– नारायण विनू नाईक, मंगेशी – गोवा
देव आणि धर्म यांच्यावरील माणसाची श्रद्धा ही मानसिक शक्तीपासून निर्माण झालेली आहे. ही शक्ती विश्वशक्ती आहे. तिलाच ईश्वर आणि भगवंत म्हणतात. तिची उत्पत्ती, स्थिती, लय यांचा अंश प्रत्येकाच्या शरीरात आत्मशक्ती रूपाने वावरत असते. प्राचीन भारतीयांनी जो आदर्श समोर ठेवला त्याला त्यांनी देव असे नाव दिले. देव शब्दाचा अर्थच आहे प्रकाश देणारा. मार्गदर्शन करणारा, सेवात्मक परमेश्वराला प्रेमाची पूजा आवडते, मनातले प्रेम व सद्भावना त्याच्या चरणावर अर्पण करायला हवी.मंदिरे ही मनुष्याची सुसंस्कार केंद्रे असून त्या संस्कारातून मानवाचे जीवन सार्थकी लागत असते, देवभक्तीने मानवामध्ये क्रांती होते. सर्वांनी देवदेवतांची आराधना करावी. आजच्या धकाधकीच्या जीवनात अध्यात्म शक्ती तारक असते. देवालये, जनसमूहामध्ये देवभक्ती निर्माण करीत असतात. गोमंतकातील बहुतेक मंदिरात वर्षपद्धतीप्रमाणे जत्रोत्सव विविध कार्यक्रमांनिशी भक्तीमय वातावरणात उत्साहाने साजरा केला जातो.
मूर्तीची आख्यायिका
असे म्हणतात की आदिमाया श्री महालसेच्या पूजेची मूळ मूर्ती तयार करण्यासाठी आणलेल्या मूर्तीकार त्याला मिळालेल्या श्रींच्या प्रेरणेने मूर्ती घडविण्यास बसला. त्याला श्रींनी स्वप्नात येऊन सांगितले की माझी मूर्ती २१ दिवसांत पूर्ण कर. त्याप्रमाणे त्या मुदतीत ती मूर्ती पूर्ण केली. पण श्री देवीने आपले त्या मूर्तीत वास्तव्य नसल्याचे सांगितले. पुन्हा त्या मूर्तीकाराच्या स्वप्नात येऊन नवीन मूर्ती बनविण्याची आज्ञा केली. आपल्या अतिशय बुद्धिकौशल्याने त्याने पुन्हा श्रम घेऊन मूर्ती तयार केली. पुन्हा देवीने स्वप्नात येऊन आपण मूर्तीत नसल्याचे त्याला सांगितले. कदाचित देवी आपली परीक्षा घेत असावी. आपण ही परीक्षा उत्तीर्ण झाले पाहिजे या भावनेने त्याने पुन्हा मूर्ती तयार केली. पण ती एकवीस दिवसांची अट तो विसरला. थोडेसेच काम शिल्लक राहिले होते. बावीसाव्या दिवशी त्याने चुकून छिन्नीचा प्रहार मूर्तीच्या मुखकमलाकडील नेत्राखाली केल्यावर अचानक विपरीत घडले. मूर्तीच्या त्या डोळ्यांखालील भागातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. शिल्पकार ते रक्त पाहून तेथेच बेशुद्ध पडला. तो परत उठलाच नाही, अशी दंतकथा आहे.
देवीचे रौद्रस्वरूप
श्री महालसा देवीची मूर्ती शालिग्राम शिळेची असून उजव्या बाजूच्या वरच्या हातात खड्ग धारण करून देवीने त्याच हाताने चंडासूर या दैत्याची शेंडी पकडली आहे. देवीच्या चरणाखाली चंडासूर चिरडला गेला आहे. महालसा देवीच्या मूर्तीपुढे सुंदर नक्षीकाम केलेला चांदीचा मंडप व दीपमाळा असून मागे कलात्मक सुवर्णाची प्रभावळ दिसून येते. देवीच्या पिंडीकेवर चांदीचे दोन नाग व एक शंख आहे. सकाळच्या प्रहरी देवीला अलंकृत करून नित्य अभिषेक, पवनसूक्त व विष्णूसूक्त आदी विधी केले जातात. मध्यान्हकाळी मूर्तीला नवयौवन रूपात शृंगारून सूर्यास्ताच्यावेळी वृद्ध, सौभाग्यवती स्त्रीरूपात सजवले जाते. तसेच विविध रूपात अलंकार गंधपूजेने सजवले जाते. बाळकृष्ण, मुरलीधर, व्यंकटेश, कालियामर्दन, अनंत शयन, विठोबा आणि लक्ष्मी इत्यादी.
आख्यायिका
भाविकांची श्रीमहालसा देवीवर एवढी श्रद्धा होती की, पोर्तुगीज न्यायालयानेही दोन्ही पक्षांची संमती असल्यास मंदिरातील घंटेखाली प्रमाण (शपथक्रिया) करून तंटे मिटवण्यास मान्यता दिली होती. श्री महालसा देवी आपल्या भक्तजनांची कसोटी घेण्यासाठी आपल्या प्रिय असलेल्या वस्तू किंवा मानवाची मागणी करीत असते. अशा प्रसंगी कौल प्रसाद घेऊन मागितलेली वस्तू श्रीचरणी अर्पण करण्यात येते. अशा प्रकारे देवीने मागणी केलेल्या माणसांच्या नावे प्रतिवर्षी देवीला पड म्हणजे नारळ, तांदुळ, फुले, फळे अर्पण करून अभिषेक करण्यात आल्यानंतर प्रसाद घेतला जातो.
देवस्थानाचे वैशिष्ट्य
म्हार्दोळ येथील देवस्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराची भव्यता. मंडपाच्या प्रवेशद्वारावरील महालसा देवीची सुंदर अशी प्रतिमा दिसून येते. मंदिरासमोर श्री मारुतीचे मंदिर आहे. जवळच पितळीचा गरुडखांब आहे. तसेच उंचच उंच असा भव्य दगडी दीपस्तंभ आहे. त्याच्या शेजारी पितळी धातूचा ज्ञानदीप आहे. तो २५५५२ किलो वजनाचा आहे. त्याला २१ आरे आहेत, या दीपाला ५६७ वाती लागतात. तर ९ डबे तेलाची गरज असते.
तलाव
श्री महालसा देवी मंदिराच्या मागे सुंदर असा तलाव आहे. या तलावातील पाणी निर्मळ असते. तलावाचे बांधकाम अत्यंत प्रेक्षणीय आहे. या तलावात जत्रोत्सवाच्या दिवशी देवीला सुशोभित केलेल्या आसनावर बसवितात. त्यास नौकारोहणोत्सव असे म्हणतात. तलावात नौकेच्या अनेक फेर्या केल्या जातात. सर्वत्र विजेची रोषणाई केली जाते. तसेच तलावाच्या चोहोबाजूस पणत्या प्रज्वलित करून ठेवतात. दारु सामानाची आतिषबाजी केली जाते, हे दृश्य अत्यंत प्रेक्षणीय आणि नेत्रदीपक असते. या तलावाच्या शेजारीच मोठी दोन पिंपळाची झाडे आहेत. एका पिंपळाच्या झाडाखाली श्री महालसा देवीची प्राचीन पाषाणी मूर्ती आहे, मूर्ती बनविणार्या मूर्तीकाराकडून देवीने नाकारलेली ती हीच मूर्ती दुसर्या पिंपळाखाली नागाची प्रतिमा आहे. या ठिकाणी नित्य पूजाअर्चा करण्यात येते.
श्री सातेरी व श्री महालसा या दैवतांची जत्रोत्सवात प्रतिदिनी विविध वाहनात बसवून वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढली जाते. उदा. महारथोत्सव, गरुडवाहन, नौकारोहण, हत्ती अंबारी, लालखीसुखासनोत्सव व विजयरथोत्सव.
श्री महालसा देवीने सर्व भाविक जनांवर कृपादृष्टी ठेवून दीर्घारोग्य व दीर्घायुष्य देऊन ईश सेवा व जनसेवेची प्रेरणा देऊन इच्छित कामात यश द्यावे हीच ‘श्री’चरणी नम्र प्रार्थना!

