22.5 C
Panjim
Saturday, November 27, 2021

शंकर ठाकर

  • गजानन यशवंत देसाई

त्या विषमतेची मला घृणा वाटू लागली. त्यानंतर शंकर वर्षभर गाडीवर कामाला राहिला असेल. नंतर ती ‘भूमिका’ गाडी बंद झाली आणि शंकरही भेटेनासा झाला. पण माझ्या मन:पटलावर मात्र शंकर कायमचा कोरला गेला!

साधारणतः १९८० च्या दशकातील तो काळ. आताच्या काळाइतकी यातायात नसलेला. संपूर्ण गोव्यात लांब पल्ल्याच्या बसगाड्या धावायच्या. कदंबा बसेस त्यावेळेस सुरू झाल्या नव्हत्या. मोजक्याच बसगाड्या. त्यासुद्धा मोठ्या. मिनीबस गाड्यांचा जमाना साधारणतः १९८५ नंतर सुरू झाला. आमच्या आवाठात मला आठवतं त्यानुसार पहिली मिनीबस सुरू झाली होंडा ते फोंडा या रस्त्यावर. नावसुद्धा तेच होंडा-फोंडा. त्यापूर्वी ‘चित्रापूर’, ‘पावलो’, ‘व्हिनसन’, ‘बुर्ये’, ‘गोवा ट्रान्सपोर्ट’, ‘बॉबी’, ‘प्रार्थना’, ‘भूमिका’, ‘राजश्री’ या बसगाड्या रस्त्यावरून धावाच्या. या गाड्या पणजी किंवा थेट मडगावपर्यंत जायच्या. आताच्यासारखी स्पर्धा नव्हती. एक बसगाडी गेली की तास-दीड तासाने दुसरी गाडी… सकाळी गेलेली गाडी थेट संध्याकाळी परत यायची. स्पर्धा नसल्याने गतीही नसायची. या बसवर काम करणारे ड्रायव्हर, कंडक्टर आणि क्लिनर अजूनही आठवतात. पावलो बसचा कंडक्टर ‘आदम’ आम्हाला शाळेत जाणार्‍या मुलांना खिडकीतूनही आत कोंबायचा. दरवाजावर लोंबकळणारे प्रवासी आता गोव्यात दिसत नाहीत, पण आमच्या काळात ते दररोजचे दृश्य होते. परीक्षेच्या वेळी मी एक दोन वेळा गाडीच्या शिडीवर उभा राहूनही प्रवास केल्याचं मला आठवतं. अशीच एक बस होती- ‘भूमिका.’
सकाळी सात वाजता साळ-डिचोलीहून सुटलेली ही बस मडगावपर्यंत जायची आणि संध्याकाळी परत साधारणतः सात वाजता परत गावात पोचायची. आमचं जुनं घर डिचोली तालुक्यातील साळ गावात, वडील नोकरीला कोठंबी गावात आणि आम्ही राहायचो वेळगे येथे कंपनीच्या ‘कॉर्टर्स’मध्ये.
मला कळायला लागलं त्यावेळेपासून आम्हाला गावी जाण्यासाठी जोशांची ‘भूमिका’ बस सोयीची असायची. कारण वेळगेला बसलो की थेट साळात घरासमोर उतरायचो, आणि साळात घरासमोर गाडीत बसलो की थेट वेळगेला उतरायचो. गाड्या बदलण्याची कटकट नसायची.

या बसगाडीवरील कंडक्टरचा चेहरा मला नीटसा आठवत नाही. कुणीतरी जोशांपैकीच असायचा. पण त्या गाडीवर एक क्लीनर होता, तो मात्र माझ्या स्मरणात कायम राहिला.
गावातच राहणार्‍या या क्लिनरचे नाव होते शंकर. त्याचं आडनाव काय होतं हे मला अजूनही माहीत नाही. पण गावातील लोक त्याला शंकर ठाकर म्हणायचे म्हणून त्याचं आडनाव ठाकर असावं असं मला वाटतं. तो आमच्या बाबांचा समवयस्क असावा, कारण बाबांना तो नावानं हाक मारायचा. पूर्वी वयानं थोडे मोठे असलेल्यांना भाई, भाऊ, काका असे आदराने संबोधले जायचे. आमची पिढी ही मला वाटतं शेवटची असावी. वेळगेहून साखळीत राहायला आल्यावर शेंबूड पुसणारी मुलं जेव्हा ‘गजानन’ म्हणून नावाने संबोधू लागली तेव्हा लक्षात आलं की आता काळ बदलला आहे. आईने कधीतरी सांगून ठेवलेलं- ‘हा शंकर काका.’ त्या वेळेपासून तो काका झालेला. अर्धी खाकी पँट आणि अर्ध्या बाह्यांचा शर्ट घातलेला शंकर ती गाडी पूर्ण ‘हायजॅक’ करायचा. साळातून सुटल्यावर वेळगेत पोहोचेपर्यंत वाटेत लागणार्‍या गावांतील बर्‍याच लोकांना त्याचं नाव माहीत होतं. कुणीतरी मग विचारायचे- ‘भूमिका गेली का शंकराची?’ नाहीतर ‘शंकराची बस गेली साळातली?’ असे प्रश्‍न बर्‍याचदा ऐकू यायचे. साळ गावातील लोकांसाठी बस जोशांची होती; बाहेरच्या लोकांसाठी ती शंकराची होती. जोशांची ‘भूमिका’ आमची हक्काची असायची, कारण त्यात शंकर असायचा.

लहान असताना म्हणूनच एकटा गावी जायला कधी भीती वाटली नाही. आताच्यासारखे त्यावेळी मोबाईल नव्हते, ना फोन- घरी पोहोचल्यावर सुखरूप पोचलो म्हणून सांगायला. पण शंकर बरोबर आहे म्हटल्यावर आई-वडील निवांत असायचे. एरव्हीच्या वेळी गाडीत गर्दी नसायची. पण खरी गोची व्हायची ती चतुर्थीच्या सणाच्या वेळी! चतुर्थीला आवश्यक सर्व सामान आमचे वडील वेळगेलाच विकत घ्यायचे. आणि त्याशिवाय आमच्या कपड्यांच्या बॅगा वगैरे धरून बरंच सामान व्हायचं. चतुर्थीच्या दिवसांत त्या मरणाच्या गर्दीत हे सर्व सामान घेऊन गावी जाणे म्हणजे दिव्यच असायचे. आणि हे दिव्य आम्ही पार पाडायचो ते शंकराच्या भरवशावर. भाड्याची गाडी घेऊन जाणे वगैरे प्रकार त्याकाळी नव्हते. भाड्याच्या टॅक्सी असायच्या त्या अस्नोड्याला. त्यासुद्धा मोजून दोन-तीन!
अशा या काळात शंकर आम्हाला देवदूतच वाटायचा. अर्ध्या अधिक सांडल्या-मांडल्या पोटल्या शंकरच गाडीत कोंबायचा. कधी एखादी पिशवी गहाळ झाल्याची माझ्या तरी लक्षात नाही.
शंकरला गाडीत मी शांत कधीच पाहिले नाही. सदानकदा आपला घाईगडबडीत असल्यासारखा. डाव्या हाताच्या करंगळीत त्याने शिट्टी अडकवलेली असायची, ती कायम वाजवत असायचा. गाडी थांबायच्या अगोदर लांबलचक शेट्टी मारून हा गाडीच्या दरवाजातून खाली उडी मारायचा. पुन्हा प्रवाशांच्या बाहेर असलेल्या पिशव्या आत ठेव… शंकर कायम आपला गडबडीत असायचा. वेळगेला गाडी पोचली आणि मी कधी रस्त्याच्या बाजूला उभा असलो की त्याला हाक मारायचो, ‘शंकर काका.’
मग तो विचारायचा, ‘येतय रे घरा? चल ये. म्हातारी वाट बगता!’ ‘ना… चौथीक’ मी म्हणायचं, नाहीतर ‘शिमग्याक!’
शिट्टी वाजवत मग तो ‘चल या’ असं म्हणत बसबरोबर निघून जायचा.
म्हातारी म्हणजे माझी आजी. आजी गावी असायची. आजीला बघितल्यावर तो चेष्टेने म्हणायचा- ‘म्हातारे, पैशे दवरलंय मगे साठवन बुडकुल्यान नातवांक? कितके आसत गे?’
आजी हसून म्हणायची, ‘म्हाज्याकडे ना रे बाबा. पैशे खुसले? माजे नातू हीच माजी दौलत.’
आमची आजी गावातून वेळगेला येणे ही आमच्यासाठी पर्वणी असायची. सकाळी ८.३० वाजता गाडी वेळगेच्या बसस्टॉपवर थांबली की शंकर एक एक पोटली बाहेर काढायचा. एकापाठोपाठ एक-एक पिशव्या संपतच नसत! त्याशिवाय मागच्या डिकीतून आठ-दहा फणस बाहेर काढत शंकर ‘चल या’ म्हणत शिट्टी वाजवायचा. बसगाडी निघून जायची. सर्व पोटल्या आणि फणस मोजून आजी बाजूच्या बाबा गोवेकरच्या दुकानात ठेवायची आणि दोन्ही हातांनी कमरेवर दोन पोटल्या घेऊन ती आमच्या खोलीचा रस्ता पकडायची. आजी घरात आली की आम्ही उरलेल्या पोटल्या आणायला धावत सुटायचो. कधीकधी दुरून येणार्‍या आजीला पाहिलं की ‘आवय येता!’ अशी आरोळी ठोकून धावत सुटायचं. घरी आणून कधी एकदा त्या पोटल्या सोडतो असं व्हायचं.

काय काय असायचं त्या पोटल्यांमध्ये? सुकवलेले आणि साखर लावलेले कापे फणसाचे गरे, रसाळ गर्‍यांची साठे, भाजलेले काजूगर, गर्‍याचे पापड, आंबे, त्याशिवाय नदीतल्या घुल्यांचे (शिंपल्या) सुके आणि बरोबर तांदळाचे पोळे, उकडलेली अंडी असं खूप काही…!
आजी दोन दिवस राहून परत निघायची. त्यावेळी तिला पोचवायला मी रस्त्यापर्यंत जायचो. आई आवर्जून सांगायची, आजीला नीट गाडीत बसवून ये! मी हो म्हणायचो. बस चार ते साडेचार दरम्यान स्टॉपवर यायची. पण आम्हाला ‘पेशन्स’ कुठे असायचे! आम्ही आजीला तिच्या भाषेत सांगायचो, ‘आवय, जतनाय चल हां… वयतय मगे?’
आजी म्हणायची, ‘चल तू बाबा… चल, अभ्यास कर. शंकर आसा… थारयतलो गाडी.’ आजीला वाटायचे आम्ही दिवसातले बाराही तास अभ्यास करतो! आणि दुसरी गोष्ट म्हणजे बसगाडीत शंकर आहे हा विश्वास!
आम्ही आजीला तिथेच टाकून सटकायचो खरे, पण आम्हाला ठाऊक असायचं की शंकर तिला तिथे सोडून कसाच पुढे जाणार नाही! आजी रस्त्याच्या कडेला बसून राहायची! शंकर आजीला घेऊन निघून जायचा. कधीतरी नंतर भेटल्यावर तो आमच्यावर ओरडायचा, ‘कसले रे नातू तुमी? त्या आजयेक थंयच दवरून वयतात ते? ती बापडी जायना तसल्यानी साटले-पोटले नातवांक घेवन येता आणि तुमी तीका पावंकसुद्धा येयनात?’
मी म्हणायचो, ‘शंकर काका तू आसय न्हुरे!’
‘आरे मी बगूंक ना जाल्यार ती थंयच बसान रवतली…!’
पण तसे कधीच झाले नाही. शंकरची बस आजीला सोडून कधीच गेली नाही.

असा शंकर कायम लक्षात राहणारा. पण माझ्या मनात घर करून राहायला एका प्रसंगाची भर पडली.
साधारण १९८४ च्या एप्रिलमध्ये आमची आजी वारली. त्याच वर्षी चतुर्थीच्या दिवसांत शंकर आमच्या घरी आला. आजीच्या निधनाचा विषय काढत शंकर म्हणाला, ‘नातवांवर म्हातारीचा खूप जीव होता. जायनातसल्यानी वचा पोटल्यो घेवन नातवांखातीर..!’ इतर बर्‍याच गोष्टी सुरू झाल्या. सरकारच्या कदंबा गाड्या दोनतीन वर्षांपूर्वी सुरू झाल्या होत्या. त्या सुरू करताना सरकारने खाजगी गाड्यांची कशी वाट लावली वगैरे चर्चा सुरू होती.
मी बाजूलाच उभा राहून या सर्व गोष्टी ऐकत होतो. अचानक आईनं विचारलं, ‘शंकर, घरात चण्याचो रोस केला, हाडू?’
शंकर म्हणाला, ‘नका गे. घरान गणपतीक नैवेद्य दाखंवक जायो.’
वडील म्हणाले, ‘भाव दाखयतलो… आयज गाडी बंद आसा म्हणान तू पावलो, ना जाल्या तुका वेळ आसा खंय?’ आईनेही जरा जास्तच आग्रह केला त्यामुळे शंकर म्हणाला, ‘चल दी मात्सो कट्टेन.’
मी ऐकतच राहिलो. शंकर वाटाण्याचा रस्सा करवंटीतून आणायला सांगत होता.

माझं लक्ष सहज वरच्या आडव्या पाटीकडे गेलं. त्या पाटीवर पाच-सहा काचेचे पेले ठेवले होते. मला मनापासून वाटलं शंकरने रस्सा करवंटीतून मागितला आहे. बाहेर ठेवलेल्या काचेच्या पेल्यातूनही त्याला रस्सा न देता घरातल्या एकाद्या स्टीलच्या भांड्यातून द्यावा. आई त्याला स्टीलच्या भांड्यातून नक्की देईल. कारण आई आत गेली होती.

पण झालं भलतंच. आई घरातून बाहेर न येता वडिलांची चुलती बाहेर आली. तिच्या हातात चार पुर्‍या होत्या आणि हातात वाटाण्याच्या रश्शाने भरलेली नारळाची करवंटी! मी स्तिमित होऊन पाहतच राहिलो! मोठ्यांना विरोध करायचे वळण घरी नसले तरी बर्‍यावाईट गोष्टींची जाण मला त्यावेळी होती. आजीने केलेली ती गोष्ट वाईट होती हे मला कळालं होतं. पण सर्वांसमक्ष कसा बोलणार?
शंकरने मात्र निर्विकारपणे त्या पुर्‍या करवंटीतल्या त्या रस्यात बुडवून खाल्ल्या आणि निरोप घेऊन तो उठला. बाहेर येत करवंटी डाव्या हाताने परसात भिरकावली नि सरळ निघून गेला.
माझ्या नजरेसमोर तो शंकर उभा राहिला. आजीचे सामान गाडीत भरणारा, आमच्या दहा-बारा साठल्या-पोटल्या न चुकता खाली उतरवणारा, न चुकता आजीला घरी पोहोचवणारा.
मी फणफणतच आता गेलो आणि आईवर बराच डाफरलो. आई म्हणाली, ‘गावात अशीच रीत असता.’
‘अगे पुण तो शंकर काका मगे!’
बाजूला उभ्या असलेल्या चुलत आजीने ते ऐकलं आणि म्हणाली, ‘आम्ही ठाकरांक केन्नाच आयदनांत दिवक ना. तेनी कट्टेन मागलां सामारां. मी दिलां. तू आजून भुरगो आसय, वगी राव. तुका काय कळना.’
पण माझ्या मनातली अपराधाची भावना मात्र काही केल्या जाईना. मला राहून राहून वाटत होतं, शंकरने करवंटीतून दे म्हटल्यावर मी आत जायला पाहिजे होतं. त्यानंतर शंकर भेटताच त्या गोष्टीची आठवण येऊन त्याच्या नजरेला नजर भिडवताना मला संकोच वाटायचा. कुठेतरी अपराधीपणाची भावना कायम राहिली. तो मात्र पूर्वीसारखाच बिनधास्त होता, पूर्वी वागायचा तसाच.

या गोष्टीला आता खूप वर्षे झाली पण त्या प्रसंगाने निर्माण झालेला तो सल माझ्या मनाला अजूनही वेदना देतो आहे. जातीपातीचे अवडंबर माणसा-माणसांतल्या नात्यावर कसे ओरखडे काढते याचे मूर्तिमंत उदाहरण या प्रसंगाशिवाय आणखी कुठले असणार?
मुख्य म्हणजे शंकरने तो रस्सा स्वतः मागितला नव्हता तर आईने त्याला खूपच आग्रह केल्यानंतर आपल्या मर्यादेत राहून त्याने करवंटीतून द्यायला सांगितलं म्हणून काय त्याला करवंटीतून द्यायचं? आणि तेसुद्धा शंकरला? मला जात-पात याबद्दल त्यावेळी काहीच कळत नव्हतं. पण त्या विषमतेची मला घृणा वाटू लागली. त्यानंतर शंकर वर्षभर गाडीवर कामाला राहिला असेल. नंतर ती ‘भूमिका’ गाडी बंद झाली आणि शंकरही भेटेनासा झाला. पण माझ्या मन:पटलावर मात्र शंकर कायमचा कोरला गेला!
आजही ही गोष्ट आठवली की मला प्रश्‍न पडतो, कोण मोठं? आपली मर्यादा राखून करवंटीतून रस्सा मागणारा शंकर ठाकर की त्याने मागितलं म्हणून करवंटीतून रस्सा देणारे आम्ही उच्चभ्रू?

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

- Advertisement -

ALSO IN THIS SECTION