श्रद्धा-बुद्धीतून जीवनविकास साधा

0
18

(योगसाधना- ५६७, अंतरंगयोग- १५३)

  • डॉ. सीताकांत घाणेकर

ईश्‍वराने माणसाला जन्मतःच दोन अनमोल गोष्टी दिल्या आहेत. एक श्रद्धा आणि दुसरी बुद्धी. या दोहोंचा जीवनात समन्वय असेल तरच जीवन-विकास साधता येतो. परंतु फारच कमी माणसे असा समन्वय साधू शकतात.

विश्‍वातील प्रत्येक राष्ट्राला स्वतःची अशी एक संस्कृती असते. विविध प्रथा असतात. विशिष्ट तर्‍हेची वेशभूषा असते. अनेक प्रकारच्या जेवणपद्धती असतात. वेगळा इतिहास-भूगोल असतो. यामागे विशिष्ट अशी कारणे असतात. शेकडो-हजारो वर्षांपासून देशातील विचारवंतांनी, विद्वानांनी वेळोवेळी विचारविनिमय, अभ्यास, चिंतन करून या सर्व गोष्टी प्रस्थापित केलेल्या आहेत. गरज भासेल त्यावेळी त्यात आवश्यक बदलदेखील केले आहेत.
येथे एक मुद्दा समजायला हवा की नियमित बदल जरूरीचे आहेत. पण मुख्य म्हणजे त्या राष्ट्राच्या तत्त्वांमध्ये, विचारसरणीमध्ये तडजोड करू नये हे अपेक्षित आहे. अवश्य इतरांकडून चांगल्या गोष्टी शिकाव्यात, आत्मसात कराव्यात, आचरणात येऊ द्याव्यात. व्यक्तीसाठी, समाजासाठी असा बदल जीवनविकासासाठी चांगला असेल तर अवश्य करावा. हा विचार न करता अज्ञानी व्यक्तींच्या मतानुसार बदल केला तर ती गोष्ट भूषणावह नाही. त्यामुळे विपरित परिणाम होऊन काही प्रमाणात बदल घातकदेखील ठरू शकतात.

या विषयावर सूक्ष्म नजर ठेवणे हे समाजनेत्याचे आद्य कर्तव्य आहे. त्या नेत्याचे काय गुण असावेत यासंदर्भात गणेशचतुर्थीपासून आपला अभ्यास सुरू आहे.
मागच्या दोन लेखांत आपण गणपतीची व्याख्या, नेत्याची गुणकथा पाहिली. गणपतीचे हत्तीचे मस्तक, मोठे सुपासारखे कान, बारीक डोळे, लांब नाक (सोंड) यामागील तत्त्वज्ञान बघितले. या सर्व गोष्टी कशा प्रतिकात्मक आहेत याबद्दल थोडा विचार केला. आता पुढे-
गणपतीला दोन सुळे आहेत. अगदी हत्तीसारखेच. पण त्यातील एक पूर्ण आणि दुसरा अर्धा (तुटलेला) आहे. लहान मुलांना आनंद वाटावा, विषयाबद्दल आवड निर्माण व्हावी म्हणून एक कथा सांगितली जाते-
महर्षी व्यास महाभारताची रचना करीत होते. त्यांचा लेखनीक गणपती होता. गणपतीने एक अट व्यासांना घातली की तुमचा कथा सांगण्याचा स्रोत अखंड चालू राहायला हवा. मध्ये तुम्ही बोलायचे बंद झाले तर मी लिहिणे सोडून निघून जाईन. मला इतर अनेक कामे आहेत. उगाच वेळ दवडण्यासाठी माझ्याकडे फालतू वेळ नाही. बरोबर आहे. नेत्यांना वेळ नसतो. ते सतत कामांत गुंतलेले असतात. तत्त्ववेत्तेदेखील वेळ वाया घालवीत नसतात.
महर्षी व्यासदेखील हुशार होते. त्यांनी अट लगेच मान्य केली. पण स्वतःचीदेखील अट घातली की गणपतीने शुद्धलेखनासारखे लिहायचे नाही तर प्रत्येक शब्द व वाक्य विचार-चिंतन करूनच लिहायचे.

खरे म्हणजे हा मुद्दा आपल्यातील प्रत्येकाला लागू आहे, उपयोगी आहे. प्रवचन ऐकताना आपण काही मुद्दे लिहून घेतो. ते मुद्दे समजून लिहिले तर नंतर अभ्यास करायला उपयोगी पडते. बालपणात छोट्या गणपतीच्या अटीचे कौतुक वाटायचे व व्यासांबद्दल आदर वाटायचा. त्यांच्या विद्वत्तेबद्दल आता प्रौढपणी चिंतन केल्यावर हा अर्थ लक्षात येतो.

आता एक सुळा अर्धा कसा झाला याबद्दल कथेप्रमाणे असे- लिहिता लिहिता गणपतीची लेखणी मोडली म्हणून त्याने लगेच आपला एक सुळा मोडला, त्याची लेखणी केली व लिहिणे चालूच ठेवले- व्यत्यय न येता. लहान मुलांसाठी ही कथा मनोरंजक आहे. पण त्यामागील तत्त्वज्ञान समजावताना पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले आपल्या गणेशचतुर्थीबद्दलच्या प्रवचनात सांगतात-
पूर्ण सुळा श्रद्धेचा व अर्धा बुद्धीचा आहे. जीवनविकासासाठी आत्मश्रद्धा व ईशश्रद्धा पूर्ण असली पाहिजे. बुद्धी थोडी कमी असली तर चालेल, पण स्वतःवर तसाच प्रभूवर थोडासा जरी कमी विश्‍वास असला तरी चालणार नाही.

ईश्‍वराने माणसाला जन्मतःच दोन अनमोल गोष्टी दिल्या आहेत. एक श्रद्धा आणि दुसरी बुद्धी. या दोहोंचा जीवनात समन्वय असेल तरच जीवन-विकास साधता येतो. परंतु दुसरी गोष्ट अशी आहे की फारच कमी माणसे असा समन्वय साधू शकतात.

बुद्धी जसजशी वाढत जाते, तसतसे तिच्या प्रखर अग्नीत श्रद्धापुष्प कोमेजून जाते. मानवाने हा समन्वय साधण्यासाठी ईश्‍वराजवळ प्रार्थना केली पाहिजे- ‘प्रभो! तुझ्याजवळ एवढेच मागतो की बुद्धी वाढली तरी भाव टिकू दे!’
जीवनात श्रद्धा व बुद्धी या दोहोंची आवश्यकता आहे. परंतु मानवीबुद्धी सीमित असल्यामुळे शेवटी त्याला श्रद्धेचा आसरा घेऊन पुढे जायचे असते. म्हणूनच तर त्या दोन सुळ्यांपैकी एक सुळा खंडित झाला. तो बुद्धीच्या मर्यादेचे सूचक आहे व दुसरा सुळा पूर्ण आहे, तो अखंड श्रद्धेचे सूचक आहे.

खरेच, हा मुद्दा पटण्यासारखा आहे. आज समाजात अनेककडे दोन तर्‍हेच्या व्यक्ती दिसतात. काहीजण बुद्धी न वापरता श्रद्धापूर्वक सर्व व्रतवैकल्ये करतात; पण त्यामुळे ती फक्त शुष्क कर्मकांडेच ठरतात. अनेकवेळा अंधश्रद्धेपोटी, भीतीमुळे ही सर्व केली जातात. यामुळे समाजात गैरसमजुती पसरतात. त्यात अनेकांचे नुकसान होते.
त्याउलट दुसरा गट फक्त बुद्धीवादी आहे. तो बुद्धिनिष्ठ नाही. अहंकारापोटी ते आपल्या बुद्धीवरच जास्त भर देतात. यामुळेदेखील समाजाचे नुकसान होते. म्हणूनच गरज आहे ती म्हणजे श्रद्धाबुद्धी समन्वयाची. तरच मानवाचा जीवनविकास सर्व पैलूंनी परिपूर्ण होईल. या विश्‍वात आनंद नांदेल.

गणेशचतुर्थी सगळीकडे आनंदाचे वातावरण फार चांगल्या रीतीने निर्माण करते. पण त्याचबरोबर जर गणेशमूर्ती व त्याच्या कथेबद्दल सूक्ष्म तत्त्वज्ञान समजून घेतले तर हा आनंद अनेक पटीनी वाढेल. तो आत्मानंद, भावानंद होईल.
योगसाधकांना या विषयाबद्दल ज्ञान आहे, त्यामुळे ते अशा आनंदाचा अनुभव अवश्य घेतात. पण इतरांचे काय? त्यांचे अज्ञान आपण दूर केले तर चतुर्थीच्या वेळी आनंदाचे साम्राज्य असेल, पण तद्नंतरही चिरकाळपर्यंत ते टिकेल.
(संदर्भ ः पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले- संस्कृतीपूजन- गणेश चतुर्थी.)