30 C
Panjim
Tuesday, June 22, 2021

‘श्रीफळा’चा महिमा वर्णू किती?

योगसाधना ५०७

 • डॉ. सीताकांत घाणेकर

सांस्कृतिक इतिहासाप्रमाणे ऋषी विश्‍वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण केली. त्यातील नर म्हणजे नारळ असे ऋषींनी त्याला सुचविले. म्हणून नराऐवजी नारळाचे बलिदान द्यायला शिकवले.
बारीक बघितले तर नारळाच्या फळाला डोके, शेंडी, नाक, डोळे…. वगैरे आहेत. त्यामुळे श्रीफळाची पूजा केल्यानंतर भगवंतासमोर नारळ फोडण्याची प्रथा सुरू झाली. त्यामागे बलिदानाचा भाव आहे. त्यामुळे पशु व मानवाचे बलिदान बंद व्हावे हा शुद्ध हेतू व भाव होता.

‘श्रीफळ’ म्हटले की, आपल्या लाडक्या गोव्याचा सुंदर निसर्ग डोळ्यांसमोर येतो; कारण इथे नारळ-पोफळीच्या मोठमोठ्या बागा आहेत. तसे बघितले, तर सर्व कोकण किनारपट्टीत, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळमध्ये नारळाची झाडे आहेत. गोव्यातील अगदी लांब-उंच व केरळमधील छोटी, बुटकी.
समुद्रकिनारा तर ह्या झाडांनी व्याप्त केलेला आहे. जाणकार म्हणत होते की, ह्या माडांना जाग लागते. म्हणून नारळ जास्त समुद्रकिनार्‍यावर असतात. एक म्हणजे समुद्राच्या लाटांचा सतत सुंदर गजर आणि तिथे राहणारे लोक. तिथे जास्त वस्ती म्हणजे मच्छिमारांची. आत असलेल्या बागांसभोवती तर अनेक लोक राहत. त्यामुळे नारळाच्या झाडांना सदासर्वकाळ काहीतरी आवाज मिळतोच.

खरेही असेल; कारण ज्याला जीव आहे, तो पशु, पक्षी, प्राणी, मानव असू दे अथवा वृक्ष वनस्पती असू देत, प्रत्येकाला भावना असतात. जसा देव देखील ‘भावाचा भुकेला’ असतो तसे सर्व जिवंत भावाचे भुकेलेले असतात. त्याला प्रेम मिळाले की ते जास्त फुलतात-फळतात. जीवनाचे तर हेच रहस्य आहे.
समुद्रकिनार्‍यावर नारळाची झाडे चांगली वाढतात. त्यांचे एक वैज्ञानिक कारण म्हणजे तिथे पाण्याबरोबर आलेला पुष्कळ ‘गाळ’ असतो. हे एक चांगले खत आहे, असे मानतात. त्याशिवाय समुद्राच्या पाण्यात मीठ असते, ते देखील चांगल्या वाढीसाठी नारळाला पाहिजे असते.

सगळेच नारळ चांगले; पण गोव्यातील नारळाची रुच आगळीवेगळीच असते असे मानले जाते. गोड पाणी व आतील गर देखील गोड व रुचकर. आपला गोवा म्हणजे परशुरामभूमी आहे, असे मानतात. म्हणून श्रींची कृपा गोव्यावर आहे. एवढेसे छोटेसे राज्य; पण विश्‍वातील लोक या भूमीकडे आकर्षित होतात. पूजनीय पांडुरंगशास्त्री श्रीफळाबद्दल बोलताना सांगतात,
‘मुखं पक्षदलकारं वाणी चंदन शीतला|
हृदय क्रोधसंयुक्तं त्रिविधं धूर्तलक्षणम्‌॥
कमलापत्राच्या आकारासारखे मुख, चंदनासारखी शीतल वाणी व क्रोधाने संयुक्त असे हृदय, ही तीन धूर्ताची लक्षणे आहेत. याच्या उलट, सज्जनाच्या संबंधात किंवा वाणीत सुरुवातीला नारळाच्या वरच्या कवटीचा कडकपणा जाणवतो; पण दीर्घकाळ संबंध नारळाच्या पाण्यासारखा भावार्थ आणि त्यांची वाणी खोबर्‍यासारखी पुष्टिवर्धक व आपल्या विकासाची द्योतक ठरते.
नारळाप्रमाणे सज्जनही बाह्य देखाव्याचा आग्रह राखीत नसल्यामुळे त्यांना ओळखणे फार कठीण जाते. बाहेरून सामान्य व कठोर वर्तनी वाटणार्‍या लोकांना ओळखण्यात आपण अधिक प्रमाणात ‘चूक’ करून बसतो.
हा मुद्दा उत्तररामचरितात भवभूतीने छान समजावला आहे,
‘वज्रादपि कठोराणि मृदुनि कुसुमादपि|
लोकोत्तराणां चेतांसि को हि विज्ञातुमर्हसि॥
वज्राहूनही कठोर व फुलाहूनही कोमल अशा लोकोत्तर पुरुषांचे चित्त समजायला कोण समर्थ आहे? अनेक महापुरुष देखील तसेच असतात- बाहेरून कठोर व आतून मृदुल. श्रीफळ हे त्यांचे देखील प्रतीक आहे. असे म्हणण्यामागे जीवनाचे एक महान तत्त्वज्ञान आहे.

महापुरुष आत्मशासन करताना वज्राहूनही कठोर असतात, तर दुसर्‍याला शासन करण्यात फुलाहूनही कोमल असतात. कर्तव्यपालनाच्या समयी ते फारच कठोर होतात. त्यांचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्रीराम! त्यांनी आपल्या प्रेमाने व भावाने स्वतःच्या कुटुंबाचे पालन केले. आई-सावत्रआई-वडील-सावत्रभाऊ व प्रजा यांना उत्कृष्ट भाव दिला; पण स्वतःच्या बाबतीत ते अत्यंत कठोर वागले. कर्तव्याच्या पालनेत बिलकुल तडजोड केली नाही. वडिलांनी दिलेल्या वचनाखातीर ते चौदा वर्षे वनवासात अगदी आनंदाने गेले. या संदर्भात श्रीराम अग्रस्थानी आहेत.

आदिमानव अगदी जंगली होता. त्याची देवदेवता देखील आसूरी वृत्तीची दाखवतात. म्हणून त्यांना पशूबळी देत असत. कोंबडा, बकरा, रेडा… काही ठिकाणी नरबळी देखील दिला जात आहे. आता देखील काही ठिकाणी या प्रथा थोड्याफार प्रमाणात चालू आहेत. लहान बालकांचा देखील या तथाकथित प्रगत मानवाच्या राज्यात बळी दिला जातो. कायद्याने तो फार मोठा अपराध ठरतो.

खरे म्हणजे या महाभयंकर प्रथेमागे काही देखील तत्त्वज्ञान नाही. आध्यात्मिक तर नाहीच नाही.
पूर्वीचा मानव भटक्या व मांसाहारी होता. आपल्या वैदिक ऋषींनी त्याला शेती शिकवली. त्याला शाकाहाराकडे, अहिंसेकडे वळवले. त्यामुळे तो एका ठिकाणी स्थायिक व्हायला शिकला. तो थोडा थोडा सुशिक्षित, प्रगतशील व्हायला लागला.
सांस्कृतिक इतिहासाप्रमाणे ऋषी विश्‍वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण केली. त्यातील नर म्हणजे नारळ असे ऋषींनी त्याला सुचविले. म्हणून नराऐवजी नारळाचे बलिदान द्यायला शिकवले.
बारीक बघितले तर नारळाच्या फळाला डोके, शेंडी, नाक, डोळे…. वगैरे आहेत. त्यामुळे श्रीफळाची पूजा केल्यानंतर भगवंतासमोर नारळ फोडण्याची प्रथा सुरू झाली. त्यामागे बलिदानाचा भाव आहे. त्यामुळे पशु व मानवाचे बलिदान बंद व्हावे हा शुद्ध हेतू व भाव होता. मंदिरात फोडलेल्या नारळाचा अर्धा भाग मंदिरात ठेवला जातो व राहिलेला अर्धा घरी नेऊन त्याचा प्रसाद बनवला जातो.

या बलिदानाबरोबर आणखी गैरसमज होता. तो म्हणजे बलिदानाच्या वेळी पशुच्या रक्ताचा छिडकाव व्हायला हवा. या प्रथेबद्दल समजावताना प. पू. पांडुरंगशास्त्री म्हणतात की, ऋषींनी समाजाला समजावले. तुम्ही देवदेवतांच्या मूर्तीला कुंकू लावा व त्याच्यावर नारळाच्या पाण्याचा छिडकाव करा. त्यामुळे रक्तपाताचा रंग देखील पाहायला मिळेल. असे करून आपल्या महान ऋषींनी मानवाला पशुहत्या व मानवहत्येपासून वाचवले. तसेच मानव समाजाची अहिंसेकडे वाटचाल सुरू झाली. निदान या धार्मिक प्रथेपुरती तरी.

शास्त्रीजी पुढे म्हणतात, या मानवाच्या जीवन विकासाकडील वाटचालीत श्रीफळाने स्वतःचे बलिदान दिले. श्रीफळ हे आदिमानव व सुसंस्कृत मानव यांच्यामधील सेतूसारखे आहे.
श्रीफळ हे बारमाही फळ आहे. त्यामुळे ते नियमित उपलब्ध होते. तसेच ते फळ दीर्घकाळ टिकणारे आहे. त्यामुळे प्रत्येक शुभकार्यात ते सहज उपलब्ध होते.

पूजनीय पांडुरंगशास्त्री भारतीय संस्कृतीचे अभ्यासक आहेत. त्यावर चिंतन करणारे आहेत. आपल्या विविध प्रतिकांकडे ते ज्ञान व भावपूर्ण दृष्टीने बघतात. श्रीफळाच्या संदर्भात ते शेवटी सांगतात- मानवाच्या सांस्कृतिक प्रगतीत बलिदान देणारे प्रतीक म्हणजे श्रीफळ.

 • जीवनात सौंदर्याचा महिमा समजावणारे प्रतीक म्हणजे श्रीफळ.
 • श्रीफळ मानवी मनाच्या वैभवाचे प्रतीक आहे.
 • ते मानवाच्या विभिन्न द्वंद्वात समन्वय साधण्याची दिशा देते.
 • कठोर कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देते.
 • खारटपणा पिऊन गोडवा देण्याचे अनुपम शिक्षण देते.
  सारांश, म्हणून ते आम्हां सर्वांना एक सुंदर जीवनोपयोगी संदेश देतात-
  ‘‘श्रीफळाच्या ह्या संदेशाला झेला|
  जीवनात खर्‍या अर्थाने ‘श्रीयुत’ बना॥
  एकांतात ध्यान करताना अनेकवेळा वेगवेगळे विचार मनात उद्भवतात. असे साहित्य वाचले की विचार येतो- आपल्या महान ऋषींनी अत्यंत कष्ट करून हाल सोसून, जंगली मानवाला संस्कृतीकडे वळविले. तो सुसंस्कृत झाला. त्यात अनेक पैलू आहेत. पण महत्त्वाचा पैलू म्हणजे शाकाहार करणे, मानवतेच्या धर्माचे पालन करणे, स्त्रियांबद्दल पवित्रतेचा दृष्टिकोन ठेवणे, विवाहप्रथेचे आध्यात्मिक, धार्मिक महत्त्व समजणे; पण दुर्भाग्य म्हणजे आजच्या तथाकथित सुधारित, सुसंस्कृत मानव हे सर्व संस्कार विसरून परत जंगली अवस्थेकडे जाताना दिसतो. म्हणूनच मांसाहार वाढला, स्त्रियांवर घृणास्पद अत्याचार वाढले, विवाह संस्कार फक्त एक कर्मकांड राहिला, पावित्र्य कमी झाले, विवाहबाह्य संबंध वाढले व त्याचे समर्थन व्हायला लागले, दारु, तंबाखू, जुगार, वेश्याव्यवसाय ही व्यसने वाढली, आपापसांत प्रेमभावना कमी होऊन स्वार्थ व आत्मकेंद्रितपणा वाढला. भांडणे, तंटे, युद्धे जास्त व्हायला लागली. सारांश म्हणजे मानव पुन्हा एकदा विकार व वासनांच्या अधीन व्हायला लागला. अपवाद अवश्य आहेत. कोरोनाच्या आपत्तीच्या काळात सूज्ञ यावर चिंतन करतील, अशी अपेक्षा आहे. आपले योगसाधक तर करताहेतच.
  (संदर्भ ः- संस्कृती पूजन- प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले)

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

उत्तम आरोग्यासाठी योगासने

डॉ. मनाली म. पवार ‘पादांगुष्ठासन’ हे पोटाची जादा चरबी कमी करण्यासाठी, मान दुखत असल्यास त्याचा त्रास कमी करण्यासाठी,...

व्हिटिलिगो किंवा कोड

डॉ. अनुपमा कुडचडकरपणजी कोडामुळे व्यक्तीच्या शरीराच्या आतील भागात काही उपद्रव होत नसून फक्त बाह्य सौंदर्यात विद्रुपता येते ज्यामुळे...

इफ्‌स अँड बट्‌स! बायोस्कोप

प्रा. रमेश सप्रे ‘इफ्‌स अँड बट्‌स’नी आपलं दैनंदिन जीवन, संभाषण ओतप्रोत भरलेलं असतं. अनेकवेळा ‘इफ्‌स अँड बट्‌स’ यांनी...

विरोधक एकत्र येणार?

‘जो मै बोलता हूँ, वो मै करता हूँ, जो मै नही बोलता वो तो डेफिनेटली करता हूँ’ हा हिंदी चित्रपटातील संवाद ज्यांना...

कोरोना बळी ३ हजाराच्या उंबरठ्यावर

>> राज्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्याही ३ हजारांवर; नवे केवळ २१७ रुग्ण; ७ जणांचा बळी राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३...

ALSO IN THIS SECTION

उत्तम आरोग्यासाठी योगासने

डॉ. मनाली म. पवार ‘पादांगुष्ठासन’ हे पोटाची जादा चरबी कमी करण्यासाठी, मान दुखत असल्यास त्याचा त्रास कमी करण्यासाठी,...

व्हिटिलिगो किंवा कोड

डॉ. अनुपमा कुडचडकरपणजी कोडामुळे व्यक्तीच्या शरीराच्या आतील भागात काही उपद्रव होत नसून फक्त बाह्य सौंदर्यात विद्रुपता येते ज्यामुळे...

इफ्‌स अँड बट्‌स! बायोस्कोप

प्रा. रमेश सप्रे ‘इफ्‌स अँड बट्‌स’नी आपलं दैनंदिन जीवन, संभाषण ओतप्रोत भरलेलं असतं. अनेकवेळा ‘इफ्‌स अँड बट्‌स’ यांनी...

जीवनाची दिशा बदलू या

योगसाधना - ५०९अंतरंग योग - ९४ डॉ. सीताकांत घाणेकर ‘‘मी मेल्यावर माझ्या शवपेटीला दोन बाजूला...

॥ बायोस्कोप ॥लिव्ह अँड् लेट् लिव्ह

प्रा. रमेश सप्रे सुसंस्कृत समाजाचं स्वप्न आहे- ‘वसुधैव कुटुंबकम्’. यात एक तिळ जरी मिळाला तरी तो सात जणांनी...