आपल्याच महिला शिष्यावर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापूला गुजरातच्या गांधीनगर सत्र न्यायालयाने काल जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने सोमवारी त्याला या प्रकरणी दोषी ठरवले होते. त्यानंतर काल त्याला शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणी 2013 मध्ये आसारामविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आसारामच्या पत्नीसह अन्य सहा आरोपींची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती.
2013 मध्ये सुरतमधील दोन बहिणींनी आसाराम बापू आणि नारायण साई यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. 2002 ते 2005 दरम्यान नारायण साईने वारंवार तिच्यावर बलात्कार केल्याचे लहान बहिणीने तक्रारीत नमूद केले होते. सुरतमधील आसारामच्या आश्रमात राहात असताना तिच्यावर बलात्कार झाला, असे पीडित मुलीने सांगितले होते. दुसरीकडे, मोठ्या बहिणीने तक्रारीत आसारामवर बलात्काराचा आरोप केला होता. अहमदाबाद येथील आश्रमात आसारामने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केल्याचे पीडितेने सांगितले.
दरम्यान, पीडितेच्या लहान बहिणीवर आसारामचा मुलगा नारायण साई याने बलात्कार करून तिला बेकायदेशीरपणे डांबून ठेवले होते. या प्रकरणात साईला सुरतच्या सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.