लवकरच होणाऱ्या राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर का होईना, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे पाय गोव्याला लागले. गोव्यासाठी तिसरे कृषी विज्ञान केंद्र नव्याने होणाऱ्या कुशावती जिल्ह्यामध्ये स्थापन केले जाईल अशी घोषणा त्यांनी केली आहे. सध्या राज्यात उत्तर गोव्यात आणि दक्षिण गोव्यात मिळून दोन कृषी विज्ञान केंद्रे आहेत, ज्याद्वारे शेतकऱ्यांसाठी विविध प्रशिक्षण आणि प्रोत्साहन योजना राबवल्या जातात. माती परीक्षणापासून शेतकरी प्रशिक्षणापर्यंत नानाविध प्रकारे शेतकऱ्यांना विज्ञान – तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांचे कृषिउत्पादन वाढविण्यास साह्य करणे हे ह्या केंद्रांचे उद्दिष्ट असते व त्याप्रमाणे त्याचे कार्यक्रम आयोजित केले जात असतात. नव्या जिल्ह्यासाठी लाभणार असलेले हे तिसरे केंद्रही त्या भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल अशी आशा आहे. राज्याचे प्रमुख कृषी उत्पादन असलेला नारळ, काजू आणि सुपारी ह्या तिन्हींसाठी प्रोत्साहक योजना राबविण्याची, तसेच उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी केंद्रीय कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करून दिली जाईल अशी घोषणाही केंद्रीय कृषीमंत्र्यांनी केली आहे. खरे पाहता, राज्यातील ही तिन्ही पिके संकटात आहेत. शहरीकरणाच्या रेट्यामध्ये माडांची प्रचंड प्रमाणात कत्तल होत असल्याने आज केरळच्या नारळावर अवलंबून राहण्याची पाळी गोमंतकीयांवर आली आहे. नारळाचे दर सतत गगनाला भिडलेले पाहायला मिळतात. राज्यातील नारळ उत्पादकांपुढील समस्यांची जंत्री फार मोठी आहे. नारळ लागवडीतील समस्यांपासून ते पाडण्यापर्यंतच्या ह्या समस्या आहेत. सुपारी बागायतदारांच्या समस्याही काही कमी नाहीत. दिवसरात्र बागायतीत राबूनही त्यांच्या हाती फारच थोडा नफा येतो ही परिस्थिती आहे. काजू उत्पादन तर देशोधडीला लागले आहे. शहरीकरणाबरोबर काजूच्या लागवडी कमी कमी होत चालल्या आहेत. काजू बोंडे गोळा करण्यास माणसे नाहीत अशा स्थितीत आपल्या काजू बागायती करार पद्धतीने देण्याकडे काजू उत्पादकांचा कल दिसतो. गोव्याच्या काजूला मागणी मोठी आहे, परंतु त्या तुलनेत येथे काजूच उपलब्ध नाही. परिणामी, मलेशियाहून आलेला काजू गोव्याचा म्हणून विकला जात असतो. गोव्यातील बाजारपेठांतील काजू दुकानांमध्ये पोतीच्या पोती काजूगर विकला जातो खरा, परंतु त्यात गोव्याच्या काजूचा वाटा किती असतो हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. गोव्याची ओळख असलेले काजू उत्पादन का घटले ह्याचा विचार होण्याची गरज आहे. जी गत काजूची, तीच आंब्याची. गोव्याच्या मानकुरादची चव हापूसच्याही तोंडात मारील अशी असते असा अभिमान गोमंतकीय मिरवतात, परंतु हा मानकुराद मिळणे दुरापास्त झाले आहे, परिणामी उन्हाळ्यात जेव्हा तो अवतरतो, तेव्हा त्याचे दर गोमंतकीयांच्याच आवाक्याबाहेर गेलेले दिसतात. आपण कितीही स्वयंपूर्णतेच्या गप्पा केल्या तरी गावठी भाज्या, फळे याच्या बाबतीतही आपण परावलंबी झालो आहोत. ताळगावसारख्या ठिकाणचे भाजीमळे जाऊन तेथे उंच इमारती उभ्या झाल्या आहेत. पारंपरिक मळे नाहीसे होऊन तेथे काँक्रिटच्या इमारती उभ्या राहत आहेत. गावठी भाज्या मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यांची जागा बेळगावहून येणाऱ्या घाटी भाज्यांनी घेतली आहे. त्यामुळे गोव्याचे पारंपरिक भाजीचे वाण जोपासण्याची, टिकवण्याची आणि त्याचे उत्पादन वाढवण्याची नितांत आवश्यकता आहे. गोवा सरकारने नुकतीच मोपा विमानतळावरून भाजीपाला निर्यातीची व्यवस्था जरूर केली, परंतु निर्यात करायला भाजी आहे कुठे? ह्या सुविधेचा लाभ गोव्यापेक्षा कर्नाटकला अधिक होणार हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नाही. गोव्यात सरकारी नोकरीपाठी धावणाऱ्या तरुणांमध्ये शेती आणि बागायतीमध्ये असलेल्या संधींविषयीचा विश्वास आपल्या कर्तृत्वाने निर्माण करणारे अनेक शेतकरी आहेत. नव्या पिढीतील अनेक तरुण घरच्या शेतीमध्ये लक्ष घालून त्यांनी ती नावारूपाला आणली आहे अशीही उदाहरणे आहेत. अशा प्रेरणास्रोतांचा सन्मान सरकारने केला पाहिजे. त्यांचे उदाहरण नव्या पिढीपुढे घालून दिले पाहिजे. गोव्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याला ‘पद्मश्री’ सन्मान मध्यंतरी लाभला होता. त्या सन्मानाने गोव्याच्या बळीराजाला आपला सन्मान झाल्यासारखे वाटले. गोव्याला कृषी क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण बनवायचे असेल, तर त्यासाठी अशा प्रेरणास्रोतांकडे लक्ष दिले गेले पाहिजे. शेतीविषयक योजनांची जलद व प्रभावी कार्यवाही झाली पाहिजे. शेतकरी आणि बागायतदारांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहिले पाहिजे. केंद्रीय निधी उपलब्ध करून देण्याचे वचन केंद्रीय कृषीमंत्र्यांनी दिले आहे. केंद्र सरकारच्या कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांकरवी मार्गदर्शनाचा शब्दही दिला आहे. ह्या संधीचा लाभ घेऊन आणि इव्हेंटबाजीपलीकडे जाऊन गोव्याच्या कृषीजगताचा संपूर्ण कायापालट घडविण्यासाठी सरकारने प्रामाणिक प्रयत्न करावेत. गोव्याच्या स्वयंपूर्णतेच्या दिशेने टाकलेले ते खरे मूलगामी पाऊल ठरेल.

