– नीलिमा आंगले, (माजी ग्रंथपाल, श्री सरस्वती मंदिर)
इ. स. १८९८ – ९९ काळातील घटना. पणजीतील प्रसिद्ध नागरिक श्रीमान विष्णू गिरिधर धेंपे यांच्या उदार आश्रयाने सर्वश्री डॉ. पुरुषोत्तम वामन शिरगावकर, शांबाराव सरदेसाई, शिवा फटु पै आंगले प्रभृती व त्यावेळच्या इतर समविचारी होतकरू तरुणांनी मिळून ‘गोवा हिंदू पुस्तकालय’ नावाचे छोटेसे पुस्तकालय धेंप्यांच्या घरातील वरच्या माडीवर सुरू केले. पाच सहा वर्षांनी म्हणजे १९०४ साली हे वाचनालय बंद पडून त्याजागेत गोवा हिंदू क्लबची स्थापना करण्यात आली. या क्लबने ‘गोवा हिंदू पुस्तकालय’ आपल्या ताब्यात घेऊन त्याचे पुनरुज्जीवन केले.
१९०८ साली हे वाचनालय देखील बंद पडून कालांतराने म्हणजे १९१३ साली ९ ऑक्टोबर रोजी श्री शके १८३५ आश्विन शु. दशमीच्या शुभमुहूर्तावर श्री सरस्वती मंदिर संस्थेचा उदय झाला. दि. ६ जानेवारी १९१६ रोजी तिला अधिकृत मान्यता मिळाली.
या संस्थेचे आद्य संस्थापक म्हणून नारायण शेणवी केंकरे आगशीकर, आचार्य रामचंद्र शंकर नायक, अनंत वासुदेव प्रभू मोये, शिवा फटू पैे आंगले, पांडुरंग केशव कामत म्हामाई इत्यादींचा उल्लेख करावा लागेल. संस्थेच्या प्रगतीस त्या काळच्या शहरवासीयांकडून बरेच आर्थिक साह्य लाभले. विष्णू गिरिधर शेणवी धेंपे, पुंडलीक अनंत केणी, बाबुली राया कामत घाणेकर हे संस्थेचे आश्रयदाते होते.
सुरुवातीचे दिवस
गोवा हिंदू पुस्तकालयाचा पुस्तकसंग्रह व शिल्लक असलेले रु. ४०० हे या ग्रंथालयाचे सुरुवातीचे भांडवल. या भांडवलावर संस्थेने आपला व्याप हळूहळू वाढवला. आरंभकाळात हे वाचनालय अनंत नागोजी नाईक यांच्या घराच्या माडीवर दहा वर्षे होते. या काळात विष्णू प्रभू कोलवाळकर व यशवंत प्रभू कोलवाळकर या पितापुत्रांनी ग्रंथपालाचे काम शिस्तबद्धरित्या पाहिले.
सन १९२३ साली हे वाचनालय कृष्णा पुरुषोत्तम शेणवी नेवरेकर यांच्या घराच्या माडीवर हलवले गेले. या काळात सुरुवातीला वाचनालयाची सदस्यसंख्या व वाचक संख्या मर्यादित होती. आर्थिक कमतरतेपोटी पुस्तके व कालिकांची खरेदीही अशक्य होती. त्यामुळे पुस्तक व नियतकालिकांची संख्या हातावर मोजण्याइतकी होती.
प्रशिक्षित माणसांचा अभाव असल्यामुळे ग्रंथालयीन कारभारात एकसूत्रीपणा नसायचा. पुस्तकांचे संग्रहण, वर्गीकरण, तालिकीकरण, पुस्तक देवघेव, पुस्तक मागवणे, पुस्तक मोजणी, पुस्तकांची रखवाली करणे ही कामे करण्यास एकटाच माणूस असायचा. ग्रंथपालाची उणीव असल्याने ग्रंथालयाचा काळजीवाहू ग्रंथपालाचे काम सांभाळायचा.
कार्यकारिणीची बैठक असल्यास चहापानाचा खर्च देखील आवाक्याबाहेरचा होता. हा खर्च संस्थेने वाचनालयाचे तत्कालीन व्यवस्थापक डॉ. बाळकृष्ण द. शे. साखरदांडे यांच्या पत्नी सौ. राधाबाई नि संस्थेचे निस्सीम हितचिंतक शिवा फटू पै आंगले यांच्या पत्नी सौ. जयवंतीबाई उभयता मिळून निभावीत.
संस्थेचा समारंभ महालक्ष्मीच्या देवळात साजरा होत असे. या समारंभासाठी टेबल खुर्च्या व तांब्या शिवा फटु पै आंगले यांच्या घरातून नेल्या जात. महालक्ष्मी देवळालगत राहणार्या कुटुंबीयांची मुले मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करून संस्थेचा वर्धापन दिन समारंभ साजरा करायचे. पडत्या काळात संस्थेची सुविहित देखभाल करणारी आणखी एक सेवाभावी व्यक्ती म्हणजे सोयरू पुंडलिक कामत म्हामाई. शिवाय संस्थेत येणार्या वाचक व सदस्यांस सहकार्य देणारे संस्थेचे तत्कालीन काळजीवाहू श्री. उमेश सुखटणकर यांच्या सव्वा दोन तपांच्या सौजन्यशील सेवेचा उल्लेख करणे अपरिहार्य आहे. ग्रंथालयातील पुस्तकांचे वर्गीकरण करतेवेळी पुस्तकसूची करण्यास तत्कालीन विद्यार्थी मधुकर दत्तात्रय वैद्य व आत्माराम शिवा पै आंगले यांची अमूल्य सेवा अविस्मरणीय आहे.
पणजीवासीयांना बौद्धिक पर्वणी
आर्थिक असमर्थतेपायी त्या काळात कसलाही कार्यक्रम करणे शक्य नव्हते. क्वचितच एखादा वक्ता आल्यास त्याची राहण्याची व भोजनव्यवस्था शिवा फटू पै आंगले यांच्या घरीकेली जाई. या वक्त्याचे आगमन म्हणजे पणजीवासीयांस बौद्धिक पर्वणीच असायची. साहित्य सम्राट नरसिंह चिंतामणी केळकर, कोशकार गणेश रंगो भिडे, चिं. ग. कर्वे, य. रा. दाते,ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकर, कथाकादंबरीकार वि. स. खांडेकर, स्त्रीकथा लेखिका विभावरी शिरूरकर ऊर्फ बाळुताई खरे (मालती बेडेकर) ही त्यावेळी संस्थेत पायधूळ झाडलेली साहित्यिक मंडळी.
अनेकांनी या ग्रंथालयाचा उपयोग ज्ञानार्जनासाठी केला आहे. माजी आरोग्य संचालक डॉ. अनंत कामत वाघ, माजी नामदार शेख हसन, भूतपूर्व मंत्री एदुआर्द फालेरो ही त्यातील काही सुपरिचित नावे.
नेवरेकरांच्या घरातील वाचनालयाच्या उत्तरकालीन वास्तव्यात म्हणजे १९५७ मध्ये वाचकाच्या नात्याने माझा सदर ग्रंथालयात शिरकाव झाला. तेव्हापासून आतापर्यंत संस्थेशी असलेला संबंध कायम आहे. सत्तरीच्या कालखंडात माझ्या महाविद्यालयीन दशेत मी देखील या ग्रंथालयाचा पुरेपूर उपयोग करून घेतलेला आहे.
स्वत:ची इमारत
या ग्रंथालयासाठी स्वत:ची इमारत असावी असे प्रत्येक पणजीवासीयास वाटायचे. यासाठी तत्कालीन प्रख्यात उद्योजक व उत्पादक माननीय अनंत विश्वनाथ केणी यांनी जागा दिली. कालांतराने सन १९६९ श्री शके १८९१ मध्ये विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर संस्थेने स्वत:च्या वास्तूत प्रवेश केला. संस्थेच्या इमारत बांधकामाचे श्रेय पणजीतील नामवंत व्यापारी रामा बाबुली कामत घाणेकर यांना देणे उचित ठरेल. ग्रंथालयाच्या उजव्या बाजूच्या कक्षातील सरस्वतीची संगमरवरी मूर्ती श्रीमती अन्नपूर्णा बाई बाबुली कामत घाणेकर यांची निरंतर आठवण करून देते. तसेच वाचनालयाच्या इमारतीच्या चाळीस पायर्या संस्थेसाठी झटलेल्या सेवाभावी व्यक्तींच्या कर्तृत्वाची गाथा सांगतात.
वाचनालयाचे व्यवस्थापन
नव्या वास्तूत सदस्य व वाचकांच्या सोयीखातर वाचनालयात पुरुष, महिला व मुलांसाठी अलग अलग विभाग पाडले गेले. कमिटी रूम, ग्रंथपालासाठी स्वतंत्र खोली, अभ्यासिका अशा खास सोयी करण्यात आल्या. घटनेनुसार सभासदांचे वाली, उपकर्ते, साहाय्यक, आजीव व सामान्य अशा पाच गटात विभाजन करण्यात आले.
सुरुवातीचा काही काळ वाचनालय रविवारी खुले व सोमवारी बंद असायचे. यामागे डॉ. शिरगावकरांचे दोन उद्देश जाणवतात. रविवारी कुटुंबातील सर्वांना रजा असल्याने स्त्रियांनी या फुरसतीच्या वेळात वाचनालयात वाचण्यासाठी यावे हा पहिला उद्देश तर स्त्रियांच्या उपास तपासाचा धार्मिक दृष्टिकोन हा दुसरा उद्देश. १९८४ सालापर्यंत ग्रंथालयाचा रजेचा दिवस सोमवार होता.
ग्रंथसंग्रह
पारतंत्र्यकाळात भारतीय पत्रांपुस्तकांवर असलेल्या शासकीय नियंत्रणामुळे पुस्तके व कालिकांची संख्या खंडित राहिली. पुस्तके व नियतकालिके वार्षिक ५ हजार रु.च्या शासकीय अनुदानातून खरेदी केली जात. या कालावधीत तत्कालीन लोकसहायता संचालक श्री. अनंत कामत यांचे संस्थेस सक्रिय आर्थिक साह्य लाभले. याशिवाय कलकत्त्याच्या राजा राममोहन रॉय फाउंडेशनच्या पुस्तकरूपी अनुदानाचा लाभ झाल्यामुळे संस्थेच्या ग्रंथसंभारात भर पडली.
तज्ज्ञ ग्रंथपाल, शास्त्रशुद्ध ग्रंथरचना, वाचक संख्या, सभासद संख्या, ग्रंथसंख्या, वृत्तपत्र व कालिकांची संख्या ही संस्थेच्या उत्कर्षाच्या मार्गातील बलस्थाने १९८१ सालच्या विद्यमान कार्यकारिणीने अचूक हेरली. १९८०पर्यंत संस्थेस रूढ अर्थाने ग्रंथपाल नव्हता. सभासद संख्याही मोजकीच होती. सदस्यपटात तत्कालीन सभासदांचा आकडा २६६ असल्याचे दर्शवतो. यापूर्वी सभासद अर्ज मंजूर होण्यास अर्जदारास विशिष्ट अटी असत. यामुळे सदस्य संख्या खंडित होती. कार्यकारिणीने या अटी शिथिल केल्याने सदस्यांचे प्रमाण वाढले. वेतनवाढ धोरणाचा अवलंब केला. शास्त्रीय ग्रंथालय रचना पद्धती अमलात आणली. वर्गीकरण, व्यवस्थापन व संघटन या कामासाठी प्रशिक्षित ग्रंथपालाची नियुक्ती केली. संस्थेच्या आर्थिक स्थितीतही काही अंशी सुधारणा झाली.
अनेकविध उपक्रम
२ फेब्रुवारी १९८२ रोजी रीतसररित्या मी संस्थेच्या ग्रंथपालपदाचा ताबा घेतला. या काळात संग्रहण व तालिकीकरणाच्या कामासाठी खास सेवकवर्ग नेमण्यात आला. पुस्तकांच्या रखवालीसाठी रखवालदार नेमला गेला. यामुळे ग्रंथालय प्रशासनात सुसूत्रता आली नि संस्थेच्या प्रशासनात दुपटीने वाढ झाली. या काळात चोखंदळ दिवाळी अंक वाचकांसाठी प्रथम येणार्यास प्रथम सेवा नियमानुसार दिवाळी अंक योजना राबविली गेली. आजतागायत ती चालू आहे.
सन १९८२ ते २००२ पर्यंतच्या वीस वर्षांच्या माझ्या ग्रंथालयीन सेवाकालात १९८४–८७ कालीन कार्यकारिणी माझ्या सेवाकालामधील सर्व कार्यकारिणीमध्ये सर्वदृष्ट्या अग्रेसर ठरली. याआधीच्या कार्यकारिणींनी आर्थिक बाजू व ज्ञानार्जनावर लक्ष केंद्रित केले होते. मात्र १९८४–८७ कार्यकारिणीने सदस्यवाढ, वाचनसंस्कृती, ज्ञानवर्दन व संस्थेचा आर्थिक स्तर उंचावण्याकडे लक्ष पुरवले. त्याशिवाय सांस्कृतिक उपक्रमही हाती घेतले. नवोदित व होतकरू लेखक कवींच्या प्रोत्साहनार्थ कोकणी–मराठी भाषांतून कथा–काव्य लेखन स्पर्धांची सुरुवात केली. या स्पर्धा आजतागायत चालू असून त्यांना प्रतिवर्षी भरघोस प्रतिसाद मिळत आहे. यातून कैक दर्जेदार लेखक कवी तयार झाले आहेत.
वाचक हा ग्रंथालयाचा प्राण असल्याचे १९८८–९१कालीन कार्यकारिणीने ओळखून स्थलांतरित व्यक्ती आणि विद्यार्थ्यांसाठी सामान्य सदस्यांचा हंगामी सदस्य नावाने एक पोटविभागाची निर्मिती केली. यामुळे ग्रंथालयाचा आर्थिक स्तर बराच उंचावला. तेणेकरून अनुदान रकमेतही बरीच वाढ झाली.
या कालावधीत संस्थेच्या सभागृहात परिसंवाद, व्याख्यान, कथाकथन, कविसंमेलन प्रसंगानुरूप अभंग नाट्यगीत भावगीतासारखे बहारदार कार्यक्रम झाले. पुस्तक प्रकाशन समारंभ, राम गणेश गडकरी जन्मशताब्दी, अत्रे जयंती, गंधर्व जन्मशताब्दी, एस. आर. रंगनाथन जन्मशताब्दी, महिला दिन हे यापैकी काही उल्लेखनीय कार्यक्रम. सार्वजनिक आरोग्य विषयावर संस्थेने आयोजित केलेली डॉ. शांताराम शे. होडारकर व्याख्यानमाला हे संस्थेचे आगळे वैशिष्ट्य होय.
पत्रकार पु. रा. बेहरे, रा. भि. गोखले, वि. स. खांडेकर, स्वामीकार रणजीत देसाई, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक वि. वा. चिपळूणकर, विद्याधर पुंडलिक, वसंत सावंत, शांता शेळके, गिरिजा कीर, विद्या बाळ, अनिरुद्ध पुनर्वसू तसेच चंद्रकांत केणी, विजया सरमळकर, मनोहर सरदेसाई, मनोहर हि. सरदेसाई यांनी संस्थेस भेट दिली आहे.
ज्ञानार्थींना ज्ञानार्जनासाठी निवांतपणा मिळावा या उद्देशाने इ. स. २००२ साली संदर्भ कक्ष उभारला गेला आणि मला आतून काम आटोपते घेण्याचा आदेश देण्यात आला. शारीरिक कुरकुरही सुरू झाली होती. थकवाही जाणवत होता, यामुळे २ सप्टेंबर २००२ रोजी मी ग्रंथपालपदास रामराम ठोकला.
ग्रंथालयाचे बदलते स्वरूप
आज ग्रंथालयात प्रशिक्षित ग्रंथपाल, संगणक, झेरॉक्स मशीन सेवा आहे. इमारतीला लिफ्ट बसवल्यामुळे पायर्या चढायचाही त्रास नाही. कोश हा ग्रंथालयाचा सांस्कृतिक ठेवा. कोश म्हणजे ग्रंथालयाची सांस्कृतिक वैभवसंपदा. सध्या ग्रंथालयात कोकणी, मराठी व इंग्रजी भाषेचे मिळून ९० कोश आहेत. ग्रंथालयाची ग्रंथसंपदा ७५ हजारच्या आसपास असेल. दिवाळी अंकांची संख्याही दरवर्षी वाढत आहे. कालिके व वृत्तपत्रांचेही तसेच. राजधानीच्या या ग्रंथालयात वाचकांचा राबता पूर्ण होता तसा आजही आहे. या सार्याचे अवलोकन केल्यास आज ग्रंथालय प्रगतिपथावर वाटचाल करीत असल्याचे जाणवते.
सरस्वती म्हणजे शारदा. ही शारदा चौदा विद्या व चौसष्ट कलांची अधिदाती. सबब श्री सरस्वती मंदिर हे फक्त श्री सरस्वतीची आराधना करायचे स्थान नसून विद्याभूषित व कलामंडित साधकांचा सरस्वतीचा दरबार आहे. आणि आपण सारेजण या सरस्वतीच्या दरबारातील मानकरी आहोत. सरस्वती म्हणजे विद्या म्हणजे ज्ञान संपादन करणे. हा ज्ञानसागर अफाट आहे. शतक सोपान ओलांडताना श्री सरस्वती मंदिराची उत्तरोत्तर भरभराट होवो. विविध ज्ञानशाखांनी हा ज्ञानवृक्ष दिगंतात बहरो, आणि सार्वजनिक असलेल्या या ग्रंथालयाचे रूपांतर जिल्हा ग्रंथालयात होवो अशी शारदेच्या पदकमली प्रार्थना करते.