{ चिनारच्या छायेत- १ }
– परेश वा. प्रभू
एअर इंडियाच्या गोवा – श्रीनगर थेट फ्लाईटने दुपारी दीडच्या सुमारास श्रीनगरच्या शेख उल आलम विमानतळावर उतरलो तेव्हा दोन गोष्टींनी स्वागत केले. पहिली गोष्ट अर्थातच हवेतील सुखद गारवा आणि दुसरी पुढच्या संभाव्य संकटांची चाहूल देत मनात उगाचच शंकेची पाल चुकचुकवणारी कडेकोट सशस्त्र सुरक्षा. खरे तर या गारव्याची चाहूल विमान जसजसे काश्मीर खोर्याकडे झेपावते, तेव्हाच लागते. खाली कापसासारख्या पांढर्या शुभ्र मऊसूत ढगांचे पुंजकेच्या पुंजके वेगाने मागे जाताना दिसतात. श्रीनगरला उतरण्याच्या थोडे आधी खाली थोडे निरखून पाहिले तर त्या मेघमालांच्या खालील हिमाच्छादित शिखरे आपल्याला या स्वर्गभूमीची पहिली सलामी देतात. पण निसर्गाने थंडावा बहाल केलेला असताना तेथील फुटीर शक्तींनी मात्र ही भूमी गेली कित्येक दशके तप्त ठेवली आहे.
काश्मीरमधील अस्वस्थतेची आणि अशांत परिस्थितीची चाहूल तिथल्या विमानतळापासूनच लागते. या विमानतळाचे नाव ‘शेख उल आलम आंतरराष्ट्रीय विमानतळ.’ तिकीट आरक्षण करतानाही संकेतस्थळावर तसा उल्लेख दिसतो, पण त्या नावाचा फलक विमानतळावर कोठेही दिसत नाही. ‘श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ अशा पाट्याच आपले स्वागत करतात. येथून हाज यात्रेला जाणार्यांसाठी जेद्दाहला विमान जाते म्हणून याला ‘आंतरराष्ट्रीय’ विमानतळ म्हणायचे एवढेच. नाही म्हणायला अलीकडेच त्याचे नूतनीकरण झाले आहे. त्यामुळे आपल्या नूतनीकरण झालेल्या दाबोळी विमानतळासारखेच त्याचे एकंदर रुपडे आहे.
शेख उल आलम हे काश्मीरचे महान अवलिया संत. हजरत शेख नसरुद्दिन वाली या नावेही त्यांना ओळखले जाते. चौदाव्या शतकात जन्मलेल्या या संताने आपल्या काव्यातून इस्लामचा खरा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. धर्माचे पाखंड माजवणार्या मुल्ला मौलवींना त्यांनी विरोध केला. परंतु त्यांनी गाठलेली आध्यात्मिक उंची हिंदू आणि मुस्लिमांमध्ये त्यांच्याप्रति श्रद्धा जागवून गेली. या आलमदार इ काश्मीरचे नाव या विमानतळाला देण्याचा ठराव काही वर्षांपूर्वी पीडीपी सरकारने केला होता. परंतु काश्मीर म्हटल्यावर ताकही फुंकून पिण्याच्या वृत्तीमुळेच हे औपचारिक नामकरण रखडले आहे.
देशातील सर्वाधिक सुरक्षा असलेला हा विमानतळ आहे. जाताना या अभेद्य सुरक्षेची नीट कल्पना येत नाही, पण परत येताना मात्र प्रत्यक्ष विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच सुरू होणार्या या अनेक स्तरीय सुरक्षा कड्याला भेदत आपल्याला यावे लागते. एकूण सुरक्षा तपासणी अठरा वेळा होते. सर्व तपासण्या पार पडल्यानंतर आपल्या बॅगा विमानात चढवल्या जातात, तेव्हा पुन्हा आपल्या बॅगांची ओळख पटवून द्यावी लागते एवढी कमालीची सुरक्षा व्यवस्था येथे आहे.
नंदनवन काश्मीर
काश्मीर हे भारताचे नंदनवन आहे, भूलोकीचा हा स्वर्ग आहे, अशी काव्यमय वर्णने लहानपणापासून वाचलेली असतात, आणि खरोखर ते तसे आहेही! पण गेल्या काही वर्षांतील तेथील अशांत परिस्थिती, स्थानिकांच्या लष्कराशी सतत झडणार्या चकमकी यामुळे तेथे पाऊल टाकताच मनात धाकधूक ही राहतेच. त्यामुळे सहकुटुंब सुटीत जाण्यासाठी काश्मीर योग्य आहे का, हा प्रश्न तेथे जाऊन आलेल्यास हमखास विचारला जातो. जाऊन आलेला तरी बिचारा काय सांगणार? क्षणात तेथील परिस्थिती पालटू शकते. कधी अचानक बंद पुकारला जाईल, दगडफेक सुरू होईल याचा काय नेम? त्यामुळे आपण काश्मीरमध्ये पाऊल ठेवतो ती मनात पुढे काय वाढून ठेवलेले आहे, त्याविषयी साशंकता ठेवूनच. पण काही वर्षांपूर्वीच्या तुलनेत अलीकडे परिस्थितीत बराच बदल घडून आला आहे. काश्मीरमध्ये आता पुन्हा पर्यटन बहरू लागले आहे. त्यातही महाराष्ट्रातील ‘केसरी’, ‘वीणा वर्ल्ड’चे शेकडो पर्यटक रोज काश्मीरमध्ये उतरत असतात. त्यामुळे आजूबाजूला सर्रास मराठी बोलणे ऐकू येते आणि दैवाच्या भरवशावर गेलेल्यांना दिलासा मिळून जातो.
पर्यटन हा काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. शेकडो शिकारावाले, हाऊसबोटवाले, घोडेवाले, दुकानदार, हॉटेलचालक यांची रोजीरोटी या पर्यटकांवर चालते. त्यामुळे फुटिरतावादाची झळ इतर भागांना जेवढी लागते, तेवढी पर्यटनस्थळांना सहसा लागत नाही. पर्यटनसंस्थाही आपल्या पर्यटकांना ठरावीक भागांतच हिंडण्या फिरण्याची परवानगी देतात. उगाच विषाची परीक्षा का घ्या, हा सुज्ञ विचार त्यामागे असतो. पर्यटकांवर यापूर्वी दहशतवादी हल्ले झालेही आहेत. श्रीनगर अर्थातच आज मुस्लीमबहुल शहर आहे, पण हिंदू, शीख कुटुंबेही काही वस्त्यांमध्ये आहेत. शहराच्या बारा लाख लोकवस्तीपैकी ९५ टक्के मुस्लीम, तर केवळ ४ टक्के हिंदू आहेत. काही प्रमाणात शीखही आहेत.
श्रीनगरच्या प्रसिद्ध लाल चौकाविषयी मनात कुतूहल होते. कॉलेजमध्ये असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काश्मीर बचाव अभियानाचे काम केले होते. त्या लाल चौकात तिरंगा फडकवणारे राष्ट्रीय आंदोलन विद्यार्थी परिषदेने तेव्हा केले होते. त्यासाठी महाविद्यालयांतून हजारो विद्यार्थ्यांनी स्वतःच्या रक्ताने सह्या केलेली निवेदने केंद्राला पाठविण्यात आली होती. या लाल चौकात फेरफटका मारताना एकही पर्यटक त्या भागात दिसला नाही. भिंतींवर ‘फ्री काश्मीर’ च्या घोषणा मात्र सर्रास होत्या. आमचे हॉटेल आणि लाल चौक या भागाला जोडणार्या पदपुलावर लष्कराने लावलेला एक फलक मात्र फार बोलका होता. ‘‘वुई आर प्राऊड टू ब्रीज द गॅप’’ असे समर्पक शब्द त्या पुलावर वाचायला मिळाले. झेलमवर असे अनेक कडाल किंवा पूल आहेत. त्यातल्या सुप्रसिद्ध ऐतिहासिक लाकडी झीरो ब्रीजची मात्र पाडापाड चाललेली पाहायला मिळाली.
श्रीनगरमध्ये जागोजागी वाळूच्या पोत्यांनी उभारलेल्या आणि काटेरी तारांनी वेढलेल्या बंकरमध्ये लष्करी जवान अहोरात्र सज्ज दिसतात. आपल्यावर त्यांची सतत नजर असते. त्यांच्या हत्यारबंद बुलेटप्रूफ गाड्या सतत नजरेस पडतात. त्यामुळे श्रीनगरमधील वास्तव्य थोडे अस्वस्थ करणारे ठरतेच. शहराच्या कॅन्टोनमेंट भागात तर लष्कराचा प्रचंड मोठा तळ आहे. पण शहरातील परिस्थिती काही वर्षांपूर्वी होती तेवढी आज वाईट नाही. पण हे पचनी पडायला तसे जडच जाते.
कश्यप ऋषींचे काश्मीर
काश्मीर कश्यप ऋषींनी वसवले असे मानले जाते. जम्मू काश्मीरची सध्याची उन्हाळी राजधानी असलेले श्रीनगरही प्राचीन नगर आहे. झेलमच्या काठावर वसलेले आणि दल लेकच्या सभोवताली पहुडलेले श्रीनगर खरोखर सुंदर शहर आहे. शंकराचार्य मंदिराच्या टेकडीवरून जेव्हा आपण या संपूर्ण शहराचे दर्शन घेतो, तेव्हा मन हरखून गेल्याविना राहात नाही. बहुतांशी लालचुटूक रंगाची मदार त्रिकोणी छपराची फार दाटीवाटीने नसलेली घरे, मध्ये पसरलेले अतिशय विस्तीर्ण आणि सुंदर असे दल सरोवर, त्यातले शेकडो शिकारे, हाऊसबोटी, कडेकडेने फुलवलेली कारंजी यांचे हे विहंगम दृश्य आपल्याला श्रीनगरच्या प्रेमात पाडल्यावाचून राहात नाही.
श्रीनगरला ‘व्हेनिस ऑफ द इस्ट’ म्हटले गेले आहे. खरोखरच येथील जलाशय डोळ्यांचे पारणे फेडतात. केरळमध्ये जसे पावलोपावली भेटणारे बॅकवॉटर आपल्याला वेडे करते, तसे श्रीनगरमध्ये दल सरोवर आपल्याला मोहून टाकते. ही नगरी फार प्राचीन. खरे तर ती ‘श्री’ नगरी. ती कोणी वसवली याविषयी वेगवेगळे प्रवाद आहेत. कोणी म्हणते ती अशोकाने वसवली, तर कोणाच्या मते दोन हजार वर्षांपूर्वी प्रवरसेन राजाने. पण या नगरीची प्राचीनता मात्र वादातीत आहे. श्रीनगर हे आजही सरोवरांचे आणि उद्यानांचे शहर आहे. शालिमार बाग, निशात बाग, चष्मेशाही या मोगलकालीन बागांनी या शहराचे सौंदर्य खुलवले आहे. दल सरोवराच्या काठावरची निशातबाग आजही आपल्याला गुंग करून टाकते. जहॉंगिराने नूरजहॉंनसाठी उभारलेले शालिमार उद्यान तिथल्या चारशे वर्ष जुन्या चिनार वृक्षांसह आजही आपला तोच दिमाख घेऊन उभे आहे. याच उद्यानात प्राचीन काळी प्रवरसेन राजाने आपले विश्रांतीस्थळ उभारले होते म्हणे. शहाजहानने उभारलेल्या चष्मेशाहीच्या औषधी झर्याचे वेगाने झुळझुळणारे पाणी आजही अत्यंत चवदार लागते.
घनगर्द छाया देणारा चिनार
काश्मीर म्हटले की चिनारचा उल्लेख व्हायलाच हवा. चिनारसारखा घनदाट छाया देणारा दुसरा वृक्ष नाही. उन्हाळ्यातही चिनारच्या घनगर्द हिरव्या छायेत बसले की एसी लावलाय असे वाटावे ही या वृक्षाच्या घनदाट पर्णराजीची किमया आहे. याच चिनारची ही उन्हाळ्यातली हिरवीगर्द पाने हिवाळ्यात आपला रंग बदलतात आणि पानगळती सुरू होते. हिवाळ्यातला तो पिवळ्या – सोनेरी पानांनी बहरलेला चिनार काश्मीरचे एक दुसरे रूप आपल्याला दाखवतो. जपानमध्ये हा रंगबदल पाहणे हाही एक सोहळा असतो. त्याला ‘मोमिजिगारी’ म्हणतात. चिनारला इंग्रजीत ‘मेपल’ म्हटले जाते. जगात त्याच्या १२८ जाती आहेत आणि कॅनडाच्या ध्वजावरही तो विराजमान झालेला आहे.
श्रीनगरमध्ये हॉटेलवर पोहोचपर्यंत दुपार उलटली होती. जेवताना सवयीप्रमाणे मिनरल वॉटर मागितले, तर वेटरच्या चेहर्यावर स्मित उमटले. काश्मीरचे पाणी मिनरल वॉटरपेक्षाही शुद्ध आहे त्याविषयीचा तो सार्थ अभिमान होता. खरोखरच काश्मीरच्या पाण्याला आगळीच चव आहे. काश्मीरमधील नद्या आणि सरोवरांचे बर्फाळ पाणी कमालीचे स्वच्छ असते. पाऊस पडून गेलेला असेल तर थोडे गढूळ होते तेवढेच, पण एरवी खालचा तळ दाखवणारे स्वच्छ आरसपानी पाणी पाहताना आपण काश्मीरमध्ये आहोत याची सतत जाणीव होत राहते.
आमचे हॉटेल झेलमच्या काठीच होते. या झेलमचा काश्मिरींना कोण अभिमान! आमच्या चालकाला जाताना सहज विचारले, ‘ही झेलम ना?’ तर किती अभिमानाने त्याने होकार दिला! झेलमचेच दुसरे नाव ‘वितस्ता’. तिचा उल्लेख ऋग्वेदातही आहे. कश्यप ऋषींनी पार्वतीमातेला आपण वसवलेली भूमी पावन करण्यासाठी आमंत्रित केले तेव्हा पार्वतीमाताच वेरिनाग येथे प्रकट झाली अशी धारणा आहे. भारत आणि पाकिस्तान असा दोन देशांचा साडेसातशे किलोमीटरचा प्रवास करणार्या झेलमचे श्रीनगरमधील पात्र छोटेसेच असले, तरी नितळ, शांत पाण्यामुळे देखणे भासते. हेच पात्र पुढे पाकिस्तानात सिंधू नदीला जाऊन मिळते. दल सरोवराप्रमाणे झेलममध्येही हाऊसबोटी नांगरून ठेवलेल्या आहेत. सामान्यांपासून असामान्यांपर्यंत सार्यांसाठी नाना दर्जाच्या हाऊसबोटी श्रीनगरमध्ये पाहायला मिळतात, पण आपल्या केरळच्या हाऊसबोटीपेक्षा त्यांचा आकार वेगळा. खरोखरचे तरंगते घरच जणू. केरळप्रमाणे त्या येथे पाण्यात सैरसपाटा करीत नाहीत, तर एकाच जागी स्थिर असतात एवढेच. हाऊसबोटमध्ये राहण्याची पर्यटकांना ओढ असते, पण श्रीनगरच्या या हाऊसबोटींमध्ये न राहणेच श्रेयस्कर असा सल्ला अनुभवींकडून मिळतो, कारण तेथील स्वच्छतेविषयी त्यांची तक्रार असते.
(क्रमशः)

