात आणि धर्मगुरूंकडून मार्गदर्शन घेतात. ‘बिशप’ या नावाने ओळखले जाणारे विभागप्रमुख प्रत्येकाला शांतीचा संदेश देतात. या दिवसात कन्ङ्गेशन देण्याची सोय असते. आपल्या हातून कळत-नकळत घडलेल्या चुकांची कबुली देऊन ताणातून मुक्त होण्याचा आणि प्रायश्चित्त घेण्याचा हा एक योग्य मार्ग आहे. इथे धर्मगुरू गुन्हा ऐकून त्यावर प्रायश्चित्त सांगतात. यासाठी चर्चमध्ये मोठमोठ्या रांगा लागतात. तणावपूर्ण आयुष्यात इतक्या साध्यासोप्या पद्धतीने तणावमुक्त होता येते ते या निमित्ताने. 
आजकाल नाताळमध्ये येशूपेक्षा सांताक्लॉजला जास्त महत्त्व येतेय हे मात्र चुकीचे आहे. सांताक्लॉजबाबत एक कथा सांगितली जाते. संत निकोलस नावाचे एक सद्गृहस्थ होते. ६ डिसेंबरला त्यांच्या आठवणीनिमित्त एक सोहळा साजरा होतो. हे सेवाभावी गृहस्थ वेषांतर करून गावोगावी ङ्गिरायचे आणि गरिबांना मदत करायचे. ङ्गिरता-ङ्गिरता त्यांना असेच एक दु:खी घर दिसलं. त्या घरात तीन उपवर मुली होत्या. मात्र पैशांअभावी त्यांचे विवाह ठरत नव्हते. अडचण लक्षात घेऊन संत निकोलस यांनी रात्री गुपचूप गाठोड्यात लपवून त्या घराच्या खिडकीतून पैसे टाकले आणि त्या दु:खी कुटुंबाने सुखाचे दिवस पाहिले. तेव्हा त्यांचा वेष काहीसा विचित्र होता. तेव्हापासून सांताक्लॉज ही संकल्पना उदयाला आली आणि रात्रीच्या निरव शांततेत गुप्तपणे गरिबांना मदत केली जाऊ लागली. आता मात्र याचे भ्रष्ट रूप पहायला मिळतेय. नाताळ म्हणजे सांताक्लॉज हे नवीन समीकरण माथी मारले जातेय. येशू खिस्त कुठेतरी बाजूलाच पडतोय. यानिमित्त मॉलमध्ये ङ्गेस्टिवलचे आयोजन होते. आकर्षक योजनांच्या नावाखाली व्यापारीकरणाचा नवा पायंडा पाडला जातो. सेलिब्रेशन होतं, थाटमाट होतो, ख्रिसमस ट्रीची आकर्षक सजावट होते, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या धर्तीवर ख्रिसमस क्रीब उभारण्याची अहमिका लागते. पण या सर्वात येशू ख्रिस्त आणि त्याचा पवित्र संदेश मात्र दुर्लक्षिला जातो. नाताळचं हे बदलतं रूप निराश करणारं आहे. येशूनं कधीच ङ्गाजील श्रीमंतीला महत्त्व दिलं नाही. त्याचा जन्म रात्रीच्या निरव शांततेत झाला. बाह्यदेखावा, तडकभडक सजावट अशा गोष्टी ख्रिस्तधर्माचा मूळ गाभा नाहीत. स्वत:वर प्रेम करा तसंच शत्रूवरही प्रेम करा, चुका माङ्ग करा हा संदेश देणारा येशू ख्रिस्त महान आहे. त्याचा संदेश तेवढ्याच उदात्त अंत:करणाने स्वीकारला पाहिजे. 
समाज नेहमी सोयिस्कर अर्थ घेत असतो. पूर्वीदेखील नाताळच्या दिवसांत युद्ध‘विराम’ असायचा, ‘पूर्णविराम’ नाही. येशूच्या शिकवणीतून ते बोध घ्यायचे नाहीत, ते युद्ध थांबवायचे नाहीत तर सात दिवसानंतर हिंसेला पुन्हा नव्याने सुरुवात व्हायची. आजही धर्माचा मूळ गाभा लक्षात न घेता साजरीकरणाला आलेलं महत्त्व याच अपप्रवृत्तीचं द्योतक आहे. 
ग्लोबलायझेशनच्या आजच्या जमान्यात मिडियामुळे हा अपप्रचार सुलभ रीतीने घडतो. आज अमेरिकेत घडते तोच ख्रिस्तीधर्म अशी एक मानसिकता तयार होताना दिसतेय. पण ती केवळ एक शाखा आहे. आमचे धर्मगुरू याबाबत सतत संदेश देत असतात, नागरिकांना सजग करत असतात. अमेरिकेत ‘वुई मॅनेज विदाऊट गॉड’ हा नवा विचार डोकं वर काढत आहे. कुठल्याही महासत्तेचं अस्तित्व नाकारणारे हे नास्तिक लोक ख्रिसमसला ‘विंटर ङ्गिस्ट’ म्हणतात. सध्या तिकडे हा ट्रेंड वाढतोय. पण माणूस आपल्यापेक्षा काही मोठं मानत नाही तेव्हा त्याचा नैतिकतेचा पाया उखडला जातो हेही वैश्‍विक सत्य आहे. युरोपमध्ये ‘सेक्युलॅरिझम’ हा शब्द इहवाद, भोगवाद या पद्धतीने वापरला जातो. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या महान शिकवणीचं ‘कुटुंब हीच माझी वसुधा’ असं संकुचित रूपात परिवर्तन झालंय. ‘मी-माझा’ हे आजचं ब्रीदवाक्य. म्हणूनच आज समाजामध्ये एकाकीपण वाढतंय. घाबरलेल्या माणसाच्या ठायी भयगंड निर्माण होतो. भयगंडाचा आविष्कार हट्टामध्ये होतो आणि अशा समाजात करुणा, दया आणि मानवता ही मूल्ये जिवंत राहू शकत नाहीत. अस्वस्थ माणूस ही एकविसाव्या शतकाची निर्मिती आहे. म्हणूनच या नाताळच्या निमित्ताने प्रत्येकाने ही भयगंड अवस्था सोडून नव्या तेजाच्या दिशेने वाटचाल करायला हवी. या नाताळचा हाच संदेश आहे.