22.5 C
Panjim
Saturday, November 27, 2021

शुभदीपावली

 • प्रा. रमेश सप्रे

असा हा दिवाळी नावाचा महासण कव्हा येतो नि जातो हे कळतही नाही. कारण सर्वत्र आनंद ओतप्रोत भरून ओसंडत असतो. काळाचं भानही राहत नाही. पण आता बदललेल्या नि बदलत राहणार्‍या काळात हा सण जरा निराळ्या पद्धतीनं साजरा करता येईल का, यावर सहचिंतन किंवा विचारमंथन करूया.

‘काहीही म्हणा अनंतराव, आपल्यावेळच्या (म्हणजे बाल-किशोर-युवावस्थेतल्या) दिवाळीचं वैभव काही औरच होतं.’ अनंतरावांनी वसंतरावांच्या या उसासत म्हटलेल्या वाक्याला दुजोरा देत म्हटलं, ‘अहो, बाकीच्या गोष्टी सोडाच, अभ्यंगस्नानाच्या वेळची पहाटेची थंडीसुद्धा आता जाणवत नाही. शिवाय सध्याच्या ‘मोबाईल’ पिढीला कशातच रस वाटत नाही. कानाला मोबाईल नि कामाला इम्मोबाईल!’ या दोघा ज्येष्ठ नागरिकांच्या संभाषणाला त्यांच्याही नकळत एक विधायक वळण लागलं. नाहीतर नुसतं स्मरणरंजन चालू राहिलं असतं.

पारंपरिक दिवाळी लोक आपापल्या कुटुंबात साजरी करतीलच; पण सार्‍या महानगराची एक प्रातिनिधिक नवदीपावली साजरी करायला काय हरकत आहे? ज्या वसाहतीत एक भव्य सभागृह आहे, मोकळी जागा आहे, अनेक ठिकाणी रहिवाशांच्या माहितीसाठी- मार्गदर्शनासाठी- निवेदनं सादर करण्यासाठी दर्शकफलक आहेत, याचा उपयोग करून दीपावली बदलत्या काळात नव्या पद्धतीने साजरी करता येईल का? याचं आणखी काही समविचारी, सक्रिय वानप्रस्थांसोबत (निवृत्त नागरिक) विचारमंथन सुरू झालं नि कार्यवाहीसाठी कार्यकारिणीही तयार झाली. या ‘नवदीपावली’वर दृष्टिक्षेप टाकण्यापूर्वी जरा झलक पारंपरिक दिवाळीची!
पूर्वरंग- पारंपरिक दिवाळी
दिवाळी सणांचा राजा की राणी?
दोन्हीही. सण म्हटलं तर राजा नि दिवाळी म्हटलं तर राणी. असं काय विशेष कारण आहे दिवाळीला सर्वश्रेष्ठ सण मानण्याचं? सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, हा एका दिवसाचा सण नाहीये तर सहा सणांचा भावोत्सव आहे. आपल्या संस्कृतीची विशेषतः म्हणजे, व्यष्टी-समष्टी-सृष्टी आणि परमेष्टी यांच्याकडे पाहण्याची मंगल दृष्टी. हे शब्द अवघड वाटतील. त्याला सोपे शब्द म्हणजे ः व्यक्ती-समाज-निसर्ग-परमेश्‍वर (मूर्तीरूपात नव्हे, तर शक्तीरूपात). यांच्यात मधुर असे परस्पर संबंध निर्माण करून तयार झालेली एक कल्याणकारी जीवनशैली- ती निसर्गस्नेही तर होतीच, पण सर्वांना सहभागी करून घेणारी मानवतास्नेही जीवनशैली होती. ज्ञानोबा माऊलीच्या शब्दांत या संस्कृतीचं ध्येय होतं-
हे विश्‍वचि माझे घर| ऐसी मति जयाची स्थिर|
किंबहुना चराचर| आपणचि जाहला॥
या दृष्टीने दीपावलीचा सण ही सुवर्णसंधी असते. कशी ते पाहूया-
सहा दिवसांच्या पारंपरिक दिवाळीचा गाभा आहे- सर्वांनी एकत्र येऊन ती साजरी करायची असते. आश्‍विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे दिवाळीचे सहा दिवस.

 • वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी
  भारतासारख्या कृषिप्रधान देशात गोधन हे सर्वोच्च धन होतं. गोवंश म्हणजे गाय-वासरू-बैल यांचं पालनपोषणच नव्हे तर कृतज्ञ भावनेनं केलेलं पूजनही आवश्यक होतं. त्यासाठी या दिवशी गाय-वासराची पूजा करायची. त्यांना व त्यांच्या मालकाला काही खाद्यपदार्थ, दक्षिणा अर्पण करायची. त्यांचे मूक किंवा प्रत्यक्ष आशीर्वाद घ्यायचे घरातील आईबाळांसाठी, विशेषतः मुलामुलींसाठी. या सर्व उपचारात कृतज्ञतेची वृत्ती आहे ‘अन्नदात्या’ पशूंबद्दल. आज या वृत्तीची खूप गरज आहे. कारण एकूण जमानाच स्वार्थ नि कृतघ्नतेचा आहे.
 • धनत्रयोदशी
  या दिवशी धनाची तशीच धन्वंतरीची पूजा करायची असते. विशेषतः व्यापारी नि वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांत ही पूजा आजकाल विशेष प्रकारे सुरू झालीय. म्हणजे धनत्रयोदशी कित्येक शतकं साजरी होत आलीय; धन्वंतरीची पूजा त्यामानानं अलीकडची आहे. धन्वंतरी निघाला समुद्रमंथनातून अमृतकुंभ घेऊन. अमरत्वाचं वरदान घेऊन अमृत निघालं खरं, पण आरोग्यवान असणं महत्त्वाचं आहे. धन्वंतरीचा संदेश आरोग्य राखण्याचा, प्रकृती बिघडू न देण्याचा आहे. आजारी व्यक्तींना बरं करणं हा आरोग्याचा नकारात्मक पैलू आहे. धन्वंतरी आजारी न पडण्यावर भर देतो. आपले पतंजलीसारखे योगाचार्यही सकारात्मक आरोग्यावरच भर देतात.
  धन्य करतं ते धन. असं धन म्हणजे आरोग्यम् धनसंपदा- हेल्थ इज वेल्थ- म्हणजे खर्‍या अर्थानं धनत्रयोदशीचा संदेश असतो- सर्वे संतु निरामयाः (आरोग्यवान).
 • नरकचतुर्दशी
  हा तर दुष्ट प्रवृत्तींवर (आसुरी शक्तींवर) सुष्ट (सज्जन) प्रवृत्तींचा (दैवी शक्तींचा) विजय. अंधारावर प्रकाशाचा विजय. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ अशा प्रवासाच प्रतीक असलेला दिवस. नरकावर स्वर्गाचा विजय. आम्हा गोमंतकीयांना अभिमान वाटावं असं महानाट्य ‘संभवामि युगे युगे.’ त्यातला तो चित्तथरारक क्षण आठवतो? श्रीकृष्णाकडून नरकासुराचा या प्रसंगाचा उत्कर्षबिंदू (क्लायमॅक्स) नरकासुराचा मृत्यू नव्हे तर त्याच क्षणी हजारो प्रेक्षकांच्या आजूबाजूला, मागे-पुढे लागलेले लक्षावधी दीप. अर्थात विद्युत दीप आणि सुरू होणारं दीपोत्सवाचं समूहगीत. नरकासुराच्या भव्य प्रतिमा जाळून नवीन नरक-ध्वनी, हवा, जमीन यांचं प्रदूषण निर्माण करणं. यात श्रीकृष्ण कुठंतरी असून नसल्यासारखा असणं हे दिवाळीचं प्रतीक नव्हे. आता हळूहळू यात चांगला बदल घडू लागलाय. नरकचतुर्दशी हा अंतर्बाह्य (मन आणि जग) विजय आहे.
 • लक्ष्मीपूजन
  लक्ष्मी म्हणजे पैसा नव्हे जो सत्ता, सामर्थ्य, स्वतःचे उपभोग विकत घेण्यासाठी वापरला जातो. लक्ष्मी स्वतःबरोबर इतरांचं कल्याण करण्याचा संस्कार रूजवते. ‘मी-मला-माझं’ असा विचार करणारी व्यक्ती पैसेवाली असते. ‘तू-तुला-तुझं’ तसंच ‘तो-त्याला-त्याचं’ किंवा ‘ती-तिला-तिचं’ सर्वांचं कल्याण साधणारी व्यक्ती लक्ष्मीवंत किंवा धनवान असते, हा महत्त्वाचा विशेष सध्या विसरला जातोय. लक्ष्मीची पूजा संध्याकाळी, तिथी अमावस्या आणि वाहन घुबड (पक्षी) या गोष्टीही विचारात घ्यायला हव्यात. नुसती झगमगाटी नि वाट्टेल त्या मार्गाने मिळवलेल्या पैशाची देवता लक्ष्मी नव्हे, तर जे निराधार, वंचित, दुर्लक्षित, गरीब लोक आहेत त्यांच्या कल्याणासाठी खरा लक्ष्मीचा विनियोग असतो. बाकी पूजनाचे उपचार-विधी योग्य असले तरी त्यानंतर लावल्या जाणार्‍या कानठळ्या बसवणार्‍या हजारो फटाक्यांच्या माळा पेटताना पाहिल्या की वाटतं, लक्ष्मी ही धनदांडग्यांच्या ताब्यात तर गेली नाही ना? असो!
 • बलिप्रतिपदा (पाडवा)
  दिवाळीतला पाडवा हा विक्रम संवत्सराचा प्रारंभदिवस असतो. साडेतीन शुभमुहूर्तांतील हा अर्धा मुहूर्त मानला जातो. या दिवशी अनेक ठिकाणी पत्नी आपल्या पतीला ओवाळते नि पती पत्नीला ओवाळणी घालतो. भेट देतो. पूर्वी स्त्रिया घरात असल्यामुळे, नोकरी करत नसल्यामुळे पाडवा, भाऊबीज या सणांना अधिक महत्त्व होतं. त्यानिमित्तानं त्यांना संसारोपयोगी किंवा स्वतःला हवी असलेली वस्तू भेट देता येत असे.
  या दिवसाला बलिप्रतिपदा असंही म्हणतात. या दिवशी बळी राजाला पाताळाचं राज्य दिल्याची कथा पुराणात येते. त्याचबरोबर बळीराजाला चिरंजीव बनवून त्याच्या राज्याचं चिरकाल रक्षण करण्याची जबाबदारी स्वतः विष्णुभगवानांनी घेतली असंही वर्णन येतं. आज शेतकर्‍यांना ‘बळीराजा’ मानलं जातं. सहज सांगायचं तर बैलासाठी एक शब्द ‘बलीवर्द’ असाही आहे. आज केवळ पूजोपचार नि इतर सोपस्कार करण्यापेक्षा अनेक कारणांनी आर्थिकदृष्ट्या ‘बळी’ ठरलेला हा बळीराजा वाढत्या संख्येनं आत्महत्या करतोय तेही लक्षात घेतलं पाहिजे. या स्थितीत सुधारणा होण्यासाठी शासनापेक्षा अनेक गैरसरकारी संस्था नि संघटना चांगली सेवा करताहेत ही आशेची फुलवात आहे.
 • भाऊबीज
  हा दिवाळी या सणसमूहाचा अखेरचा दिवस. पुराणकाळात यमुना नदीनं आपला भाऊ यमाला जेवायला बोलावल्याचा उल्लेख येतो. त्यावेळी यमुनेनं आपल्या भाऊरायाचं स्वागत ओवाळून केलं असेल. यावरून भाऊबीजेचा हृदयाला स्पर्श करणारा दिवसही दिवाळीचा भाग बनला. भाऊ-बहिणीच्या आपुलकीच्या नात्याला नवा उजाळा देणारा हा दिवस रक्षाबंधनासारखाच पवित्र आहे.
  असा हा दिवाळी नावाचा महासण कव्हा येतो नि जातो हे कळतही नाही. कारण सर्वत्र आनंद ओतप्रोत भरून ओसंडत असतो. काळाचं भानही राहत नाही. पण आता बदललेल्या नि बदलत राहणार्‍या काळात हा सण जरा निराळ्या पद्धतीनं साजरा करता येईल का, यावर सहचिंतन किंवा विचारमंथन करूया.

उत्तररंग- नवदीपावली
दोन वर्षांपूर्वीची- २०१९ सालची- दिवाळी लोकांनी नेहमीप्रमाणे साजरी केली होती. नंतर त्याच वर्षीच्या अखेरीस ‘कोविड-१९’ नावाची एक भयानक महामारी सार्‍या जगात पसरून हाहाकार माजवू लागली. एका अर्थानं जगाला कुलूप लावणारी (लॉकडाऊन) ही महामारी अभूतपूर्व अशीच होती. एकापेक्षा एक भयंकर अशा निर्माण झालेल्या लाटांमुळे सारी मानवजात पछाडून गेली. आता जरा बरे दिवस आलेत. पुन्हा तिसरी लाट येऊ नये हीच अपेक्षा! गेल्या वर्षीची दिवाळी बरीचशी काळवंडून गेली होती. असं वाटत होतं की पुन्हा अंधाराचा प्रकाशावर विजय झालाय. अंधारयुग पसरलंय सर्वत्र.

एक छोटोसा कोरोना नावाचा विषाणू किती उत्पात माजवू शकतो… असंख्य लोकांना मारूनही सार्‍या जगाची अर्थव्यवस्था धोक्यात आली असतानाही या निर्दयी विषाणूची भूक अजून भागतच नाहीये. तिसर्‍या लाटेची भीतीही हवेत आहे. तरीही आपण त्या भीतीच्या माथ्यावर नाचलं पाहिजे; कालियामर्दनप्रसंगी कालियाच्या फणावर नृत्य केलेल्या कृष्णासारखं! अर्थात आवश्यक ती सर्व काळजी घेऊन नि सावधानता बाळगूनच. याबरोबर पारंपरिक दिवाळी साजरी करताना काही परिवर्तन करून ‘नवदीपावली’ साजरी करूया.

सध्या सामाजिक वातावरणात आणि समाजमाध्यमात एक शब्दप्रयोग तरंगतोय- ‘न्यू नॉर्मल.’ काय अर्थ आहे याचा? ‘नॉर्मल’ म्हणजे सर्वसामान्य परिस्थिती. (व्यक्तीच्या बाबतीत ‘नॉर्मल’ शब्द वापरत नाहीत. कारण काही संतसत्पुरुष सोडले तर कोणीही सर्व दृष्टींनी नॉर्मल नसतो. असो.) कोणत्याही कारणानं परिस्थिती बिघडली नि नंतर ती सुधारली तर आपण म्हणतो- ‘बॅक टू नॉर्मल.’ पण कोरोना-कोविडमुळे बदललेली संपूर्ण जगातील परिस्थिती पुन्हा कधीही पहिल्यासारखी होणार नाही. होऊ शकणार नाही. गेल्या दीड-दोन वर्षांत सर्व क्षेत्रांत घडून आलेले बदल काही अंशी या नव्या सर्वसाधारण परिस्थितीत (न्यू नॉर्मल) टिकून राहतील.

सणांच्या साजरीकरणावर नि सोहळ्यांच्या सादरीकरणावर याचा परिणाम होणारच. यासंदर्भात पारंपरिक दिवाळीबरोबरच एक सामाजिक नवदीपावली साजरी का करू नये? यादृष्टीनं दिवाळीच्या दिवसांसाठी करता येतील असे काही उपक्रम-
हल्ली शहरी भागात अनेक रहिवासी-वसाहती मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात येत आहेत. दोनशे-तीनशे कुटुंबे एकत्र राहणार्‍या (म्हणजे छपरं नि घराची दारं स्वतंत्र असली तरी आतबाहेर करायला गेट (महाद्वार?) एकच असतं) परिवारांचा एक विशाल जनसमूह सहजीवन जगत असतो. म्हणजे तसं सहजीवन जगायला हवं. नाहीतर सध्याचं सामाजिक अंतर नि विलगीकरण माणसामाणसांतलं भावनिक अंतर नि अलगीकरण निश्‍चित वाढवेल; अन् दिवाळी सण तर सलगीकरणाचा, सामंजस्याचा, समरसतेचा!

 • वसुबारस ः एखाद्या गोशाळेतील गाय-वासराला ‘दत्तक’ घेता येईल. म्हणजे गाय-वासरू तिथंच राहतील. आपण त्यांचा खर्च करायचा. त्यांच्यासह सेल्फी काढली तरी चालेल.
  धनत्रयोदशी किंवा धन्वंतरी जयंती ः आरोग्य हेच खरं धन मानून वसाहतीतील रहिवाशांसाठी विविध चाचण्या (पॅथॉलॉजिकल टेस्ट्‌स) आयोजित करणं व आहार, रोगप्रतिकारक शक्ती यांविषयी प्रभावी मार्गदर्शन करता येईल.
 • नरकचतुर्दशी ः सर्व वसाहतीचा एकच नरकासुर जाळूया. जमलं तर एका मोठ्या पडद्यावर ‘नऊ नरकासुर’ही जाळता येतील. रिमोटचं बटन छोट्या मुलांच्या (कृष्णाच्या) हातात दिलं जावं. आजच्या आभासी जमान्यात असं दहन करायला हरकत नाही.
  या दिवसापूर्वी वसाहतीतील सार्वजनिक स्थानांची (उदा. जिम, पोहण्याचा तलाव, सभागृह इ.) स्वच्छता नि सॅनेटायझेशन श्रमदान किंवा श्रमसंस्कार म्हणून करता येईल.
 • लक्ष्मीपूजन ः सभागृहात प्रातिनिधिक लक्ष्मीपूजन करून, सर्वांना आवाहन करून, प्रत्येक घरातून यथाशक्य दान घेऊन सर्व रक्कम तिथल्या तिथेच ‘पंतप्रधान आपत्ती निवारण निधी’ किंवा कोविड योद्द्यांना साह्य करण्यासाठी पाठवता येईल. उदात्त कारणासाठी केलेलं हे लक्ष्मीपूजनच होय.
 • बलिप्रतिपदा (पाडवा) ः बळीराजाच्या (शेतकर्‍याच्या) कल्याणासाठी काम करणार्‍या संघटनांना साह्य नि सहकार्य.
 • भाऊबीज ः निराधार महिलांसाठी निःस्वार्थ भावानं कार्य करणार्‍या संस्थांना (महिलाश्रम) भेटवस्तू किंवा प्रत्यक्ष भेटी देणं. त्यांच्याकडून ओवाळून घेऊन त्यांना ओवाळणी घालणे आदर्श ठरेल.
  याशिवाय इतर उपक्रमही राबवून वसाहतीतलं वातावरण निरंतर दिवाळीसारखं राखता येईल.
  अशा पारंपरिक दिवाळीबरोबर साजर्‍या केलेल्या या नवदीपावलीला ‘दीपाली’ म्हटलं तर?

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

- Advertisement -

ALSO IN THIS SECTION