25.7 C
Panjim
Friday, February 26, 2021

शिंबीधान्ये (PULSES)

 • डॉ. मनाली म. पवार
  (सांत इनेज- पणजी)

पित्ताशयाचे खडे किंवा वृक्कामधील मूतखड्यांवर कुळीथ रामबाण उपाय आहे. गोव्यामध्ये कुळीथ सर्वत्र उपलब्ध आहेत. कुळीथ किंवा काही ठिकाणी हुलगे असेही म्हटले जाते. हे कुळीथ रोज रात्री मूठभर भिजत घालावेत. सकाळी त्यावरील पाणी सेवन करावे व उरलेले कुळीथ हे सूप बनवून खावे.

शिंबीधान्ये म्हणजे शेंगेतून निघणारे द्विदल धान्य. यामध्ये मूग, मसूर, हरभरा, तूर, पावटे, चवळी, राजमा, वाटाणे, कुळीथ, उडीद, सोयाबीन इत्यादी कडधान्यांचा समावेश होतो. ही सर्व कडधान्ये कमी-अधिक प्रमाणात शाकाहारी जेवणार्‍यांमध्ये सेवन केली जातात. पण बर्‍याच वेळा मांसाहार सेवन करणारे फक्त तूर डाळ, वाटाणा, हरभरा, राजमा यांसारखी फक्त निवडक कडधान्येच सेवन करतात. खरं तर ह्या कडधान्यांचे गुणधर्म, पोषक तत्त्वांची पुरेशी माहिती नसल्याने फक्त जिभेला चविष्ट अशीच कडधान्ये प्राधान्याने सेवन केली जातात. म्हणून काही शिंबीधान्यांची माहिती आपण जाणून घेऊया…

तसे पाहता ही सर्व धान्ये कमी-अधिक प्रमाणात मधुर, लघू, विबंध, मलबद्धता, रूक्षता उत्पन्न करणारी थंड, कटू, विपाकी व पथ्यकर आहेत. दररोज ८० ग्रॅम म्हणजे सुमारे पाऊण कप डाळ खावी. गोवा- कोकण प्रदेशात साधारण डाळीचा वापर फारच कमी होतो. कारण आमटीमध्ये फारच थोडी डाळ वापरली जाते. म्हणून वरण खाण्याची पद्धत ठेवावी किंवा घट्ट डाळ खावी. एकूण २३ अमिनो ऍसिड्‌सपैकी महत्त्वाची दहा (आवश्यक अमिनो ऍसिड्‌स) फक्त सोयाबीनमध्ये असतात. म्हणून इतर डाळी व धान्ये याचे योग्य मिश्रण करीत राहावे.

१) मूग – असे म्हटले आहे की आजारांमध्ये पथ्याचे पालन केल्यास औषधोपचाराची गरज भासत नाही व पथ्यापथ्याचे पालन न केल्यास औषध परिणाम करत नाही. जुने तांदूळ, मूग, गरम पाणी, तूप व मध हे सर्व प्रकारच्या आजारांमध्ये तसेच स्वास्थ्यरक्षणासाठी पथ्यकर असे पदार्थ आहे. हिरवे मूग हे सर्वांत पथ्यकर आहेत. ते पचनाला हलके असून पित्तप्रकोप करीत नाहीत. मूग काळे, हिरवे, पिवळे, पांढरे आणि लाल रंगाचे असतात. हिरव्या रंगाचे मूग अत्यंत स्वादिष्ट आणि गुणकारी असतात. प्राचीन भारतीय पद्धतीमध्ये मूग हे सर्वाधिक पोषणयुक्त अन्नपदार्थांपैकी एक मानले जाते. यामध्ये मँगनीज, पोटॅशियम, मॅग्नेशिअम, फॉलेट, तांबे, जस्त आणि विविध व्हिटामिन-बी इत्यादी शरीराला आवश्यक असणारे घटक यात असतात.

 • अनेक खाद्यपदार्थात मुगाचा उपयोग करतात. वरणासाठी डाळ, मुगाच्या डाळीपासून खिचडी, हलवा, मुगाच्या पिठापासून लाडू, मुगाला मोड आणून उसळ अशा विविध प्रकारे मुगाचा वापर करता येतो. मुगाची डाळ शीत व पित्तशामक असून पचायला हलकी असते.
 • मुगाचे सार, सूप, यूष हे तापामध्ये गुणकारी औषधच आहे. तृष्णा या विकारातही तहान भागवण्यासाठी मुगाचे सूप दिले जाते.
 • मूग पचायला हलका असल्याने त्यातील फायबर घटक पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करतात. पोटात गॅस जमा होण्याचे प्रमाण नियंत्रणात राहते.
 • मूगडाळीमध्ये जीवनसत्त्वं आणि फॉस्फरस घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे चेहर्‍यावरील डाग कमी करण्यासाठी मुगाचा उपयोग होतो.
 • मूग भुकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. यामुळे वजन घटवण्याचा प्रयत्न करणार्‍यांनी मधल्या वेळेत लागणार्‍या भुकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मूग खाणं फायदेशीर आहे. रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनीही मूग नियमित सेवन करावे. लठ्ठपणामध्ये मुगाची खिचडी फायदेशीर ठरते. यामध्ये रक्तशाली तांदूळ, मूग, सेंधव, हरिद्रा ही द्रव्ये वापरून खिचडी शिजवावी व त्यावर तुपाची जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, दालचिनी, मिरे व ओव्याची फोडणी द्यावी. या प्रकारची खिचडी मेदाचे क्षरण करते व पोटही भरते.
 • मूगडाळीमुळे मेंदूमध्ये ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होते. केसांना समूळ मजबूतपणा येण्यास मदत होते.

२) तूर (रेड ग्राम) –
वरण, आमटी इत्यादींसाठी मुगापेक्षा तुरीचाच जास्त वापर असतो पण ही डाळ पित्तकर आहे. तसेच अतिसेवनाने मूत्रवहस्रोतसाचे व्याधी व अम्लपित्त होते. पित्त प्रकृतीच्या लोकांनी तसेच ही व्याधी झालेल्यांनी तूरडाळ खाऊ नये.

३) वाल पावटे (फिल्ड बीन) –
हे सारक, रूक्ष, तुरट, गोड रसाचे असून पचण्यास जड आहेत. त्यांचा विपाक अम्ल व वीर्य उष्ण आहे. वातगतीला स्तंभन करणारे प्रसूतीनंतर पावट्याची भाजी सूतिकेला खायला द्यावी. कारण वाल पावटे हे स्तन्य वाढवणारे आहे. वाल पावटे हे मूत्रल, रक्तपित्तकर व विदाही आहेत. ते दृष्टीला अहितकर, शुक्र, कफ, शोथ व विषघ्न आहेत.

४) चवळ्या (काऊ ग्राम) –
या पचण्यास जड, पुष्कळ मळ तयार करणार्‍या, रूक्ष व वातकर आहेत. अल्प मल अथवा मलक्षय असणार्‍यांना मात्र त्या उपयुक्त ठरतात.

५) कुळीथ (हॉर्स ग्राम) –
चवीला तुरट, गोड, अम्ल, विपाकी व उष्ण आहेत.

 • रक्तपित्तकर आहेत. कफघ्न व मूत्रल आहेत.
 • त्यामुळे कास, श्‍वास, प्रतिश्याय या रोगांवर तसेच मेदोरोग, अश्मरी यासाठी चांगले आहेत.
 • अश्मरीसाठी दररोज पाच वाट्या कुळथाचे सूप (कढण) प्यावे.
 • शुक्रवहस्रोतसातील व्याधी नष्ट करण्यासाठी व शोथासाठी पथ्यकर आहेत.
 • श्‍वेतप्रदरावर चांगला उपयोग होतो.
 • पित्ताशयाचे खडे किंवा वृक्कामधील मूतखड्यांवर कुळीथ रामबाण उपाय आहे. गोव्यामध्ये कुळीथ सर्वत्र उपलब्ध आहेत. कुळीथ किंवा काही ठिकाणी हुलगे असेही म्हटले जाते. हे कुळीथ रोज रात्री मूठभर भिजत घालावेत. सकाळी त्यावरील पाणी सेवन करावे व उरलेले कुळीथ हे सूप बनवून खावे किंवा कुळिथाची आमटी करावी किंवा कुळिथाची उसळ करावी. कोकणात कुळिथाची पिठी म्हणजे कुळीथ भाजून त्याचे पीठ करून त्याला तुपाची किंवा तेलाची मोहरी- लसूण- कढीपत्ता- हिंग, आले या द्रव्यांची फोडणी द्यावी. चवीसाठी मीठ, हरिद्रा व मसाला घालावा. १ चमचाभर पीठासाठी साधारण १ पेला पाणी घ्यावे. ही सुपासारखी पिठी गरम असताना सेवन करावी.

६) उडीद (ब्लॅक ग्राम) –
अत्यंत स्निग्ध, पौष्टिक आहेत. तसेच पचनाला फार जडही आहेत. मधुर रसाचे असून अम्लविपाकी व उष्ण आहेत. मलाचे प्रमाण वाढवितात व मलस्सारक आहेत. पित्तकर आहेत. शाकाहारामध्ये मांसासमान असल्याने महत्त्वाचे द्रव्य आहे. शुक्रधातूची वृद्धी करतात व शुक्रविरेचन हे कार्यही करतात.
अर्वाचीन दृष्टिकोनातून पाहता मूग, तूर व उडीद यात प्रथिनांचे व कॅलरीजचे प्रमाण जवळजवळ सारखेच आहे. पण आयुर्वेदीय दृष्टिकोनातून मूग हे सर्वश्रेष्ठ आहेत.

७) सोयाबीन –
प्रथिनांचे भरपूर प्रमाण असणारी ही उत्तम डाळ आहे. या डाळीत हृदय कार्यक्षम ठेवणारा पोटॅशियम आणि मज्जावहस्रोतसाला आवश्यक असा लेसिथीन हे घटक आहेत. रात्री पाण्यात भिजत ठेवून दुसर्‍या दिवशी वाळवून मग भाजून पीठ करून वापरल्यास अधिक चांगली. आयुर्वेदिय दृष्टिकोनातून ही डाळ मधुर, अम्लविपाकी आणि वीर्यात्मक असून पित्तकर आहे. त्यामुळे पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी याचा वापर कमी करावा.

८) हरभरा –
पचनास जड असून कषाय रस, कटू विपाक व किंचित उष्ण आहे. वात-पित्तकर आहे. ज्या व्यक्तीचा अग्नी मंद आहे, तसेच ज्यांना वारंवार अजीर्ण, अम्लपित्त, प्रवाहिका होतात त्यांनी या डाळीचे अजिबात सेवन करू नये.
तूप आणि गूळ याबरोबर सेवन केल्यास लवकर पचते. म्हणून पुरणपोळी तुपासह खाणे चांगले. कफघ्न म्हणून वसंत ऋतूत हरभर्‍याचा विशेष वापर करता येतो.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

सर्वथा अनुचित

पालिका प्रभाग आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयापुढे झालेल्या सुनावणीत राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांचा मनमानी कारभार उघडा पडला आहे. पालिका आरक्षणासंदर्भात ज्या...

६० वर्षांवरील व्यक्तींना मार्चपासून कोविड लस

>> केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती, ४५ वर्षांवरील व्यक्तींनाही गरजेनुसार लस देणार देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने...

नगरपालिका आरक्षण निवाडा राखीव

>> मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणी पूर्ण गोवा नगरपालिका निवडणुकांसाठी गोवा सरकारने अधिसूचित केलेले प्रभाग आरक्षण व प्रभागांची...

गोमंतकीय दुसर्‍या लाटेचाही सामना करतील ः डॉ. बांदेकर

राज्यातील आरोग्य सेवकांना कोविडची लस देण्यात आलेली असल्याने आता राज्यात कोविडची दुसरी लाट आली तरी गोवा त्या लाटेचा चांगल्या प्रकारे सामना करू...

श्रीपाद नाईक यांना गोमेकॉतून डिस्चार्ज

मागील एक महिना आणि तेरा दिवस गोमेकॉत उपचार घेणारे उत्तर गोव्याचे खासदार व केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र कार्यभार) व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद...

ALSO IN THIS SECTION

त्रिफळा ः महा, अमृततुल्य औषध

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज, पणजी) त्रिफळा हे फक्त बद्धकोष्ठतेचे औषध नसून त्याचा उपयोग अगदी केसांपासून ते पायांपर्यंत होतो,...

॥ बायोस्कोप ॥ ऑन् लाइन्… ऑफ् लाइन् …

प्रा. रमेश सप्रे शिक्षकांनी विचार करायला हरकत नाही, ‘आपण विद्यार्थ्यांसाठी फक्त एक रेघ आहोत, रेषा? जस्ट् अ लाईन?...

बहुपयोगी बिमला

अवनी करंगळकर ‘बिमला’ ही वनस्पती बहुवर्गीय वनस्पती, सर्वांच्या परिचयाची असून परसबागेत मोठ्या डौलाने वाढते. परंतु तिला मानाची पसंती दिली...

प्रतीक दर्शन

योगसाधना - ४९४अंतरंग योग - ७९ डॉ. सीताकांत घाणेकर प्रतीक ही मौनाची भाषा आहे. शांतीचे...

आरोग्याचा मंत्र ः उपवास

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज, पणजी) उपवास सोडताना किंवा सोडल्यानंतर एकदम विपरीत अन्न व जडान्न कधीही खाऊ नये. नाहीतर...