उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची काल दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने व्हीप जारी केला होता; पण पक्षाचा व्हीप धुडकावून या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित राहिले, हे तेच 6 खासदार आहेत जे बंडखोरी करुन शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. 6 खासदार अनुपस्थित असल्याने फक्त तीनच खासदार बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचे जवळपास निश्चित आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल, या सहा खासदारांनी दिल्लीत जाऊन लोकसभा अध्यक्षांकडे वेगळा गट स्थापन केल्याचे पत्र दिले. त्यांच्या विलिनीकरणाची घोषणा संसदेकडून शुक्रवारी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झाले असले तरी त्याची घोषणा ही शिवसेनेच्या वर्धापनदिनी केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या सहा खासदारांनी त्यांच्या सह्यांचे पत्र हे लोकसभा अध्यक्षांना दिल्याचे समोर आले आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची भीती त्यामध्ये खासदारांनी व्यक्त केली आहे. या पत्राची घोषणा शिवसेनेच्या वर्धापन दिनी म्हणजेच 19 जून रोजी होणार असल्याचे समोर आले आहे. त्याच दिवशी संसदेकडून बुलेटिन जारी करण्यात येणार असून त्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलिनीकरण होत असल्याचे जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.

