शार्दुलचा सराव;बीसीसीआय नाराज

0
129

भारताचा मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूर याने लॉकडाऊन ४.० मध्ये थोडीशी सूट मिळाल्यानंतर मैदानावर जात गोलंदाजीचा सराव केला खरा परंतु, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ याच कारणास्तव त्याच्यावर नाराज झाले आहे. परवानगी न घेता शार्दुलने शनिवारी पालघर डहाणू तालुका जिल्हा क्रीडा संघटनेच्या मैदानावर सराव केला.

भारतात सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. चौथ्या टप्प्यातील या लॉकडाऊनमध्ये आवश्यक परवानग्या घेतल्यानंतर आणि कठोर मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून क्रीडा संकुल आणि मैदानावर वैयक्तिक प्रशिक्षण घेण्यासाठी खेळाडूंना परवानगी देण्यात आली आहे.

शार्दुल ठाकूरच्या सरावाबद्दल बोलताना बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले, ‘तो बीसीसीआयशी करारबद्ध आहे, त्यामुळे त्याला याची परवानगी नाही. तो स्वत:च्याच मनाने सरावासाठी गेला, हे निराशाजनक आहे. त्याने असे करायला नको होते, हे योग्य पाऊल नाही.’ मुंबईत ( रेड झोन) असलेल्या रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर असे काही खेळाडू आहेत. पण त्यांनाही अजून मैदानात जाऊन सराव करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. शार्दुलने रेड झोन नसलेल्या पालघर जिल्ह्यात सराव केला होता. त्यामुळे बीसीसीआयला आक्षेप घेण्याचे कारण नव्हते. पण, बीसीसीआयने मात्र खेळाडूंच्या सुरक्षेचे कारण पुढे करत शार्दुलला झापले आहे.