शैक्षणिक गळती आणि उपाय

0
3678
 गजानन हरिश्‍चंद्र मांद्रेकर
(प्राचार्य, श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशपुरी, म्हापसा)

विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांना शाळा हे दुसरं घर कसं वाटेल याविषयी शिक्षक चिंतन करतील. शाळा ही भानगड नाही तर श्‍वासाइतकीच आपल्या जीवनातील अनिवार्य गोष्ट आहे, हे सर्वांच्या ध्यानात येईल आणि त्यामुळे शाळेकडे पाठ फिरवणारी मुले शाळेवर आणि शिक्षणावर प्रेम करायला लागतील!

 

शैक्षणिक गळती हा आपल्या देशातील एक खूप जुना आणि तितकाच चघळला गेलेला विषय आहे. शैक्षणिक गळतीची सांगितली जाणारी कारणेही पारंपरिकच आहेत. त्यांपैकी अनेक कारणे आज कालबाह्यही झालेली आहेत. परंतु स्वतः विचार न करता ‘गुगलबाबा’ सांगतो तेच खरे मानून आपल्या बुद्धीला ताण आणि त्रास द्यायचा नाही, हे बहुतेकांनी ठरवलेलेच असल्यामुळे या विषयावरील गुगलबाबाची मते आपलीच आहेत अशा आविर्भावात बिनधास्त मांडली जातात. त्यामुळे इतर अनेक समस्यांप्रमाणे या विषयावरही स्वतंत्ररीत्या चिंतन झालेलं दिसत नाही. आपल्याकडील शिक्षणक्षेत्राशी संबंधित अनेक समस्या विशिष्ट औषध घेतलं की एखादा रोग जसा बरा होतो, तशा स्वरूपाच्या नाहीत. त्या दिसायला वरकरणी साध्या, सोप्या, सरळ वाटतात, परंतु त्या खूप जटिल असतात. त्यांची वरकरणी दिसणारी कारणे फसवी असतात. खरी कारणे आत दडून बसलेली असतात. ती शोधून काढल्याशिवाय त्या समस्या सोडवण्याचे उपाय सापडणे कठीण असते. शैक्षणिक गळती ही अशाच प्रकारची एक समस्या आहे.
आपल्या देशात सुमारे सहा कोटीच्या वर मुले शाळेबाहेर आहेत. प्राथमिक स्तरावर शाळेत जायच्या वयातील शाळेत जाणार्‍या मुलांची सरासरी ९५ टक्के असली तरी त्यातील ४४ टक्के मुलेच दहावीपर्यंत पोचतात, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे प्रारंभापासून शाळेतच जात नाहीत, अशा मुलांची संख्या खूप कमी म्हणजे ५ टक्केच आहे. गळती होते ती नंतर. म्हणूनच शैक्षणिक गळतीची खूप आधीपासून जी कारणे सांगितली जातात, त्यांतील बहुतांश कारणे ही न पटणारी आहेत. परीक्षेत निबंध लिहिण्यासाठी ती ठीक आहेत, परंतु या समस्येवर उपाय शोधून काढण्यासाठी ती नक्कीच उपयोगी नाहीत.

गरिबी, जवळपास शाळा नसणे, वाहतुकीची व्यवस्था नसणे, आजारपण, अपंगत्व, शाळेत असुरक्षित वाटणे, पालकांचा व शिक्षकांचा परीक्षेत चांगले यश प्राप्त करण्यासाठीचा दबाव, घरकामात व अर्थार्जनात मदत करण्यासाठी मुलांची गरज ही जी शैक्षणिक गळतीची कारणे सांगितली जातात, ती सार्वत्रिक नाहीत. काही ठिकाणी, काहींच्या बाबतीत, काही प्रमाणात ती लागू होतील; परंतु याच कारणांमुळे सगळीकडील मुले शाळा सोडतात, हा दावा ग्राह्य धरता येणार नाही. या समस्येच्या मुळाशी सार्वत्रिक कारणे काय आहेत, याचा विचार केला तरच या समस्येवर काही प्रमाणात तरी उपाययोजना करता येईल.

अर्ध्यावर शाळा सोडणारी मुलेच शैक्षणिक गळतीला जबाबदार नसतात. त्यांपैकी काही मुले शाळा सोडण्याचा निर्णय स्वतः घेत असतील. परंतु अनेकांच्या बाबतीत शिक्षक, पालक, शिक्षण व्यवस्था, अध्यापन पद्धती आणि समाजाचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन या गोष्टी समस्येच्या मुळाशी असतात. म्हणून या समस्येचा विचार करताना आणि त्यावर उपाययोजना करताना सर्वंकष विचार करणे गरजेचे आहे.
शिक्षण हे व्यक्तिमत्त्व विकासाचे, चारित्र्य निर्मितीचे, सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे, हा विचार आपल्या ऋषिमुनींनी दिलेला आहे. आधुनिक काळातही स्वामी विवेकानंदानी ‘मनुष्यत्व निर्माण करणे हेच शिक्षणाचे प्रमुख कार्य आहे’ किंवा ‘शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विद्यमान आहे, त्याचे प्रकटीकरण असते’ किंवा ‘शिक्षण म्हणजे डोक्यात सतत धुडगूस घालणार्‍या माहितीचे भेंडोळे नसून, शीलवान, चारित्र्यवान माणसे घडवण्याचे ते एक प्रभावी साधन आहे’ असा मौलिक विचार त्यांनी मांडला आहे. ‘शिक्षण म्हणजे सुसंस्काराचे दान आहे’ असे आचार्य विनोबा भावेनी सांगितलंय. आपल्या देशातील शिक्षणचिंतकांनी हाच विचार वेगवेगळ्या शब्दांत मांडला आहे. परंतु शिक्षण हे अर्थार्जनाचे साधन आहे, हा व्यावहारिक विचार जेव्हा पूर्वसूरींच्या विचारांवर आरूढ झाला, तेव्हाच शैक्षणिक गळतीच्या महामार्गाचे खोदकाम सुरू झाले.

पुढे मग आणखीनच समाजविघातक विचार दृढ झाला. पदरी अजिबात शिक्षण नसलेले, कमी शिक्षण असलेले भरपूर पैसे कमावते झाले, संपत्तीवान झाले आणि पैशांच्या, संपत्तीच्या जोरावर लोकशाहीच्या तत्त्वांचा आधार घेत सामाजिक, सांस्कृतिक आणि विशेषतः राजकीय क्षेत्रात उच्च पदावर आरूढ झाले, तेव्हा तर शिक्षणाचा संबंध अर्थार्जनाशीही नाही, हा समाजविघातक विचार रुजला आणि भराभर फोफावलाही! याचा परिणाम म्हणून मग विद्यार्थ्यांचा शिक्षणातील रस निघून गेला आणि एकूण शिक्षणप्रक्रियाच त्याला निरस वाटू लागली.

त्यातच भर म्हणून सामाजिक तथा सांस्कृतिक क्षेत्रातले आधुनिक बदल लक्षात न घेता तशीच चालू असलेली शेकडो वर्षांपूर्वीची अध्यापन पद्धती आणि त्यामुळे ‘शिक्षणप्रक्रिया ही आनंददायी असली पाहिजे’ या विचाराचा झालेला सपशेल पराभव, यामुळे हा विचार समाजात उत्तरोत्तर दृढ होत गेला. अभ्यास म्हणजे कटकट, अभ्यास म्हणजे डोकेदुखी, जगातलं जे जे भयानक आहे, वाईट आहे त्याची तुलना अभ्यासाशी होऊ लागली. त्यामुळे ‘नको रे बाबा ही शाळा नावाची भानगड!’ अशी शाळेविषयीची भावना निर्माण झाली.

‘चूल आणि मूल’ हा वास्तविक अर्थपूर्ण विचार! स्त्रियांनी मुलांची काळजी घ्यायला हवी आणि घरातल्यांच्या योग्य आहाराकडे लक्ष पुरवले पाहिजे म्हणजे कुटुंब सुखी व समृद्ध राहातं, असा त्याचा मतितार्थ! परंतु, या विचाराचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आणि परिणामी मुली जर चूल आणि मूलच सांभाळणार असतील तर मग त्यांना शाळेत कशाला पाठवायचे? हा निव्वळ व्यावहारिक विचार ग्रामीण भागातला पालक करू लागला. त्यातून मुलींच्या शिक्षणाचे दरवाजे बंद होत राहिले. स्त्री-शिक्षणाचे स्वामी विवेकानंद, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे इत्यादींनी प्रतिपादन केलेले महत्त्व कालौघातात कुठल्या कुठे वाहून गेले.

आपल्या पूर्वसूरींच्या समाजहितकारक विचारांचा कालौघातात असा झालेला पराभव हे शैक्षणिक गळतीचे प्रमुख कारण आहे. गरिबी, जवळपास शाळा नसणे, वाहतुकीची व्यवस्था नसणे, आजारपण, अपंगत्व, शाळेत असुरक्षित वाटणे, पालकांचा व शिक्षकांचा परीक्षेत चांगलं यश प्राप्त करण्यासाठीचा दबाव, घरकामात व अर्थार्जनात मदत करण्यासाठी मुलांची गरज ही जी शैक्षणिक गळतीची कारणे सांगितली जातात, ती केवळ निमित्त आहेत. शिक्षणाचे महत्त्व न जाणणे हेच या समस्येच्या मुळाशी असलेले कारण आहे.

शिक्षण म्हणजे काय? शिक्षणाचा हेतू काय? शिक्षणामुळे माणसात आणि समाजात कोणते बदल होतात? आणि शिक्षणाच्या अभावामुळे माणसाचं आणि समाजाचं कोणतं आणि कसं नुकसान होतं या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोचवायचं काम शिक्षकाने केलं तर या समस्येपासून सुटका होऊ शकते. स्वामी विवेकानंद, आचार्य विनोबा भावे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे इत्यादींची शिक्षणविषयक भूमिका विद्यार्थी तथा पालकांपर्यंत पोचवण्यासाठी शिक्षण प्रशिक्षण महाविद्यालयांतून नव्याने तयार होणार्‍या शिक्षकांपर्यंत आधी पोचवली पाहिजे. या शिक्षण प्रशिक्षण महाविद्यालयात अध्यापन करणार्‍यांनी या सगळ्याचा अभ्यास करायला हवा. केवळ अध्यापन पद्धती, अध्यापन तंत्रे, पाश्‍चात्त्य शिक्षणप्रणाली यातच अडकून पडलेल्या शिक्षण प्रशिक्षण महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचनाही करायला हवी. मी केवळ विद्यार्थ्यांचा नव्हे तर संपूर्ण समाजाचा शिक्षक आहे आणि शाळा हे सामाजिक केंद्र आहे, शिक्षकी हा व्यवसाय किंवा पेशा नाही, तर ते एक व्रत आहे, ही भावना शिक्षणक्षेत्रात पाऊल टाकणार्‍या शिक्षकांच्या मनात रुजवावी लागेल.
‘विद्येविना मती गेली| मतीविना नीती गेली| नीतीविना गती गेली| गतीविना वित्त गेले| वित्ताविना शुद्र खचले| इतके अनर्थ एका अविद्येने केले’ या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वचनाची महती आजच्या विद्यार्थी आणि पालक समजू शकला तर शिक्षण आणि शाळा याकडे पाठ फिरवण्याचा विचार ते कशाला करतील?
आजचा विद्यार्थी आणि पालक केवळ आपलाच विचार करतो. शिक्षणसंस्था प्रमुखांना आणि शिक्षकांना मात्र संपूर्ण शाळेचा आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा विचार करावा लागतो. त्यामुळे शाळेत विशिष्ट शिस्तीचे, नियमांचे, संकेतांचे पालन विद्यार्थ्यांनी करणे अपेक्षित असते. परंतु, आजच्या बहुतांश विद्यार्थ्यांना शिस्त तथा नीतिनियम पाळण्याची सवय नाही. कौटुंबिक नियम न पाळण्याची सवय जडल्यामुळे आणि त्याला घरून मूक संमती मिळाल्यामुळे, शाळेत शिस्तीचे, नियमांचे पालन करणे विद्यार्थ्यांना फार मोठे संकट वाटते. वास्तविक विद्यार्थीदशेत नियम पाळण्याची लागलेली सवय भावी आयुष्यात उपयुक्त ठरते. पालकही अनेकवेळा शाळेचा विचार न करता आपल्या पाल्याचाच विचार करतात, आणि अशा अत्यंत मामुली कारणांसाठीही काही विद्यार्थी शाळेला रामराम करतात. यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचं समनुपदेशन आवश्यक आहे.

अनेक योग्य, उपयुक्त आणि चांगल्या गोष्टी या योग्य, व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने सांगितल्या जात नाहीत. त्यामुळे त्या ऐकून घेतल्या जात नाहीत. शिक्षणाचं महत्त्व, विद्यार्थीदशेत घेतलेले त्रास, शिस्त व नियम पाळण्यासाठी केलेली तडजोड भावी आयुष्य सुखी व समाधानी बनवण्यास कशी उपयुक्त ठरते, हे पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना व्यवस्थित रीतीने पटवून दिले तर शाळेपासून दूर जाणार्‍या मुलांची संख्या निश्‍चितच कमी होईल.

थोडक्यात, शिक्षण म्हणजे काय? आपल्या व्यक्तिगत, सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात शिक्षणाचे महत्त्व काय? अभ्यास म्हणजे काय? शिक्षण प्रक्रिया कशी असते इत्यादी विषय विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजातील इतर जबाबदार घटकांनी व्यवस्थित समजून घेणे हाच शैक्षणिक गळतीवरील रामबाण उपाय आहे. कारण, एकदा या गोष्टी या सर्व संबंधितांनी समजून घेतल्या की मग घरापासून लांब असलेली शाळाही विद्यार्थ्यांना जवळ वाटेल. अभ्यास ही कटकट नसून, ती आनंदाने, मजेत करण्याची गोष्ट आहे हे त्यांना पटेल. वाहतुकीची व्यवस्था नसेल तर ती व्यवस्था कशी करता येईल याचा विचार पालक करतील. विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांना शाळा हे दुसरं घर कसं वाटेल याविषयी शिक्षक चिंतन करतील. शाळा ही भानगड नाही तर श्‍वासाइतकीच आपल्या जीवनातील अनिवार्य गोष्ट आहे, हे सर्वांच्या ध्यानात येईल आणि त्यामुळे शाळेकडे पाठ फिरवणारी मुले शाळेवर आणि शिक्षणावर प्रेम करायला लागतील!