शेष विश्‍वकडून भारताचा पराभव

0
156

ऑनलाईन नेशन्स कप बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत भारताला शेष विश्‍व संघाकडून २.५-१.५ असा पराभव पत्करावा लागला. पहिल्या फेरीत अमेरिकेविरुद्धला बरोबरीत रोखल्यानंतर भारतासाठी हा धक्का होता. माजी विश्‍वविजेत्या विश्‍वनाथन आनंद याला तैमूर राजोबोव याने बरोबरीत रोखल्यानंतर वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन कोनेरू हंपीला माजी विश्‍वविजेत्या मारिया मुझिचूक हिचा भक्कम बचाव भेदणे शक्य झाले नाही.

पी. हरिकृष्णा व उदयोन्मुख स्टार अलिरेझा फिरोझा यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. परंतु, विदित गुजराती याच्या जागी खेळलेल्या बी. अधिबन याला पेरुच्या जॉर्जी कोरी याच्याकडून हार पत्करावी लागल्याने शेष विश्‍वविरुद्ध भारताचा पराभव झाला. अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या फेरीत कोनेरू हंपीने ऍना झातोनकिश हिला पराजित केले होते.

आनंदने आपल्यापेक्षा सरस मानांकित हिकारू नाकामुराला बरोबरी मानण्यास भाग पाडले होते. पण, फाबियानो कारूआना याने विदित गुजरातीला पराजित करत भारताचे विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले. पी. हरिकृष्णा व लिनिएर दुमिंगेझ यांच्यातील लढत बरोबरीत सुटली. भारताचे पुढील सामने चीन व युरोपविरुद्ध होणार आहेत.