शिल्प

0
18
  • प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

शिल्प एक स्वप्न असते. आपल्या जीवनाचे आपण एक शिल्प रचतो. पण शिल्पाप्रमाणे जीवन पुढे जात नाही. आपण आपल्या स्वतःच्या वृत्ती नियंत्रित करू शकतो, आपण पावले घालताना अतिशय सावधपणे चालू शकतो; पण दुसऱ्याचे चालणे आपल्या मनासारखे कसे बरे होईल?

‘शिल्प’ हा मनातला आराखडा असतो. बीज अंकुरल्यावर शिल्प हळूहळू साकारत असते. बीजामध्ये पुढच्या वृक्षाचे शिल्प दडलेले असते. शिल्प गुप्त असते; ते जेव्हा साकार होते तेव्हा शिल्पाची कल्पना जगाला येते.
सुतार जेव्हा टेबल करायला बसतो तेव्हा ते टेबल कसे होईल ते शिल्प त्याने मनात साठवलेले असते. मनातील शिल्पाप्रमाणे वस्तू तयार झाली तर तो समाधानी असतो. ताजमहाल घडवताना शाहजहाँने आपल्या मनात अगोदर शिल्प कोरलेले होते. अमूर्त प्रेमाला मूर्त शिल्पाची त्याने देणगी दिली. आजच्या जमान्यात भव्य इमारत घडवताना अगोदर तयार मॉडेल शोकेसमध्ये घालून प्रदर्शन करतात. त्यावरून प्रेक्षकांना इमारतीची कल्पना येते. शिल्पाची ही जाहिरात असते. शिल्प हा फ्लॉट असतो. ‘नाटक’ घडवताना अगोदर त्या नाटकाचे शिल्प नियोजित केले जाते. कादंबरी आणि कथेलादेखील शिल्प असतेच.
मुलाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा आईबापाच्या मनात शिल्पाची अपेक्षा असते. कधी त्यांना कन्या हवी असते तर कधी पुत्र हवा असतो. आपली अपत्ये कशी असावी हेदेखील शिल्प त्यांनी मनात रचलेले असते. कित्येकदा मनातील शिल्पाप्रमाणे मुले उतरत नाहीत. गोरी मुले हवी असताना एकेकदा ती काळी-सावळी उतरत असतात. व्यंग्य असलेली मुले कोणालाच नको असतात; पण विधिलेख असा असतो की तशीच व्यंग्ययुक्त मुले आईबापाच्या नशिबाने जन्मतात. मुलांच्या स्वभावाविषयी आईबापाचे खास शिल्प असते. आई-बाप जिवंत असेपर्यंत मुलांच्या स्वभावात होणारे परिवर्तन कधी सुखद असते तर कधी दुःखद असते. जन्म देणाऱ्या आई-बापाना कसल्याही चढ-उताराला तोंड देण्यास सदैव तत्पर राहावे लागते, कारण शिल्पाचा उलटाच प्रतिसाद अनुभवाला येतो.
पृथ्वीच्या अस्तित्वाला एक शिल्प आहे. सागर, डोंगर, पर्वत, दऱ्या, मैदाने, नद्या, झरे, जंगले यांचे शिल्प रचले गेले आहे. माणसाचे कुठल्या तरी एका टोकाला कार्यक्षेत्र असते. संपूर्ण विश्वापर्यंत तो संचार करू शकत नाही. विश्वाचे शिल्प अफाट असते.
शिल्प एक स्वप्न असते. आपल्या जीवनाचे आपण एक शिल्प रचतो. पण शिल्पाप्रमाणे जीवन पुढे जात नाही. आपण आपल्या स्वतःच्या वृत्ती नियंत्रित करू शकतो, आपण पावले घालताना अतिशय सावधपणे चालू शकतो; पण दुसऱ्याचे चालणे आपल्या मनासारखे कसे बरे होईल? आपण एका दिशेने विचार करतो, तर दुसऱ्याची विचार करण्याची दिशा परस्पर विरोधी असते. त्यामधून संघर्ष निर्माण होतो आणि त्या संघर्षाचा परिणाम एकोपा घडवण्यामध्ये होत नसून वेगळेपणा घडवण्यातच अग्रेसर बनतो.
शिल्पाप्रमाणे सृष्टी घडत नाही म्हणून आपण शिल्प नाकारू शकत नाही. जोपर्यंत ही पृथ्वी आहे तोपर्यंत प्रत्येक घटनेचे शिल्प पूर्वनियोजित असेलच. कधी अपेक्षित तर कधी अनपेक्षित.
या भारत देशाचे शिल्प रचताना महात्मा गांधींना येथे ‘रामराज्य’ घडवायचे होते. रामराज्यामधला प्रत्येक राज्यकर्ता रामासारखा प्रामाणिक, मुत्सद्दी, कर्तव्यपरायण आणि प्रजेचे सुख पाहणारा, लोकहितदक्ष असावा अशी अपेक्षा होती.
शिल्पाप्रमाणे नवा भारत घडला का? अगोदर आपण शिल्पकर्त्या गांधीजींचाच बळी घेतला. गांधीजींच्या रामराज्याचे सगळे अनिवार्य जे गुण होते त्या सर्वांना सर्वप्रथम आपण हद्दपार केले. आपल्याला जसा हवा तसा भारत आपण घडवत गेलो. असहिष्णुता, अप्रामाणिकपणा, आपमतलबीपणा यांना पोसणे आर्थिक फायद्याचे आहे असे आपल्याला वाटायला लागले. सत्ता मिळवायला मते हवीत म्हणून मतांचे गणित कोडे सोडवल्याप्रमाणे आपण सोडवायला शिकलो. कोणाची मते कशी चोरावीत, मते हातात येईपर्यंत कशी खोटी आश्वासने देत जनतेला फसवावे हे नवीन तंत्र आपण शिकलो आणि गांधीजींच्या स्वप्नातल्या भारताला आपण संपूर्णपणे मुकलो.
आज कित्येक आई-बापांना आपल्या वृद्धत्वामध्ये आपण जीवनात अपयशी ठरलो असे वाटत असते. मुलांना पालन-पोषण करून वाढवणे, शिकवणे व पुढे त्याच मुलांचे तारुण्यावस्थेत वागणे आईबापांच्या मनातील शिल्पाला हादरा देणारे असते.
मुलांनी आपला सन्मान राखावा. नम्रतेचे बोल बोलून उपकार आठवावेत. म्हातारपणी आपली सेवा करावी. आई-बापाची ही अतिसामान्य अपेक्षा असते. पण घडणारा चमत्कार अजब असतो. आई-बापाला नको असलेले चित्रच प्रखरपणे पुढे येत असते.
जी मुले बालपणात अतिमायाळू होती तीच मुले पुढे अतिकठोर व अतिक्रूर कशी बनली? वृद्ध आई-बापावर वृद्धाश्रमामध्ये प्रवेश घेण्याची पाळी का आली? वृद्ध आई-बापाच्या मनातील शिल्प आणि समोर असलेले वास्तव यांच्यामध्ये एवढा मोठा विरोधाभास का? शिकलेली मुलेच आईबापाच्या मनातील शिल्प तोडून उद्ध्वस्त करायला पुढे सरसावतात हे अतिशय दुःखद आहे.