संकल्प आणि सिद्धी

0
20
  • – मीना समुद्र

सध्याच्या काळात वृक्षलागवड, जलसंवर्धन, पर्यावरण जागृती- रक्षण, स्वच्छता हे मानवजातीसाठी मूलभूत संकल्प करायला हवेत. व्यक्तिगत आणि सामूहिक संकल्पानेवसुंधरादिन’ साजरा करत चराचर सृष्टीचे अस्तित्व टिकविण्यात यश मिळवायला हवे.

संकल्प आणि सिद्धी यात जमीन-अस्मानाचं अंतर असतं असं म्हटलं जातं. संकल्प म्हणजे कृतनिश्‍चय आणि सिद्धी म्हणजे तो संकल्प राबवून मिळालेलं फळ; मग ते यश, कीर्ती, प्रसिद्धी, पैसा या कोणत्याही स्वरूपात का असेना! …पण संकल्प राबविल्याने व पूर्ण केल्याने मिळणारी सिद्धीही अतिशय समाधानकारक आणि शांतिदायी असते हे मात्र खरे! एखाद्या गोष्टीसाठी संकल्प केला म्हणजे विशिष्ट हेतूने विशिष्ट कालावधीत एखादे काम पार पाडायचे असे ठरवले, निश्‍चय केला, निर्धार केला. आणि त्याप्रमाणे वागले की तो संकल्प तडीला जाईल याची खात्री असते. पण नुसत्याच संकल्पाने सिद्धी प्राप्त होत नाही. मनाशी बांधलेल्या त्या खूणगाठीशी इमान राखायचे असेल तर त्यासाठी प्रयत्नांचे सातत्य, संकल्पासाठी झटणे, येईल त्या संकटाशी प्राणपणाने झुंजणे, अडचणींच्या डोंगरदर्‍या- खाचखळगे पार पाडणे, अपयशाने निराश न होता, खचून न जाता सुनिश्‍चित दिशेने प्रयत्न चालू ठेवणे या सार्‍या गोष्टी अपेक्षित किंवा अंतर्भूत असतात. सत्य संकल्पाचा दाता ईश्‍वर असतो. ‘घेतला वसा टाकू नये’ असं म्हणतात. संकल्प म्हणजे वसाच असतो. ती एक नियमबद्धता असते. आता चातुर्मासात स्त्रियांचे व्रतनेम सुरू होतात. त्यासाठी चार महिन्यांतले काही वार उपवास करणे, वेगवेगळ्या पूजाअर्चा करणे, पोथीवाचन, लक्ष नामजप, लक्ष फुले-दुर्वा वाहणे असे अनेक संकल्प स्त्रिया करतात. कुटुंबासह स्वतःच्या कल्याणासाठी चातुर्मासाच्या सुरुवातीला असे संकल्प करून चार महिन्यांच्या काळात त्या ते निभावूनही नेतात. आजकाल वाणवसा, व्रतनेम यासाठी कुणाला वेळ नसला तरी काही सत्यसंकल्प मनाशी करणे म्हणजे आपले मनोबल, आपले सामर्थ्य वाढवणे असते. नावीन्य, कल्पकतेला प्रेरणा देणे असते.
एकूणच मनुष्यप्राणी अनुकरणशील असतो. काही चांगले ऐकले, पाहिले, वाचले तर ते स्वतः करून पाहण्याची, आचरणात आणण्याची त्याची वृत्ती-प्रवृत्ती असते. त्यातला यशाचा, कौतुकाचा, सन्मानाचा भाग त्याला तरी भुरळ घालतो. तसा आनंद आपणही उपभोगावा अशी त्याला साहजिक इच्छा होते. ही इच्छा प्रबळ झाली की तो ती किंवा तशी गोष्ट करण्याचा संकल्प करतो. तो पूर्ण करण्यासाठी त्याला निश्‍चय आणि निर्धाराची आवश्यकता असते. ती फक्त मनाची तात्कालीक उबळ किंवा उचंबळ असता उपयोगी नाही. हा जरी एकट्याचा संकल्प असला तरी त्याला मनोबलाची आवश्यकता असते.

एकतर मनुष्यप्राणी हा क्रोध, मद, मत्सर, दंभ, लोभ, मोह अशा षड्‌रिपूंनी ग्रासलेला असतो. कमी-जास्त प्रमाणात असतील, पण हे सारे त्याच्या शरीरमनात सतत नांदत असतात. स्वार्थाने त्याची मती भ्रष्ट होते आणि तो मदांध होतो. वारा येईल तशी पाठ फिरवण्याची आणि उगवतीलाच फक्त वंदन करण्याची त्याची वृत्ती असते. त्याच्या स्वार्थी, चंचल वृत्तीमुळे त्याचे संकल्प सिद्धीला जातीलच असे नाही.

अगदी साधी उदाहरणं घेतली तरी- विद्यार्थिदशेत पहाटे लवकर उठणे, नियमित अभ्यास करणे, प्राणायाम-योगासनं करणे, लेखन-वाचन, कविता-श्‍लोक-पाढे-परवचा म्हणणे, नियमित फिरायला जाणे हे सारे ठरवून अगदी निश्‍चयाने पार पाडले पाहिजे, तरच चांगले गुण, परीक्षेत सुयश, आरोग्य संपन्नता, बहुश्रुतपणा ही सिद्धी त्याला भेटेल. आपला परिसर स्वच्छ ठेवणे, आपल्यातील चांगल्याची पेरणी करणे, स्वावलंबी होणे, दान देणे, सेवाशुश्रूषा करणे, गरजूंना मदत करणे असेही नियमितपणे करता येते. संकल्प केल्याने आपल्या शरीरात ऊर्जा येते, मनात चैतन्य येते, यशकीर्ती चालून येते. मनाला संतोष-समाधान प्राप्त होते. संकल्प हा आपणच आपल्या मनाशी केलेला वादा (वायदा) असतो. त्यामुळे तो निभावण्याची जबाबदारी आपली असते. कुणी जबरदस्तीनं लादत असेल तर तो ‘संकल्प’ ठरत नाही. संकल्पाला मनाचं स्फुरण लागतं. त्यामुळे संकल्प झाला की शरीराची साथ आपोआप मिळते. अंतःस्फूर्त अशा संकल्पाला शुद्ध आचरणाची साथ देणे हे आपले केवळ कामच नव्हे तर कर्तव्य ठरते. संकल्प म्हणजे चांगुलपणाच्या आचरणाचे सातत्य असते. असे शुभसंकल्प आपल्या पूर्वजांनी, पूर्वसुरींनी आखलेल्या, रेखलेल्या वाटेने जातात आणि शुभमुहूर्तावर ते केले जातात. त्यामुळे ते पूर्ण व्हावेत अशी इच्छा आणि मानसिकताही असते.

गोकुळातल्या गोपांच्या काठ्या लागतात तेव्हा गोवर्धन उचलला जाऊन रक्षक बनतो. असा संकल्प सामूहिक असेल तर त्यात सहभागी होणार्‍यांनी त्याच्याशी सहमत असले पाहिजे. असा संकल्प, अशी प्रतिज्ञा ही जाहीरपणे केली गेल्याने सहभागी होणार्‍यांची जबाबदारी नक्कीच वाढते. व्यक्ती वेगवेगळ्या असल्या तरी त्यांना ओवणारे सूत्र, गुंफणारा धागा हा समान असतो, एकच असतो. व्यक्तिगत आयुष्यही त्या संकल्पासाठी अर्पण करावे लागते. पण एकजूट, एकवाक्यता, एकलक्ष्य असल्याने चालना आणि चैतन्य मिळते. ‘मिलकर बोझ उठाना’ असं हे काम चालतं, त्यामुळे ते करणं सोपं होऊन जातं.

शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प केला होता. लो. टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क असून तो मी मिळवणारच’ अशी प्रतिज्ञा केली होती. म. गांधींनी अहिंसा आणि सत्याग्रहाचा मार्ग आचरला होता. मुलींना शिक्षण मिळालेच पाहिजे म्हणून ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी सतीचे वाण स्वीकारले होते. अस्पृश्यता निवारण आणि जात्यांधता नष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही सत्यसंकल्प केला होता. भारतीय स्वातंत्र्य मिळविण्याचा संकल्प करणार्‍या अनेक शूरवीरांनी त्यासाठी हौतात्म्यही पत्करले होते. स्वातंत्र्य, समता, स्वराज्य, बंधुभाव हे सारे सत्यसंकल्प होते. त्यासाठी जे-जे झटले त्या सर्वांना त्यांच्या जितेपणी यश, सिद्धी मिळाली असे नाही; पण आताच्या यशात, सिद्धीत त्यांचा वाटा फार फार मोलाचा म्हणून आपण त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. गेल्या दोन-तीन वर्षांच्या काळात, जागतिक संकटाच्या वेळी डॉक्टर्स, नर्स, पोलीस, दानशूर व्यक्ती, शास्त्रज्ञ यांनी सेवेचा आणि दानाचा संकल्प केला आणि प्राणांची बाजी लावून तो पार पाडला…

सामूहिक संकल्पात घरबांधणी, रस्ते-पूल-इमारत बांधणी, धरणे-प्रकल्प असे मोठमोठे प्रकल्प येतात जे विशिष्ट अंदाजित कालावधीत पूर्ण करणे अपेक्षित असते. अनेक प्रकारचे अवलंबित्व असल्याने; शिवाय लालफितीत, सरकारी दप्तरात प्रकल्प अडकून पडला तर कोनशिला समारंभ झाल्यानंतर वर्षानुवर्षे तो धूळ खात पडून राहतो. असे आरंभशूरत्व उपयोगाचे नाही. दिरंगाईमुळे अनास्था निर्माण होते. सर्वांचाच (जनतेचा) वेळ, पैसा वाया जातो. त्यामुळे संकल्पावर पूर्ण श्रद्धा आणि निष्ठा हवी. अडथळ्यांची शर्यत पार करायला हवी, आणि यशाचे पाणी सर्वांनी चाखायला हवे.

सध्याच्या काळात वृक्षलागवड, जलसंवर्धन, पर्यावरण जागृती- रक्षण, स्वच्छता हे मानवजातीसाठी मूलभूत संकल्प करायला हवेत. व्यक्तिगत आणि सामूहिक संकल्पाने ‘वसुंधरादिन’ साजरा करत चराचर सृष्टीचे अस्तित्व टिकविण्यात यश मिळवायला हवे.