>> अडवई-सत्तरीतील घटना; अनावधानाने बंदुकीचा चाप ओढला गेल्याने घात; वाळपई पोलिसांकडून संशयिताला अटक
वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा अनावधानाने बंदुकीचा चाप ओढला गेल्यामुळे गोळी लागून मृत्यू झाला. हेमंत हिरबा देसाई (32, रा. अडवई-सत्तरी) असे मृत तरुणाचे नाव असून, ही घटना गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी वाळपई पोलिसांनी अभिजीत नारायण देसाई (रा. थडलेभाट-दोडामार्ग) याला अटक केली आहे. तसेच विनापरवाना बंदूक आणि एक दुचाकी वाळपई पोलिसांनी ताब्यात घेतली. गोमेकॉमध्ये उत्तरीय तपासणीनंतर हेमंत देसाई याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी पाटवळ या ठिकाणी वन्यप्राण्यांची शिकार करताना समद खान या नाणूस येथील तरुणाचा अशाच प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाला होता.
वाळपई पोलीस स्थानकाच्यावतीने डिचोलीचे पोलीस उपाधीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेरंब देसाई व अभिजीत देसाई हे दोघेही अडवई गावापासून काही अंतरावर असलेल्या जंगलामध्ये वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी गेले होते. सदर शिकारीची पूर्वतयारी करीत असतानाच अभिजीत देसाई याच्या हातामध्ये असलेल्या बंदुकीचा चाप अनावधानाने ओढला गेला आणि त्याबरोबर बंदुकीची गोळी सुटून ती समोर असलेल्या हेमंत देसाई याच्या छातीला लागली. परिणामी गंभीर दुखापत झाल्यामुळे तो जागीच कोसळला.
यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत हेमंत देसाई याला गावातील एका तरुणाशी संपर्क साधून दुचाकीवरून वाळपईच्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. ड्युटीवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तो मृत पावल्याचे घोषित केले. छातीला गोळी लागल्यामुळे रक्तस्त्राव झाला व त्यातच त्याचे निधन झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
याबाबतची तक्रार हेमंत देसाई यांच्या चुलत्याने वाळपई पोलीस स्थानकावर दाखल केली. त्यानंतर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तक्रार दाखल झाल्यानंतर वाळपईचे पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर, उपनिरीक्षक प्रथमेश गावस यांनी ताबडतोब पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी धाव घेतली आणि प्राथमिक पंचनामा करण्यात आला. यावेळी अभिजीत देसाई याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून पूर्ण माहिती घेतल्यानंतर वाळपई पोलिसांनी त्याला अटक केली.
वाळपई पोलिसांकडून घटनास्थळाची जागा सील
गुरुवारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तपास करण्यात आल्यानंतर वाळपई पोलिसांनी सदर जागा सील केली. सदर ठिकाणी नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला. शुक्रवारी सकाळी जिवबा दळवी व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन एकूण परिस्थितीची पाहणी केली. नमुने गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. दुपारी 12 वाजेपर्यंत सदर पथक घटनास्थळी पोहोचले. सदर ठिकाणी पडलेले रक्ताचे सडे व इतर स्वरूपाचे नमुने पथकाने गोळा केले.
शिकारीसाठी झाडावर चोख व्यवस्था
ज्या ठिकाणी सदर घटना घडली, त्या ठिकाणी एका झाडावर शिकारीला बसण्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून आले. तेथे बसण्यासाठी व्यवस्थित जागा केलेली असून, त्या ठिकाणाहून सातत्याने वन्यप्राण्यांची शिकार होत असल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या अंतरावरून अवघ्या काही अंतरावर पाण्याचा स्रोत आहे.
पाटवळमधील घटनेची पुनरावृत्ती
तीन महिन्यापूर्वी पाटवळ या ठिकाणी समद खान (रा. नाणूस) या तरुणाचा वन्यप्राण्यांच्या शिकारीवेळी अशाच प्रकारे गोळी लागून मृत्यू झाला होता. सदर प्रकरण ताजे असतानाच आता अडवई या ठिकाणी नवी घटना घडल्याने वन्यप्राण्यांच्या शिकारीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.