- रमेश सावईकर
हनुमान जयंतीच्या दिवशी योग्य विधींनी पूजा केल्याने हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःखे आणि संकटे दूर होतात अशी मान्यता आहे. या दिवशी पूजेदरम्यान या देवतेला फुले, हार, सिंदूर, बुंदी किंवा बेसनाचे लाडू, तुळशीची पाने अर्पण केली जातात. हिंदू धर्मात हनुमान या देवतेला सात चिरंजिवींपैकी एक मानले जाते. हे दैवत अजूनही पृथ्वीवर आहे अशी मान्यता आहे. अशा या महाबली हनुमान देवाची आज जयंती. त्यानिमित्त…
हनुमान जयंती हिंदुधर्मीय भक्तगण मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करतात. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. या वर्षी आज म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमा, शनिवार दि. 12 एप्रिल रोजी देशातील विविध भागांत हनुमान जयंती साजरी केली जाईल. या दिवशी हनुमान मंदिरात सूर्योदयाच्या आधीपासून षोडशोपचार पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ केला जातो. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो अशी कथा आहे. त्यानुसार कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो. श्रीहनुमानाचा जन्म नाशिक जिल्ह्यातील अंजिनेरी येथे झाला असे मानले जाते. या दिवशी रामायणातील सुंदरकांडाचा पाठ वाचला जातो. ‘हनुमान चालीसा’चा पाठ या दिवशी करणे महत्त्वाचे मानले जाते.
श्रीहनुमानाची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून काही भाविक त्याच्या जयंतीदिनी उपवासाचेही व्रत करतात. भारताच्या विविध भागांत हनुमान जयंती साजरी करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी भक्तिभाव तोच असतो. विविधतेतून एकतेचे दर्शन घडविणारा, पारंपरिक संस्कृतीचे जतन करणारा असा हा उत्सव वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. हा दिवस हनुमान जन्मोत्सव म्हणूनही ओळखला जातो.
गोवा व महाराष्ट्र राज्यात सामान्यपणे शनिवार, तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीच्या पूजेचे वार मानले जातात. या दिवशी मारुतीला शेंदूर, तेल तसेच रुईची फुले आणि पाने अर्पण करण्याची प्रथा आहे. मारुतीला नारळ फोडण्याची रुढीही पूर्वापार चालत आलेली आहे. उत्तर भारतातसुद्धा हनुमानाची उपासना प्रसिद्ध आहे. तुलसीदास विरचित हनुमान चालिसा उत्तर भारतात विशेष लोकप्रिय आहे.
हिंदू पंचांगानुसार हनुमान जयंती चैत्र किंवा वैशाख महिन्यात येते. देशाच्या दक्षिण भागात म्हणजे तामिळनाडू आणि केरळ ही राज्ये हा सण ‘धनू’ येथे साजरा करतात, ज्याला स्थानिक लोक ‘मार्गशी’ म्हणतात. शास्त्रानुसार भगवान हनुमान हा देव प्रचंड शक्तीचा स्वामी आहे. तो धैर्य, शौर्य, करुणा आणि निष्ठा या गुणांचा प्रतीक आहे. हनुमानाच्या पूजनीय रूपाचे उत्सव साजरे करण्यामागील कारण म्हणजे, आपल्या जीवनातून वाईट शक्ती आणि नकारात्मकता दूर करणे. ‘हनुमान चालीसा’चे पठण करून भक्त हनुमानाच्या समान धैर्य आणि शौर्याचे रूप धारण करू इच्छितात, ज्यामुळे त्यांना वाईट शक्तीशी लढण्यास मदत होते. हनुमान जयंतीचा दिवस भगवानाकडून आंतरिक शक्ती मिळविण्यासाठी आणि आनंदी, समृद्ध जीवन जगण्याची ऊर्मा प्राप्त व्हावी या हेतूने मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.
हिंदू धर्मातील अनेक ग्रंथांमध्ये एक उल्लेख आहे की, जर एखाद्याला ‘मर्यादा पुरुषोत्तम’ भगवान रामाचा कृपाशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर त्याने भगवान हनुमानाची प्रार्थना करावी. भगवान राम एखाद्याचे दुःख आणि संकट दूर करण्यास मदत करतात असे म्हटले जाते. परंतु त्याच्याकडे पोचणे केवळ पवनपुत्र हनुमानाद्वारेच शक्य आहे. म्हणून भगवान राम आणि हनुमान या दोघांचेही आशीर्वाद मिळविण्यासाठी हनुमान जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते.
भगवान हनुमानाची प्रार्थना केल्याने मनातील भीती दूर होते. त्याच्या संरक्षणात प्रचंड शक्ती आहे. कारण तो संकटमोचक आहे आणि प्रभू रामाचा परम भक्त आहे. जे त्याची प्रार्थना करतात त्यांना तो आशीर्वाद देतो आणि त्याचे जीवन आनंदाने परिपूर्ण करतो. याच कारणास्तव हनुमान चालीसाचे पठण हे दुःख दूर करण्यास आणि मन भयमुक्त करण्यास मदत करते अशी भक्तांची श्रद्धा आहे.
‘रामायण’ ग्रंथातील कथेनुसार भगवान हनुमान हा शिवाचा अवतार आहे. तो वानरराज केसरी आणि त्याची पत्नी अंजनी यांचा पुत्र होय. त्यामुळे हनुमानाला ‘अंजनीसुत ‘ असेही संबोधले जाते. त्याचा जन्म हा केवळ रामाची भक्ती व सेवा करण्यासाठी झाला होता असे मानले जाते. त्याचे प्रभू रामावर निस्सीम प्रेम होते. त्याची परम भक्ती व सेवा करणे हेच जीवनाचे ध्येय मानून हनुमानाने आपले संपूर्ण जीवन व्यतित केले. एका आख्यायिकेनुसार एकदा हनुमानाने सीतेला डोक्यावर नारंगी रंगाचा सिंदूर लावताना पाहिले. त्याने सीतेला त्यामागचे कारण विचारले असता तिने सांगितले की, आपले पती श्रीरामाचे दीर्घायुष्य सुनिश्चित करण्यासाठी ती डोक्यावर सिंदूर लावते. हे ऐकून हनुमानाने त्याचे पूजनीय श्रीराम दीर्घायुषी आणि निरोगी आयुष्य जगावे म्हणून आपल्या संपूर्ण शरीरावर नारंगी सिंदूर लावले. याच कारणास्तव हनुमानाला नारंगी सिंदूर फार आवडतो असे म्हटले जाते आणि हनुमानाला संतुष्ट करण्यासाठी त्याच्या मूर्तीवर सिंदूर लावला जातो.
हनुमान जयंतीचा दिवस हा त्याचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्याकरिता त्याची विधीवत पूजा करून मोठ्या भक्तिभावाने त्याची प्रार्थना करण्याचा दिवस. तो साजरा केल्याने मनातील भीती दूर होते, संकटांचे निवारण होते आणि आपले जीवन भयमुक्त, सुखी-संपन्न होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. यास्तव संपूर्ण देशभर हनुमान जयंतीचा सण मोठ्या थाटात, उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. हनुमान जयंतीदिनी भक्तगण संपूर्ण दिवस उपवासाचे व्रत करतात. सकाळी उठून मंगलस्नान करून हनुमानाच्या मूर्तीची धार्मिक विधीनुसार यथासांग पूजा करतात. हनुमानाला सिंदूर, धूप, दीप, पुष्पहार, फळे अर्पण करून, त्याची आरती करून प्रार्थना करतात. त्याला नैवेद्य समर्पित करून नंतर तो प्रसाद म्हणून सेवन करतात.
काही भक्त हनुमान स्तोत्र, हनुमान चालीसा यांचे पठण करतात. रामायण, रामचरितमानस आदी ग्रंथांचे पूजनही करतात. हनुमान मंदिरात मोठ्या प्रमाणात जयंती साजरी केली जाते. हनुमानाची मूर्ती सजविलेल्या पाळण्यात ठेवून हनुमान जन्मोत्सव साजरा करतात. महिला पाळणा हलवीत पाळणागीत गाऊन जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. हनुमानाच्या जीवनावर आधारित प्रवचने, कीर्तने, व्याख्याने आयोजित करतात. याशिवाय रामचरितमानस, भगवद्गीता, भागवत पुराण आदी ग्रंथांचे वाचन केले जाते. त्यामुळे जीवनात चांगली कर्मे करण्याची प्रेरणा भक्तांना लाभते. माणसाच्या जीवनातील नकारात्मक शक्ती नष्ट व्हावी आणि सकारात्मकतेसाठी नवीन ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून ‘सुंदराकांड’चे पठण-श्रवण केले जाते.
सामुदायिकरीत्या हनुमान स्तोत्र पठण, नामजप, तसेच रामनाम जप मंदिरांतून हनुमान जयंतीदिनी करतात. याशिवाय हनुमानस्तुतीपर आरत्या व भजनाचे कार्यक्रम आयोजित करून हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते.
इतर राज्यांप्रमाणे गोव्यातही हनुमान जयंती विविध ठिकाणी असलेल्या मारुती व हनुमान मंदिरांत सामुदायिकरीत्या मोठ्या थाटामाटात साजरी करतात. त्यांत प्रामुख्याने हनुमान मंदिर पणजी, मारुती मंदिर मळा- पणजी, मारुती मंदिर म्हापसा, हनुमान मंदिर अंजुणा, रेईश मागुश मडगाव, सुधा कॉलनी डिचोली, भायलीपेठ डिचोली, साखळी, नायंगिणी-कुडचिरे (हनुमान मंदिर), श्रीशांतादुर्गा देवस्थान कवळे-फोंडा, श्रीराम देवस्थान कोलवाळ-म्हापसा आदी ठिकाणांचा समावेश होतो. याशिवाय राज्यात इतर अनेक ठिकाणी हनुमान जयंती साजरी केली जाते.
भगवान रामावरती भाविकांची जी भक्तिभावना व सेवाभाव आहे, तद्वतच भगवान श्रीहनुमानाप्रती असल्याने हनुमान जयंतीला विशेष महत्त्व आहे.
हनुमान पूजेचा शुभमुहूर्त
अभिजीत मुहूर्त : सकाळी 11.56 ते दुपारी 12.48 दरम्यान
अमृतकाळ : सकाळी 11.23 ते दुपारी 01.11 दरम्यान
गोधूली मुहूर्त : संध्याकाळी 06.44 ते 07.06 दरम्यान
संध्यापूजा मुहूर्त : संध्याकाळी 06.45 ते 07.52 दरम्यान
निशिथकाल मुहूर्त : मध्यरात्री 11.59 ते 12.44 दरम्यान
सकाळी पूजा मुहूर्त : 07.35 ते 09.10 दरम्यान
संध्याकाळी पूजेची वेळ : 06.45 ते 08.09 दरम्यान
हनुमान पूजेची पद्धत
- सकाळी स्नान आणि ध्यान केल्यानंतर, उपवास करण्याचा आणि पूजेची तयारी करण्याचा संकल्प करा.
- श्रीहनुमानाची मूर्ती किंवा फोटो लाल किंवा पिवळ्या कापडाने झाकलेल्या पाटावर किंवा चौरंगावर ठेवा.
- मूर्तीला स्नान घाला आणि जर फोटो असेल तर तो पूर्णपणे स्वच्छ करा.
- त्यानंतर धूप आणि दिवे लावून पूजा सुरू करा.
- हनुमानाला तुपाचा दिवा लावा.
- हनुमानाला अनामिका बोटाने टिळा लावा, शेंदूर अर्पित करा. सुगंध, चंदन इत्यादी लावा आणि नंतर त्याला हार आणि फुले अर्पण करा.
- जर तुम्हाला मूर्तीला अभिषेक करायचा असेल तर कच्चे दूध, दही, तूप आणि मध म्हणजेच पंचामृताने अभिषेक करा, नंतर पूजा करा.
- पंचोपचार पूजा व्यवस्थित केल्यानंतर त्याला नैवेद्य दाखवा. नैवेद्यात मीठ, मिरची आणि तेल वापरले जात नाही.
- प्रसाद म्हणून गूळ आणि हरभरा नक्की द्या. याशिवाय केशर बुंदीचे लाडू, बेसनाचे लाडू, चुरमा, मालपुआ किंवा मलाईचे पदार्थ अर्पण करा.
- शेवटी हनुमानाला प्रार्थना करा आणि त्याची आरती करा.
- त्याची आरती केल्यानंतर त्याला पुन्हा नैवेद्य अर्पण करा आणि शेवटी तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटा.