24.8 C
Panjim
Thursday, January 21, 2021

शाळा सुरू करताना…

  • विलास सतरकर
    (मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी)

गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर ते आवश्यकच बनले आहे. परंतु प्रत्यक्ष शाळा-वर्गांची गरज बघता ते सुरू होण्यासाठी आणि अखंडितपणे चालू राहण्यासाठी सामाजातील सर्व लोकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कुठल्याही राजकीय जाहिरातबाजीला बळी न पडता ही सर्व मुले आपली आहेत, आणि ती समाजाची जबाबदारी आहे या भूमिकेतून या निर्णयाकडे बघणे आवश्यक आहे.

गोवा सरकार आणि गोवा शिक्षण खात्याने गोव्यात इ. १० वी व १२ वीचे वर्ग आंशिक खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण क्षेत्राचा विचार करता हा एक महत्त्वाचा व सकारात्मक निर्णय आहे. या निर्णयाचे गोव्यातील बहुतांश शाळांनी स्वागत केले आहे.
२१ नोव्हेंबरपासून गोव्यातील सर्व विद्यालये (काही अपवाद वगळता) सुरू करण्यात आली आहेत. इ. १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना गटानुसार शाळेत बोलावण्यात आले आहे आणि १५ मार्चपासून बंद असलेल्या शाळा पुन्हा एकदा मुलांच्या आगमनाने खुलायला लागल्या आहेत. शहरातल्या शाळा असोत वा खेडेगावातल्या, सर्वांनी आपापल्या सोयीनुसार व उपलब्ध साधन-सुविधांनुसार, सर्व मार्गदर्शक तत्त्वे पाळत शाळा सुरू केलेल्या आहेत. ग्रामीण भागातील काही शाळांनी १० वीच्या सर्व मुलांना शाळेत बोलावून, त्यांना वेगवेगळ्या वर्गात बसवून वर्ग सुरू केले आहेत.

देशातील एक प्रथितयश व्यावसायिक ‘इन्फोसिस’चे संस्थापक श्री. नारायण मूर्ती हे ३० एप्रिलला एका वेबिनारमध्ये आपले मत मांडताना म्हणाले होते की, ‘भारत देशाला जास्त काळ लॉकडाऊनमध्ये राहायला परवडणार नाही. आम्हाला या पार्सलसोबत राहायची सवय करावी लागेल, अन्यथा लोक भुकेने मरतील.’ आताही त्यांनी शाळा-महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सुरक्षेची सर्व काळजी घेऊन शाळा सुरू कराव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या सप्टेंबर ३० ला जाहीर झालेल्या अनलॉक चारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार त्यांनी राज्य सरकारला दिला होता. शिक्षणक्षेत्रातील सर्वांशी चर्चा तथा विचारविनिमय करून यावर निर्णय घ्यावा अशी सूचना केली होती. देशातील काही राज्यांनी ऑक्टोबर महिन्यापासून इ. ९ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू केले आहेत आणि त्यासंबंधी संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. गोव्यात शिक्षण खात्याने फक्त इ. १० वी आणि इ. १२ वीचे वर्ग दि. २१ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे गोव्यातील विद्यालये, विद्यार्थी आणि पालकांनी स्वागत केले आहे. प्रत्यक्ष वर्ग सुरू होऊन आता एक आठवडा उलटला आहे. प्रतिसादही फार चांगला मिळाला आहे.
गोव्यातील काही शाळांनी केंद्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार गेल्या महिन्यातच शाळा सुरू केल्या होत्या. शाळा सुरू करण्याच्या निर्णयाच्या समर्थनार्थ आणि विरोधात अशा संमिश्र प्रतिक्रिया लोकांकडून येत आहेत. समाजातील काही घटकांचे असे मत आहे की, शिक्षणापेक्षा जीवन महत्त्वाचे, त्यामुळे एवढ्यात शाळा सुरू करू नयेत. तर काही पालकांचे असे मत आहे की, ही कोविडची परिस्थिती कधी सुधारणार सांगता येत नाही आणि मुले आणखी किती दिवस घरी बसून राहणार… आपल्याला कधीतरी शाळा सुरू कराव्याच लागणार! परंतु इ. १० वी व १२ वीच्या बहुसंख्य पालकांच्या मते योग्य ती काळजी घेऊन शाळा सुरू कराव्यात. त्यांचा सरकारच्या निर्णयाच्या बाजूने कल दिसला आणि तसा प्रतिसादही त्यांनी दिला.
शाळा अंशता जरी सुरू झाल्या असल्या तरी शाळांसाठी शाळा सुरू करण्यापूर्वी पाळावयाची मार्गदर्शक तत्त्वे व त्यांचे नियोजन तथा अंमलबजावणीसंदर्भात विस्तृत माहिती शिक्षण खात्याच्या परिपत्रकात दिली आहे. शाळेतील वर्ग व इतर खोल्यांचे निर्जंतुकीकरण, शाळा परिसराची स्वच्छता व निर्जंतुकीकरण, शाळेत लावायचे विविध फलक, सामाजिक अंतर पाळण्याबाबतचेे मार्गदर्शन, स्वच्छतागृहांची सफाई व वापर, शाळेत येता-जाता पाळावयाच्या सूचना अशा विविध मार्गदर्शक तत्त्वांची विस्तृत माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी!
शाळा बर्‍याच दिवसांनी सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना आपल्या मित्रमंडळीना भेटण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे साहजिकच एकत्र येणे, गप्पागोष्टी करणे अशा गोष्टी होऊ शकतात. पण त्यावेळी मुलांनी सामाजिक अंतराचे भान ठेवणे, शाळेत असताना पूर्णवेळ मास्क वापरणे या सूचनांचे पालन करण्यासंदर्भात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नियमित आठवण करून द्यावी लागेल. वर्गात बसताना मुलांनी सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे, स्वच्छतागृहात जाताना गर्दी न करणे, सॅनिटायझर वापरणे, मधल्या सुट्टीतला खाऊ खाताना सामाजिक अंतराचे भान ठेवणे, अशी सर्व प्रकारची तत्त्वे मुलांनी पाळणे आणि त्यासाठी शिक्षकांनी आवश्यक ते मार्गदर्शन मुलांना करणे गरजेचे आहे. शाळेचे व वर्गांचे नियमित निर्जंतुकीकरण करणे, त्यासंबंधीचे वेळापत्रक तयार करणे, विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचार्‍यांना आवश्यक ते मार्गदर्शन करून कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेण्याबाबत सतर्क ठेवणे आवश्यक आहे.

छोट्या गटांत प्रत्यक्ष शिकवणी- तारेवरची कसरत
विद्यार्थी शाळेत गटागटांनी येणार, छोट्या-छोट्या गटाने वर्गात बसणार, त्यामुळे शिकवताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. बर्‍याच वेळा एकच विषय तीन ते चार वेळा शिकवावा लागणार आहे, त्यामुळे शिक्षकांची ओढाताण होऊ शकते. फक्त प्रत्यक्ष शिकवणीवरच थांबल्यास निर्धारित अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. यातून मार्ग काढण्यासाठी ऑनलाईन शिक्षणपद्धती चालूच ठेवून, ऑनलाईन शिकवलेल्या विषयांची वर्गात प्रत्यक्ष पुनरावृत्ती करणे, छोट्या-छोट्या चांचण्या घेणे, मुलांच्या अभ्यासातील/विषयांच्या अडचणी सोडवणे, विज्ञानाचे प्रयोग (प्रॅक्टिकल) करून घेणे असे उपक्रम करणे सोयीचे होऊ शकते. ऑनलाईन आणि प्रत्यक्ष शिकवणी असा दोहोंचा मेळ बसवल्यास ते जास्त उपयुक्त होऊ शकते.

शाळांना आर्थिक अनुदानाची गरज
गोव्यातील बहुसंख्य विद्यालये ही अनुदानित असून सरकारतर्फे शाळा व्यवस्थापनाला अनुदान मिळत असते. हे अनुदान सप्टेंबर आणि जानेवारी अशा दोन टप्प्यांत दिले जाते. गेल्या मार्चमध्ये लॉकडाऊन झाल्यामुळे गत आर्थिक वर्षातील अनुदानाचा दुसरा भाग शाळांना देण्यात आला नव्हता, तसेच या वर्षीच्या सप्टेंबर महिन्याचेही अनुदान मिळाले नसल्याने आता शाळा सुरू करताना हे प्रलंबित असलेले अनुदान शाळांना मिळाले तर कोविडसंदर्भातील सर्व मार्गदर्शक तत्त्वे पाळताना लागणारा खर्च करायला विद्यालयांना खूप सोयीचे ठरले असते. नियमित सॅनिटायझेशन, हँडवॉश, सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशन, फवारणीसाठी लागणारी उपकरणे असे विविध खर्च हे नियमित स्वरुपाचे असून त्याचा आर्थिक भाग खूप मोठा असणार आहे.

पालक-शिक्षक संघाचे सहकार्य आवश्यक
या सर्व प्रक्रियेत पालक-शिक्षक संघ खूप महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. सरकारी अनुदान कधीही येवो, शाळेचे निर्जंतुकीकरण किंवा इतर साहित्य लागेल त्यासाठी पालक-शिक्षक संघाने पुढाकार घेऊन आवश्यक त्या सर्व गोष्टी शाळांना मिळवून देण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे.
कोविडबाबत सर्व मार्गदर्शक तत्त्वे पाळण्यासाठी व विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी पालक-शिक्षक संघाच्या सहकार्याने टास्क फोर्स समिती व आपत्कालीन व्यवस्थापन समिती निर्माण करणे आवश्यक आहे. पालकांच्या सहकार्यातूनच शाळा सुरळीत चालू राहू शकतात, त्यामुळे यात पालकांची भूमिका विशेष महत्त्वाची आहे. गोव्यात मे महिन्यात झालेल्या इ. १० वीच्या परीक्षाकाळात पालकांनी खूप महत्त्वाची व जबाबदारीची भूमिका घेतली होती, तशाच प्रकारे आताही घेणे आवश्यक आहे.

मुलांची सुरक्षितता एक आव्हान!
जगभर आणि आपल्या देशाच्याही विविध भागांत कोविडची दुसरी-तिसरी लाट येत आहे. असे असताना गोव्यात पर्यटक येऊन कुठलीही मार्गदर्शक तत्त्वे न पाळता फिरत आहेत. तसेच आगामी दिवसांत थंडीचा काळ सुरू होणार आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर कोविडच्या भविष्यकाळातील चढ-उताराबाबत कोणीही ठाम अंदाज व्यक्त करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
विद्यार्थी शाळेत आल्यावर त्यांची सुरक्षितता हे एक फार मोठे आव्हान आहे. विद्यार्थ्यांना कोविडची लागण झाल्यास ती फार वेगाने पसरू शकते. ती कुटुंबापर्यंतही पोचू शकते. त्यामुळे मुलांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांची काळजी घेणे ही जबाबदारी सर्व समाजाची आहे.

एकमेकांवर दोषारोप करत न बसता मुलांच्या भवितव्याचा विचार करून सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. मुले ही देवाघरची फुले असे म्हटले जाते आणि या सर्व मुलांना जपणे, त्यांची काळजी घेणे ही शाळा व्यवस्थापनाबरोबरच शिक्षक, पालक आणि समाजाची एकत्रित जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः जबाबदारीने वागणे हेही महत्त्वाचे आहे.
गोव्यातील बहुतेक प्रसारमाध्यमांनी यासंबंधी योग्य ती प्रसिद्धी दिली आहे. शाळा सुरू होण्यापासून शाळेत घेण्यात आलेली काळजी, शाळा निर्जंतुकीकरणाचे व स्वच्छतेचे फोटो व माहिती आपल्या दैनिकांमध्ये प्रसिद्ध करून समाजापर्यंत हा विषय पोचवण्याचे काम फार चांगल्या पद्धतीने केले आहे. पहिल्या दिवशी ४० ते ५० टक्के मुलांना घेऊन वर्ग सुरू करण्यात आले होते; परंतु दिवसागणिक त्यात मुलांची वाढ दिसून येऊ लागली आहे. मुले शाळेत आनंदाने येत आहेत. बर्‍याच दिवसांनी आपल्या मित्रमंडळीना व शिक्षकांना भेटायला मिळणार असल्याचा आनंद मुलांच्या चेहर्‍यावर दिसत आहे, ही एक जमेची बाजू आहे. शाळेतील शिक्षकवर्गही मुलांना प्रत्यक्ष भेटायला, त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधायला मिळाल्याने खूश झाला आहे. शाळापरिसराला पुन्हा एकदा नवचैतन्य प्राप्त झाले आहे.

आव्हानाला सामूहिकरीत्या सामोरे जाऊ!
सरकारच्या शाळा सुरू करण्याच्या या निर्णयाने मुलांचे शिक्षण प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे. बर्‍याच काळापासून शाळा बंद असल्याने त्याचे दूरगामी दुष्परिणाम होऊ शकतात. विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता कमी होऊ शकते, मुले मोबाईल, इंटरनेटच्या आहारी जाऊ शकतात, बरेच दिवस विद्यार्थ्यांची एकमेकांशी भेट न झाल्याने त्याचा सामाजिक दुष्परिणामही होऊ शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर ते आवश्यक बनले आहे. परंतु शारीरिक शिक्षणासाठी ऑनलाईन शिक्षणपद्धती प्रभावी ठरू शकत नाही, आणि म्हणूनच प्रत्यक्ष शारीरिक वर्ग सुरू करणे काळाची गरज आहे. प्रत्यक्ष वर्गाची गरज बघता ती सुरू होण्यासाठी आणि अखंडितपणे चालू राहण्यासाठी सामाजातील सर्व लोकांनी या ज्ञानयज्ञाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कुठल्याही राजकीय जाहिरातबाजीला बळी न पडता ही सर्व मुले आपली आहेत, आणि ती समाजाची जबाबदारी आहे या भूमिकेतून या निर्णयाकडे बघणे आवश्यक आहे.

शाळेत आल्यानंतर मुलांना कोविडची बाधा होणार नाही, सर्व मुले सुरक्षित राहणार यासाठी सर्वांनीच जबाबदारी घ्यावी लागेल. या निर्णयामुळे मुलांचा आत्मविश्‍वास वाढणार आहे, परत एकदा सर्व गोष्टी सुरळीत होणार आहेत असा आत्मविश्‍वास मुलांमध्ये निर्माण होणार आहे. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी होणे काळाची गरज आहे.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

ध्यासपंथी

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती…वाळवंटातुनी सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती --बा. भ. बोरकर जीवनभर एखादा ध्यास घेऊन वावरणार्‍या व्यक्ती...

ऐतिहासिक मालिका विजय

कसोटी क्रिकेटमधील वैयक्तिक नीचांकी धावसंख्या ते ऐतिहासिक मालिका विजय असे परस्परविरोधी क्षण टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अनुभवायला मिळाले. राखेतून फिनिक्स पक्षी ज्याप्रमाणे...

तीन-चार दिवसांत मिळेल डिस्चार्ज

>> श्रीपाद नाईक यांनी दिली माहिती देवाची कृपा आणि सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. येत्या चार-पाच दिवसात...

केंद्रीय सचिवालय उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन ः मुख्यमंत्री

केंद्र सरकारची राज्यातील सर्व कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी केंद्रीय सचिवालय उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल...

स्वातंत्र्यसैनिक व ‘मार्ग’चे प्रणेते गुरुनाथ केळेकर यांचे निधन

ज्येष्ठ गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक, कोकणी चळवळीतील एक नेते व ‘मार्ग’ ह्या रस्ता सुरक्षाविषयक चळवळीचे संस्थापक श्री. गुरुनाथ केळेकर (९१) यांचे काल पहाटे ३.३०...

ALSO IN THIS SECTION

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आक्षेप, समर्थन आणि सुधारणा

कालिदास बा. मराठे २९ जुलै २०२० रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने शैक्षणिक धोरणाला संमती दिली. ३० जुलै २०२० रोजी हे...

कर नियोजनासाठी तीन टप्पे

शशांक मो. गुळगुळे कर-नियोजन वेळेवर करावे. शेवटच्या काळापर्यंत ते पुढे ढकलू नये. कंपनीच्या व्यवस्थापकांनी प्राप्तिकरात सवलत मिळण्यासाठी केलेल्या...

राममंदिर ते राष्ट्रमंदिर

दत्ता भि. नाईकलोगो- इतिहासाच्या पाऊलखुणा श्रीराम मंदिराच्या परिसरात शिक्षण, आरोग्य इत्यादींसाठी आधुनिक पद्धतीच्या व्यवस्था प्रस्थापित करण्यात आल्या आहेत....

टीम इंडियाची जिगरबाज झुंज

सुधाकर रामचंद्र नाईक गेल्या सोमवारी सीडनी मैदानावर भारतीय संघाने ४०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १३१ षटके धीरोदात्त झुंज...

आर्थिक २०२० ः सिंहावलोकन

शशांक मोहन गुळगुळे एक महिन्यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांना २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करावा लागणार. हा अर्थसंकल्प सादर...