काल कला अकादमीच्या कृष्णकक्षात गीत शकुन, कला अकादमी आणि कला व संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पद्मविभूषण गंगुबाई हंगल स्मृती स्वरांजली संगीत संमेलनात गोव्यात ‘शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार’ या विषयावर व्याख्यान देताना श्री. वाघ बोलत होते. यावेळी कला आणि संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मीट कलाकार डॉट कॉमच्या ऋचा व राजश्री राजाध्यक्ष उपस्थित होत्या त्यांनी आपल्या संकेतस्थळाचे सादरीकरण करून माहिती दिली.
भारतीय शास्त्रीय संगीत हे पूर्वीपासून अस्तित्वात आहे. पूर्वी नादप्रधान गायकी होती. तिचे हळूहळू स्वरप्रधान गायकीत रूपांतर झाले. संगीताची विविध घराणी आली, त्यांची वैशिष्टपूर्ण शैली आली असे सांगून श्री. वाघ म्हणाले, हार्मोनियमसारखे विदेशी वाद्य भारतीय संगीतात मिसळून गेले. इतरांच्या चांगल्या गोष्टी भारतीय संगीताने स्वीकारल्या. आज शास्त्रीय संगीत संमेलनाला येणार्या श्रोत्यात बहुतेक पन्नाशी पुढचेच श्रोते असतात याकडे त्यांनी लक्ष वेधून लहानपणापासूनच मुलांची अभिरूची घडविण्याची गरज त्यांनी प्रतिपादिली.
श्री. वाघ यांनी सांगितले, की भारतीय संगीताची गोडी मुलांना लागण्यासाठी प्रचलीत गीते कोणत्या रागात आहेत ती राग शिकवतांना शिकवायला हवीत. चित्रपट संगीतामुळेच संगीत सर्वांपर्यंत पोचले आहे. शास्त्रीय संगीतातील कर्मठपणा दूर व्हायला मदत झाली आहे. भास्करबुवा बखले, रामकृष्णबुवा वझे या गायनाचार्यांनी दरबारातील संगीत सामान्यापर्यंत पोहचवण्याचे कार्य केले आहे.
गोव्यात अनेक संगीत संमेलने होतात. ती दर्जेदार व्हायला हवीत असे मत व्यक्त करून श्री. वाघ यांनी ‘स्वरांजली’ संमेलन पुढच्यावर्षी कला अकादमीच्या मा. दीनानाथ कला मंदिरात घेतले जाईल व त्याचा अर्धाभार अकादमी उचलेल असे जाहीर केले.
दयानंद मांद्रेकर यांनी सांगितले, की कलाकाराला वयाची मर्यादा नसते. जस जसे कलाकाराचे वय वाढते तस तसा तो अधिक प्रगल्भ होतो. आजची पिढी पाश्चात्य संगीताकडे वळत आहे त्यांना आपल्या परंपरेकडे वळवायला हवे. शास्त्रीय संगीताची थोर परंपरा जपून ठेवायला हवी, असे ते म्हणाले.
सकाळच्या सत्राला श्रीमती सुलभा निरलगी यांच्या गायनाने प्रारंभ झाला. त्यांनी तोडी राग रसिल्या शैलीत आळविला. त्यांना प्रसाद गावस (संवादिनी) व दयानंद कांदोळकर (तबला) यांनी साथ दिली. त्यानंतर नामवंत गायक उ. अर्शद अली खान यांचे प्रभावी गायन झाले. त्यांनी शुद्धसारंग राग शैलीदारपणे गाऊन रसिकांना स्वरानंद दिला. त्यांना प्रसिद्ध वादक पं. तुळशीदास नावेलकर (तबला) व राया कोरगावकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली. सायंकाळच्या सत्रात प्रथम गोमंतकीय उदयोन्मुख गायक विक्रांत नाईक यांचे गायन झाले. त्यांनी मुलतानी राग नीटसपणे पेश केला. त्यांना प्रसाद गावस (संवादिनी) व अमर मोपकर (तबला) यांनी साथ दिली. त्यानंतर पुणे येथील श्रीमती स्वप्ना दातार यांचे सुरेख व्हायोलीनवादन झाले. त्यांना युवा पिढीतील प्रसिद्ध वादक चारूदत्त फडके यांनी पूरक अशी तबला साथ दिली. शेवटच्या सत्रात मुंबईस्थित आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गोमंतकीय वादक रवींद्र च्यारी यांच्या रंगतदार सतारवादनाने रंग भरला. आलाप, जोड, झाला व गत या क्रमाने त्यांनी स्ट्रोकचा प्रभावी वापर करून व आलाप, मींड, झमझमा याचा कल्पक आविष्कार घडवून वाजविलेला जोगकंस राग रसिकांची उत्स्फूर्त दाद घेऊन गेला. त्यांच्या वादनात लयकारीचाही प्रभावी आविष्कार होता. त्यांना ओजस आधिया या तरुण वादकाने तयारीने साथ देवून वादन खुलविले. राजस्थान येथील पं. राजेंद्र वैष्णव यांच्या रंगतदार गायनाने संमेलनाची सांगता झाली. त्यांना पं. तुळशीदास नावेलकर (तबला) व राया कोरगावकर (संवादिनी) यांनी पोषक साथ दिली. गोविंद भगत सूत्रसंचालन केले. ‘गीत शकून’च्या शकुंतला भरणे यांनी ऋणनिर्देश केला.