दरम्यान, संजय दत्तला घरगुती जेवण, झोपण्यासाठी चटई व उशी व औषधे पुरविण्यास टाडा कोर्टाने मान्यता दिली. मात्र ही परवानगी सुरुवातीच्या एक महिन्याकरिता असेल व त्यानंतर कारागृह प्रशासन कायतो निर्णय घेईल. मात्र इलेक्टॉनिक सिगरेट ओढण्यासाठी, कारागृहात मुक्तपणे फिरण्यासाठी, परिवारजनांना भेटण्यासाठीची संजय दत्तने केेलेली विनंती अद्याप कोर्टाने मान्य केलेली नाही.
शरण आल्यानंतर त्याची ओळख पटविण्याची व इतर प्रक्रिया करण्यात आली. आपल्या बांद्रा येथील इंपेरियल हायट्स या घरातून बाहेर पडताना त्याने जमावाला हात दाखवून अभिवादन केले. कोर्टाकडे पोचल्यानंतर संजय दत्तला लोकांचा व छायापत्रकारांचा गराडा पडला. पोलिसांनी संजय दत्तच्या निवासाबाहेर व कोर्टाबाहेर कडक बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान, संजयला आर्थर रोड कारागृहात ठेवल्यास त्याच्या जीवाला धोका असल्याचे एक पत्र कारागृह प्रशासन खात्याला आले आहे. अभिनेता दत्तनेही टाडा कोर्टाला आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते.
बॉम्बस्फोट खटल्यात बेकायदेशीरपणे शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी ५३ वर्षीय संजय दत्तला पाच वर्षे कारावासाची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने २१ मार्च रोजी सुनावली होती. दि. १० रोजी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेसंबंधी फेरविचार याचिकाही फेटाळली होती. दि. १४ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने शरण येण्यासाठी मुदतवाढ देण्यासही नकार दिला होता.
संजय दत्तल आधी आर्थर रोड कारागृहात नेऊन कागदोपत्री प्रक्रिया केली जाईल. त्यानंर त्याला पुण्याच्या येरवडा कारागृहात पाठविले जाण्याची शक्यता आहे.