शफाली वर्मा नंबर १

0
118

टीम इंडियाची १६ वर्षीय सलामीवीर शफाली वर्माने आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवताना आयसीसी टी-ट्वेंटी क्रमवारीत प्रथम स्थानी झेप घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काल बुधवारी महिलांची ताजी क्रमवारी जाहीर केली.

भारताच्या पुरुष व महिला खेळाडूंचा विचार केल्यास प्रथम स्थान प्राप्त करणारी ती सर्वांत कमी वयाची खेळाडू ठरली आहे. शफाली मागील क्रमवारीत १९व्या स्थानावर होती. तिने मोठी झेप घेत थेट अव्वल क्रमांक आपल्या नावे केला. न्यूझीलंडची माजी कर्णधार सुझी बेट्‌स (७६१) हिला तिने दुसर्‍या स्थानी ढकलले. सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-ट्वेंटी विश्‍वचषकात शफालीने ४ सामन्यात ४०.२५च्या सरासरीने व १६१च्या स्ट्राईकरेटने १६१ धावा केल्या आहेत. महिला टी-ट्वेंटी क्रमवारीत प्रथम स्थान मिळविणारी ती मिताली राजनंतरची केवळ दुसरी भारतीय खेळाडू आहे.

शफालीच्या पदार्पणाला केवळ सहा महिने झाले आहेत. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात सूरत येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीने पदार्पणाचा सामना खेळला होता. आत्तापर्यंत १८ टी-ट्वेंटी सामन्यांत तिने १४६.९६च्या स्ट्राईकरेटने दोन अर्धशतकांसह ४८५ धावा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. शफालीची सलामी साथीदार स्मृती मंधानाला खराब कामगिरीचा फटका बसला आहे. चौथ्या स्थानावरून ती सहाव्या स्थानी घसरली आहे. जेमिमा रॉड्रिग्सला दोन स्थानांचा तोटा सहन करावा लागला असून नवव्या स्थानासह ती ‘अव्वल दहा’मधील तिसरी भारतीय आहे.

इंग्लंडची डावखुरी फिरकीपटू सोफी एकलस्टनने गोलंदाजीत अव्वल क्रमांक आपल्या नावे केला आहे. तिने ऑस्ट्रेलियाच्या मेगन शूट हिचे स्थान घेतले आहे. ऍन्या श्रबसोल (एप्रिल २०१६) हिच्यानंतर प्रथम क्रमांक मिळविलेली ती इंग्लंडची पहिलीच गोलंदाज आहे तर डॅनी हॅझेल (ऑगस्ट २०१५) हिच्यानंतरची इंग्लंडची पहिलीच फिरकी गोलंदाज. प्रगतीपथावर असलेल्या टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेत भारताच्या पूनम यादव (९ बळी) हिच्यानंतर बळी घेण्यात एकलस्टन (८) हिचा क्रमांक लागतो. पूनमने चार स्थानांची उडी घेत आठवा क्रमांक मिळविला आहे. आज ५ रोजी भारत व इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. त्यामुळे अव्वल स्थानावरील शफाली व एकलस्टन यांच्यातील झुंज पाहण्याची संधी क्रिकेट रसिकांना मिळणार आहे.