शिंदेंसह १२ आमदारांचे सदस्यत्व रद्द करा

0
13

>> शिवसेनेची विधानसभा उपाध्यक्षांकडे याचिका सादर

महाराष्ट्रातील सत्ता नाट्याचा आणखी एक अंक सुरू झाला असून, शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे १२ आमदारांचे सदस्यत्त्व रद्द करण्यासाठी याचिका सादर केली आहे. शिवसेनेच्या या खेळीला आता एकनाथ शिंदे गटाकडून काय उत्तर दिले जाते हे पाहावे लागणार आहे.

महाराष्ट्रात विधानपरिषदेचा निकाल जाहीर झाला आणि राज्यातील नवे सत्ता नाट्य सुरू झाले. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थकांसह सूरतमधील हॉटेलमध्ये गेले. त्यानंतर शिंदे यांच्यासह असलेल्या आमदारांना मध्यरात्री गुवाहाटीला पाठवण्यात आले. यादरम्यान गटनेता आणि प्रतोद कोण यावरुन वाद सुरू झाला. काल दुपारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेला प्रतोद नियुक्तीचा दावा फेटाळला. तसेच ज्या ३४ आमदारांच्या सह्यांचे पत्र सादर केले होते, त्यापैकी नितीन देशमुख यांच्या सहीबाबत साशंकता व्यक्त करून ते स्वीकारण्यास नकार दिला. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक सादर घालत बंडखोर आमदारांना समोरासमोर बसून चर्चेचे आवाहन केले होते; मात्र काल शिवसेनेने कडक भूमिका घेत १२ आमदारांची रद्द करण्याची याचिका सादर केली आहे.
या १२ आमदारांंमध्ये एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, लता सोनावणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, महेश शिंदे यांचा समावेश आहे.

१२ आमदारांचा मुद्दा चर्चेत
महाराष्ट्राच्या राजकारणात १२ आमदार हा मुद्दा चांगला चर्चेत राहिला आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची अद्याप नियुक्ती झालेली नाही. दुसरीकडे काही महिन्यांपूर्वी विधानसभेतील गोंधळामुळे भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. आता शिवसेनेने थेट १२ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची याचिका सादर केली आहे.

मोठ्या राष्ट्रीय पक्षांचा पाठिंबा : शिंदे
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा काल एक नवा व्हिडीओ समोर आला. यामध्ये ते एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा आपल्याला पाठिंबा असल्याचे सांगत आहेत. कुठेही काही लागले, तर कमी पडणार नाही, असा शब्द सदर पक्षाने आपल्याला दिला आहे. राष्ट्रीय पक्ष असल्याने बलवान आहे आणि आपल्याला मदतीचा शब्द त्यांनी शब्द दिला आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेनेने १२ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी याचिका सादर केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. १२ आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला घाबरवू शकत नाही. तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो. घटनेच्या १०व्या परिशिष्टाप्रमाणे व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे असंख्य निकाल आहेत, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

शरद पवार, अजित पवारांची परस्परविरोधी मते
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाच्यामागे भाजपचा हात असल्याचे मत काल शरद पवार यांनी व्यक्त केले. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांसाठी सर्व सुविधा पुरवण्यामागे भाजपाचा हात आहे, असे ते म्हणाले. तर दुसर्‍या बाजूला उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी या बंडामागे भाजपाचा हात असल्याचे वाट नाही, असे काल त्यापूर्वी केले होते. मात्र लगेचच शरद पवारांनी हा मुद्दा खोडून काढला.