Home बातम्या शरदसाहित्याचा वेध घेणारे पु. शि. नार्वेकर

शरदसाहित्याचा वेध घेणारे पु. शि. नार्वेकर

0

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

प्रथितयश कथाकार, सर्जनात्मक समीक्षा करणारे विचारवंत म्हणून पु. शि. नार्वेकर यांनी वाङ्‌मयीन जगतात नावलौकिक मिळविलेला आहे. शिवाय त्यांनी नाट्यलेखन आणि ललितनिबंधलेखन केले आहे. त्यांचा जन्म बांदिवडे येथे ३० जून १९२५ रोजी झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात ते वाढले. त्यांचे मराठी प्राथमिक शिक्षण वास्को येथे झाले. चौथीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर ते पोर्तुगीज सेगुंदग्रावपर्यंत शिकले. त्यानंतर इंग्रजी शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. परंतु घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणक्रम पूर्ण करता आला नाही. ती कसर त्यांनी अखंडितपणे केलेल्या व्यासंगाने भरून काढली. सर्जनशील साहित्यनिर्मिती आणि सातत्याने वाचन करणे हा त्यांचा ध्यास आहे. चित्रकलेची त्यांना अत्यंत आवड होती. त्या कलेमध्ये त्यांनी कौशल्यही प्राप्त केले होते. १९४६ च्या अखेरीस चित्रकलेचे शिक्षण घेण्याच्या उद्देशाने ते कोल्हापुरास गेले. पण ती इच्छा फलद्रूप न झाल्यामुळे ते परतले. भ्रमंती पदरी आली. जयसिंगपूर आणि नरसोबाचीवाडी येथे त्यांनी चार वर्षे नोकरी केली. १९५० मध्ये ते गोव्याला परतले. १९५४ पासून एम. एस. तळावलीकर ऍण्ड सन्स प्रा. लि.च्या साकोर्डे येथील ऑफिसमध्ये त्यांनी नोकरीस प्रारंभ केला. १९८४ मध्ये ते निवृत्त झाले. राष्ट्रकार्यासाठी समर्पित भावनेने कार्य करणार्‍या थोर पुरुषांची भेट घेणे, साहित्यिकांशी हृदयसंवाद करणे हा त्यांच्या जीवनाचा मर्मबंध. त्यांनी डॉ. राममनोहर लोहिया व सानेगुरुजी यांची भेट घेतली. ग. त्र्यं. माडखोलकर आणि प्रा. ना. सी. फडके या साहित्यिकांची त्यांनी कुळे स्टेशनवर भेट घेतली.

शरच्चंद्र चटर्जी, वि. स. खांडेकर, ग. त्र्यं. माडखोलकर आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्या साहित्याचा नार्वेकरांनी मनःपूत आस्वाद घेतला. चित्रकलेचा त्यांचा छंद सुटला नाही. ‘केसरी’, ‘लोकशक्ती’ आणि ‘गावकरी’ या दैनिकांत त्यांची राजकीय व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली.

कथालेखन हे त्यांचे आवडते क्षेत्र होय. त्यांचे आतापर्यंत ‘विघ्नहर्ता’, ‘मृगजळ’, ‘कलंदर’ आणि ‘ब्लॅकिस्ट’ हे चार कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘नवमीच्या मध्यरात्री’ हे त्यांचे ऐतिहासिक नाटक प्रसिद्ध झाले. ‘आषाढधारा’ हा त्यांचा ललितनिबंधसंग्रह. ‘महाभारत’ हा त्यांचा आवडता ग्रंथ. त्यातील व्यक्तिरेखा हा त्यांच्या चिंतनाचा विषय. यातून त्यांचा ‘द्यूतचक्र’ हा ग्रंथ साकार झाला. आस्वादक समीक्षेचे ते मनोज्ञ रूप होय. ते आपल्याला अंतर्मुख करते. मूळ ग्रंथाकडे मर्मदृष्टीने पाहायला प्रवृत्त करते. शरच्चंद्र चटर्जी हा त्यांचा आवडता कादंबरीकार. या कादंबरीकाराविषयी १९२० नंतरच्या कालखंडात मराठी वाचकांना फार मोठे आकर्षण वाटलेले दिसते. बंगाली साहित्यातील रवि-चंद्र म्हणून रवींद्रनाथांचे आणि शरच्चंद्रांचे नाव गौरवाने घेतले जाते. एक वास्तववादी कादंबरीकार म्हणून शरच्चंद्र चटर्जी ओळखले जातात. अधःस्तरावरील उपेक्षित समाजाचे अंतर्बाह्य चित्रण तन्मयतेने, सहृदयतेने आणि मर्मदृष्टीने करणारा कादंबरीकार असा त्यांचा लौकिक आहे. शरदबाबूंची स्त्रीसृष्टी वैविध्याने आणि वैचित्र्याने नटलेली आहे. परंपरागत बंधनांमध्ये जखडलेल्या स्त्रीमनाचे चित्रण शरदबाबूंनी सहानुभूतीने केले. भारतीय भाषांत त्यांचे अनुवाद प्रसिद्ध झाले. मराठीत भा. वि. वरेरकर, पु. बा. कुलकर्णी, शं. बा. शास्त्री आणि वि. सी. गुर्जर यांनी शरदबाबूंच्या कादंबर्‍यांची भाषांतरे केली. पु. शि. नार्वेकर यांनी मन लावून या कादंबर्‍यांचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या कादंबर्‍यांतील मनस्वी स्त्रीपात्रांविषयी चिंतन करता करता त्यांना त्यांविषयी ग्रंथनिर्मिती करण्याची अंतःप्रेरणा झाली. पु. शि. नार्वेकर शरदबाबूंच्या कादंबर्‍यांकडे अधिकाधिक का वळले असावेत? एक शक्यता अशी वाटते की, लेखक आणि त्याच्या साहित्यकृतीचा अभ्यासक यांच्या जीवनप्रवासातील समांतरता त्याला लेखनप्रवृत्त करीत असावी. दोहोंच्या प्रवृत्तीच्या समानधर्मेपणामुळे एक अनामिक नाते निर्माण होते. शरदबाबूंचा जीवनप्रवास खडतर झाला. आर्थिक विवंचनांना तोंड देताना त्यांना देशान्तर करावे लागले. असेच काहीसे जीवन पु. शि. नार्वेकरांच्या वाट्याला आले. साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात माणसे लहान-मोठी असतात, पण भोगवटा समान असतो. प्रतिकूल परिस्थितीमुळे या दोघांना पुढील शिक्षण घेण्याच्या आकांक्षेवर पाणी सोडावे लागले. शरदबाबूंना वाचनाचे अतिशय वेड होते. कविता, कथा, साहित्यचर्चा आणि चित्रकला या छंदांमध्ये ते रमत होते. शरच्चंद्रांविषयी ममत्व वाढायला पु. शि. नार्वेकरांच्या बाबतीत हे घटक कारणीभूत झाले असावेत. त्यांनी लिहिलेल्या ‘शरदबाबूंच्या नायिका’ आणि ‘शरच्चंद्रांच्या मानसकन्या’ या ग्रंथांतून त्याचा पदोपदी प्रत्यय येतो. शिवाय आपला भारत हा बहुभाषी देश असला तरी भारतीय जीवनदृष्टीचे अंतःसूत्र येथील कुठल्याही प्रदेशातील लेखकाच्या अंतरंगात सामावलेले असतेच. पु. शि. नार्वेकरांचा मनःपिंड पाहता ही धारणा बलवत्तर असल्याचेही दिसून येते.

‘शरदबाबूंच्या नायिका’ या आपल्या पहिल्या ग्रंथात शरदबाबूंच्या नायिकांविषयी आपली निरीक्षणे नोंदवताना ‘प्रास्ताविका’मध्ये नार्वेकर म्हणतात ः

‘‘शरदबाबूंच्या नायिका या त्यांच्या नायकांपेक्षा अधिक कणखर वाटतात. त्या निर्णय घेऊ शकतात. संकटात त्या डगमगत नाहीत. स्वतःच्या सार्‍या शक्ती पणाला लावून संसाराचा कोसळणारा डोलारा सावरण्याचा प्रयत्न त्या करतात. कधी त्या त्यात यशस्वी होतात तर कधी विराजसारख्या स्वतःच कोसळतात. पण त्या अयशस्वी प्रयत्नांतही त्यांचे आगळेवेगळे सामर्थ्य प्रकट होतेच. त्यामुळे शरदबाबूंच्या नायकांपेक्षा त्यांच्या नायिकाच वाचकांच्या जास्त लक्षात राहतात.’’

लेखकाने सांगितलेले हे अंतःसूत्र स्वीकारूनच ‘शरदबाबूंच्या नायिका’ आणि ‘शरच्चंद्रांच्या मानसकन्या’ या दोन्ही ग्रंथांमधील आशयाचा विचार करावा लागेल.

‘शरदबाबूंच्या नायिका’ या ग्रंथात पु. शि. नार्वेकरांनी त्यांच्या वेगवेगळ्या कादंबर्‍यांमधील दहा नायिका निवडलेल्या आहेत. ‘चरित्रहीन’मधील किरणमयी, सावित्री, ‘श्रीकांत’मधील अन्नदा, राजलक्ष्मी, ‘पथेरदाबी’मधील सुमित्रा, भारती, ‘देना-पावना’मधील अलका, ‘बिराज बौ’मधील विराज, ‘परिणीता’मधील ललिता, ‘शेषप्रश्‍न’मधील कमल या व्यक्तिरेखांचा ऊहापोह लेखकाने या संदर्भात केलेला आहे. समांतर प्रक्रियेने त्या-त्या कादंबर्‍यांमधील आशयसूत्रांविषयी त्याने विवेचन केलेले आहे.

‘चरित्रहीन’मधील किरणमयी, ‘श्रीकान्त’मधील राजलक्ष्मी आणि ‘शेषप्रश्‍न’मधील कमल या नायिका लेखकाला असाधारण वाटतात. संयमशील, प्रिय व्यक्तीसाठी अथवा कुटुंबासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची त्यांची तयारी असते. त्यांच्या काही नायिका आदर्श भारतीय परंपरेतील आहेत, तर काही अवैध मार्गाने जाणार्‍या आहेत. ‘चरित्रहीन’मधील किरणमयी आणि ‘शेषप्रश्‍न’मधील कमल या प्रखर बुद्धिमत्ता लाभलेल्या व तेजस्वी व्यक्तिमत्त्वाच्या स्त्रिया आहेत. किरणमयीने प्राचीन भारतीय दर्शनशास्त्रांचा अभ्यास केलेला आहे, तर कमलला आधुनिक शिक्षणाचा लाभ झालेला आहे. पण दोघीही प्रचलित नीतिनियमांविरुद्ध बंड पुकारणार्‍या आहेत, असा दोघींबद्दल समान धागा लेखकाने शोधलेला आहे. सावित्री ही शरदबाबूंची नायिका म्हणजे कारुण्य, ममता, प्रेम, संयम, त्याग आणि सेवावृत्ती यांचा गुणसमुच्चय आहे. पण जग मात्र तिच्याकडे ‘चरित्रहीन’ या दृष्टीने पाहते.

अन्नदा ही ‘श्रीकान्त’ कादंबरीची नायिका म्हणता येणार नाही. कादंबरीच्या प्रत्येक भागात श्रीकान्तच्या सहवासात म्हणा किंवा अवलोकनात असलेल्या म्हणा, एकेका स्त्रीचे चरित्र सांगितलेले आहे. पहिल्या भागात अन्नदेचे जीवनचरित्र सांगितलेले आहे असे मत पु. शि. नार्वेकर यांनी मांडलेले आहे. ‘श्रीकान्त’च्या दुसर्‍या भागात अभया या स्त्रीची कथा आलेली आहे. चौथ्या भागात कमललतेची कथा येते. श्रीकांत हा स्त्री, संपत्ती व अधिकार या ऐहिक आकर्षणांपासून कित्येक कोस दूर असलेला माणूस. त्याला कमललता आवडते. तिची जीवनकथा ऐकून त्याला तिच्याविषयी सहानुभूती वाटते.

श्रीकांत व राजलक्ष्मी ही पात्रे म्हणजे शरदबाबूंच्या प्रतिभेचा उच्चतम आविष्कार होय असे लेखकाने म्हटलेले आहे. राजलक्ष्मी सौंदर्यवती आहे. नृत्यगायनादी कलांमध्ये ती निपुण आहे. तितकीच ती बुद्धिमान आहे. ती व्यवहारनिपुणही आहे. सर्व गोष्टींकडे तिचे लक्ष आहे. मात्र दैवाच्या विचित्र लीलेमुळे तिची जीवननौका वादळात सापडलेल्या चिमुकल्या होडीसारखी कुठल्या कुठे वाहून गेली आहे असे सार्थ वर्णन त्याने केलेले आहे.

शरच्चंद्र चटर्जी हे निव्वळ कल्पनाविश्‍वात रमणारे साहित्यिक नव्हते. हिंदुस्थान आणि ब्रह्मदेशामधील भ्रमंतीत त्यांनी जे पाहिले, ऐकले, अनुभवले त्यातूनच त्यांची विविध पात्रे साकार झाली असे निरीक्षण पु. शि. नार्वेकर यांनी नोंदविलेले आहे. शरदबाबूंची ‘पथेरदाबी’ ही तत्कालीन राजकीय पार्श्‍वभूमीवरील कादंबरी. ब्रिटिश साम्राज्यांतर्गत देशात क्रांतिकारकांची गुप्त संघटना कार्यरत होती. तिचे अध्यक्षपद सुमित्रा या स्त्रीकडे होते. तिने ते कर्तृत्वाच्या बळावर मिळविले होते असे लेखकाचे प्रतिपादन आहे. डॉ. सव्यसाची या क्रांतिकारक नेत्याच्या सहवासात सुमित्रा आली. ती धर्माने ज्यू. तिचे खरे नाव रोझ डेव्हिड. तिचे वास्तव्य इंडोनेशियातील सुमात्रामध्ये होते, त्यावरून डॉक्टरांनी तिचे नाव सुमित्रा ठेवले. राजकीय मतांप्रमाणे सुमित्रेची सामाजिक मतेही क्रांतिकारक स्वरूपाची आहेत. तिच्या स्त्रीविषयक जाणिवा प्रगल्भ आहेत. शरदबाबूंच्या संस्मरणीय नायिकांपैकी ती एक आहे. तिच्या मनात वज्रनिर्धार आहे; पण त्याचबरोबर तिचे अंतःकरण कुसुमकोमलही आहे.

शांत स्वभावाची, कोमल मनाची, हिंसा, द्वेष यांचा तिटकारा असलेली, सेवाभावी वृत्तीची सुहास्यवदना भारती अग्निभक्षक क्रांतिकारकांच्या गोटात कशी काय दाखल झाली हे एक कोडेच आहे असे मत लेखकाने व्यक्त केले आहे. तिला समाजसेवेची आवड होती. मिशनर्‍यांच्या शाळेत तिचे शिक्षण झाले होते. दुर्बल, निराधार, पीडित लोकांची सेवा करण्याचा संदेश तिला ख्रिस्ताच्या शिकवणुकीतून मिळाला होता. ‘पथेरदाबी’ ही कादंबरी म्हणजे क्रांतिकारकांची गाथा आहे की भारतीच्या प्रेमाची कथा आहे याविषयी संभ्रम निर्माण व्हावा असे हे दोन प्रवाह परस्परांमध्ये मिसळून गेले आहेत असे लेखकाने म्हटलेले आहे. भारती ही नव्या युगाची प्रतिनिधी आहे असे त्याला वाटते.

‘देना पावना’ या कादंबरीतील अलका या नायिकेचे व्यक्तिचित्र लेखकाने उलगडून दाखविले आहे. ही कादंबरी ‘भैरवी’ या नावाने अनुवादित झालेली आहे. षोडशीचे खरे नाव अलका. ती संन्यासिनी आहे. तरी ती मोठ्या अधिकाराच्या, मानाच्या जागेवर होती. जीवानंद सर्वनाशाच्या कड्यावर असताना अलकेच्या प्रभावामुळे त्याचे परिवर्तन झाले.

शरदबाबूंच्या सर्व नायिकांमध्ये अन्यायी पुरुषी सत्तेशी निर्भयपणे, एकाकी सामना करणारी अलकेसारखी दुसरी स्त्री नाही. संन्यासिनी असल्यामुळे कदाचित तिला हे सामर्थ्य प्राप्त झाले असावे असे मत लेखकाने येथे व्यक्त केले आहे.

‘बिराज बौ’ या कादंबरीत शरदबाबूंनी विराज या कलंकित समजल्या गेलेल्या पण वास्तवात पतिव्रता असलेल्या दुर्दैवी स्त्रीचे अत्यंत हृदयस्पर्शी व करुण चित्र रेखाटलेले आहे. विराजच्या जीवनाची शोकांतिका होण्यास राजेंद्र केवळ निमित्तमात्र ठरला. जे काही घडले त्याला विराज स्वतः जबाबदार होती. नीलांबरही त्याला कारणीभूत झाला. विराजचा संतापी स्वभाव आणि नीलांबरचे गांजाचे व्यसन या अनर्थाचे कारण ठरले. नीलांबरने गांजाच्या कैफात विराजच्या चारित्र्याबद्दल शंका घेतली. नीलांबरशी झालेल्या कलहात ती नको नको ते बोलून गेली अन् मागाहून शरमिंदी झाली. शरदबाबूंना हिंदू स्त्रियांच्या जीवनात पातिव्रत्याला सर्वात महत्त्वाचे स्थान आहे याची पूर्णतः जाणीव होती. जाणता अजाणता ही लक्ष्मणरेषा ओलांडली तर स्त्रियांची काय दुर्दशा होते हेच त्यांनी विराजच्या आणि किरणमयीच्या उदाहरणांतून दाखविलेले आहे असे मत लेखकाने व्यक्त केले आहे.

शेखर आणि ललिता यांचे संबंध अतिनिकटचे व आत्यंतिक जिव्हाळ्याचे असले तरी दोघांच्या मनात प्रेमभावना निर्माण झालेली नव्हती. ललितेवर आपला एक प्रकारचा हक्क आहे असे जणू शेखरला वाटत होते. ती त्याची सेक्रेटरी होती, मैत्रीण होती आणि शिष्याही होती. काही प्रमाणात सेविकाही होती. शेखरने बकुळीच्या फुलांची माळ आकस्मिकपणे ललितेच्या गळ्यात घातली तेव्हा त्याला प्रतिकार करण्याची संधी ललितेला मिळाली नाही. शेखरने तिला हृदयाशी कवटाळले तेव्हा ललिता थरथर कापू लागली. तिने कठोर शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. शेवटी शेखरच्या मनात ललितेविषयी निर्माण झालेले आकर्षण, ती आपल्यापासून दुरावेल या संशयातून त्याच्या मनात निर्माण झालेले नाट्य व ललितेची निष्ठा यांतून ‘परिणीता’ या कादंबरीतील प्रेमभावनेचा परिपोष होतो.

‘शेषप्रश्‍न’मधील कमल हे किरणमयीचेच परिणत रूप आहे. प्रखर बुद्धिमत्ता असूनही सामाजिक चौकट मोडण्याचे धैर्य किरणमयीला झाले नाही; पण कमलने मात्र ती बेधडक मोडून टाकली. याचे एक कारण असे की तिच्या बाबतीत ‘समाज‘ असा अस्तित्वात नव्हता. ती हिंदू समाजातील नव्हती किंवा ख्रिस्ती समाजातीलही नव्हती. त्यामुळे कोणत्याही धर्माचे यमनियम पाळण्याचे बंधन तिच्यावर नव्हते अशी मीमांसा ‘शेषप्रश्‍न’मधील ‘कमल’ या नायिकेविषयी पु. शि. नार्वेकर यांनी केलेली आहे. शरदबाबूंच्या कादंबर्‍यांमधील आशयसूत्रांचे सखोल अवगाहन करून पु. शि. नार्वेकर यांच्यासारख्या सर्जनशील लेखकाने सहृदयतेने त्यांतील व्यक्तिरेखांचा वेध घेतला आहे. त्यांच्या चिंतनशील वृत्तीचा येथे प्रत्यय येतो.

पु. शि. नार्वेकर यांना परिणतप्रज्ञ वयात पुन्हा एकदा शरद साहित्याचा मागोवा घ्यावासा वाटला, यातच त्यांचे वाङ्‌मयीन संस्कृतीविषयीचे निस्सीम प्रेम प्रकट होते. ‘शरच्चंद्रांच्या मानसकन्या’ हा त्यांचा नुकताच प्रसिद्ध झालेला ग्रंथ हेच दर्शवितो. या ग्रंथात त्यांनी सुरुवातीला शरच्चंद्र चटर्जी यांच्या चरित्राचा आलोक संक्षेपाने वाचकांसमोर ठेवलेला आहे. त्यांच्या वाङ्‌मयीन कर्तृत्वावर प्रकाश टाकून सूत्रमय शब्दांत त्यांच्या मानसकन्यांविषयी विवेचन केलेले आहे.

शरच्चंद्र चटर्जी यांनी साहित्याची साधना करीत असताना अनेक ज्ञानशाखांचा अभ्यास केल्याचे नार्वेकरांची सांगितले आहे. त्यांनी वेदांचे अध्ययन केले होते. उपनिषदे अभ्यासली होती. संख्यादी दर्शनशास्त्रे वाचून काढली होती. पौर्वात्य तत्त्वज्ञानाबरोबरच त्यांनी पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला होता. शरीरशास्त्र, प्राणिशास्त्र, तर्कशास्त्र आणि इतिहास या विषयांचाही त्यांनी अभ्यास केला होता. ब्रह्मदेशातील दीर्घ वास्तव्यात त्यांनी अखंडितपणे ज्ञानसाधना केली होती. पुढील काळात त्यांनी विपुल आणि सतेज साहित्यनिर्मिती केली, त्याचे मूळ या दृढ पायात आहे असे मत लेखकाने व्यक्त केले आहे. त्यांच्या दीर्घ भ्रमंतीत त्यांना भेटलेल्या असंख्य पतित स्त्रिया, परिचितांनी सांगितलेल्या सत्यकथा आणि सूक्ष्म निरीक्षणशक्ती यांच्या बळावर त्यांनी शेकडो पतित स्त्रियांच्या चरित्रांचा अभ्यास करून आपले काही निष्कर्ष काढले होते असेही त्याने पुढे म्हटलेले आहे. सती-साध्वी स्त्रियांचे चित्रणही त्यांनी केलेले आहे. स्त्रीजातीवर पुरुषप्रधान संस्कृतीमुळे जो अन्याय होतो, त्याचा निषेध त्यांनी केलेला आहे. त्यामुळे बंगालमधील स्त्रीवर्गाला त्यांच्याविषयी आदर वाटत असे. स्त्रियांशी संबंधित असलेल्या प्रश्‍नांवर आपल्या साहित्यातून त्यांनी प्रकाश टाकलेला आहे असे प्रतिपादन पु. शि. नार्वेकर यांनी केले आहे. भारतातील अनेक साहित्यिकांचे ते चरित्रविषय झालेले आहेत याची माहिती त्यांनी दिलेली आहे.

‘शरच्चंद्रांच्या मानसकन्या’ या ग्रंथात पार्वती (‘देवदास’), चंद्रमुखी (‘देवदास’), माधवी (‘बडी दिदी’), कमललता (‘श्रीकांत’, भा. ४), अभया (‘श्रीकांत’, भा. २), कमला (‘काशीनाथ’), बिंदू (‘बिंदूचे बाळ’), विजया (‘दत्ता’/‘विजया’), कुसुम (‘पंडितमोशाय’), अनुराधा (‘अनुराधा’) आणि वंदना (‘विप्रदास’) या स्त्री-व्यक्तिरेखांचा लेखकाने तन्मयतेने वेध घेतलेला आहे. शरच्चंद्रांच्या कादंबर्‍यांचे अवगाहन करून त्या त्या कादंबर्‍यांतील आशयसूत्रांचा संक्षेपाने परामर्श घेत घेत त्यांनी या व्यक्तिरेखांवर प्रकाश टाकलेला आहे. एखादा सर्जनशील लेखक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण करणार्‍या भारतीय साहित्यातील मानदंड ठरलेल्या शरच्चंद्रांच्या व्यक्तिदर्शनाकडे किती सहानुभूतीने आणि समरसतेने पाहू शकतो त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

‘देवदास’ ही कादंबरी बंगाली साहित्यातील एक श्रेष्ठ शोकांतिका मानली जाते हे सांगून जनमानसावरील तिचा प्रभाव कसा आहे याविषयीची माहिती पु. शि. नार्वेकर यांनी दिलेली आहे. सुरुवातीची प्रतिक्रिया काहीशी विरोधी स्वरूपाची होती हेही त्यांनी नमूद केलेले आहे.

मनोविश्‍लेषण, अंतर्मनाचे पापुद्रे उलगडून दाखविणे इत्यादी प्रकार शरदबाबूंच्या कादंबर्‍यांत अभावानेच आढळतात. पण त्यांची पात्रे संवादामधून प्रकट होतात. तेही छोट्या-छोट्या वाक्यांतून ही निरीक्षणे लेखकाने नोंदविली आहेत. पार्वतीची व्यतिरेखा उलगडून दाखविताना देवदास आणि पार्वती यांच्या भावसंबंधांविषयी लेखकाने विवेचन केलेले आहे. या दोघांच्या बालपणी रुजलेल्या स्नेहाच्या वेलीला तारुण्यावस्थेत प्रीतीच्या कळ्या आल्या होत्या. देवदासच्या आईने कुलीनत्वाच्या प्रश्‍नावरून पार्वतीच्या आजीने केलेला देवदास-पार्वतीच्या विवाहाचा प्रस्ताव फेटाळला हे जेव्हा तिला समजले तेव्हा ती निराश झाली. तिचा स्वप्नभंग झाला. पुढे तिचा वयस्क बिजवराशी विवाह ठरविण्याचा घाट घातला गेला. पार्वतीचे लग्न म्हातार्‍या चौधरीबाबूंशी झाले. ते खूप श्रीमंत होते. जमीनदार होते. त्या श्रीमंतीला भुलून पार्वतीने देवदासला अपमानित केले. अभिमानाच्या ताठ्याने माणसे अंध कशी होतात त्याचे उदाहरण म्हणून ही व्यक्तिरेखा नार्वेकरांनी अधोरेखित केलेली आहे.

चंद्रमुखी ही कलकत्त्यातील एक वेश्या. वेश्या हा स्त्रीजातीवरील कलंक आहे. कारण या वेश्यांमुळे समाजस्वास्थ्य बिघडते असे शिष्टसंमत समाजात मानले जाते. पण अन्य स्त्रियांप्रमाणे आपणही संसार करावा, कुणातरी एकाच पुरुषावर प्रेम करावे, आपणाला मुलेबाळे असावीत असे त्यांनाही वाटत असते. चंद्रमुखी अशा स्त्रियांपैकी एक आहे. शरदबाबूंनी अशा अनेक पतिता स्त्रियांचे चित्रण केले आहे. चंद्रमुखी रूपाने सुंदर होती. देवदासच्या प्रथम भेटीतच ती त्याच्या प्रेमात पडली. पार्वती दुसर्‍याची झाली हे कळताच देवदास दारूच्या व्यसनाच्या अधीन झाला. तेव्हा चंद्रमुखी त्याला त्यापासून परावृत्त करू लागली. सोन्यासारख्या जिवाचा नाश करून घेऊ नका असे म्हणून विनवू लागली. कलकत्ता शहराचा त्याग करून आशथउरी या छोट्या गावात ती राहू लागली. नदीकाठी दोन खोल्यांचे नीटनेटके घर तिने बांधले. शांतपणे ती जीवन कंठू लागली. आयुष्यात घडलेली पापे तिने गंगार्पण करून टाकली.

माधवी ही शरच्चंद्रांच्या ‘बडी दिदी’ या पहिल्या कादंबरीतील एक व्यक्तिरेखा. या कादंबरीच्या नायकाचे नाव सुरेंद्रनाथ आणि नायिकेचे नाव माधवी. इतर कादंबर्‍यांतील नायक-नायिकांप्रमाणे त्यांचे नाते प्रियकर-प्रेयसीचे नाही. पती-पत्नीचे नाही. ते आहे मानलेल्या भावा-बहिणीचे. तिच्या रूपलावण्याकडे लक्ष न जाता तिच्या गुणसंपन्नतेचा प्रभाव त्याच्यावर पडलेला होता. माधवीचे गुणवैशिष्ट्य असे की ती विलक्षण आत्मसंयमी. आपण विधवा आहोत, प्रेम करण्याचा आपल्याला अधिकार नाही; किंबहुना ते पाप आहे हे कळण्याइतपत तिच्यावर सुसंस्कार झालेले होते. त्यांचे उल्लंघन करण्याइतकी बंडखोर वृत्ती तिच्याजवळ नाही. याशिवाय महत्त्वपूर्ण बाब अशी की आपल्या पतीवर तिने मनापासून प्रेम केले होते. आजही तिच्या मनात त्याच्याविषयीची निष्ठा अभंग आहे. माधवी बालविधवा होती. प्रेमाचे खेळ कल्पनेतसुद्धा तिला वर्ज्य होते. धर्माच्या व समाजाच्या दृष्टीने ते पाप होते. माधवीच्या भावाच्या शिवचंद्राच्या बायकोने घराचा कारभार अनेक वर्षे माधवीच्या हातात दिला होता, तो आपल्या हातात घेतला. माधवीच्या बाबतीत जे घडले ते जगरहाटीनुसार घडले. ती आपल्या हक्काच्या घरी- सासरी निघून गेली. चटर्जी नावाच्या गृहस्थाकडे माधवीचा जमीनजुमला भोगवट्याखाली होता. माधवी आपली जमीन आता ताब्यात घेणार हे कळताच त्याला दुःख झाले. जमीनदाराचा मॅनेजर असलेल्या मथुरानाथ याच्याशी संगनमत करून त्याने माधवीची इस्टेट हडप करण्याचा घाट घातला. या अन्यायाविरुद्ध तिने जमीनदाराकडे न्याय मागायचे ठरविले. म्हातारा जमीनदार वारला होता आणि त्याचा नातू आता जमीनदार बनला होता. त्याचे नाव होते सुरेंद्रनाथ रॉय.

गोलागावच्या कुणा माधवीदेवी नावाच्या विधवेच्या घरादारासह जमीनजुमला लिलावात खरेदी केल्याचे कोर्टाचे सर्टिफिकेट पाहून सुरेंद्रनाथ चमकला. ही आपली अक्का तर नव्हे ना! देवीसमान असलेल्या स्त्रीचे निर्वाहाचे साधन हिरावून घेऊन तिला देशोधडीस लावण्याचे महापाप आपल्या हातून घडावे या गोष्टीचा त्याला पश्‍चात्ताप झाला. घोड्यावर स्वार झाला आणि दौडत गोलागावच्या दिशेने निघाला. अतिरिक्त श्रमांमुळे पाच वर्षांपूर्वीं सुरेंद्रनाथाला झालेल्या अपघातात शरीराच्या अंतर्भागात झालेली जखम फुटली आणि त्याच्या तोंडातून रक्तस्राव झाला. त्याही असहाय स्थितीत ‘अक्का अक्का’ अशा हाका मारीत किनार्‍यावरून तो धावू लागला. स्वतःच्या वाड्यात- आपल्या शयनगृहात माधवीच्या मांडीवर डोके ठेवून सुरेंद्रनाथ मृत्युशय्येवर पडला होता.

माधवीच्या तोंडाकडे पाहत सुरेंद्रनाथ म्हणाला, ‘‘अक्का, त्या दिवसाची गोष्ट आठवते का? त्या दिवशी तू घरातून हाकलून दिले मला. कसं फिटंफाट झाली ना?’’

त्याच क्षणाला माधवी बेशुद्ध पडली. ती शुद्धीवर आली तेव्हा घरभर रडण्याचा आक्रोश ऐकू येत होता. शोकान्त कादंबरीची नायिका असलेल्या माधवीचे व्यक्तिचित्र पु. शि. नार्वेकर यांनी संक्षेपाने आणि समरसतेने उभे केलेले आहे.

‘श्रीकान्त’ कादंबरीच्या चौथ्या भागात आलेल्या कमललता या वैष्णवीची कथा पु. शि. नार्वेकर यांनी सांगितलेली आहे. पुरुष आणि स्त्री दोघेही वासनेला बळी पडतात. पण पुरुष त्यातून सहीसलामत सुटून जातो. स्त्रीला मात्र तो कलंक जन्मभर आपल्या कपाळावर तप्त मुद्रेप्रमाणे वागवावा लागतो. कोणत्याही परिस्थितीत संसाराची स्वप्ने पाहणार्‍या कमललतेला ऐन तारुण्यातच संन्यस्तव्रती होऊन वैष्णवांच्या मठात राहावे लागते अशी आशयसूत्र असलेली वेदना देणारी ही कथा आहे असे लेखकाने म्हटलेले आहे.

‘श्रीकान्त’ हे श्रीकृष्णाचे एक नाव. आपण पूर्वजन्मीच्या गोपी आहोत. श्रीकृष्णासमवेत वृंदावनात रासक्रीडा खेळलेलो आहोत, अशी भावना मनात बाळगून कृष्णभक्ती करणे हा मधुराभक्तीचा एक प्रकार आहे. वैष्णवपंथाचे ते एक प्रमुख वैशिष्ट्य आहे असेच कमललता मानीत होती. पहिल्या भेटीतच श्रीकान्तविषयी तिच्या मनात प्रेम निर्माण झाले होते. ती मोकळ्या मनाची आणि चतुरभाषिणी होती. तिच्या अंगावर वैष्णवीची वस्त्रे असली तरी वैराग्याच्या आड असलेले तिचे सौंदर्य लोप पावलेले नव्हते. एका नीच प्रवृत्तीच्या माणसाने तिच्या भावजीवनाची लक्तरे करून टाकली होती त्यामुळे ती वैष्णवी झाली. श्रीकान्तच्या सहवासामुळे तिच्या मनाला पुन्हा टवटवी आली होती.

‘श्रीकान्त’च्या दुसर्‍या भागात श्रीकान्तला अभया नावाची बंगाली तरुणी भेटते. तिचे व्यक्तिचित्र पु. शि. नार्वेकर यांनी येथे उभे केलेले आहे. हजारो वर्षे हिंदू स्त्रीच्या मनावर संस्कार करण्यात आलेले आहेत. पती कसाही वागला तरी पत्नीने त्याच्याशी एकनिष्ठच राहिले पाहिजे. अभयेच्या व्यक्तिरेखेद्वारा हे अधोरेखित झालेले आहे. लेखकाने एका कथेच्या द्वारे ते सांगितलेले आहे.

‘‘पुराणात एक कथा आहे. कुठल्याशा एका ऋषीला वेश्यागमनाचा नाद होता. पुढे त्याला कुष्टरोग झाला. पण छंद सुटेना. त्याच्याने चालवेनासे झाल्यावर त्याच्या पतिव्रता पत्नीने त्याला पाठंगुळीस घेऊन रोज वेश्येच्या घरी पोचवावे व पहाटे तसेच पाठंगुळीस घेऊन परत यावे. आदर्श पतिव्रता म्हणून ती स्त्री भारतीय समाजाच्या इतिहासात अमर झालेली आहे!’’

स्त्रीच्या वाट्याला येणार्‍या भोगवट्यावर लेखकाने केलेले हे जळजळीत भाष्य आहे.

‘कमला’ ही ‘काशीनाथ’ या कादंबरीतील नायिका आहे. कमला या नावाचे शरदबाबूंना विशेष आकर्षण असावे असे पु. शि. नार्वेकर यांनी म्हटलेले आहे. त्यांच्या तीन कादंबर्‍यांच्या नायिकांची नावे ‘कमला’ अशी आहेत. ‘श्रीकान्त’ कादंबरीतील उपनायिका कमललता आहे.

कमला ही जमीनदार प्रियनाथबाबू मुखोपाध्याय यांची एकुलती एक मुलगी. त्यांना मुलगा नव्हता. त्यामुळे कमला हीच त्यांच्या अफाट इस्टेटीची एकमेव वारसदार होती. ती एकुलती, त्यातही श्रीमंत घराण्यातील. त्यामुळे तिचा स्वभाव काहीसा अहंमन्य. याच अहंकारी स्वभावामुळे ती पतीच्या चरणी आपले सर्वस्व अर्पण करू शकली नाही. तिने पतीला दुःख दिले. पण स्वतःही ती सुख भोगू शकली नाही. पती-पत्नीमधील संघर्ष हाच ‘काशीनाथ’चा विषय आहे. ज्या वयात काशीनाथने स्त्रीमध्ये गुंतून पडायला हवे होते, तसे त्याच्याकडून घडत नव्हते. कमलेला याचे वैषम्य वाटत होते. ती सर्वसाधारण स्त्री होती. यामुळे तिच्या मनात काशीनाथविषयी दुरावा निर्माण झाला. पण काशीनाथ वेगळ्या मनोवृत्तीचा माणूस होता. दर्शनशास्त्रांच्या अभ्यासामुळे त्याचे मन विरक्त बनले होते.

‘बिंदू’, ‘विजया’, ‘कुसुम’, ‘अनुराधा’ आणि ‘वंदना’ या मनस्विनींची स्वभावचित्रे पु. शि. नार्वेकर यांनी अत्यंत सहृदयतेने रेखाटलेली आहेत. ती मुळातून वाचणे हा एक आनंदानुभव आहे. शरद साहित्याचा मागोवा घेताना बंगालमधील सांस्कृतिक संचिताचे, तेथील समाजरचनेचे आणि तेथील माणसांच्या जीवनशैलीचे मर्म समजून घेणे आवश्यक आहे. शिवाय शरच्चंद्रांची भ्रमंती ब्रह्मदेशात झालेली असल्यामुळे शरच्चंद्रांच्या चरित्रविषयक तपशिलांचे आवश्यक भानही पु. शि. नार्वेकर यांनी ठेवलेले आहे. शरदाचे हे चांदणे मराठी साहित्यात बरसत राहावे या निष्ठेने त्यांनी लेखन केल्याचे सतत जाणवत राहते.