Home बातम्या ‘शोले’ची त्रिमिती तरीही अतृप्ती

‘शोले’ची त्रिमिती तरीही अतृप्ती

0

– सुरेश वाळवे

भारतीय चित्रसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत अन् हॉलिवूडनंतर ‘बॉलिवूड’चा क्रमांक लागतो, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. परंतु संख्या सोडाच, दर्जाच्या दृष्टीने पाहिल्यासही अमेरिकेच्या लॉस एंजल्समधील हॉलिवूड खूप खूप पुढे आहे, हे मान्य करावे लागेल. ऑस्कर/एकॅडमी ऍवॉडर्‌‌सचा विचार करता तर आपण तेथील चित्रपटांच्या जवळपासही पोचू शकत नाही. सरस तांत्रिक अंगे हे जसे त्यांचे बलस्थान तद्वत नवनवे, अफलातून कथाविषय आणि भव्यता या बाबतीत तर हात धरणे शक्यच नाही. गेल्या शे-शंभर वर्षांमध्ये खरोखरच भव्यदिव्य असे किती चित्रपट आपल्याकडे बनविले गेले? अगदी हातांच्या बोटांवर मोजण्याइतके. ‘बेन हर’च्या तोडीचा तर महापट आपण अजून निर्माण करू शकलेलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. नाही म्हणायला ‘मुगल-ए-आझम’चा गौरवपूर्ण उल्लेख करता येईल. आता तर तो सप्तरंगात परिवर्तिला गेल्याने पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार, मधुबाला, दुर्गा खोटे वगैरेंच्या अभिनयाच्या जुगलबंदीचा आनंद द्विगुणित होत असतो.
‘मुगल-ए-आझम’नंतर दुसरा हिंदी महापट म्हणता येईल तो ‘शोले.’ १९७५ साली म्हणजे जवळजवळ चार दशकांपूर्वी त्याची निर्मिती झाली अन् तेव्हा त्याचा एकूण खर्च चार-पाच कोटींपलीकडे गेला नव्हता. आज शंभर, दोनशेच नव्हे तर ‘धूम-३’सारखा चित्रपट तीनशे करोडचा गल्ला अवघ्या काही दिवसांत कमावतो. ‘शोले’ने बहुधा गेल्या चार दशकांत सगळी मिळून एवढी कमाई केली नसेल.
ते काही असो, ‘शोले’ हा भारतात तरी मैलाचा महत्त्वपूर्ण दगड ठरला आहे अन् दोन पिढ्यांवर त्याची मोहिनी टिकून आहे. हल्लीच हा चित्रपट थ्री डी म्हणजे त्रिमिती स्वरूपात प्रदर्शित झाला अन् या तंत्रामध्ये त्याचा आनंद तर शतपटीनी अधिक लुटला. तरीदेखील गोव्यात या थ्री डी ‘शोले’ला म्हणावा तितका प्रतिसाद दिसत नाही. याचे एक कारण मूळ ‘शोले’ अष्टौप्रहर चालणार्‍या हिंदी सिनेवाहिन्यांवर अधूनमधून सतत दाखविला जातो, हे असेल. पुन्हा अनेक रसिकांना त्रिमिती तंत्राची तेवढी माहितीही नसेल. चित्रपट तोच; थोडे तंत्र बदलले म्हणून सिनेगृहात जाऊन का पहा, असा विचारही त्यामागे असू शकतो. पण महाराज, चुकता आहात!

‘शोले’ हा डाकूपट. ‘गंगा-जमना’पासून ‘जिस देश में गंगा बहती है’ अन् ‘मुझे जीने दो’पासून ‘मेरा गॉंव, मेरा देश’पर्यंत अनेक डाकूपट आपल्याकडे होऊन गेले. वरील सर्व यशस्वीही ठरले. तथापि ‘शोले’ तो ‘शोले.’ न भूतो अशी त्याची फर्मास निर्मिती तर झालीच; परंतु उत्कृष्ट दिग्दर्शन, परिणामकारक संकलन, कसदार अभिनय, सकस कथा, नेमकी गाणी, चपखल पात्रयोजना, ‘रग्ड’ लोकेशन्स, उत्तम छायाचित्रण, कोंदणात हिरा बसवावा तशी ‘टाइट’ पटकथा आणि चटपटीत, खटकेबाज संवाद असा सारा मालमसाला समप्रमाणात साकार व्हायचा योग पहिल्यांदाच जुळून आल्याने पदार्थ खमंग न बनता तरच नवल.
‘इंडियन एक्स्प्रेस’चे संपादक शेखर गुप्ता यांनी हल्लीच एनडीटीव्हीवर दिग्दर्शक रमेश सिप्पींशी केलेली ‘वॉक द टॉक’ बातचीत अन् सीएनएन- आयबीएनवर परवा राजीव मसंदने घेतलेली पटकथाकार सलीम-जावेद यांची मुलाखत काही ‘बिहाइंड द सीन’ गोष्टींवर प्रकाश पाडती झाली. ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘डॉन’, ‘त्रिशूल’ अशा यशस्वी पटकथा देणार्‍या या जोडीत फूट पडली तिचे कारण तेवढे कळले नसले तरी ‘त्यावेळी आपण काहीसा अपरिपक्वपणे वागलो’ अशी कबुली सलीम खान यांनी प्रांजळपणे दिली तेव्हा त्यांचे डोळे भरून आले होते. ‘अरे यार, यशाचे जसे आपण दोघेही बरोबरीने हिस्सेदार होतो तशी त्या कटू विभाजनाची जबाबदारीही उभयतात वाटून जाते,’ असे जावेद यांनी त्यावर म्हटले तेव्हा अख्तर यांच्या दिलेरपणाचाही प्रत्यय आला. सिप्पी आणि सलीम-जावेद यांनी ‘शोले’च्या चित्रणप्रसंगीचे अनेक किस्से कथन केले. धर्मेंद्र (वीरू) व अमिताभ (जय) यांना एकदुसर्‍याच्या भूमिका हव्या होत्या येथपासून बहुतेकांची पसंती गब्बर ही व्यक्तिरेखा रंगविण्याची होती, अशी माहिती दिली. राजकुमार, डॅनी डेन्झोंग्पा आदी अनेक तार्‍यांचा विचार गब्बरसाठी झाला होता. मात्र अखेरीस जयंतपुत्र अमजद खानची निवड झाली अन् पुढे काय घडले, तो सारा इतिहास ताजा आहे. (पण दिलीपकुमारला मात्र ठाकूर रंगवावा, असे वाटत होते अन् ती संधी गेल्याची खंत आहे.)
‘शोले’चे हे यश नेमके कशात आहे? नवरसांचे इतके बेमालूम मिश्रण बराच काळपर्यंत रुपेरी पडद्यावर झाले नव्हते. एकरंगी वा मॅचिंग कपड्यांपेक्षा कॉन्ट्रास्ट पोशाख अधिक उठावदार दिसतो. ‘शोले’तील बहुतेक प्रमुख व्यक्तिरेखा अशा परस्पर स्वभावविरोधी आहेत. पहा ना, बसंती (हेमा) बडबडी तर राधा (जया) आतल्या आत जळणारी अन् मूक. ‘नचनिया’ हेमा रंगीत अन् तडकभडक चनिया-चोली-घागर्‍यात तर जयाचा (विधवा राधा) चित्रपटभर वावर (एकदोन विवाहपूर्व प्रसंग वगळता) सफेद साडी-ब्लाऊजमध्ये. वीरू वटवट बहाद्दर आणि एक्स्ट्रोवर्ट तर जय गंभीर अन् इंट्रोवर्ट तरी मिस्कील व विनोदबुद्धी असलेला. ठाकूर बलदेव सिंहचे (संजीव) बहुतेक संवाद खर्जात तर गब्बर आक्रस्ताळा. ए. के. हंगल यांची छोटेखानी भूमिकादेखील भाव खाऊन जाणारी अन् तशीच दुर्गा खोटेची नटखट मौसी. मुगल-ए-आझममध्ये तिने पती व पुत्र यांच्या कचाट्यात सापडलेली जोधाबाई ताकदीने रंगवली होती. तो चित्रपट म्हणजे अभिनयाचा चौरंगी सामनाच होता. पाचवा फिकटसा रंग अर्थातच अजित. पृथ्वीराज यांचा खर्जातील खरबरीत आवाज. (‘मार्मिक’मध्ये सिनेप्रिक्षन लिहिणार्‍या श्रीकांतजीनी त्याचे वर्णन ‘जमिनीवर कपाटे सरकवल्यासारखा’ असे केले होते.) दिलीपचे नजाकतपूर्ण पण जोशीले उर्दू संवाद, मधुबालेचे आरसपानी सौंदर्य आणि दुर्गाबाईंची तगमग, घुसमट. व्वा! क्या बात है| त्यात पुन्हा नौशाद यांची सदाबहार गीते.
‘शोले’त हंगलच नव्हेत, विजू खोटे (कालिया) आणि मॅक्‌महॉन (सांभा) हेही नगण्य भूमिकांमध्ये प्रभाव पाडते झाले. प्रत्येक व्यक्तिरेखा आणि सार्थ पात्रनिवड असा दुर्मीळ योग क्वचितच घडून आलेला. आणि सूचक दिग्दर्शन/संकलन इन के क्या कहने! ही सूचकताही इतकी परिणामकारक की, अगदी बुद्दू प्रेक्षकालाही चटकन अपील होणारी. उदाहरणार्थ, अहमद (सचिन) यांची हत्या प्रत्यक्ष न दाखवता गब्बर केवळ मनगटावरील मुंगळा चिरडून सूचित करतो. बलदेवच्या भुजा तोडताना न दाखवता ‘ये हाथ, ये हाथ, हमको दे दे ठाकूर’ म्हणत गब्बरने वार करण्यासाठी (वीरभद्रसदृश) उचललेल्या तलवारी अन् तो सीन तेथेच कट करीत पडद्यावर दर्शन घडते ते संजीवच्या खांद्यावरील शाल उडून उघड्या पडलेल्या मुंड्या बाहूंचे. असाच आणखी एक प्रसंग म्हणजे ठाकूरच्या नातवाच्या हत्येचा. अंगणात एकीकडे झोपाळा कुंकूं कुंकू आवाज करीत स्लो मोशनमध्ये झोके घेत आहे, भेदरलेला मा. अलंकार (निवेदिका पल्लवी जोशीचा भाऊ) भयभीतपणे थरथरत उभा आहे अन् समोर घोड्यावरून गब्बर धरतो तो बंदुकीचा नेम. गोळी झाडलीय, असे न दाखवता दुसर्‍याच क्षणी स्टेशनवर होणारे रेल्वेगाडीचे आगमन अन् दाट धुराच्या माहोलात हाती विविध भेटवस्तू (रिश्‍वत) घेऊन उतरणारा ठाकूर! कालियाबिलिया यांच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी पेटलेला गब्बर विचारतो, ‘होली कब है? कब है होली?’ प्रसंग तेथेच कट् आणि लगेच पडद्यावर ‘होली के दिन दिल खिल जाते हैं’ हे समूहनृत्यगीत. प्रेक्षक रंगात न्हाऊन निघत असतानाच रामगढवर पडलेली डाकूंची धाड अन् पुढची सारी गोळाबारी, खूनखराबा. राज कपूर, हृषिकेश मुखर्जी यांची संकलनावर जबरदस्त हुकमत होती. पण ‘शोले’तही कातरीची जी करामत दिसते, ती अवर्णनीय. शंभरपैकी शंभर गुण! सव्वातीन-साडेतीन तास लांबीच्या या चित्रपटात गाणी मोजून पाच अन् तीदेखील योग्य क्षणी, रिलीफ देणारी. चवळीची शेंग कशी लवलवणारी हेलन त्या काळची एकमेव कॅबरे डान्सर. आज ‘आयटम सॉंग’च्या नावाखाली नागड्याउघड्या होत हिरॉइनीदेखील धागडधिंगा घालू लागल्या आहेत. पुढे हेलन सलीमची दुसरी बीबी आणि सलमान खानची सौतेली मॉं बनली अन् आज तिच्या देहाचा गरगरीत भोपळा झाला आहे. पण ‘मेहबूबा मेहबूबा’ या जिप्सी नृत्यगीताच्या वेळी खरी कमाल केलीय ती जलाल आगाने. आपल्याकडच्या फुगडीमध्ये काही मुश्कील पदन्यास असतात. जलालने त्यांचे दर्शन घडवले आहे. वास्तविक तो एक गुणी कलाकार. पण केवळ ‘ज्युली’त त्याला अभिनयदर्शनाची थोडीफार संधी लाभली, तेवढीच. तरुणपणीच तो अल्लाला प्यारा झाला. अमजद खान, संजीव कुमार, मॅकमहॉन, संगीतकार राहुलदेव बर्मन, गीतकार आनंद बक्षी ही ‘शोले’च्या अपूर्व यशाशी संबंधित मंडळी तरी आज कुठे आहे?
‘शोले’च्या ‘कॅची वन लायनर’नी एके काळी जी धमाल उडवली, ती पूछो मत. ‘कितने आदमी थे?’, ‘जो डर गया, समझो वो मर गया’, ‘तेरा नाम क्या है बसंती?’, ‘तेरा क्या होगा कालिया?’, ‘जब तक तुम्हारे पांव चलेंगे, इसकी सांस चलेगी| जब पैर रुकेंगे तो ये बंदूक चलेगी|’, ‘दुनिया में सब से भारी बोझ है बाप के कंधे पर बेटे का जनाजा!’
माझ्या पिढीच्या वाचकांना आठवत असेल की, ४०-४५ वर्षांपूर्वी हर सिनेगृहाबाहेरील गाड्यांवर चित्रपटगीतांच्या तळहाताच्या आकाराएवढ्या, अगदी रद्दड कागद वापरलेल्या आणि छपाईही तशीच ‘बाबत’ असलेल्या पुस्तिका चार-आठ आणे एक अशा मिळत. एफ. बी. बुर्‍हाणपूरवाला हे त्यांचे प्रकाशक. पण संवादांच्याही पुस्तिका निघाल्या त्या ‘शोले’च्या. हा अपवादात्मक प्रकार होता. सुटसुटीत, खटकेबाज पण छोट्या छोट्या संवादांनी जशी ‘शोले’ची खुमारी वाढवली तशीच सगळ्या साहाय्यक कलावंतांच्या सरस कामगिरीने चार चॉंद लगा दिये| जगदीप (सूरमा भोपाली), असरानी (अंग्रेजों के जमाने के जेलर), मा. सचिन, सत्येन कप्पू (रामलाल) आदी कलाकारच नव्हे तर धन्नो घोडीनेही आपली जबाबदारी उत्तम पार पाडली. आणि बेंगळुरूनजीक उभारलेला ‘रामगढ’चा सेटसुद्धा किती जिवंत! आजवरचे सारे डाकूपट चंबळच्या खोर्‍यात चित्रित झालेले. दक्षिणेत वीरप्पनसारखा कर्दनकाळ निर्माण झाला तरी तेथे डाकूपट तयार झाले नव्हते. ‘शोले’ हा अपवाद. चित्रपटाच्या शेवटी वीरू रामगढ सोडून जातो तेव्हा आगगाडीच्या डब्यात बसंती त्याची वाट पाहत असते. उभयता आवेगाने मिठीत सामावतात. एक सांगा, रेल्वे डब्याच्या अपुर्‍या जागेत त्यांच्या भोवती कॅमेरा फिरवायचे कसब दिग्दर्शक/कॅमेरामन यांनी कसे बरे चित्रित केले? आपले तर नुसत्या कल्पनेनेच डोके गरगरले.
‘थ्री डी’ची किमया काय असते, याचा मी प्रथमच अनुभव घेतला. सुरुवातीच्या दृश्यात धावत्या मालगाडीवर डाकू हल्ला करतात तेव्हा वीरू-जय यांच्या हातातील बेड्या इन्स्पेक्टर ठाकूर रिवॉल्वरची गोळी झाडून तोडतो तेव्हा पोलादी हातकड्यांचा उसळलेला तुकडा डोळ्यांवर येऊन बसल्याचा प्रत्यय हादरवणारा होता. पाठलागाच्या दृश्यात एक चाक निखळून पडले तेव्हा बसंतीचा टांगा कलंडलेल्या अवस्थेत ऍक्सलवर धावतो. तेव्हा उडणार्‍या दगडांचा फरफराटसुद्धा अंगावर आल्यासारखा वाटतो.
एकूण काय, ‘शोले’ मोठ्या व छोट्या पडद्यावर यापूर्वी शेकडो वेळा पाहिलेला. पण त्रिमितीने विलक्षण अनुभव दिला अन् पुन्हा एकवार तो घ्यावा, ही अतृप्तीची भावनाही जागी ठेवली. कलाविष्कार किती प्रत्ययकारी असू शकतो, त्याचे ‘शोले’ हे मूर्तिमंत उदाहरण. विविध साधने आणि तंत्रांची उणीव असतानाही चाळीस वर्षांपूर्वी ज्यांनी ही अजरामर कलाकृती निर्माण केली, त्या सगळ्यांना सलाम.

‘बेन हर’ आणि ‘शोले’: ठळक चुका

‘बेन हर’ पाहिला होता तो पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वी. त्यावेळी त्याने आठदहा ऑस्कर किताब जिंकले होते. एका आंग्ल पत्रकाराने आव्हान दिले. चित्रपट उत्तम आहे, परंतु त्यात एक ठळक चूक आहे. मी ती जाहीर करतो. बघू या कसे ऑस्कर जिंकताय तो! निर्मात्याचे धाबे दणाणले. डोके खाज खाज खाजवूनही त्याच्या लक्षात ती चूक येईना. त्याने संबंधित पत्रकाराशी ‘सेटिंग’ केले असावे. कारण हा दोष कोणता तो जाहीर झाला नाही. पुढे ‘बेन हर’च्या वितरकांनीच प्रेक्षकांना कोडे घातले. चूक दाखवा आणि पैज जिंका. कोणती बरे होती ती चूक?
चित्रपट ‘ग्लॅडियेटर’वर म्हणजे योद्ध्यांच्या रणधुमाळीवर आधारित. ख्रिस्तपूर्वकालीन पार्श्‍वभूमी. पण जेथे रथयोद्ध्यांची रणधुमाळी चालते, त्या मैदानातील धुळीत सिनेमावाल्यांनी चित्रणप्रसंगी वापरलेल्या जीपच्या टायरच्या खुणा उमटलेल्या एका दृश्यात क्षणिक दिसतात. त्या चाणाक्ष पत्रकाराच्या ध्यानात नेमका हा दोष आला होता. तीनचार हजार वर्षांपूर्वी रबरी टायर कुठे होते? म्हणून त्याने आव्हान दिले होते. मी दोष दाखवतो आणि तुमचे ‘ऑस्कर’चे नामांकन रद्द करवतो.
आता ‘शोले’तसुद्धा अशीच एक ठळक चूक आहे. खाजवा डोके आणि सांगा पाहू कोणती ती!…. काय, नाही ना जमत? मग हार माना. अहो, रामगढमध्ये पाण्याची टाकी आहे, जेथून वीरू बसंतीच्या लाभासाठी आत्महत्येची धमकी देतो. काय, बरोबर की नाही? आता या टाकीत पाणी कसे चढणार? त्यासाठी पंप हवा. पंप हवा म्हणजे वीजही हवी. पण रामगढमध्ये तर वीज नव्हती/नाही. असती तर ठाकूरच्या हवेलीच्या गॅलरीत कंदीलसदृश दिवे का टांगले असते जे राधा मालवते? आता ठाकूरसारख्या गावातील एकमेव तालेवार व्यक्तीच्या भव्य वाड्यात वीज असूनही घेतली नसेल, हे संभवत नाही.