शक्तिशाली स्फोटाने दिल्ली हादरली; 8 ठार

0
6

लाल किल्ल्यापासून काही अंतरावर कारमध्ये भीषण स्फोट; अनेक जण जखमी; स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट

काल सायंकाळी 6.52 च्या सुमारास झालेल्या एका भयंकर स्फोटाने देशाची राजधानी दिल्ली हादरली. लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट नंबर एकजवळील रस्त्यावरून जात असलेल्या ‘आय-20′ कारमध्ये हा स्फोट झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचे आवाज अनेक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आले. या स्फोटात आय-20 कारच्या मागे-पुढे असलेल्या अनेक गाड्यांचेही नुकसान झाले. गाड्यांचे वेगवेगळे भागही हवेत उडाले. तसेच स्फोटाच्या ठिकाणी मानवी अवयव विखुरलेले दिसून आले, तर काहींचे मृतदेह रस्त्यावर पडले होते. या स्फोटात 8 नागरिकांचा मृत्यू झाला असून, 24 नागरिक गंभीररित्या जखमी झाले. स्फोटाची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्फोटात वापरलेली कार मोहम्मद सलमान नामक व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत असून, सदर कार नदीम नामक दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा दावा त्याने केला आहे. दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळे याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ज्या कारमध्ये हा स्फोट झाला, त्याबद्दल दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी माहिती दिली. स्फोटानंतर माध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त सतीश गोलचा म्हणाले, सोमवारी सायंकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी एक हळूहळू पुढे सरकत असलेले एक वाहन रेड लाईटजवळ येऊन थांबले होते. त्यात हा स्फोट झाला. त्यावेळी गाडीमध्ये काही प्रवासी होते. या स्फोटामुळे आजूबाजूला असलेल्या वाहनांचेही नुकसान झाले. या स्फोटाबद्दल माहिती मिळताच सगळ्या यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या.

या स्फोटाचा तपास केला जात आहे. या घटनेचा तपास करून जे काही आढळून येईल, ते माध्यमांना सांगितले जाईल. या घटनेत काही लोक जखमी झाले आहेत. काही लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. मृतांचा निश्चित आकडा लवकरच सांगितला जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त गोलचा यांनी दिली.

या स्फोटाने आजूबाजूच्या कारही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या होत्या. काही वाहनांचे तर फक्त सांगाडे उरले होते. तसेच त्या वाहनांतील काही प्रवाशांचा मृत्यू, तर काही जण गंभीररित्या जखमी झाले. अनेक मृतदेह दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात आणण्यात आले आहेत. तसेच जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच युद्धपातळीवर मदत आणि बचाव मोहीम हाती घेण्यात आली. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी संपूर्ण परिसर रिकामा केला. अग्निशामक दलाच्या जवानांनी स्फोटामुळे लागलेल्या आगीवर नियंत्रण आणले.
ज्या कारमध्ये स्फोट झाला, ती आय-20 कार होती. या गाडीची नोंदणी गुरुग्रामची होती म्हणजे ती हरयाणातील होती. ज्या ठिकाणी स्फोट झाला, त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी तपासणी केली. या स्फोटाची भीषणता लक्षात घेऊन एनआयए आणि एनएसजीचे पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळाची पाहणी तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची दखल घेऊन तपास यंत्रणांना वेगाने तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

स्फोट नेमका कुठे घडला?
अधिकाऱ्यांनी स्फोटाचे ठिकाण लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्र. 1 च्या बाहेर असल्याचे सांगितले. दिल्ली गेट ते काश्मिरी गेटला जोडणाऱ्या रस्त्यावर हा स्फोट झाला. हा परिसर चांदणी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या विरुद्ध बाजूस आहे. या ठिकाणाहून लाल किल्ला अवघ्या 800 मीटर अंतरावर, तर जामा मशीद दीड किलोमीटर अतंरावर आहे. लाल किल्ला हा जुन्या दिल्लीतील अतिशय गजबजलेला भाग आहे, विशेषतः सण आणि विवाह समारंभाच्या हंगामात इथे मोठी गर्दी असते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काय म्हणाले?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही देशाला या घटनेबद्दल माहिती दिली. काल सायंकाळी जवळपास सात वाजता लाल किल्ल्याजवळ सुभाष मार्ग सिग्नलजवळ आय-20 ह्युंदाई कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटामुळे आजूबाजूच्या काही गाड्या, रस्त्याने जात असलेले लोक जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार, काही लोकांचा मृत्यू झाला आहे. आम्ही सर्व शक्यतांचा तपास करत आहोत आणि सर्व शक्यता लक्षात घेऊन याची सखोल चौकशी होईल. चौकशीतून जे समोर येईल ते लोकांसमोर ठेवले जाईल, असे शहांनी म्हटले आहे. दरम्यान, अमित शहा यांनी तातडीने एलएनजेपी रुग्णालयात धाव घेतली आणि स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

स्फोट कधी झाला?
जुन्या दिल्लीतील दाट लोकवस्ती असलेल्या भागात हा स्फोट घडला. एक संथ गतीने येणाऱ्या कारमध्ये 6 वाजून 52 मिनिटांनी स्फोट घडला. कारमध्ये जवळपास दोन ते तीन लोक बसले होते, अशी माहिती दिल्ली पोलीस आयुक्तांनी दिली.

सहा कारसह अन्य वाहनांचे नुकसान
दिल्लीच्या अग्निशामक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 6.55 वाजता लालकिल्ला मेट्रो स्टेशनजवळ स्फोट झाल्याची माहिती देणारा कॉल आला. त्यानंतर 7 अग्निशामक वाहने आणि 15 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. स्फोटात सहा कार, दोन ई-रिक्षा आणि एक ऑटो रिक्षा जळून खाक झाली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काय म्हणाले?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही देशाला या घटनेबद्दल माहिती दिली. काल सायंकाळी जवळपास सात वाजता लाल किल्ल्याजवळ सुभाष मार्ग सिग्नलजवळ आय-20 ह्युंदाई कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटामुळे आजूबाजूच्या काही गाड्या, रस्त्याने जात असलेले लोक जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार, काही लोकांचा मृत्यू झाला आहे. आम्ही सर्व शक्यतांचा तपास करत आहोत आणि सर्व शक्यता लक्षात घेऊन याची सखोल चौकशी होईल. चौकशीतून जे समोर येईल ते लोकांसमोर ठेवले जाईल, असे शहांनी म्हटले आहे. दरम्यान, अमित शहा यांनी तातडीने एलएनजेपी रुग्णालयात धाव घेतली आणि स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

दल्लीत झालेल्या स्फोटात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. बाधितांना अधिकाऱ्यांकडून मदत केली जात आहे. गृहमंत्री अमित शहा आणि इतर अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

  • नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाची बातमी खूपच दुःखद आणि चिंताजनक आहे. या दुःखद अपघातात अनेक निष्पाप जीव गमावल्याने दुःख झाले आहे. या दुःखद काळात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्या कुटुंबांबरोबर मी आहे आणि माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. सर्व जखमी लवकरात लवकर बरे होतील अशी मी आशा करतो.

  • राहुल गांधी, विरोधी पक्षनेते.