कोणत्याही वेळी कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी एन.डी अगरवाल यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली व कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची चिन्हे दिसताच त्यांनी व्यवस्थापन ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने जिल्हा न्याय दंडाधिकारी म्हणून त्यांनी जुनीच व्यवस्था कायम ठेवण्याचा लेखी आदेश दिला व पूर्ववत स्टाफरुम उघडण्याचा आदेश देऊन सोमवार दि. १ जुलै रोजी दुपारी २.३० वा. संबंधितांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावली.
त्यानंतर साडेपाच तासांनी दुपारी २.३० वा. विद्यार्थी व शिक्षक वर्ग महाविद्यालयातून परतले. गेल्या कित्येक वर्षापासून श्रीमती पार्वतीबाई चौगुले विद्यालयाचे व्यवस्थापक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक यांच्यात वाद असून गेल्या वर्षापासून व्यवस्थापनाने उच्च माध्यमिक विद्यालय बंद करण्यासाठी शिक्षण खात्याकडे परवानगी मागितली होती. परंतु सरकारने ती न दिल्याने उच्च न्यायालयात त्या विरुद्ध याचिका दाखल केली होती. गेल्या १८ जूनला त्यावर सुनावणी होऊन बंद करावयाचे असल्यास नव्याने परवानगी घ्यावी असा सल्ला न्यायालयाने दिला. त्या अगोदर चौगुले व्यवस्थापनाने यावर्षी उच्च माध्यमिक विद्यालय बंद करण्यात येणार नाही असे प्रतिज्ञा पत्र सादर केले. उच्च माध्यमिक विद्यालय बंद करण्यात खोडा आणणार्या या शिक्षकांविरुद्ध त्यांनी कडक धोरण स्वीकारले होते. दि. २६ जून रोजी मेलवरून प्राचार्याने स्टाफरूम शनिवारपासून बदलण्याचा आदेश दिला होता. कित्येकजणांना तो मिळाला नसल्याचा दावा शिक्षक वर्गाने केला व काही शिक्षकांना तो संदेश मिळताच त्यांनी विरोध केला होता. शुक्रवारी कॉलेजची वेळ संपल्यानंतर व्यवस्थापनाने शिक्षकांच्या सर्व लॉकर्सना नवीन टाळे ठोकले व स्टाफरूमला बाहेरून टाळे ठोकून तो बंद केला. काल सकाळी शिक्षक वर्ग स्टाफरूममध्ये जाण्यासाठी निघाले असता तो बंद आढळला व तेथे कडक सुरक्षा रक्षक ठेवले होते. संतापलेल्या शिक्षकांनी प्राचार्याच्या कचेरीत धाव घेण्याचा प्रयत्न करताच सेक्युरीटीने शिक्षिका राजश्री ठाकूर हिच्या अंगावर हात टाकला व ती जखमी होऊन खाली पडली व दुसर्या शिक्षकाला मारहाण करण्याचा प्रयत्न करताच शिक्षक व विद्यार्थी गोळा झाले व त्यांनी संतापून प्राचार्याना घेराव घातला. त्यावेळी सुरक्षा रक्षक, विद्यार्थी व शिक्षकांमध्ये वादावादी झाली.
वातावरण तंग बनल्याचे समजताच व महाविद्यालयाच्या कचेरीतून फोन येताच मामलेदार त्रिवेणी वेळीप यांच्यासह पोलिस निरीक्षक सुदेश नाईक, मायणा कुडतरी पोलिस स्टेशनचे निरीक्षक कदम पोलिसांच्या फौजफाट्यासह चौगुले कॉलेजमध्ये गेले व त्यांनी सर्वत्र पोलिस संरक्षण ठेवून प्राचार्यांना संरक्षण दिले. हे वृत्त इतर विद्यार्थ्यांना समजताच उच्च माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्राचार्याच्या कचेरीबाहेर निषेध धरणे धरले. व्यवस्थापनाविरुद्ध घोषणा दिल्या व त्यावेळी मामलेदार वा पोलिसांचे म्हणणे ऐकण्याच्या तयारीत नव्हते. बराच वेळ त्यांच्याशी बोलणी करण्याच्या प्रयत्न मामलेदार त्रिवेणी वेळीप यांनी केला व पाच विद्यार्थी व ५ शिक्षकांच्या मंडळाने येऊन प्राचार्याशी बोलणी करावी व इतरांनी बाहेर रहावे असे सांगितले परंतु ऐकण्याच्या पलीकडे गेलेले विद्यार्थी बाहेर जायला तयार झाले नाही. दुसर्या बाजूने शिक्षकांची चिथावणी त्या विद्यार्थ्यांना मिळत असल्याचे दिसत होते.
दुपारी १.३० वा. जिल्हाधिकारी एन. डी अगरवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी संध्या कामत, उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नाईक घटनास्थळी पोहोचले व त्यांनी प्राचार्याच्या कचेरीत पोहोचले. काही वेळ प्राचार्याशी बोलणी केल्यानंतर स्टाफरुम पूर्ववत खुला करण्याचा आदेश प्राचार्यांना दिला. परंतु हा सर्व निर्णय व्यवस्थापनाने घेतल्याने त्याच्या आदेशाशिवाय आपण काहीच करू शकत नसल्याचे त्यांनी जिल्हाधिकार्यांना सांगितले. बराच वेळ चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकारी एन .डी अगरवाल यांनी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेत कचेरीत असलेल्या विद्यार्थी, शिक्षक व पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितले. परंतु शिक्षकांच्या आदेशानुसार काही विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकार्यांनी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला असता जिल्हाधिकार्यांनी सर्वांना बाहेर जाण्यास भाग पाडले.
त्यानंतर सरकारी अधिकार्याबरोबर प्राचार्य डॉ. रमेश गावकर यांची बैठक झाली. त्या अगोदर फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक यांनी चौगुले कॉलेजमध्ये घेतलेल्या घटनेची सर्व माहिती शिक्षण संचालकांना दिली व हंगामी मुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या आदेशानुसार ते चौगुले महाविद्यालय आले व जिल्हाधिकारी व प्राचार्याबरोबर बोलणी केली व स्टाफ रूम खुला करण्याचे आवाहन केले. परंतु व्यवस्थापन तयार नसल्याने जिल्हाधिकार्यानी आपला अधिकार तेथे वापरला व कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने महाविद्यालयातील पूर्ववत स्थिती कायम ठेवावी व तात्काळ स्टाफरूम खुला करावा तसेच सोमवार दि. १ जुलै रोजी दुपारी २.३० वा. विद्यार्थी, शिक्षक व व्यवस्थापनाच्या प्रतिनिधीची बैठक आपल्या कार्यालयात बोलावली असा लेखी आदेश त्यांनी सर्व विद्यार्थ्या व शिक्षकांसमोर जाहीर केला.
दरम्यान स्टाफरूम खुला केला तरी शिक्षक वर्गाचा प्रत्येक लॉकरला व्यवस्थापनाने नवे टाळे ठोकल्याने शिक्षकांना आपले सामान काढता आले नाही. पुन्हा शिक्षक वर्गाने जिल्हाधिकार्याकडे धाव घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन जिल्हाधिकारी अगरवाल यांनी ती सर्व ठोकलेली टाळे काढण्याचा आदेश दिला. सकाळी ९ पासून दुपारी २.३० वाजेपर्यंत तेथील सर्व वातावरण तंग बनलेले होते. कोणत्याही वेळी कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची स्थिती निर्माण झाली होती.
दुपारी १२.३० वा. मामलेदार त्रिवेणी वेळीप यांनी प्राचार्य व शिक्षकांबरोबर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. शिक्षकांचे जे म्हणणे आहे ते आपण व्यवस्थापनांना पोहोचवितो व सोमवार पर्यंत व्यवस्थापनाचा झालेला निर्णय शिक्षक वर्गाना सांगतो असे सांगितल्यानंतर विद्यार्थी व शिक्षकाने स्टाफरूम खुला करण्याची मागणी केली पण प्राचार्यानी ती मागणी धुडकावून लावली.
हा सर्व निर्णय व्यवस्थापनाचा असून आपण शिक्षक वर्गापर्यंत पोहोचविण्याचे काम केलेले आहे. सुरक्षा रक्षकांनी केलेल्या मारहाणीत राजेश्री ठाकूर जखमी झालेली असून तिला हॉस्पिसीयो हॉस्पिटलाच उपचारासाठी दाखल केले आहे. शिक्षक वर्गाचे प्रतिनिधी श्रीकांत मोरे व सौ निलम पै आंगले यांनी आपल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केले व व्यवस्थापनाकडून शिक्षक वर्गाचा छळ चालविल्याचे सांगितले.