शिक्षणक्षेत्राकडे आजही एक पवित्र क्षेत्र म्हणून पाहिले जाते. परंतु ह्या क्षेत्राला काळीमा फासणाऱ्यांचीही कमी नाही. सध्या गाजणाऱ्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात ही परीक्षा घेणाऱ्या एनटीएशी संबंधित काही प्राध्यापकच मुख्य सूत्रधार असल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. शिक्षणक्षेत्राला पुन्हा एकवार काळीमा फासला गेला आहे. गेल्या तीन मे रोजी जवळजवळ तेवीस लाख विद्यार्थ्यांनी ही राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा मोठ्या भाबड्या विश्वासाने दिली. खरे तर दोन वर्षांपूर्वीच अशाच प्रकारची पेपरफुटी आढळली होती, परंतु तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ही पेपरफुटी सार्वत्रिक नसल्याचे सांगत परीक्षा रद्द करायला नकार दिला होता व ज्यांचे गुण संशयास्पद आढळले, त्यांना फेरपरीक्षा द्यायला लावली होती. त्या पेपरफुटीवेळी केंद्र सरकारने नीट परीक्षेतील सर्व त्रुटी दूर करीत असल्याच्या गर्जना केल्या. के. राधाकृष्णन समिती नेमली गेली. तिच्या शिफारशींची कार्यवाही करण्यासाठी पुन्हा समिती नेमली गेली. न्यायालयालाही ठासून सांगण्यात आले की आम्ही सर्व शिफारशींची शब्दशः पूर्तता केली आहे. पण ह्या तथाकथित पूर्ततेचे बिंग यावेळी फुटले. राजस्थानमधील सिकरपासून उघडकीस आलेल्या ह्या पेपरफुटीचे धागेदोरे अनेक राज्यांमध्ये पसरले असल्याचे आता आढळले आहे. सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे ह्या पेपरफुटीमागे कोणी ऐरे गैरे गुन्हेगार नाहीत, तर विद्यानगरी म्हणवणाऱ्या पुण्यातील प्रतिष्ठितपणाच्या बुरख्याआड वावरणारी काही भ्रष्ट प्राध्यापक मंडळी आहेत. दोघांचा बुरखा सीबीआयने आतापर्यंत फाडला, त्यातून जे वास्तव समोर आले ते हादरवून टाकणारे आहे. नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीएसाठी प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या प्राध्यापकांचाच ह्या पेपरफुटीत थेट सहभाग आहे असे ह्यावरून दिसते. जीवशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या ह्या प्राध्यापकांनी लाखो रुपये घेऊन धनिक पालकांच्या मुलांना घरी बोलावून प्रत्यक्ष परीक्षेत येणार असलेले प्रश्न आणि उत्तरे वहीत उतरवून घ्यायला लावली. तेवढ्यावरच त्यांची हाव थांबली नाही, तर मध्यस्थांमार्फत ह्या प्रश्नपत्रिका इतर राज्यांतील कोचिंग संस्थांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी पुन्हा लाखो रुपये उकळले गेले. नीट आणि जेईईसारख्या राष्ट्रीय परीक्षांच्या निमित्ताने देशभरात कोचींग क्लासेसचा जो सुळसुळाट झालेला आहे, त्यांना आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांना ह्या परीक्षांत यश लाभते हे दाखवण्यासाठी आणि त्याद्वारे पुन्हा लाखो रुपये घेऊन नवे विद्यार्थी मिळवण्यासाठी ह्या आयत्या प्रश्नपत्रिकांची मदत होते. त्यामुळे लाखो रुपये देऊन या प्रश्नपत्रिका विकत घेऊन त्या आपल्या विद्यार्थ्यांना विकण्याचा त्यांचा गोरखधंदा चालतो. काही पालक असेही निघाले की ज्यांनी आपल्या मुलासाठी तर ही प्रश्नपत्रिका लाखो रुपये देऊन विकत घेतलीच, परंतु आपण खर्चिलेले ते पैसे वसुल करण्यासाठी ती पुन्हा आपल्या मित्रांना आणि नातलगांना विकली. त्यामुळे नीटची ही तथाकथित संभाव्य प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी बघता बघता देशभरात जाऊन पोहोचली. कोट्यवधींचा व्यवहार ह्या दरम्यान झाला. नीट परीक्षेशी थेट संबंधित असलेले प्राध्यापक, त्यांच्यासाठी काम करणारे मध्यस्थ, कोचींगच्या नावाखाली बाजार मांडलेल्या संस्था, त्यांचे चालक आणि काहीही करून आपल्या मुलाने पैशाच्या जोरावर तरी डॉक्टर बनावे म्हणून कितीही लाख रुपये देण्याची तयारी असलेले पालक असे हे मोठे जाळे आहे. पैसे चारून प्रश्नपत्रिका मिळवून डॉक्टर झालेली ही मंडळी मग आरोग्य व्यवस्थेचाच बाजार करायला निघाली तर नवल नाही. ही सगळी अशी सडलेली व्यवस्था आहे आणि राज्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेश परीक्षा रद्द करून राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा घेण्यामागे ह्याच सडलेल्या व्यवस्थेचे लाभार्थी कारणीभूत आहेत. ह्या प्रवेश परीक्षांमध्ये उत्तर भारतातील विशिष्ट शहरांतील विद्यार्थ्यांनाच मोठे यश का मिळते ह्या प्रश्नाचे उत्तर कुठेतरी ह्या असल्या लाग्याबांध्यांतही दडले आहे. यंदाच्या नीट परीक्षेत बिंग फुटले, परंतु केवळ ह्याच परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली कशावरून? यंदा आपल्या पालकासाठी प्रश्नपत्रिका विकत घेणाऱ्या राजस्थानमधील एका धनिकाची इतर मुले ह्यापूर्वीच्या नीट परीक्षांमध्ये मोठे यश मिळवून वैद्यकीय शिक्षण घेत असल्याचे आढळले आहे. हा शिक्षणाचा बाजार किळसवाणा आहे. शिक्षणाचे पावित्र्य रसातळाला चालले आहे. एवढा सगळा पेपरफुटीचा प्रकार होऊनही, काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या करूनही केंद्रीय शिक्षणमंत्री झालेल्या घटनेची जबाबदारी स्वीकारून या विद्यार्थ्यांची माफी मागायलाही पुढे होणार नसतील तर ते खेदजनक आहे. शिक्षण व्यवस्थेला पोखरणाऱ्या शक्ती बलाढ्य असतील, परंतु त्यापुढे निदान सरकारने तरी एवढे हतबल होऊ नये.

