डोक्याला गंभीर दुखापत; घटनेचा व्हिडिओ व्हायरल; दोघा संशयितांना अटक
कळंगुट समुद्रकिनाऱ्यावरील एका शॅकच्या बाकड्यावर बसल्याचे कारण पुढे करून बंगळुरूतील एका पर्यटकाला शॅकच्या कर्मचाऱ्यांनी जबर मारहाण करण्याची घटना मंगळवारी सकाळी 11.30 वाजता घडली. या घटनेचा व्हिडिओ काल व्हायरल झाला. दंडुके आणि लोखंडी सळईने मारहाण केल्याने सदर पर्यटकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणात कळंगुट पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दरम्यान, पर्यटन खात्याने उमतावाडो-कळंगुट येथील शॅक क्र. 16 चा परवाना निलंबित केला आहे.
बंगळुरू येथील एका पर्यटक कौशिक पाशा याने समुद्रात स्नान केल्यानंतर तो समुद्रकिनाऱ्यावरील शॅकच्या बाकड्यावर बसला होता. त्यावेळी शॅक क्र. 16च्या कर्मचाऱ्यांनी त्या पर्यटकाला बाकड्यावर बसल्याचे कारण पुढे करून दंडुके, लोखंडी सळईने जबर मारहाण केली. शॅक कर्मचाऱ्यांकडून पर्यटकाला होत असलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या प्रकरणात कळंगुट पोलिसांनी दिनेश कुमार (हिमाचल प्रदेश) आणि धुपेंद्र यादव (नेपाळ) या दोन शॅक कर्मचाऱ्यांना अटक केली असून, या मारहाण प्रकरणात सहभागी इतर शॅक कर्मचाऱ्याचा शोध घेतला जात आहे. त्या दोघांना 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने दिला आहे.
या घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाईला सुरूवात केली आहे. जखमी पर्यटक कौशिक पाशा यांच्यावर कांदोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
पर्यटनमंत्र्यांकडून घटनेचा निषेध
पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी कळंगुट येथील पर्यटक मारहाण घटनेचा निषेध केला आहे. पर्यटकाला मारहाण करणाऱ्या शॅकवर कडक कारवाई केली जाणार आहे, असा इशारा पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिला. गोवा राज्य ‘अतिथि देवो भव’ या तत्त्वावर विश्वास ठेवते आणि अशा प्रकारचे वर्तन या तत्त्वाच्या पूर्णपणे विरोधात आहे. तसेच, अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची सरकार पूर्ण काळजी घेईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

