– सुमेधा कामत–देसाई
पावसाळ्याचे चार महिने आभाळ कृष्णकाळ्या ढगांनी भरून जाते. मुसळधार पाऊस कोसळत राहतो आणि सारे वातावरण कसे गार–ओले होऊन जाते. घरे–दारे, वनश्री भिजून चिंबओली होते. कधी पाऊस थांबला तरीदेखील आभाळ उदी ढगांनी व्याप्त. सारे वातावरण मग कुंद होऊन जाते. झाडे एकदासुद्धा पाने न हालवता चिडिचूप बसलेली असतात. दर्या कसला तरी विचार करीत गप्प बसलेला असतो. लाटासुद्धा आपली गुपिते किनार्याला सांगण्याचा नेहमीचा वेडा अट्टहास सोडून देतात आणि उदास, धीरगंभीर सागराला धीर द्यायला त्याच्या पोटाशी उगी उगी जाऊन बसतात. आणि एक दिवस… कुणाला काहीही न सांगता पावसकाळ गडप होतो. जाताना चारदोन सरी निरोपादाखल झडवून जातो तेवढाच! आणि दूरदेशी जाण्याच्या गडबडीत माझा तेवढा निरोप घ्यायला विसरून जातो. दोनतीन दिवस ओळीने छत्री पावसासाठी उघडावी लागली नाही आणि दुपारी कळतनकळत ऊन लागू लागले, तेव्हा वाटते चार महिन्यांतल्या आपल्या या मित्राने आता नक्कीच दडी मारली आहे.
अख्खा दिवस निघून जातो. संध्याकाळी आसमंत ढवळून काढणारा वारा सुटतो. मी खोलीत असले तर काही जाणवत नाही; पण जिना उतरून खाली आले आणि रस्त्यावर पाऊल टाकले तर वार्याच्या गार झुळका अंगाला स्पर्श करतात आणि चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात. नाक्यावर चक्कर टाकायच्या निमित्ताने मी भराभर पावले उचलते. विलक्षण प्रसन्न वाटते मनाला! वार्याच्या वाढत्या जोरदार झुळका, माडांचे हलणारे शेंडे आणि ओहोळातल्या पाण्यात प्रतिबिंबे पाहत बसलेली स्तब्ध झाडे. या रस्त्यावरून चालतानाच आपण सागराच्या कक्षेत असल्याची जाणीव होते. वार्याच्या झपाट्यासरशी मीही समुद्राच्या दिशेने ढकलली जाते. येथून समुद्र जेमतेम किलोमीटरभर अंतरावर असेल. दोनतीन वळणे मागे टाकून मी समुद्रावर येते. स्वच्छ रेतीने भरलेली पुळण आणि वरच्या निळ्या आभाळाचे प्रतिबिंब पडलेला लख्ख झळझळता निळा दर्या. लाटा आवेगाने किनार्याला धडकत राहतात आणि त्याच वेगाने परत जातात. डाव्या बाजूने काबो राजनिवास असलेले भूशिर आणि उजव्या बाजूला समुद्राच्या पोटात शिरलेला आग्वादचा किल्ला. दूरवर खुला दर्या. क्षितिजरेघेवर आभाळाला कवेत घेण्यासाठी धडपडणार्या चंदेरी लाटा. सूर्य मावळतीला आलेला. आभाळाचे अंतरंग उजळून गेलेले. उतरणार्या सूर्याचे तिरपे किरण मला भाजून काढणारे आणि समुद्राला पाठ करून सुरूच्या गर्द राईत स्वतःला हरवून बसलेली मी!
मला वर्षभरही समुद्रावर यायला खूप आवडते. आणि आता तर पावसाळादेखील संपला. शरद ऋतूचे साम्राज्य सुरू झाले की याच्याइतका सुरेख काळ अख्ख्या वर्षभर शोधून सापडायचा नाही. पाहता पाहता सूर्य समुद्राच्या उदरात विलीन झाला आणि आभाळ स्तब्ध झाले. मघाशी सूर्यास्ताच्या वेळी झालेली रंगांची उधळण पाहता पाहता विलयाला गेली आणि आभाळ परत एकदा समुद्राचा अथांग नीलिमा पिऊन उगा राहिले. या दिवसांतले आभाळाचे सौंदर्य अनोखे! पांढर्या पुळणीच्या साक्षीने, निळ्या दर्याच्या साथीने विशाल नीलवर्णी आभाळाचा पट उलगडत जातो आणि जन्मजन्मांतरीची गुपिते उलगडून सांगण्याचा प्रयत्न करू लागतो. या दिवसांत नीलवर्णाचे हे लावण्य अनुभवायला समुद्रावर जाऊन एकदा तरी बसायला हवे!
भाद्रपद शुद्ध चतुर्दशी होती त्या दिवशी. रात्री बाल्कनीत आले तेव्हा डाव्या बाजूच्या विशाल आभाळात एक विस्मितच दिसले. आभाळात ढगांचे एक झाड उभे राहिलेले. पानांचा डेरेदार विस्तार आणि खाली सरळसोट खोड. पानांच्या गोलट कडांच्या मागून झगमगणारे प्रकाशकिरण. ढगांचे हे असले रूप मी फारसे कधी पाहिल्याचे आठवत नाही. निळ्या आभाळात, कडा प्रकाशकिरणांनी रेखून टाकलेले हे ढगांचे झाड कितीतरी वेळ उभे होते. वारा पडला होता. वातावरण स्तब्ध. आणि दूरवर अज्ञाताच्या प्रदेशात रुजलेले प्रकाशाचे आणि सावलीचे झाड. मागे दूरवर चंद्र असावा आणि पुढचा भाग कृष्णमेघांनी आच्छादून गेल्याने त्याचे किरण अंधुकपणे प्रस्फुटित होणारे. त्यातून ही छायाप्रकाशाची अद्भुत किमया झालेली. कितीतरी वेळ ते झाड पाहत मी जुन्या हुरहुरत्या आठवणी जागवू लागले… पौर्णिमा उद्या होती हे मी चक्क विसरले. नंतर पौर्णिमेच्या दिवशीही मला माहीत नव्हते. रात्री नऊ वाजता बाल्कनीत आले तर आसमंत दिव्य तेजाने उजळून गेलेला. त्या चांदणमायेची मला भूल पडली. माझ्या सार्या संवेदना मला सोडून गेल्या. भारल्यासारखी मी बाल्कनीच्या कठड्याला टेकून उभी राहिले आणि निसर्गाच्या अद्भुत लावण्याचा तो आविष्कार अनुभवू लागले. शारदातले लख्ख झळझळते निळे आभाळ. निळ्या आभाळात अतिदूरच्या प्रदेशात उभा असलेला तो नक्षत्रसखा चंद्र. पृथ्वीतलावर सांडलेली त्याची शीतल किरणे आणि आसमंत उजळवणारी ती दिव्य प्रभा. चंद्रकिरणे हळुवार आवाजात वीणेच्या तारा छेडत होती. आणि वातावरणात ग्रहतार्यांच्या भ्रमणाच्या संगीताने अद्भुत सूर उमटू लागले. दूरवर कृष्णमेघ. चंद्राच्या डाव्या बाजूला एक विशाल खंड तर दुसर्या बाजूला एक खंड. डाव्या बाजूच्या खंडातून वेगाने, अतिवेगाने दूर जाणारा आणि उजव्या बाजूच्या खंडात झपाट्याने तोंड लपवणारा चंद्र. आभाळभर अतिवेगाने धावून धावून त्याचे पाय गळून गेले असावेत आणि त्याचा आकार गोलाकार झालेला असावा. दोनचार क्षण तसेच गेले. श्वास रोखून मी पाहत होते. मला वाटले चंद्र त्या कृष्णविवरात कायमचा हरवून जातो की काय? पण नाही. कृष्णविवर मागे राहिले आणि परत एकदा चंद्र आभाळाच्या प्रांगणात दौडू लागला. हसरी चंद्रकिरणे आकाशदेवतेच्या मुद्रेवर विलसू लागली. आभाळभर संगीताचे सूर घुमले आणि झाडे विस्मयचकित होऊन ते सारे जादूचे जग विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत होती. मी श्वास रोखून ते सारे पाहतच होते. मला झांजर आल्यासारखी वाटले. जड पावलांनी आणि मिटल्या डोळ्यांनी मी तेथून कधी उठले आणि अंथरुणावर जाऊन पडले ते माझे मलाच कळले नाही.
कालची रात्र शरदातल्या पहिल्या पुनवेची रात्र. पुनवेचे सारे सौंदर्य शरदातल्या त्या पहिल्या पुनवेत एकवटले होते. या देखण्या शरदाचे आणि या ऋतूतल्या विलोभनीय पौर्णिमांचे सौंदर्य सार्या कवींना मोहवीत आले आहे. कालिदास या पौर्णिमेच्या लावण्यावर लुब्ध आहे. ‘मेघदूता’त उत्तरमेघात यक्ष आपल्या प्रियेला धीर देताना ‘आपले मनोरथ शरद ऋतूतील स्वच्छ चांदण्यारात्री पूर्ण करू’ असे आश्वासन देतो.
चातुर्मासात झोपलेले देव शरदातल्या चांदण्यारात्री जागे होतात. झोपेतून उठून आनंदोत्सव करू लागतात. देवांच्या या आनंदोत्सवात माणसाने तरी का मागे राहावे? या पुनवेच्या रात्रीचे लावण्य मर्त्य मानवाने तरी का अनुभवू नये? रूप, रंग, गंधाचे प्रेमी असलेल्या आपल्या पूर्वजांनी कोजागिरी पौर्णिमेची कल्पना आणली. पुनवेच्या या देखण्या रात्री आकाशलक्ष्मी धरित्रीवर उतरते आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारते, ‘को जागर्ति? को जागर्ति?’ (कोण जागे आहे? कोण जागे आहे?) आकाशलक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी पुनवेच्या या रात्री सगळ्यांनी जागे राहावे आणि आनंदोत्सव करावा अशी ही कल्पना आहे…
शरदातल्या चांदणरात्रीच्या लावण्याने ज्ञानियाचा राजासुद्धा तृप्त झाला आहे. ‘शारदियेचे चंद्रकळे’च्या उल्लेखाने त्याची साक्ष आपल्याला पटते आणि तनामनावर शरद ऋतूतल्या चांदणवेलीची मोहिनी पडू लागते. गतजन्मीच्या आठवणी याच काळात स्मरू लागतात…