शिक्षक कोण?

0
593

– ललिता जोशी

‘शिक्षण’ हा शब्द उच्चारला की लगेच त्याचा संबंध शाळा, कॉलेज आणि अशाच सारख्या इतर शिक्षण संस्थांशी जोडला जातो. साहजिकच शिक्षणाच्या दर्जाची आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची जबाबदारीही फक्त शिक्षण संस्थांचीच असते असे सर्रास गृहीत धरले जाते. याचे कारण आपण ‘शिक्षण’ या शब्दाची व्याख्या खूप संकुचित केली आहे. खरं तर शिक्षण ही संकल्पना खूप व्यापक आहे. आणि शिक्षण संस्थांनी दिलेल्या पदव्या, सर्टीफिकेट्‌स त्यापलीकडची आहे. जे शिकून आपले आयुष्य समृद्ध होते ते शिक्षण! म्हणून शिक्षणाचा संबंध फक्त शिक्षण संस्थांशी नाही तर समाजाच्या सर्वच घटकांशी जोडलेला आहे. शाळेतल्या शिक्षकांशिवाय, मुलांचे आईवडील, आजी- आजोबा, शेजारीपाजारी, राजकारणी, पुस्तके, टी. व्ही., इंटरनेट, सोशल मिडिया हे सगळे मुलांचे शिक्षकच आहेत. शाळेत जाण्याआधीपासून आणि शाळेतून बाहेर पडल्यावरही मुलांचे शिक्षण अव्याहत सुरूच असते.

जपानमध्ये घडलेली ही गोष्ट! काही वर्षांपूर्वी भारतातील एक प्रसिद्ध गणिततज्ज्ञ जपानच्या भेटीवर गेले असताना, तिथल्या एका शाळेला त्यांनी भेट दिली. शाळेतल्या साधारण १०-१२ वर्षांच्या मुलांशी त्यांनी संवाद साधला. त्या मुलांची बुद्धिमत्ता अजमावण्यासाठी त्यांना एक गणित सोडवायला दिले, ते साधारण असे होते – धान्याचा एक व्यापारी अमुक एका दराने धान्य विकतो आणि त्यावर ५% नफा कमवतो. समजा त्या व्यापार्‍याने धान्यामधे ठराविक प्रमाणात भेसळ केली आणि त्याच दराने धान्य विकले, तर त्याच्या नफ्यामधे किती वाढ होईल? त्या गणिततज्ञाचा अंदाज होता की त्या वयाच्या मुलांना ते गणित सोडवायला अवघड जाईल. परंतु सर्वच मुलांनी झटकन कागदावर उत्तर लिहिलं. त्या मुलांनी लिहिलेले उत्तर जेव्हा तपासलं, तेव्हा सर्व मुलांनी लिहिले होते की जर तो व्यापारी धान्यामधे भेसळ करत असेल, तर तो निश्‍चितच तुरुंगात जाईल. त्याने नफा कमावण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. एकमुखाने दिलेल्या या उत्तराने त्या गणिततज्ज्ञावर मात्र थक्क होण्याची पाळी आली. या मुलांनी त्यांच्या आजूबाजूला मेहनत करणारे शिक्षक, नेक राजकारणी आणि सरळ मार्गाने पैसा कमावणारे आईवडील पाहिले होते. त्यामुळे मुद्दाम कोणी न शिकवताच धंदा प्रामाणिकपणेच करायला पाहिजे हे शिक्षण त्यांना मिळाले होते. केवळ शालेय पुस्तकांमधून नीतिमत्तेच्या धड्यांची पोपटपंची करून प्रामाणिकपणाची मूल्ये मुलांमधे रुजवणे केवळ अशक्य आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या समाजात असे विद्यार्थी घडवता येतील?
आपल्या देशातले हे एक उदाहरण बघा! प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचा एक अनुभव विचार करण्यासारखा आहे. काही वर्षांपूर्वी एका दुर्मीळ सूर्यग्रहणाचा योग आला होता. हे ग्रहण देशातल्या अनेक भागाबरोबरच पुण्यामधेही दिसणार होते. निसर्गाचे हे अद्भुत इतके दुर्मीळ होते की कोणाच्याही आयुष्यात ते एकदाच अनुभवता येईल. हे ग्रहण सर्वांनी विशेषत: युवकांनी पहावे, म्हणून डॉ. नारळीकरांच्या ‘आयुका’ या संस्थेतर्फे खूप प्रयत्न केले गेले. मोफत चष्मे वाटले, ग्रहणाच्या परिणामांची माहिती दिली. ग्रहण काळजी घेऊन बघितले तर काहीही धोका नाही असा संदेश दिला. परंतु तरीही लोकांनी घरी बसणेच पसंत केले. पुण्यासारख्या शहरातसुद्धा त्या दिवशी रस्त्यांवर शुकशुकाट होता. उगाच विषाची परीक्षा कशाला घ्या असा विचार करून बहुसंख्य लोकांनी ग्रहण न पाहणेच पसंत केले. शाळेमधे विज्ञान विषयात उत्तम गुण मिळवणारे विद्यार्थीसुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारू शकत नाही. अशा समाजात शास्त्रज्ञ कसे निर्माण होतील? शास्त्रज्ञ व्हायला केवळ उत्तम शिक्षणसंस्था पुरेशा आहेत का?
असं म्हणतात की एज्युकेशन इज टू सिरियस. अ बिझ्‌निस टू बी कन्सिडर् ओन्लि बाय एज्युकेशनिस्ट. अगदी खरंय हे. शिक्षण हे सर्वांगी आहे. ते केवळ पैसे मिळवण्याचे साधन नाही. आपले जगणे ज्यामुळे अधिक अर्थपूर्ण आणि समृद्ध होईल ते खरे शिक्षण! मनाची मशागत करणारे, प्रगल्भता वाढवणारे आणि स्वत:बरोबर दुसर्‍यांचा विचार करायला शिकवते ते खरे शिक्षण! म्हणूनच मुलांना शिक्षण देणे समाजातल्या प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे, याचे भान आल्याशिवाय आणि समाजाची मानसिकता बदलल्याशिवाय शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची स्वप्ने बघणे हे केवळ दिवास्वप्न ठरेल!
………