शिमग्याच्या मांडांवर….!

0
207

– अजित पैंगीणकर

फाल्गुन मास सुरू झाला की गोव्याला शिमग्याचे वेध लागतात. गोव्यातील कष्टकरी, कामकरी लोकांचा हा उत्सव… लहानांपासून थोरांपर्यंत कष्टकरी समाजातील सर्वांनाच वेड लावणारा. उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यात शिमगा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. उत्तरेला साजरा होणार्‍या शिमग्याला ‘थोरला शिमगा’ म्हणतात. तो पुनवेला सुरू होतो. सत्तरीसारख्या भागात रंगपंचमीला शिमगा सुरू होतो. दक्षिण गोव्यात तो फाल्गुन शुद्ध नवमीला सुरू होतो आणि पुनवेला त्याची समाप्ती होते. गोव्यावर आतापर्यंत जेवढ्या राजवटी आल्या त्या राजवटींचा प्रभाव प्रत्येक सणावर पडलेला दिसतो. काणकोण, सांगे, केपे या भागांत कर्नाटक राजवटीचा प्रभाव विशेषत्वाने दिसतो. बहामनी, कदंबा, विजयनगरचे साम्राज्य या सर्वांचा प्रभाव दक्षिणेतील धाकट्या शिमग्यात आढळतो. उत्तरेत मराठेशाहीचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो.

शिमग्याला कधी सुरुवात झाली याचा अंदाज नसला तरी ज्यावेळी समाज एकत्रित राहायला लागला, अन्न शिजवून खायला लागला, अन्नाची निर्मिती करायला लागला त्या वेळेपासून सण-उत्सवांना सुरुवात झाली असावी. फाल्गुन महिन्यात घरात धनधान्य आलेले असते. सृष्टी आनंदित झालेली असते. अशा वेळी सुरुवातीला केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिल्या गेलेल्या या उत्सवाचे आजचे स्वरूप जरी बदललेले असले तरी मूळ जी शिमग्याची भावना आणि संकल्पना आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

गणेशा देवा गा नमन करू|

धरत्री माये गे नमन करू|

खुटये माये गे नमन करू|

चुकमाकल्या देवा गा नमन करू|

असे म्हणत मांडावर शिमग्याच्या नमनाला प्रारंभ होतो. गणेश देवाच्या नावाने प्रारंभ झालेल्या नमनात नंतर परिसरातील सर्व देव-दैवतांबरोबरच ग्रामपुरुष, सांतेर, बेताळ या सर्वांची नावे गुंफली जातात आणि मांडावर आलेले गडे एका सुरात, एका तालात नमन घालू लागतात. मांड हा शिमग्याचा प्रमुख भाग. त्या मांडाचा प्रमुख तो ‘मांडेली’ आणि गाणे म्हणणारा तो ‘गाणेली.’ ही प्रथा दक्षिण गोव्याच्या ग्रामीण भागातील मेळकर्‍यांमध्ये प्रकर्षाने दिसते.

शिमगा म्हटला की उत्साह, आनंद, मस्ती असे सर्व काही आले. वर्षातून एकदाच येणार्‍या या उत्सवासाठी कामाधंद्याच्या निमित्ताने बाहेरगावी असलेली लोकं आपल्या घरी येतात. काणकोण, सांगे, केपे या महालांत शिमग्याचे मेळ वाड्यावाड्यांवर खेळायला जातात. पारंपरिक वेष, डोक्यावर भेंडाच्या फुलांचे विशिष्ट आकाराचे फेटे, गळ्यात फुलांच्या माळा, हातात तोणी (टिपरी), घुमट, शामेळ, झांज, प्रसंगी ढोल, ताशा अशा लवाजम्यासहित शिमग्याचे मेळ घरोघरी फिरतात. प्रत्येकाच्या अंगणात जातात. खेळतात. त्यात विविध प्रकार असतात. तोणया मेळ, तालगडी, चौरंग, थिन्नक या प्रकारांबरोबर बर्‍याच ठिकाणी ‘गोफ’ विणला जातो. गोफ हे नृत्यच मुळी काणकोणचे. गोव्यात काही लोकनृत्ये त्या-त्या तालुक्याची मक्तेदारी किंवा त्या-त्या तालुक्याचे वैशिष्ट्य म्हणून ओळखली जातात. घोडेमोडणी हा सत्तरी- डिचोलीचा नृत्यप्रकार, मुसळनृत्य हे चांदरचे, वीरभद्र सांगे महालाचा, जागर फोंडा महालाचा, तसा गोफ हा नृत्यप्रकार काणकोणचा. रंगीबेरंगी असे आठ दोर एकत्रितपणे अंगणात उभारलेल्या माटवाला बांधले जातात. मग घुमट आणि शामेळाच्या तालावर-

‘दोरी वळली सुंभाची, पूजा केली गोफाची…’

म्हणत खेळगडी गोफ विणतात. त्यात विविध प्रकार आहेत. गोफ विणतात पाहणार्‍याला खेळगड्यांचा पदन्यास पाहावा की विणलेला गोफ पाहावा याचे भान राहत नाही एवढ्या चपळाईने पैंगीण, माशे भागातील पारंपरिक खेळगडे हा गोफ विणतात. हाच गोफ आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचला आहे. पुरुषांबरोबर महिलादेखील गोफ विणायला लागल्या आहेत. अन्य तालुक्यांबरोबरच शाळा-कॉलेजमध्येही हे नृत्य लोकप्रिय व्हायला लागले आहे.

बदलत्या काळानुसार गोफातील दोर्‍या जाऊन त्यांऐवजी लांब आणि विविध रंगांच्या साड्या आल्या. युवक आणि युवती एकत्रितपणे नाचायला लागल्या. एका विशिष्ट समाजापुरते आणि विधीपुरते असलेले हे नृत्य, तसेच शिमग्यातील तालगडी, चौरंग, तोणयामेळ ही नृत्येदेखील मांड आणि अंगण सोडून नवी कात, नवा उत्साह घेऊन बाहेर आली.

शिमगा या उत्सवाशी काही दैवताचा संबंध आहे. काही ठिकाणी चंद्रावळ, फाग हे सुवारीतील प्रकार गायले जातात. काही ठिकाणी पालखी काढली जाते. ही पालखीदेखील विशिष्ट ठिकाणी थांबविण्याची प्रथा आहे. सीमेवरच्या देवचाराला रोट घातले जाते. शिमग्यात विधी आणि संकेत पुष्कळ आहेत आणि प्रत्येक स्थळ आणि वाड्यानुसार त्यात वेगळेपण दिसून येते. अमुक ठिकाणी थांबणे, अमुक ठिकाणी पानाचा विडा ठेवणे, अमुक ठिकाणी वाद्य न वाजविता जाणे, पायात वहाणा न घालणे, नमन झाल्यानंतर दशमीच्या दिवशी- ज्यावेळी मेळे बाहेर निघतात त्या दिवसापासून पुनवेपर्यंत घरी न येणे, घरातील जेवण न घेणे, मेळातल्या माणसाने शिमग्याच्या काळात अमुक एका देवतेचे दर्शन न घेणे असे अनेक संकेत शिमग्यातील खेळगडे वर्षोनुवर्षे पाळत आलेले आहेत.

शिमग्याचा एक भाग म्हणून अनेक ठिकाणी ‘गडेपडणे’ हा प्रकार आहे. ‘गडे पडणे’ म्हणजे ठराविक व्यक्तीच्या अंगात अवसर येणे. काही ठिकाणी नमनाच्या दिवशी आणि पुनवेला मांड मोडताना गडे पडतात. काही ठिकाणी मांडावर हा प्रकार चालतो तर काही ठिकाणी कोणाच्याही अंगणात गडे पडण्याचा विधी उरकला जातो. प्रथम नमन होते. नमनानंतर एकेका देवाचे स्मरण होते. त्यानंतर हळूहळू गड्यांच्या अंगात अवसर यायला लागतो. त्यावेळी जे गायन होते त्याला ‘शिवोड’ असे म्हणतात. या गड्यांना खूपच जपले जाते.

मांड फोडसी गड्या

मांडामधी खेळा रे|

अशी गाणी यावेळी गायली जातात. गडे पडणे हा प्रकार बराच वेळ चालतो. परत अवसर आलेले गडे हळूहळू पूर्वपदावर येतात. काणकोण, सांगे, केपे, तिसवाडी या तालुक्यांत गडे पडण्याची परंपरा आहे.

होळीचा सण हा शिमग्यातील अखेरचा दिवस. पौर्णिमेच्या दिवशी होळी साजरी होते आणि होळी दहनाने शिमग्याची समाप्ती होते. होळी म्हणजे ठराविक बागेतील पोफळी कापून वाजत-गाजत आणणे आणि मध्यरात्री तिचे दहन करणे, एवढाच प्रकार. शिमग्यातील मांड मोडणे आणि होळी दहन यांचा विशेष असा संबंध नाही. दोन्ही स्वतंत्र उत्सव. तरीदेखील मांड मोडणे आणि होळी दहन जवळजवळ बरोबरीने होतात. मांड मोडल्यानंतर ज्या ठिकाणी होळीचे दहन केले जाते, त्या आगीला स्पर्श करून शिमग्यातील गडे आंघोळ करतात आणि शुद्ध होऊन परत मांडावर येतात.

अशी ही गोव्याची लोकसंस्कृती आहे. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली. रंगपंचमीदेखील शिमग्याचाच एक भाग आहे. रंग उडविणे हा प्रकार गोव्यात निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही ठिकाणी होळी पुनवेला, तर काही ठिकाणी दुसर्‍या दिवशी पाडव्याला. कोठे रंग पंचमीच्या दिवशी तर कोठे अमावास्येच्या दिवशी रंग उधळले जातात. यात फक्त पुरुषच असतात; स्त्रियांवर कधीही रंग उडविला जात नाही.

दिवजोत्सव, नाट्योत्सव हे प्रकारही शिमग्यातच होतात. दक्षिण गोव्यातील बहुतेक मंदिरांत दिवजांची जत्रा होते. हा सण विशेषत: महिलांसाठी असून दिवज घेणार्‍या महिला उपवास धरतात, अनवाणी चालतात. दागिने, उंची वस्त्रे परिधान करून वाजतगाजत दिवजांची भोवर मंदिराला फेर्‍या मारीत असते.

शिमग्याच्या काळात पूर्वी प्रत्येक मंदिराजवळ नाट्योत्सव व्हायचा. पाच-पाच दिवस नाटके सादर केली जायची. स्थानिक देवस्थान मंडळे या नाट्यमहोत्सवाला प्रोत्साहन द्यायचे. काणकोण, सांगे, केपे या भागांत आजही नाटके होतात; मात्र स्थानिकांचा अभाव असतो. कुठून तरी बिदागी देऊन नाटके साजरी केली जातात.

शिमगोेत्सवातील नाट्यमहोत्सवामुळे स्थानिक कलाकार निर्माण झाले. आजची परिस्थिती वेगळीच आहे. आज शिमगोत्सव शासकीय स्तरावर साजरा केला जातो. त्यात पारंपरिकतेपेक्षा कृत्रिमतेलाच अधिक वाव दिला जातो. सरकार लाखो रुपये खर्च करून केवळ पर्यटकांचे चाचले पुरविते एवढेच त्यातून दिसून येते. सरकारी शिमगोत्सवात दिसतात ते चित्ररथ आणि महिला पथकांच्या फुगड्या ज्यांचा शिमगोत्सवाशी कसलाही संबंध नाही. या शिमगोत्सवात प्रत्येक गावातील पारंपरिक मेळ दिसत नाहीत. बक्षिसांची खैरात आणि चुरशीमुळे पारंपरिक शिमगोत्सवांना व्यावसायिक स्वरूप निर्माण झाले आहे. आपले जे नाही ते स्वीकारण्याच्या वाईट वृत्तीमुळे गावातील पारंपरिक शिमग्यांनादेखील धोका निर्माण होण्याची शक्यता आता दिसायला लागली आहे. पारंपरिक लोकगीतांऐवजी हिंदी सिनेमातील गीते काही शिमग्यामेळातून सादर होताना दिसतात. कधीही पायांत चप्पल घालून तुळशीवृंदावनासमोर जाण्याची धमक नसलेले आज चक्क बूट घालून नाचतात आणि बुटासहित सुवासिनींनी दिलेली पंचारती स्वीकारताना दिसतात. तरी आशेचा किरण एकच की अजूनही ग्रामीण भागातील युवा पिढी जाग्यावर आहे; नपेक्षा पारंपरिक शिमगो कधीच बंद झाला असता. या पारंपरिक शिमग्यामेळांना सरकारच्या कला आणि संस्कृती खात्याने अर्थसाहाय्य करायला हवे. आपले पारंपरिक धालांचे आणि शिमग्याचे मांड जर टिकून ठेवायचे असतील तर या मांडांना सरकारने अर्थसाहाय्य करणे गरजेचे आहे. लोककला पथकांना पोशाख घ्यायला, वादन-साधन घ्यायला सरकार अर्थसाहाय्य करते, त्याच धर्तीवर या पारंपरिक शिमगो पथकांना वाद्यसाहित्य घ्यायला, मांडाची देखभाल आणि सुधारणा करायला एखादी नवीन योजना आखायला हवी. हे मांड टिकणे आणि पारंपरिक शिमगो चालू राहणे ही काळाची खरी गरज आहे.