
राफेल नदाल या आपल्या जुन्या प्रतिस्पर्ध्याचा ६-४, ६-३ असा सरळ सेटमध्ये फडशा पाडून रॉजर फेडरर याने शंघाई मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले. स्वित्झर्लंडच्या या दिग्गजाच्या कारकिर्दीतील हे ९४वे जेतेपद आहे. यासह त्याने इव्हान लेंडल यांच्या विक्रमाशी बरोबरी साधतानाच एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानावरील नदाल व आपल्यातील गुणांचे अंतर कमी केले.
फेडररविरुद्ध नदालचा जय-पराजयचा रेकॉर्ड २३-१४ असा असल्यामुळे नदालच विजयाची पहिली पसंती होती. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला नदाल फेडररवर कुरघोडी करेल अशी अपेक्षा होती. परंतु, ३६ वर्षीय फेडररने आपल्यापेक्षा पाच वर्षांनी लहान असलेल्या प्रतिस्पर्ध्याला अस्मान दाखवले. फेडररने सलग पाचव्यांदा नदालचा पराभव करत वाढत्या वयाबरोबरच खेळातील धार अधिक तीक्ष्ण झाल्याचे काल रविवारी दाखवून दिले. फेडररने पहिल्याच गेममध्ये नदालची सर्व्हिस भेदत जोरदार सुरुवात केली. यानंतर आपली सर्व्हिस राखताना २-० अशी आघाडी घेतली. यानंतर सेटच्या पाचव्या गेममध्ये व शेवटच्या गेममध्ये नदालची सर्व्हिस भेदली. पावसामुळे क्विंझहॉंग टेनिस सेंटर कोर्टचे छप्पर झाकलेले असतानादेखील फेडररने फटक्यांचा पाऊस पाडत नदालला क्वचितच संधी दिली. ७२ मिनिटे चाललेल्या सामन्यात फेडररला एकदाही ब्रेक पॉईंटचा सामना करावा लागला नाही. कालच्या पराभवामुळे नदालची सलग १६ विजयांची मालिका खंडित झाली.
