शेत खाणारे कुंपण

0
14

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी थर्मासमधून चहाऐवजी गांजा नेताना एका महिला सुरक्षा रक्षकास नुकतेच रंगेहाथ पकडण्यात आले. तिच्या लॉकरच्या झडतीत अनेक मोबाईल आणि एटीएम कार्डेही सापडली. म्हणजे हा धंदा बराच काळ चालू असावा. एकट्या महिला रक्षकाला एवढे धैर्य आले कुठून? तिचे बोलविते धनीही वेगळे असावेत. तपास यंत्रणेने आता तिचे हे धनी कोण आहेत हे शोधावे. अर्थात, कोलवाळ कारागृहाच्या बाबतीत असे काही घडले, तरी त्याचे आता आश्चर्यच वाटेनासे झाले आहे, कारण याहून उच्च कोटीचे प्रकार ह्यापूर्वी येथे घडले आहेत. ह्यापूर्वी कधी द्रोनमधून, कधी फुटबॉलमधून, कधी चपात्यांमधून अमली पदार्थ येथे कैद्यांपर्यंत पोहोचवले गेले आहेत. कारागृहाबाहेरून गांजाचे गोळे बनवून आत फेकण्याचे प्रकारही येथील एक दोन नव्हे, सहा टेहळणी मनोऱ्यांवरील शिपायांची नजर चुकवून घडले होते. त्यामुळे कैद्यांजवळ मोबाईल फोन, गांजापासून कोकेनपर्यंतचे अमली पदार्थ सापडले आणि त्यामध्ये तुरुंगरक्षकच गुंतलेले आढळले तर त्यात जनतेला आता आश्चर्यही वाटेनासे झाले आहे. आजवर कितीतरी तुरुंगरक्षक अशा अमली पदार्थ व फोन तस्करीच्या प्रकरणांत येथे तात्पुरते निलंबित झाले. 2019 ते 2022 ह्या पाच वर्षांत पाच तुरुंगरक्षकांना निलंबित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली होती. ओमवीरसिंग बिश्नोई हे गोव्याचे पोलीस महानिरीक्षक असताना त्यांनी कोलवाळ कारागृहावर छापा टाकला तेव्हा कैद्यांपाशी तब्बल 65 मोबाईल फोन पाहून तेही अवाक झाले होते. तेलंगणा पोलिसांनी हैदराबादेत गाचीबावलीत अमली पदार्थ तस्करांवर छापा मारला, तेव्हा हैदराबादेतील ही अमली पदार्थांची तस्करी थेट गोव्यातून होत असल्याचे आणि त्यातही ह्या तस्करीचा मुख्य सूत्रधार कोलवाळच्या कारागृहातून ह्या साऱ्या व्यवहाराची सूत्रे हलवीत असल्याचे आढळून आल्याचे पाहून त्यांनी तर तोंडात बोटे घातली होती. असे धक्कादायक प्रकार ह्या कोलवाळ कारागृहाच्या बाबतीत सातत्याने घडत असतात. येथील गैरप्रकारांत केवळ रक्षक शिपाईच पकडले गेले आहेत असे नव्हे. तुरुंगाच्या एका उपपर्यवेक्षकांना पाच लाखांचा सौदा केल्याप्रकरणी निलंबित केले गेले होते. ह्याच कारागृहातील कैद्यांमधील हाणामाऱ्या, धमक्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. अश्पाक बेंगरे ह्या कुख्यात गुंडाचा खून पाडला गेला तोही ह्याच कारागृहात. अनेक कैद्यांसाठी तर हा तुुरुंगवास नाहीच. ही त्यांच्या अय्याशीची जागा आहे. बिनदिक्कम मोबाईल फोन वापरण्याची आणि त्यावरून सर्व सूत्रे हलविण्याची, हवे ते अंमली पदार्थ मागवण्याची आणि ह्यातले काही जमले नाही, तर किमान ब्ल्यूटूथ स्पीकरवर मोठमोठ्याने गाणी लावण्याची अय्याशी केवळ ह्याच कारागृहात चालू शकते. न्यायालयात सुनावणीसाठी किंवा इस्पितळात उपचारासाठी गेलेले कैदी परत येताना चपलेतून कोकेन घेऊन येण्याचे प्रकार याच तुरुंगाच्या बाबतीत घडू शकतात. कचरा फेकायला गेलेला कैदी कडेकोट सुरक्षा असूनही पळून जाऊ शकतो तोही ह्याच तुरुंगात. हा तुरुंग आहे की मस्करी? सातत्याने हे असे गैरप्रकार घडत आहेत ह्याचा अर्थ तुरुंग प्रशासनाचे ह्या मध्यवर्ती कारागृहाकडे जेवढे असायला हवे तेवढे लक्षच नाही. हे गैरप्रकार रोखण्याची धमक वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नाही हाच ह्याचा अर्थ होतो. जे सुरक्षारक्षक आजवर निलंबित झाले, त्यातील कितीजण सेवेतून बडतर्फ केले गेले? त्यांच्यावर कोणती कारवाई झाली? इथे कुंपणच शेत खात असताना किती सुरक्षा रक्षकांना जबर कारवाईचा धाक बसला? प्रसारमाध्यमांतून जराशी ओरड झाली की कारवाईचे देखावे करायचे आणि पुन्हा गांजा, कोकेनची तस्करी जैसे थे असा प्रकार कोलवाळ कारागृहाच्या बाबतीत सतत सुरू आहे. गुन्हेगार इथे रक्षकांना घाबरत नाहीत, तर रक्षक गुन्हेगारांना घाबरून वावरतात असे ह्या सगळ्या घटना घडामोडींवरून स्पष्ट दिसते. गृहखात्याने ह्या परिस्थितीचा विचार करून ह्या तुरुंगाच्या सुरक्षेबाबत आमूलाग्र सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. हे कारागृह आहे, सुटी घालवण्याचे पंचतारांकित रिसॉर्ट नव्हे ही जरब येथील कैद्यांना बसली पाहिजे. केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ते इथे भोगत आहेत ही जाणीव त्यांना पदोपदी झाली पाहिजे. गुन्हे करायचे आणि विश्रांती घेण्यासाठी इथे यायचे आणि चैनबाजी करायची हे प्रकार कायमचे थांबावेत. कैद्यांमध्ये सुधारणा घडून यावी, ते गुन्ह्यांपासून परावृत्त व्हावेत म्हणून कायदेकानून सैल करण्यात आले आहेत हे खरे, परंतु त्याचा अर्थ गुन्हेगारांना त्यांनी केलेल्या गुन्ह्यांबद्दल पस्तावा न होता उलट असे गुन्हे करूनही आणि न्यायालयीन प्रक्रियेअंती शिक्षा होऊनही कारावासात मौजमजा करता येते असा त्यांचा समज होता कामा नये.