– स्वाती पेशवे
१२१ कोटी भारतीयांमधून उत्तमोत्तम खेळाडू शोधायचे झाल्यास संख्या अत्यंत कमी भरेल ही निराश करणारी बाब आहे. मात्र या पार्श्वभूमीवर सध्याची परिस्थिती आशादायी म्हणावी लागेल. आतापर्यंत क्रिकेटविश्वानं जगभर अमाप लोकप्रियता मिळवली आहे. या प्रवाहात देशोदेशीचे लोकप्रिय खेळ मागे पडले. मात्र आता क्रिकेटचा अतिरेक होतोय. शिवाय ङ्गिक्सिंगसारख्या प्रकरणांमुळे या खेळाला ग्रहण लागल्याचं दिसत आहे. याच्या प्रभावाने अथवा अन्य खेळांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आता क्रीडारसिक अन्य खेळांकडे उत्सुकतेने बघत आहेत. ङ्गिटनेसचा बोलबाला असणार्या आजच्या जगात एखाद्या खेळाद्वारे ङ्गिटनेस जपण्याचा मंत्र लोकप्रिय होताना दिसतोय. त्यामुळे बरेच हौशी खेळाडू वेगवेगळ्या खेळांकडे वळतात. बॅडमिंटन हा असाच खेळ. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना हा रोमांचक खेळ आकर्षित करतो. मॉर्निंग वॉकला बाहेर पडताना पाच–पन्नास लोक तरी पाठीवर रॅकेट अडकवून टीपटॉप पेहरावात बॅडमिंटन कोर्टकडे चाललेले दिसतात. हा एक अतिशय सोङ्गिस्टिकेटेड खेळ. मुलं, स्त्रिया, पुरुष, वृद्ध कोणीही या खेळाद्वारे शरीराची लवचिकता टिकवू शकतो. मर्यादित वेळेत संपणारा, सर्वांगाला व्यायाम घडवणारा आणि स्पर्धेतला थरार जपणारा हा खेळ ङ्गार पूर्वीपासून खेळला जातो.
असा हा रंजक खेळ आता ख्यातकीर्त झाला आहे. त्यात भारताच्या शटलक्विननं जागतिक पातळीवर नाव कमावल्यामुळे उत्सुकता आणखी वाढली आहे. अश्विनी पोनप्पा, ज्वाला गुट्टा, पी. व्ही. सिंधू, पी. कश्यप, प्रज्ञा गद्रे, आदिती मुटाटकर, अपर्णा पोपट आदी नावं बॅडमिंटनच्या क्षितिजावर तळपत असतात. अनेक नवोदित खेळाडू बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन घेत दररोज तीन–चार तास खेळाचा सराव करताना दिसतात. पालकही जाणीवपूर्वक मुलांना या खेळाचे धडे देताहेत. प्रसंगी धाक दाखवून मुलांमध्ये या खेळाप्रती रुची वाढवताहेत. बॅडमिंटनची वाढती लोकप्रियता लक्षात घेता आता या खेळाचं क्षितिज विस्तारतंय. आयपीएलच्या धर्तीवर आयबीएलद्वारे या खेळाला ग्लॅमरस रूप मिळू पाहतंय.
आयपीएलमुळे जुन्या जाणत्या क्रिकेटपटूंबरोबर नवोदितांनाही चांगली संधी मिळाली. संधीबरोबर मुबलक पैसाही मिळाला. बॅडमिंटनसारख्या खेळातही हेच वारे वाहू लागेल या उद्देशाने आयबीएलची सुरुवात होतेय. या निमित्तानं देश–विदेशातील खेळाडू एकत्र येतील. भारताबरोबर चीनमध्ये बॅडमिंटनचा विशेष बोलबाला आहे. चीनचे खेळाडू भारतीय खेळाडूंना नेहमीच भारी ठरतात. पण हा अपवाद वगळता भारतीय खेळाडूंनी या खेळावर आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. विशेषत: हैद्राबादने क्रीडाविश्वात आघाडी राखलीय. अश्विनी पोनप्पा आणि प्रज्ञा गद्रे ही जोडी विशेष प्रभाव दाखवतेय. अनेक नवोदितही चमकते तारे म्हणून समोर येताहेत. म्हणून आयपीएलच्या प्लॅटङ्गॉर्मवर या सर्वांना अपेक्षित संधी मिळेल आणि खेळाची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढेल. भारतीय बॅडमिंटन क्षेत्रात नवी क्रांती घडवू पाहणार्या इंडियन बॅडमिंटन लीगच्या संकल्पनेचा पहिला टप्पा नुकताच पार पडला. सहा संघांमध्ये रंगलेल्या बॅडमिंटनपटूंच्या लिलावात साईना नेहवालला घरच्या संघाकडून १ लाख २० हजार अमेरिकन डॉलर मोजून करारबद्ध करण्यात आले. खुद्द ङ्गुलराणीनंच हैद्राबाद किंवा आंध्रकडून खेळण्याची इच्छा केली होती. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणारा मलेशियाचा चोंग वुई या लिलावातला सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला सुनील गावसकरच्या मुंबई मास्टर्सनं १ लाख ३५ हजार अमेरिकन डॉलरला विकत घेतलं. दिल्ली स्मॅशर्सही त्याला खरेदी करण्यासाठी उत्सुक होते. मात्र मुंबई मास्टर्सची सरशी झाली. मुंबई मास्टर्स, पुणे पिस्टन्स, लखनौ वॉरिअर्स, दिल्ली स्मॅशर्स, हैद्राबाद हॉटशॉट्स आणि बांगा बिट्स हे सहा संघ आयबीएलमध्ये प्रतिस्पर्धी आहेत. भारताची युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला लखनौ वॉरियर्सनं ८० हजार अमेरिकन डॉलरला करारबद्ध केलं आहे. ज्वाला गुट्टाला दिल्ली स्मॅशर्सनं ३१ हजार डॉलरला करारबद्ध केलंय. व्हिएतनामच्या टिव्ह मिन्ह युगेनला पुणे संघानं ४४ हजार डॉलरला खरेदी केलं आहे.
हे आकडे आयपीएलमधील खेळाडूंना मिळणार्या आकड्यांपेक्षा बरेच कमी भासत असले तरी सुरुवात चांगली आहे असंच म्हणावं लागेल. या निमित्तानं या खेळाची लोकप्रियता वाढीस लागेल. आयबीएलच्या रचनेनुसार पुरुष एकेरीचे दोन, पुरुष दुहेरीचा एक, महिला एकेरीचा एक आणि मिश्र दुहेरीचा एक सामना होणार आहे. यामध्ये महिला दुहेरी हा प्रकार पूर्णपणे वगळण्यात आलाय. त्यामुळे अनेक नवोदित महिला खेळाडू या स्पर्धेपासून दूर राहणार आहेत. महिला एकेरीत अनेक खेळाडू आहेत त्याचप्रमाणे महिला दुहेरीतही अनेक खेळाडू आहेत. मात्र दुहेरी स्पर्धा म्हटल्यानंतर खेळाडू वाढतात, खर्च वाढतो आणि अर्थकारण सांभाळण्याचं आव्हान उभं ठाकतं. शिवाय महिला दुहेरीपेक्षा पुरुष दुहेरीतले सामने जास्त थरारक वाटतात. पुरुषांचे सामने प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. टीव्हीवरील प्रक्षेपण, प्रेक्षकांचा प्रतिसाद या बाबी लक्षात घेऊन संयोजकांनी महिला दुहेरी न खेळवण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. मात्र, त्यामुळे इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये भाग घेण्याची काही महिला खेळाडूंची संधी हुकली जाणार आहे.
बहारदार बॅडमिंटन
दोन हजार वर्षांपूर्वी प्राचीन ग्रीसमध्ये बॅडमिंटन खूप प्रसिद्ध होते. मध्ययुगातही हा खेळ खेळला जात असल्याचे संदर्भ बघायला मिळतात. ब्रिटिशांनी हा खेळ पुण्यात रुजवला. १९ व्या शतकात पुण्यामध्ये हा खेळ विशेष लोकप्रिय होता. गल्ल्यागल्ल्यांतून बॅडमिंटन कोर्टस होते. स्त्री–पुरुष बॅडमिंटन कोर्टमध्ये खेळाचा आनंद लुटत असत. या शहरात लोकप्रिय झालेला हा खेळ ‘पुना’ या नावानंच ओळखला जात असे. या खेळासाठी रॅकेट आणि शटल एवढंच साहित्य आवश्यक. खरं तर हा इनडोअर गेम. पण जागेच्या उपलब्धतेअभावी तो मोकळ्या वातावरणातही खेळला जातो. शटलला सोळा पिसं लावलेली असतात. ही पिसं बदकाची असतात. बदकाच्या डाव्या पंखातली पिसं लावलेलं शटल सर्वात उत्कृष्ट समजलं जातं. सध्या प्लास्टिकचे पंख लावले जातात. पण बदकाची पिसं लावलेल्या शटलची खासियतच काही वेगळी. १९७३ च्या सुमारास इंग्लंडमधील बॅडमिंटन नावाच्या शहरातल्या लॉनवर हा खेळ खेळला गेला. तोपर्यंत ‘पुना’ नावानं प्रसिद्ध असलेल्या या खेळाचा बराच बोलबाला झाला होता. एका पार्टीच्या आयोजनाप्रीत्यर्थ हा खेळ खेळला गेला आणि तिथं त्याचं नव्यानं बारसं झालं. आता हाच खेळ बॅडमिंटन नावानं ओळखला जाऊ लागला. १८७७ मध्ये बॅडमिंटनचे नियम ठरवले गेले. यासाठी वेगळ्या क्लबची स्थापना झाली आणि उत्तरोत्तर हा खेळ लोकप्रिय झाला. ‘ढल गया दिन, हो गयी शाम’मधला जितेंद्र आणि लीना चंदावरकरमध्ये रंगलेला बॅडमिंटनचा डाव आणि नाचत–लचकत हवेतलं शटल उडवण्याचा केलेला प्रयास ‘टकटक’मुळे आजही स्मरणात असेल. अनेक चित्रपटांमध्ये हा खेळ हायलाईट केला गेला.