शिरोडा मतदारसंघातील युवा कार्यकर्ते शिवप्रसाद वसंत शिरोडकर यांनी काल राष्ट्रीय काँग्रेस पक्षात रीतसर प्रवेश केला. काँग्रेस मुख्यालयात काल आयोजित एका कार्यक्रमात गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी शिवप्रसाद शिरोडकर याचे स्वागत केले. यावेळी काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व इतरांची उपस्थिती होती. राज्यातील जनतेमध्ये सत्ताधारी भाजपच्या विरोधात तीव्र असंतोष वाढत चालला आहे. शिरोडा मतदारसंघात सुध्दा भाजपच्या विरोधात असंतोष वाढल्याने शिवप्रसाद शिरोडकर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसमवेत राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, असा दावा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष विविध प्रश्नावर घरोघरी जाऊन जनजागृतीची मोहीम सुरू करणार आहे. भाजप सरकारची निष्क्रियता जनतेसमोर मांडली जाणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.

