शिक्षण आणि कौशल्यविकास

0
565

– विवेक पेंडसे

काळाप्रमाणे शिक्षणपद्धती जाऊन ब्रिटीशांनी सुरू केलेली शिक्षण पद्धती भारतात लागू झाली. या पद्धतीमध्ये शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांमधील खास कौशल्यांचा विचार झाला नाही. सर्वांना समान पद्धतीचे शिक्षण दिले गेले. यातून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्यांचा विकास झाला नाही. यासाठी आता शिक्षणतज्ज्ञांनी विचार करून सर्वांगीण आणि सातत्याने मूल्यमापन करण्याची पद्धती लागू करण्यात आली.

सर्वांगीण आणि सातत्याने मूल्यमापन करण्याची शिक्षण पद्धती ही चांगली असली तरी ती पद्धत लागू करण्यात बर्‍याच अडचणी आणि आव्हाने आहेत. भारतामध्ये लोकसंख्या खूप जास्त असल्याने विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे. मुलांच्या संख्येच्या तुलनेत शिक्षकांचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळेच या योजनेची कार्यवाही करणे हे एक मोठे आव्हान आहे. ही मूल्यमापन पद्धती लागू करून मुलांमधील कौशल्य विकसित करण्यासाठी खालील काही सूत्रे लक्षात घ्यायला हवी.
१) प्राथमिक स्तरावर मुलांमधील कौशल्ये ओळखणे. कौशल्यांना विकसित करण्यासाठी प्राथमिक शिक्षणापासून सुरूवात करायला हवी. यासाठी प्राथमिक स्तरावरच मुलांमधील कौशल्ये ओळखण्याची पद्धती हवी.
२) ही कौशल्ये ओळखून त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी शिक्षकांना त्याविषयी प्रबोधन करणे, त्यांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे.
३) कौशल्ये विकसित करण्यासाठी तसा शैक्षणिक उपक्रम तयार करायला हवा.
४) कौशल्यांचे मूल्यमापन कसे करावे याविषयीची कार्यपद्धती तयार करायला हवी.
५) कौशल्ये प्राप्त करून ती विकसित करण्यासाठी विद्यार्थ्याला कोणत्या पद्धतीचे शिक्षण द्यावे, अभ्यासक्रमात कोणते विषय असावेत याचा विचार करायला हवा.
६) कौशल्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्या विषयात पारंगत झाल्यावर त्या विद्यार्थ्याला रोजगाराची संधी प्राप्त व्हायला हवी.
७) शिक्षणाचा उपयोग स्वत:साठी करतानाच समाजासाठी त्याचा कसा उपयोग होईल याचा विचार व्हायला हवा.
जन्माला आल्यापासून प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकत असते. शिकत असतानाच ती व्यावहारिक जीवनात लागणार्‍या सर्व गोष्टींचे ज्ञान करून घेते. शरीर, मन आणि बुद्धी याद्वारे विविध विषयांचे ज्ञान प्राप्त करून घेते. आणि व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास होत असतो. याबरोबरच ती काही कौशल्ये प्राप्त करत असते. या सर्वांचा मूळ उद्देश म्हणजे व्यक्तीने ज्ञान मिळवणे आणि या ज्ञानाचा स्वत:साठी आणि समाजासाठी उपयोग करणे.
शिक्षणाचा विचार करताना प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, तिची जडणघडण, आजूबाजूचे वातावरण याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगवेगळी असते. एखाद्या विद्यार्थ्याला शारीरिक खेळामध्ये रस असतो, एखाद्याला गाण्याची आवड असते, एखादा चांगला वक्ता असतो. ही कौशल्ये प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळी असतात. विद्यार्थ्याला शिकवताना त्याच्यामधील ही कौशल्ये ओळखून त्याचा विकास घडवून आणून त्याची गुणवत्ता समाजाभिमुख करणे हा शिक्षणाचा मूळ उद्देश हवा.
पूर्वीच्या काळी भारतात गुरुकुलपद्धती होती. गुरूच्या घरी राहून विद्यार्जन करणे हे त्याकाळी होत असे. गुरुगृही राहिल्यावर तिथे आश्रमातील सर्व कामे करून विद्यार्जन करावे लागत असे. यामुळे रोजच्या जीवनात लागणारी कौशल्ये विद्यार्थी शिकत असे. या शिवाय त्या विद्यार्थ्याची कुवत क्षमता ओळखून गुरु त्याला पुढच्या प्रगत विषयाचे ज्ञान आणि त्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकवत असे.
……….