26 C
Panjim
Tuesday, September 21, 2021

शिक्षक नव्हे, दीपस्तंभ!

  • मीना समुद्र

ज्ञानोपासक, संवेदनशील, करुणामय, उदार अंतःकरणाचे प्रेरणादायक, स्फूर्तिदायक शिक्षक ज्यांना लाभले ते सारे अत्यंत भाग्यवान. शिक्षक दीपस्तंभासारखे उभे राहिले की हे सारे आपोआप घडते. शिकणं म्हणजे फक्त ज्ञान मिळवणं नव्हे. तर शिकणं म्हणजे माणुसकी जोपासणं.

सकाळीच फुलं काढायला बाहेर गेले. जास्वंद बहरली होती. ‘आँटी, १ फूल पाहिजे लाल’. पाठीवर दप्तर घेऊन शाळेत निघालेल्या त्या मुलानं म्हटलं. आमच्या घराजवळच्या ‘विद्यामंदिर’ शाळेत निघालेला तो मुलगा, आजूबाजूची मुलं यावेळी घरावरून शाळेत जाताना दिसतात.
‘काय रे? फुलांचे पार्ट शिकवताहेत वाटतं टीचर?’ मी म्हटलं. तेव्हा तो म्हणाला, ‘नाही आज ‘टीचर्स-डे’ आहे ना? आम्ही टीचरला भेट देणार आहोत.’ त्याचं वाक्य संपतंय तोपर्यंत त्याचा मित्र हातात रानफुलापानांचा सुंदर गुच्छ घेऊन हजर झाला. त्यालाही मधोमध लावायला टप्पोरं लाल उठावदार जास्वंदीचं फूल हवं होतं. मग २-४ फुलं तोडून त्यांना दिल्यावर ‘थँक यू आँटी’ म्हणत खुश होऊन शाळेला पळाली.
सुमारे दीड वर्षांपूर्वीचा हा प्रसंग; शिक्षकदिनाच्या निमित्ताने मनात जागा झाला. शाळेत रोजच्यासारखा अभ्यास यादिवशी होत नाही. शिक्षकांविषयी मनात असलेला आदर, श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. विद्यार्थी त्यासाठी आपापसात ठरवून नाटकुलं, गाणी, जादूचे प्रयोग, नाच, खेळ असे वेगळे कलात्मक, विविध गुणदर्शनात्मक काहीतरी कार्यक्रम सादर करतात. त्यांना फुलं, गुच्छ, चित्रं, भेटकार्डं असं छोटंसं काहीतरी भेट देतात. शिक्षकही मुलात मूल होऊन त्यांच्या नाचगाण्यात, खेळात सामील होतात. वर्गशिक्षिका आपल्या वर्गासाठी काही भेटी आणतात. विशेषतः अगदी छोट्या मुलांसाठी. माझा नातू लहान होता तेव्हा त्याचं आद्याक्षर असलेली की-चेन त्याला मिळाली होती, त्याचा त्याला केवढा आनंद झाला होता.
आमच्या वेळी आम्ही कन्या शाळेत शिकत असताना शिक्षकदिनाला शिक्षक आणि विद्यार्थ्यांची भूमिका बदले. त्यादिवशी १०वी, ११वीतली एखादी हुशार विद्यार्थिनी मुख्याध्यापिका बने. कोणी शिक्षिका तर कोणी शिपाई बने आणि नोटीस वहीची ने-आण करी. घंटा वाजवी. आमच्या बरोबरचीच कुणी चुणचुणीत मुलगी हातात खडू, डस्टर घेऊन आम्हाला शिकवू बघे. साडीचा बोंगा सावरत इकडे-तिकडे करताना पाहून गंमत वाटे. काही मुली मात्र चापूनचोपून छान साडी नेसत आणि गंभीर भाव चेहर्‍यावर वागवत. सगळ्यांचीच खूप गंमत आणि अपूर्वाई वाटे. उगीचच कुणाची तक्रार केली की ‘बाई’ शिक्षेचा धाक दाखवीत. गोड गळ्याच्या मुलीने म्हटलेल्या गाण्याला दाद देत. शिक्षिकांच्या नकला करण्याचाही कार्यक्रम चाले आणि इतर मुली त्या लकबींवरून वा सवयीच्या नकलेवरून शिक्षिकांचे नाव ओळखून काढत, कविता, गाणी, गोष्टी, वाचन सगळ्याची नुसती धमाल असे. आपल्याकडे होऊन गेलेल्या थोर शिक्षकांची आठवण, त्यांच्या स्मृतीला वंदन, त्यांना आदरयुक्त पुष्पांजली वाहण्यात येई.
अशातूनच रवींद्रनाथ टागोरांची ओळख झाली. ‘शांतिनिकेतन’ची स्थापना हे त्यांचे एक थोर कार्य होते. त्यांच्या शिक्षणविषयक विचार आणि कल्पनांची मुख्य मदार शिक्षकांवर होती. विद्यार्थ्यांविषयी ज्याला खरेखुरे प्रेम आहे आणि त्यांच्या व्यक्तित्वाविषयी आदरभाव आहे, ज्ञानाचा ध्यास आहे असा चारित्र्यवान शिक्षक दिव्यासमान आपल्या विद्यार्थ्यांची जीवने उद्दीप्त करू शकतो. उजळू शकतो हा विचार त्यांच्या मनात होता. निसर्गाच्या सहवासात, मातृभाषेच्या माध्यमातून जीवनशिक्षण मिळाले पाहिजे असा त्यांचा विचार होता. गुरु-शिष्याचा संबंध निकटचा हवा हा त्यांचा विचार आजच्या बिकट संकटकाळात पार पुसून गेला आहे. ऑनलाइन शिक्षणपद्धतीमुळे मुले एकमेकांच्या सहवासात येत नाहीत. शिक्षकांचा स्पर्श, त्यांचे सभोवताली असणे अनुभवत नाहीत. त्यांचा प्रेमळ कटाक्ष, पाठीवर थाप त्यांना मिळत नाही. संवाद होत नाही. बाहेर पडायचंच नाही तर निसर्गसान्निध्य, सृष्टीतील प्राणिपक्षांचे, झाडाफुलांचे सान्निध्य मुले कशी अनुभवणार? या सगळ्यात लपलेले, स्रवणारे, झरणारे, सळसळणारे, निनादणारे सौंदर्य आणि चैतन्य आणि सर्वांनी एकत्र येऊन करण्याच्या कामाचा सच्चा आनंद त्यांना कसा प्राप्त होणार? बालवयात तर मुलांना शारीरिक हालचालींची किती आवश्यकता असते. नवनवीन घडामोडी पाहण्याचे कुतूहल, प्रयोगक्षमता, निरीक्षणशक्ती, आकलन अभ्यास आणि विकास या सार्‍या विद्यार्थीवयातल्या, वाढीच्या वयातल्या पायर्‍या आहेत. त्याचे ज्ञान प्रत्यक्ष शिक्षणाने, प्रयोगाने प्राप्त होते. शिक्षक, गुरु असे ज्ञान देऊ शकतात.
‘‘शिक्षण म्हणजे माणसाच्या शारीरिक आणि मानसिक शक्तींचा उद्भव आणि विकास – परिपोष, परिपाकांचे मानवी उपाय आणि त्यांचा बुद्धिपुरस्सर अवलंब होय’’, असे कुठेतरी वाचले होते. दीड-दोन वर्षें मुलांची अशी निर्भर, निरोगी वाढ खुंटल्यासारखी झाली आहे. तिला तिचे पूर्वीचे स्थान प्राप्त होवो आणि सारी परिस्थिती सुरळीत होऊन व्यक्तिमत्त्व आणि त्याबरोबरच समाजाचा, देशाचा विकास घडत राहो अशी फक्त प्रार्थना आपण करू शकतो ही सद्यस्थिती पाहता.
शिक्षकदिन हा साजरा व्हायलाच हवा. ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’- ज्ञानासारखे पवित्र दुसरे काही नाही – ही भारतीय धारणा आहे. ज्ञानाची कास प्रत्येकानेच धरायला हवी. अज्ञानाच्या अंधःकारात आपले अधिकार, विचार, मते ही बनू शकत नाहीत; आकार घेऊ शकत नाहीत. मातीच्या गोळ्याला आकार देतो तो शिक्षक. या दृष्टीने माता-पिता हे आपले पहिले शिक्षक, नंतर शाळेतले शिक्षक, गुरुजन. पुस्तके, निसर्ग, सृष्टी ही आपल्याला खूप काही शिकवीत असते. शिक्षकही आपल्यामध्ये सद्गुणांची, चांगुलपणाची, सदाचाराची बीजे पेरतात. आपल्यामध्ये असलेला गुण ओळखून त्याच्या वाढीसाठी प्रोत्साहन देतात. चुका सुधारण्यास पाहिजे तिथे मार्गदर्शन करतात. आपली प्रज्ञा जागी ठेवतात. आपल्यातला अंगार फुलवतात. विवेक शिकवतात. आत्मविश्‍वास जागृत करतात. जिज्ञासा जागवतात आणि तिची पूर्ती करण्यासाठी झटतात. वेगळी परिस्थिती, क्षेत्र, वातावरणातून आलेल्या मुलांची मानसिकता जाणून त्यांना तळमळीने शिक्षण देतात. फीसाठी मदत करतात. जीवनाचा पाया पक्का करतात.
आपले पूर्वीचे राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनीही म्हटले आहे की शिक्षण आनंददायक हवे. तांत्रिक युगात अपडेट रहायलाच हवे. डॉ. जयंत नारळीकर म्हणा, सुधा मूर्ती म्हणा, किरण बेदी म्हणा… कुठल्याही क्षेत्रातले मान्यवर आपल्या भाषणात नेहमी आपल्या यशात शिक्षकांचा वाटा असल्याचे सांगतात आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. शिक्षकांचे प्रेम, त्यांची माया, त्यांचे वात्सल्य आणि त्यांची शिस्त, त्यांचे कष्ट यांची बूज राखली जायला हवी. त्यांच्या सन्मानासाठी आजचा शिक्षकदिन.
आपण १९६२ साली डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या नावे हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि मित्रांनी ५ सप्टेंबर हा त्यांचा वाढदिवस त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षकदिन म्हणून साजरा केला. अतिशय थोर असे तत्त्वज्ञानाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक डॉ. राधाकृष्णन् यांनी भारतीय तत्त्वज्ञान जगात पोचवले. माणूस जन्मभर विद्यार्थी असतो. तो काही ना काही सतत नवीन शिकत असतो. जिथून जसे ज्ञान मिळेल तिथून ते घेतले पाहिजे. देशविदेशात आपल्या छोट्या गावाचे, पूर्वजांच्या गावाचे ‘सर्वपल्ली’चे नाव अजरामर करणार्‍या डॉ. राधाकृष्णन् यांना मनःपूर्वक सादर प्रणाम! सर्व शिक्षकवर्गालाही वंदन!
ज्ञानोपासक, संवेदनशील, करुणामय, उदार अंतःकरणाचे प्रेरणादायक, स्फूर्तिदायक शिक्षक ज्यांना लाभले ते सारे अत्यंत भाग्यवान. सूर्य स्वतः जळून दुसर्‍यांना प्रकाश देतो. आरोग्य, संपन्नता, चैतन्य देतो. ज्ञानाच्या प्रकाशात जीवनाचे सांदीकोपरे उजळतात. जीवनात लख्ख प्रकाश पसरतो. सर्वकाही निरखून पारखून घेण्याची सवय लागते. चांगल्या-वाईटाचे भान येते. आत्मविश्‍वास जागृत होतो. स्वतःतले स्वत्व आणि सत्त्व जपता येते. एक मार्ग मिटला तरी दुसर्‍या वाटा खुल्या होतात. जगण्याला आधार आणि बळ मिळते. अन्यायाविरुद्ध पेटून उठून लढण्याची जिद्द निर्माण होते. शिक्षक दीपस्तंभासारखे उभे राहिले की हे सारे आपोआप घडते. शिकणं म्हणजे फक्त ज्ञान मिळवणं नव्हे. तर शिकणं म्हणजे माणुसकी जोपासणं. आजच्या शिक्षकदिनानिमित्त ही ठेव जोपासणं अत्यंत गरजेचं आहे.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

‘आयपीएल’चा तडका आजपासून आखातात

सुधाकर रामचंद्र नाईक ‘कोविड-१९’च्या मृत्युतांडवामुळे आकस्मिकपणे अनिश्‍चित कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आलेल्या बहुचर्चित तथा देश-विदेशांत अङ्गाट लोकप्रियता लाभलेल्या ‘इंडियन...

ताण, तणाव आणि आपण

गिरिजा मुरगोडी तुम्ही करत असलेल्या कामावर जर तुमचं प्रेम असेल आणि तुम्हाला माणसांची आवड असेल तर कुठलीच गोष्ट...

मुंगी ः एक किमयागार

अंजली आमोणकर नियमबद्धता, विचारी भाव, बदलत्या परिस्थितीशी सामना करण्याची तयारी असावी हे मुंगी शिकवते. मुंगीचं जीवन मानवासाठी मोठा...

विमा उद्योगाचे खाजगीकरण

शशांक मो. गुळगुळे अलीकडे केंद्र सरकारकडून खाजगीकरणाबाबत बर्‍याच क्रांतिकारक घोषणा करण्यात आल्या. विरोधी पक्ष त्यांचे काम म्हणून याला...

कॅप्टन पदच्युत

राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्याची सध्या जी मालिका चालली आहे, त्यामध्ये भाजपने उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पायउतार केले, तर कॉंग्रेसने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन...

ALSO IN THIS SECTION

परी या सम हा…

जनार्दन वेर्लेकर ३१ जुलै २०२१ रोजी जयंत पवारांनी व्हॉट्‌सऍपवरून मला आश्‍वस्त केलं ‘खूप आभार वेर्लेकर! बरं वाटलं’ माझ्या...

आला आला ग कान्हा.. आ ऽ ऽ ला

डॉ. गीता काळेपर्वरी बालांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या मनात विविध रूपात हा श्रीकृष्ण वसलेला आहे. म्हणूनच त्याचा जन्मोत्सव जन्माष्टमी, गोकुळाष्टमी...

भरती-ओहोटी

गौरी भालचंद्र जगणं म्हणजे भरती-ओहोटीच्या लाटांमधून अचूक वेळ साधून त्या त्या घडीला वाळूचा किल्ला बांधणं.. वाळूत किल्ले बांधण्याचा...

ऋतुचक्र

प्राजक्ता गावकर ती नवतरुणी झालेली वसुंधरा ग्रीष्माच्या कडक ज्वाळांनी भाजून निघालेली असताना आपल्या सख्या प्रियतमाला आर्तपणे साद घालून आपल्याला...

श्रावणोत्सव

दीपा जयंत मिरींगकर श्रावणातील नारळी पौर्णिमा म्हणजे बहीणभाऊ या नात्याचा उत्सव आणि वर्षातून एकदा केले जाणारे वरुण पूजन...