शिवरायांचा इतिहास आता पाठ्यपुस्तकात

0
10

>> चिखलीतील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची घोषणा

शिवरायांची विचारधारा आणि त्यांचे चरित्र विद्यार्थ्यांसमोर उलगडावे, यासाठी शालेय अभ्यासक्रमात आणि गोवा विद्यापीठ अभ्यासक्रमातही शिवरायांचे शौर्य, शिकवण व गोव्याशी संबंधित ऐतिहासिक संदर्भ यांचा समावेश केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केली.
चिखली-वास्को येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीत काल शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून करण्यात आले, त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. चिखलीत उभारण्यात आलेला हा पुतळा ३२ फूट उंच असून, तो पूर्णाकृती आहे. या पुतळ्यासाठी फायबर ग्लास व स्टीलचा वापर करण्यात आलेला आहे. या पुतळ्यासाठी सुमारे दहा लाख रूपये खर्च करण्यात आलेला असून, हा पुतळा सावंतवाडी येथील विजेंद्र मांजरेकर यांनी तयार केला आहे.

यावेळी व्यासपीठावर पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार कृष्णा साळकर, संकल्प आमोणकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुरगाव हिंदू समाजाचे अध्यक्ष नारायण बांदेकर, नगराध्यक्ष दामोदर कासकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवरायांनी गोव्याच्या संस्कृतीचे संरक्षण केले आहे. त्यांचे कार्य प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील. सडा येथील किल्ल्याचे नूतनीकरण केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.